अंबरनाथ शहर पिछाडीवर, बदलापूरला खासगी लसीकरणाचा आधार

अंबरनाथ : देशभरात सात महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत उल्हासनगर, बदलापूर या शहरांनी आघाडी घेतली आहे. उल्हासनगर शहरात २६ जुलैपर्यंत तब्बल ९५ हजार ५६२ नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर बदलापूर शहरात आतापर्यंत ८१ हजार ६७६ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आरोग्य सुविधा उभारण्यात आघाडीवर असलेल्या अंबरनाथ शहरात मात्र अवघ्या ३४ हजार २४ नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणात उल्हासनगर आणि बदलापूर शहराने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

जानेवारी महिन्यात देशभरात लसीकरणाची सुरुवात करण्यात आली होती. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, करोनाच्या संकटात आघाडीवर असलेले कर्मचारी यांना लस देण्यात आली होती. कालांतराने सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आली होती. राज्यात सातत्याने लशीचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे अनेकदा शासकीय लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ येते आहे. गेल्या दोन महिन्यांत लशींचा तुटवडा मोठय़ा प्रमाणावर जाणवला. मात्र लशींचा तुटवडा असतानाही उल्हासनगर, बदलापूर यांसारख्या शहरांमध्ये लसीकरणाने एक सकारात्मक टप्पा गाठल्याचे दिसून आले आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात २६ जुलैपर्यंत ९५ हजार ५६२ नागरिकांना लशीचे डोस देण्यात आले होते. त्यात १९ हजार ३३१ नागरिकांना लशींचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर ७६ हजार २३१ नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यात सर्वाधिक ९१ हजार ५१९ लशींचे डोस हे कोव्हिशिल्डचे असल्याची माहिती पालिकेच्या लसीकरण विभागाने दिली आहे. पालिकेच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असली तरी लशीच्या तुटवडय़ात ही लसीकरण आकडेवारी समाधानकारक मानली जाते आहे. तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत ८१ हजार ६७६ नागरिकांना लस देण्यात आली आहे. यातील ६८ हजार १७६ लशींचे लाभार्थी हे शासकीय रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांवरचे आहेत, तर १३ हजार ५०० नागरिकांनी खासगी लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून लस घेतली आहे. अंबरनाथ शहरात आतापर्यंत ३४ हजार २४ नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यात २४ हजार ७६६ नागरिकांना लशीचा पहिला डोस तर ९ हजार २५८ नागरिकांना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

लसीकरण केंद्रांची संख्या

उल्हासनगर आणि बदलापूर शहरांत सुरुवातीपासून लसीकरण केंद्रांची संख्या एकपेक्षा अधिक होती. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात एका वेळी ९ लसीकरण केंद्रे सुरू होती. कालांतराने लशींअभावी त्यांची संख्या ६ वर आली आहे. तर बदलापूर शहरात तीन शासकीय लसीकरण केंद्रे आहेत. त्यासोबतच एक खासगी लसीकरण केंद्र आहे. बदलापूर शहरात राजकीय पक्षांनी लसीकरण मोहीम सशुल्क राबवून मोठय़ा संख्येने लस उपलब्ध करून दिली. त्यामुळे बदलापुरात उल्हासनगरपाठोपाठ लशीचे डोस सर्वाधिक देण्यात आले आहेत. त्याचा नागरिकांनाही फायदा झाला आहे. अंबरनाथ शहरात सुरुवातीच्या काळात अवघे एक लसीकरण केंद्र होते. त्यानंतर कै. बी. जी. छाया रुग्णालयात दुसरे लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. शहरात चार खासगी लसीकरण केंद्रे मंजूर असून त्यापैकी एक केंद्र शहराबाहेर सुरू आहे. त्यामुळे अंबरनाथमधील लसीकरण थंडावले आहे.