वसईतील खुल्या मैदानातील अनेक लग्न सोहळे रद्द करण्याची वेळ

वसई : बुधवारी पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका लग्न सोहळ्यांना बसला. खुल्या मैदानात आयोजित लग्न सोहळे रद्द करावे लागल्याने आयोजक आणि कॅटरिंगसह, मंडप आणि सजावट व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर लग्न सोहळ्यांना सुरुवात झाली होती. बुधवार १ डिसेंबर या दिवशी मुहूर्त असल्याने अनेक लग्नांचे आयोजन  होते. मंगल कार्यालयातील बंदिस्त सभागृहातील लग्ने कशीबशी पार पडली. मात्र खुल्या मैदानातील शाही लग्न सोहळ्यांचा बोजवारा उडाला. नायगाव येथील नितीन ठाकूर यांच्या मुलाचे बुधवारी लग्न होते. त्याचा स्वागत समारंभ पापडी येथील मैदानात होता. मात्र पावसामुळे तो रद्द करावा लागला.  मुलाचे लग्न पार पडले  तरी स्वागत समारंभ पावसात करणे शक्य झाले नाही. त्यामुळे  समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. वसईच्याच संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या प्रांगणातील एक लग्न सोहळाही  रद्द करावा लागला. यामुळे कॅटरिंगचालक, मंडप सजावट, फुलवाले यांना मोठा आर्थिक फटका बसला. वाजंत्री पथकांचे पण नुकसान झाले. आम्हाला लग्नाच्या आदल्या दिवसापासून जेवणाचे साहित्य आणून तयारी करावी लागते. ऐनवळी पावसामुळे लग्न रद्द झाल्याने सर्व साहित्य वाया जाणार आहे, असे वसईतील एका कॅटरिंग चालकाने सांगितले. खुल्या मैदानात उभारलेला मंडप आणि महागडे साहित्य पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.

ज्या बंदिस्त मंगल कार्यालयात लग्न सोहळे पार पडले त्यांना देखील पावसामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पावसामुळे पाहुण्यांची संख्या देखील रोडावली होती.

भर पावसात शुभमंगल

पावसामुळे अनेक ठिकाणी  मंडपाऐवजी घराच्या ओटय़ावर मंगलाष्टकांचा आवाज निनादला. लग्नसोहळ्यासाठी नटूनथटून तयार झालेल्या मंडळींना नवीन कपडे भिजवत आशीर्वाद द्यावा लागला.   पाहुणचार करताना यजमानांची दमछाक झाली. ग्रामीण भागात वाजंत्री शेजारील एका घराच्या ओटय़ावर भटजी व वधुवर एकीकडे तर वऱ्हाडी तिसरीकडे असे चित्र होते.