दिवाळीच्या खादाडीपूर्वीच ‘डिटॉक्स’ नोंदणीकडे कल

वर्षांतून एकदा बनणाऱ्या फराळाच्या पदार्थासह विविध प्रकारच्या मिठाया आणि चॉकलेट यांच्या सेवनावर ठरवूनही नियंत्रण आणणे कठीण जाते.

अतिखाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांची खबरदारी; आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी पूर्वनोंदणी

सुहास बिऱ्हाडे

वसई : दिवाळीच्या दिवसांत खादाडीलाही मर्यादा नसते. वर्षांतून एकदा बनणाऱ्या फराळाच्या पदार्थासह विविध प्रकारच्या मिठाया आणि चॉकलेट यांच्या सेवनावर ठरवूनही नियंत्रण आणणे कठीण जाते. अशा अतिखाण्याचे दुष्परिणाम आरोग्यावर दिवाळीनंतर दिसू लागतात. म्हणूनच की काय, दिवाळीनंतर शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अर्थात ‘डिटॉक्स’साठी नागरिक दिवाळीपूर्वीच खबरदारी घेऊ लागले आहेत. अनेक आहारतज्ज्ञ, आयुर्वेद-पंचकर्म तज्ज्ञ, वेलनेस सेंटर येथे दिवाळीनंतरच्या सल्ल्यांसाठी आगाऊ नोंदणी होत आहे.

मागील वर्षी करोनामुळे दिवाळीवर र्निबध होते. मात्र यंदा अनेक र्निबध शिथिल झाल्यामुळे दिवाळी मोठय़ा उत्साहात साजरी होत आहे.  त्यात यंदा हॉटेल – रेस्टॉरंट्सदेखील पुर्ण वेळ सुरू झाली आहेत, लशींच्या दोन मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवासाचे तिकीटही मिळणार आहे, म्हणजेच यंदा दिवाळी पार्टी अगदी जोरात होणार यात काही शंकाच नाही. दिवाळी सेलिब्रेशन म्हणजे खवय्येगिरी हे समीकरण ठरलेले आहे. फराळ, मिठाई, चमचमीत जेवण यामुळे अतिखाणे होते. यामुळे पित्त, अपचन, वात तसेच वजन वाढणे, सुस्ती येणे, चरबी वाढणे अशा शारिरीक तक्रारी उद्भवतात. दिवाळीतील अतिखाण्यामुळे होणाऱ्या शारिरीक तक्रारी टाळण्यासाठी अनेकजण ‘डिटॉक्स’ करतात. आहार नियोजक, आहार व्यवस्थापक, आहारतज्ज्ञ यांच्याकडून ‘डिटॉक्स प्लॅन’ बनवून घेत असतात.

 यंदा ‘डिटॉक्स थेरपी’ साठी वेलनेस सेंटर, आयुर्वेदिक सेंटर, आहारतज्ज्ञ यांच्याकडे आगाऊ नोंदणी (प्री- अपॉइन्मेंट) घेतली जात आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारपासूनच नागरिकांनी अपॉइन्मेंट घेतल्या आहेत. ‘दिवाळीच्या पुढच्या आठवडय़ाअखेपर्यंतची नोंदणी आधीच झाली आहे. या सर्व सल्लाभेटी ‘डिटॉक्स’साठीच आहेत,’अशी माहिती ‘डाएट क्लिनिक’च्या संचालिका आणि आहारतज्ज्ञ शीला शेहरावत यांनी दिली.

‘ करोनामुळे नागरिकांमध्ये स्वत:च्या आरोग्याबाबत जनजागृती झाली आहे. त्यामुळे नागरिक आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागले आहेत. यामुळेच यंदा दिवाळी डिटॉक्स करण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. मागील वर्षभरापासून ऑनलाइन ( आहार मार्गदर्शन) डाएट कन्सल्टन्सी वाढली आहे. त्यामुळे नागरिक ऑनलाईन दिवाळी डिटॉक्स प्लॅन आहार सल्लागारांकडून दिवाळीपूर्वीच बनवून घेत आहेत. मागील आठवडय़ापासून दिवसाला जवळपास सरासरी २५ ते ३० जण डिटॉक्स प्लॅन बनवून घेताना दिसत आहेत,’ असे ‘वेलनेस कोच’ अजिंक्य सावंत यांनी सांगितले.

स्पा रिसॉर्टनाही मागणी

दिवाळीनंतरच्या सुट्टीत पर्यटनाचे बेत आधीच आखले जातात. मात्र, शारीरिक तंदुरुस्तीबाबत सजग झालेले अनेक नागरिक पर्यटनासोबत आरोग्यालाही महत्त्व देत आहेत. त्यामुळे स्पा, पंचकर्म, हर्बल स्पा, मेडिटेशन अशा सुविधा पुरवणाऱ्या हॉटेल आणि रिसॉर्टकडे अधिक ग्राहक वळत आहेत, अशी माहिती ‘टूर प्लस’चे संचालक अमित दोशी यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Trend towards detox registration diwali yah

Next Story
चंद्रपाडा- वाकीपाडय़ातील पाणीप्रश्न मार्गी
ताज्या बातम्या