लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : भरधाव वेगाने जाणार्‍या टँकरने धडक दिल्याने आजी आणि ५ वर्षीय नातवाचा जागीत मृत्यू झाला आहे. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे शुक्रवारी दुपारी हा अपघात घडला.

विरार पश्चिमेच्या भागात ग्लोबल सिटी परिसर आहे. या भागाला अजूनही पालिकेकडून पाणी पुरवठा न झाल्याने येथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भागात पाण्याचा टँकर आला होता. याच वेळी अमरावती यादव (५७) ही महिला तिचा ५ वर्षाचा नातू विवान यादव याला शाळेतून घेऊन येत होती. टँकर मागील बाजूने वळण घेत असताना मुलगा व आजी दोघेही टँकरच्या चाकाखाली आले. यात विवानचा जागीच मृत्यू झाला तर आजी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-राज भगतने रचला इतिहास! वसईतून स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होणारा पहिला तरूण ठरला

या घटनेनंतर टँकर चालक फरार झाला आहे. अर्नाळा सागरी पोलीस फरार टँकर चालकाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून टँकर चालकांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या महिन्यातील टँकर अपघाताची दुसरी घटना आहे. २ एप्रिल रोजी विरारच्या जकात नाका येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला टँकरने चिरडले होते यात किरण टाक (३५) या महिलेचा मृत्यू झाला होता.