९ वर्षांत ५८२ शस्त्रक्रिया, योजनेसाठी ८ पथके कार्यरत 

विरार : शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत वसईत मागील ९ वर्षांत ५८२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत हृदय शस्त्रक्रिया झाल्या असून ४२१ इतर सामान्य शस्त्रक्रिया केल्या आहेत. करोनाकाळात शाळा आणि अंगणवाडय़ा बंद असल्याने या योजनेअंतर्गत शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी झाले होते; परंतु करोना प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा या योजनेला गती दिली जात आहे. राज्य शासनाकडून ग्रामीण रुग्णालयामार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गत वयोगट ० ते १८ मधील मुलांतील जन्मजात व्याधीचा शोध घेतला जातो. हृदयाला छेद असणे, ओठ-टाळू दुभंगलेले, खुबा सरकणे, पाय वाकडे असणे, जन्मजात श्रवणदोष, रक्ताचा अ‍ॅनिमिया अशा ३२ व्याधींवर मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतील वैद्यकीय अधिकारी विविध अंगणवाडी आणि शाळा यांना भेटी देऊन अशा मुलांचा शोध घेतात. व्याधिग्रस्त मुलांना त्यांच्या पालकांच्या मदतीने मुंबईतील जेजे रुग्णालय, कोकिळाबेन रुग्णालय, ज्युपिटर रुग्णालय, नायर रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जाते. तसेच सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.

मागील दोन वर्षांपासून करोनाकाळात शाळा आणि अंगणवाडय़ा बंद असल्याने या योजनेचा कोणताही लाभ नागरिकांना देता आला नाही, परंतु सन २०२१-२२ मध्ये पुन्हा या योजनेअंतर्गत हृदयाच्या १२ व इतर १७ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सध्या वसईत या योजनेची ८ पथके कार्यरत असून त्यात १ अधिकारी आणि ३ कर्मचारी कार्यरत आहेत. या योजनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मुंडे यांनी माहिती दिली की, करोनाकाळात मोठय़ा प्रमाणात स्थलांतरण सुरू आहे. यामुळे बालकांचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी आम्ही काही सामाजिक संस्थांची मदत घेत आहोत. या योजनेसाठी अत्यल्प कागदपत्रे लागत असल्याने लाभ मिळणे सोपे आहे. यामुळे आपल्या मुलामध्ये अशा प्रकारचा दोष असल्यास नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.