वसई / विरार : अवयवदानाविषयी वाढणारी जागरूकता तसेच राज्यभरात त्यासाठी सुरु असलेले प्रयत्न यामुळे दिवसेंदिवस अवयवदानाच्या चळवळीला बळ मिळत आहे. वसई विरारमध्ये गेल्या वर्षभरात ६४ कुटुंबांकडून यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यातून अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.

दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान वसई विरार पालिकेच्या आरोग्य विभागाकडून जीवनसंजीवनी अभियान राबविण्यात आले आहे. यावेळी जनजागृतीसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शाळा आणि महाविद्यालयात चित्रकला, निबंध लेखन, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच परिचारिका आणि आशा सेविकां यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन अवयवदानाबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी अभियानात सामील झालेल्या नागरिकांनी अवयवदानाची शपथ घेतली.

सध्याच्या धावपळीच्या जगात माणसे विविध आजारांना बळी पडतात. काही वेळा अवयव निकामी होतात. काही अवयव हे निकामी झाले, तर बदलता येतात. पण काही अवयव बदलणे किंवा त्यासाठी डोनर मिळणे हे सोपे नसते. अशावेळी घरातील माणसे अवयवदानासाठी पुढे येतात. पण अनेकदा कधी रक्तगट,  कधी वय, कधी मधुमेहासारखे अनुवंशिक आजारामुळे कुटुंबातील व्यक्ती अवयवदानास अपात्र ठरतात.अशा वेळी अवयव निकामी झालेल्या व्यक्तींना दाते मिळणे कठीण होत असते. अशा वेळी अनेक अडचणी निर्माण होत असतात.

ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण असतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे, हृदय, किडनी, यकृत व इतर अवयव दान करता येतात. त्याचा वापर असे अवयव निकामी झालेल्या रुग्णांना होऊ शकतो. यासाठी समाजात जनजागृती करून अवयवदान व त्वचा दान ही चळवळ सक्रिय होत आहेत.गेल्या काही वर्षांपासून वसई विरारमध्ये अवयवदान चळवळ सुरु असून यासाठी आता अनेक कुटुंबांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरात ६४ जणांनी अवयव दान केले असल्याचे माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

वसईतील सामाजिक संस्थेचा पुढाकार

अवयवदानाच्या बाबत जनजागृती व्हावे यासाठी ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बाॅडी डोनेशन’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  पुरुषोत्तम पवार यांच्या संस्थेतर्फे गेल्या चौदावर्षांपासून यासाठी कार्य केले जात आहे. या  चळवळीला वसई विरार मधून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक कुटुंबियांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अवयव व त्वचादान केले असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.