पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होऊ लागल्याने प्रशासनाचा निर्णय

भाईंदर : गेल्या काही महिन्यांपासून मीरा-भाईंदर शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ात विविध स्वरूपाच्या अडचणी निर्माण होऊन  पाणीटंचाईची समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावत आहे. या समस्येला देण्यात येणाऱ्या अनधिकृत नळजोडण्या जबाबदार असल्याचे आरोप सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात येत असल्याने अखेर नवीन नळजोडण्यांना स्थगिती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शहरासाठी स्वतंत्र जलाशय नसल्यामुळे  स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाणीपुरवठय़ावर अवलंबून राहावे लागते. यात स्टेम प्राधिकरणकडून ८६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो आणि  एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. जलवाहिनी फुटणे व पाणीकपात होणे अशा समस्या निर्माण होत असल्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी पालिका प्रशासनाकडून राज्य शासनाकडे करण्यात येत आहे. त्याच प्रकारे मोठय़ा प्रमाणात देण्यात येणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्यादेखील रद्द करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रशासनाजवळ करण्यात येत आहे.  कमी दाबाने पाणीपुरवठा होणे व पाणीपुरवठय़ाच्या वेळेत वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त दिलीप ढोले यांनी नळ जोडणीसाठी प्रलंबित अर्जाना मंजुरी देऊ नये तसेच अतिरिक्त पाण्याचा साठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत नवीन नळजोडणी देण्यास स्थगिती देण्यात यावी असा आदेश जारी केला आहे. अतिआवश्यक बाब असल्यास नळजोडणीला आयुक्तांच्या परवानगीने मंजुरी मिळेल, असे नमूद केले आहे.

तब्बल दहा हजार नळजोडण्या बेकायदेशीर!

पालिका प्रशासनाने आतापर्यंत एकूण ४३ हजार ६१८ नळजोडण्या दिल्या आहेत. यात २०१७ पूर्वी ३३ हजार ८९३ नळजोडण्या देण्यात आल्या होत्या. केवळ २०१७ नंतर म्हणजे अवघ्या चार महिन्यांत ९ हजार ७२५ दिल्या आहेत. त्यामुळे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध झाला नसताना पालिकेतील सत्ताधारी पक्षाने बेकायदा नळजोडण्या दिल्या असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. हे काम पालिकेतील पाणीपुरवठा विभागात मेस्त्री पदावर काम करत असलेल्या संजय सोनवणे या कर्मचाऱ्याकडून होत असल्याचा आरोप आ. प्रताप सरनाईक यांनी केला.