कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बेवारस वाहने हटविण्यास सुरुवात

वसई : मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात बेवारस वाहनांचा प्रश्न जटिल बनला आहे. या बेवारस वाहनांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडत असल्याने अशी बेवारस वाहने वाहतूक पोलिसांनी हटविण्यास सुरुवात केली आहे. वर्षभरात १४६ बेवारस वाहने ही वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहेत.

वसई विरार शहरात अनेक ठिकाणच्या रस्त्यावर बेवारस वाहने उभी करून ठेवली आहेत.वर्षांनुवर्षे वर्षे ही वाहने एका जागीच उभी राहत असल्याने समस्या निर्माण होत असतात. अशा वाहनांमुळे वाहतुकीला अडथला निर्माण होत असतो.  तर दुसरीकडे या वाहनांचा गैरवापर होण्याचीशी शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वाहने ही तशीच पडून असल्याने अशा वाहनांत आजूबाजूच्या भागातील लहान मुले ही खेळण्यास जात असतात त्यामुळेही एखादी दुर्घटना होण्याची शक्यता असते.

यासाठी ही बेवारस वाहने बाजूला करण्यात यावी अशी मागणी सातत्याने नागरिकांमधून करण्यात येत होती. परंतु वाहतूक पोलिसांना सुरवातीला ही वाहने ठेवण्यासाठी जागा नसल्याने ही वाहने उचलण्यास अडचणी येत होत्या. पालिकेने आता आचोळे या भागात वाहने ठेवण्यासाठी तात्पुरता स्वरूपाची जागा दिली आहे. त्याठिकाणी ही बेवारस वाहने उचलून ठेवली जात असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

वर्षभराच्या कालावधी मध्ये  शहरातील १४६ वाहने जप्त करून त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यातील ३२ वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन ती परत केली आहेत. तर अजूनही ११४ बेवारस वाहने ही पडून आहेत. ६९ वाहनांचा योग्य रित्या शोध लागत नसल्याने त्याची माहिती काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

जागेच्या अडचणी कायम

वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली वाहने व बेवारस वाहने ठेवण्यासाठी पालिकेने आचोळे येथील जागा वाहतूक विभागाला उपलब्ध करून दिली आहे. परंतु त्या जागेत आता नव्याने रुग्णालय तयार होणार असल्याने तेथील वाहने हटविण्यास सांगण्यात आले असल्याचे वसई वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांनी सांगितले आहे. सध्या जी जागा आहे त्याच्या वरच्या भागात मोकळय़ा जागेत वाहने ठेवण्यास तात्पुरता सोय झाली आहे. मात्र कायमस्वरूपी जागा उपलब्ध झाली नसल्याने वाहने ठेवण्याच्या संदर्भातील अडचणी कायम आहेत.