वसई: वसई-विरार शहरातली रिक्षाचालकांनी अचानकपणे भाडय़ात वाढ केली आहे. नव्या भाडेवाढीनुसार किमान भाडे हे ३५ रुपये करण्यात आले आहे. तर शेअर रिक्षाचे किमान भाडे हे १५ रुपये करण्यात आले आहे. पेट्रोल महाग झाल्याने दरवाढ केल्याचे रिक्षा संघटनांनी सांगितले आहे. मात्र वसईतील बहुतांश रिक्षा या सीएनजीवर चालणाऱ्या असूनही त्यांनी ही भाववाढ केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
वसई-विरार शहरातील नागरिक रिक्षाचालकांच्या मनमानीपणाच्या कारभारामुळे त्रस्त आहेत. करोनाकाळात रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून मोठी लूट केली होती. आता रिक्षासंघटनांनी आपल्या भाडय़ात वाढ केली आहे. नवीन दरपत्रकानुसार भाडय़ात ५ ते १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शेअर रिक्षामधील किमान भाडे हे १० रुपयांऐवजी १५ रुपये तर विशेष भाडे किमान ३० रुपयांवरून ३५ रुपयांवर करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी विशेष भाडे हे ४० ते ८० रुपये एवढे वाढविण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आधीच रिक्षाचालक करोना काळात निर्बध शिथिल असतानाही केवळ दोन प्रवाशी बसवून प्रत्येकी ४० रुपये घेत होते. आता त्यांनी अचानकपणे अवाच्या सवा भाडेवाढ केली आहे, असे रोहिणी पाटील या महिला प्रवाशाने सांगितले. या भाडेवाढीसंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही
पेट्रोल दरवाढीमुळे भाडेवाढ केल्याचा दावा
पेट्रोलच्या किमती वाढल्याने आम्हाला भाडेवाढ करावी लागली असे रिक्षा संघटनांनी सांगितले. वसईतील बहुतांश रिक्षा या सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. तरी देखील पेट्रोल भाववाढीचे कारण सांगून दरात वाढ करण्यात आली आहे. वसईती सीएनजी पंप लांब असून त्यात ये-जा करण्यात वेळ आणि इंधन खर्च होते. प्रत्येक रिक्षाचालकाला विमा, परवाना नूतनीकरण, पीयूसी तसेच रिक्षा विकत घेताना वस्तू सेवा कर यासाठी मोठा खर्च होतो. वर्षांला प्रत्येक रिक्षाचालकांला या विविध करापोटी २५ हजार रुपये भरावे लागतात. २०१७ नंतर प्रथमच ही भाडेवाढ केल्याचे रिक्षा संघटनेचे नेते विजय खेतले यांनी सांगितले.