सुहास बिऱ्हाडे

टाळेबंदीनंतर ऑनलाइन असणे हा जीवनाचा अविभाज्य भाग बनू लागला. अगदी लहान मुलांच्या हातातही मोबाइल, लॅपटॉप आला आणि ते अमर्यादित वायफायच्या माध्यमातून आभासी जगताशी जोडले गेले. अनेक धोके थेट घरात शिरले. विविध समाजमाध्यमांद्वारे आकर्षण, प्रेम, भूलथापा, आश्वासने देऊन फसवणुकीचे प्रकार वाढले. वयात येणाऱ्या किशोरवयीन मुली त्याला बळी पडू लागल्या. मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात विनयभंग, बलात्कार तसेच लैंगिक छळवणुकीच्या प्रकारांचा उगम हा आभासी जगातून होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Big fluctuations in the shares of two private sector banks in the capital market
बँकांच्या भागधारकांना अनोखी अनुभूती; कुणा वाट्याला आनंद, कुणा पदरी दुःख!
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

महिलांवरील अत्याचार हा संवेदनशील विषय आहे. त्यात वाढ होणे हेदेखील नवीन नाही. मात्र आता या अत्याचाराचे उगम ऑनलाइनच्या आभासी विश्वातून होत असल्याचे समोर आले असल्याने चिंता वाढली आहे. मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने नुकताच  २०२१ च्या गुन्हेगारीचा आलेख असलेला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात महिलांवरील लैंगिक अत्याचारात कमालीची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. आकडय़ांच्या भाषेत सांगायचे झाले, तर २०२१ या वर्षांत २९२ बलात्कार, ५०२ अपहरण, ४१४ विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या अर्थात पोक्सोअंतर्गत २७२ गुन्हे दाखल झाले आहेत. मुलींवर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार करणारे कोण आहेत हे पाहिल्यानंतर जे समोर आले ते धक्कादायक होते. लैंगिक छळाच्या बहुतांश प्रकरणांतील आरोपी हे आंतरजालाच्या आभासी विश्वातून विविध समाजमाध्यमांद्वारे आलेले असतात.  या समाजमाध्यमांद्वारे होणारी फसवणूक हा एक ज्वलंत सामाजिक प्रश्न बनत चालला आहे.

गेल्या काही वर्षांपासून दैनंदिन वापरात आंतरजालाचा वापर वाढला. त्यात विविध समाजमाध्यमे आली. करोनाच्या काळात तर शिक्षणापासून कामापर्यंत ऑनलाइन वापराशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे अजाणत्या वयात मुला-मुलींच्या हातात मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप नामक उपकरणे आली. त्याद्वारे अल्पवयीन मुली आभासी जगतात रमू लागल्या आणि त्यामुळेच आभासी जगतातील ‘खलनायक’ घराच्या उंबरठय़ावर येऊ लागले. कोण आहेत हे खलनायक? तर आभासी जगातून विविध माध्यमांतून विविध रूपांतून ते मुलींना जाळय़ात ओढणारे विकृत आहेत. कधी फेसबुक, इन्स्टाग्रामवर बनावट आयडी (ओळख) तयार करून अल्पवयीन मुलींशी संपर्क करायचा; कधी मैत्रीचे, कधी प्रेमाचे नाटक करून, तर कधी नोकरीचे, मॉडेलिंगचे ऑफर देऊन जाळय़ात ओढायचे. त्यानंतर मग अश्लील चॅट करण्यास भाग पाडायचे त्या चित्रफिती आणि छायाचित्रांच्या आधारे मग ब्लॅकमेल करून खंडणी उकळायची असे प्रकार वाढले आहे. आता प्रत्यक्षात रस्त्यात गाठून विनयभंग न करता ऑनलाइनच्या माध्यमातून विनयभंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांकडे केल्या जाणाऱ्या  तक्रारींचे प्रमाण एक टक्काही नाही. बदनामीपोटी तसेच भीतीपोटी अनेक मुली तक्रारीच देत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या आभासी जगतामुळे मुलांपुढे किती मोठे धोके निर्माण केले आहेत, या भीषणतेची कल्पना यावी.

वायफायच्या घरात मुली असुरक्षित

पूर्वी ७ च्या आत मुली घरात आल्या की सुरक्षित मानल्या जात होत्या. त्या वेळी आंतरजाल (इंटरनेट), समाजमाध्यमे नव्हती. फार तर दूरध्वनी असायचा. त्यामुळे मुलगी घरात एकटी असली तर बाहेर गेलेले पालक निश्चित असायचे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मुलांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली तसेच कामानिमित्त पालक दिवसभर बाहेर असतात. मुलांकडे मोबाइल असतो आणि वायफायमुळे ते आभासी जगाशी जोडले जातात.  पालक बाहेर असले आणि घरात वायफाय असल्यावर मुली एकटे असणे चिंताजनक आहे. आता घरात वायफाय असलेली मुलगी सुरक्षित नाही अशी वेळ आली आहे. कारण ती आंतरजालाच्या माध्यमातून अनोळखी आभासी जगात जोडली जाते.  किशोरवयीन मुले-मुली स्वप्नाळू असतात. त्यांना आकर्षण असते. आपल्या आयुष्यात एखादा नायक असावा अशा स्वप्नरंजनात ते असतात. मात्र बाहेरच्या जगातील अपप्रवृत्तीबद्दल ही मुले अजाण असतात आणि प्रलोभनाला बळी पडत असतात. त्यामुळे आभासी जगातून नायकाऐवजी विविध खलनायक तिच्या आयुष्यात येतात. मैत्री, प्रेमाच्या नावाखाली या मुलींचे आर्थिक आणि लैंगिक शोषण करत असतात. मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे आभासी जगातील हे खलनायक कधी मित्र बनून, कधी प्रियकर बनून, कधी कुठले तरी आमिष दाखवून आलेले असतात. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.

मुली का पळून जातात?

अल्पवयीन मुली घरातून पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत आणि तो एक सामाजिक प्रश्न बनला आहे. २०२१ मध्ये शहरातून एकूण ५२२ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली होती. त्यात ४२० मुली आणि १०२ मुलांचा समावेश होता. यापैकी ९२ मुले आणि ३५१ मुली यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र अद्यापही ७५ बेपत्ता मुलामुलींचा शोध लागलेला नाही. यामध्ये ९० टक्के मुली या प्रेमप्रकरणातून पळून जात असल्याचे समोर आले आहे. या मुली घरात असतात. मग कोण त्यांना फूस लावतं? त्या पळून का जातात ? याचे उत्तर शोधले तर या आभासी जगात आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर भेटलेल्या अनोळखी लोकांच्या प्रेमात पडून मुली त्यांना भुलतात आणि मग घरातून पळून जात आहेत. समोरचा व्यक्ती कोण आहे, तो खरा आहे की खोटा याची कल्पना नसते. मात्र आभासी जगात मुली वरवर दिसणाऱ्या नकली विश्वाला भुलतात आणि फसतात. मीरा-भाईंदर वसई-विरार शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दररोज ३ ते ४ अल्पवयीन मुलेमुली घर सोडून पळून जात असतात. आभासी जगातून जेव्हा वास्तवाची जाणीव होते तेव्हा या खलनायकांचा बुरखा फाटलेला असतो, मात्र वेळ हातातून निघून गेलेली असते.

बलात्काराची वाढती प्रकरणेदेखील चिंतेची बाब बनत चालली आहे. समाजमाध्यमाद्वारे अवघ्या काही दिवसांची, महिन्यांची ओळख होते आणि मग थेट भूलथापा देऊन शरीरसंबंधास भाग पाडले जाते. कधी फसवून, कधी ब्लॅकमेल करून, मग कधी खोटी आश्वासने देऊन. प्रेमसंबंधातील नाजूक क्षणांचे छायाचित्र आणि चित्रफिती तयार करून मग त्याआधारे पुन्हा ब्लॅकमेलिंग केले जात आहे. पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अहवालात अशा घटना मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहेत. २०२१ या वर्षांत बलात्काराच्या २९२ घटना घडल्या आहेत. यातील पीडित महिलांच्या परिचयाच्या लोकांचा समावेश जास्त आहे. म्हणजे २९२ बलात्काराच्या प्रकरणांमध्ये केवळ ३ प्रकरणांत आरोपी अनोळखी आहेत. म्हणजे इतर सर्व आरोपी ओळखीचे आहेत. आकडेवारीनुसार बलात्काराच्या ३९२ प्रकरणांत ओळखीचे १००, मित्र १२३, शेजारी २३, कुटुंबीय ८२ असे प्रमाण आहे. व्यस्त पालक, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुलांशी होणारा संवाद खुंटला आहे. लहान मुलींना समाजमाध्यमाच्या धोक्यांपासून सावध करण्याची वेळ आली आहे. आभासी जग आणि वास्तवाचे जग याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. नाही तर आभासी जगातील खलनायक तुमच्या घराचेही दार ठोठावल्याशिवाय राहणार नाही.