विरार : वसई-विरार शहरात मागील दोन दिवसांपासून पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. मागील  वर्षांपासून पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. ग्रामीण भागातील भातशेती आटोपली असली तरी मात्र झोडपणीचे कामे बाकी असल्याने पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे.

वसई-विरारमध्ये मंगळवार आणि बुधवारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या वसईच्या विविध ठिकाणच्या भागात मोठय़ा प्रमाणात खरीपाची लागवड करण्यात आली आहे. भातपिकांच्या कापणीला वसईच्या पूर्वेतील भागांत सुरुवात झाली होती. कापणी केलेली पिकांची कणसे चांगल्या प्रकारे वाळविण्यासाठी शेतात ठेवण्यात आली होती. त्यानंतर या कणसाचे भारे तयार करून ठेवण्यात येणार होते.परंतु पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणी करून ठेवण्यात आलेले सर्व पीक भिजून गेले आहे.

वसई पूर्वेतील विशेष करून कामण, पोमण, नागले, मोरी यासह इतर ठिकाणच्या भागात याचा मोठा फटका बसल्याचे तर विरार पूर्वेला सिरासाड, पोमण, शिवणसई भागातही  नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागील वर्षीसुद्धा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अशीच दाणादाण उडविली होती. यावर्षीसुद्धा पुन्हा तसेच चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे आता कापणी केलेल्या भात पिकांची कणसे पाण्यातून उचलून शेताच्या बांधावर नेऊन ठेवण्याचे काम सुरू केले आहे. लागवडीपासून ते भात कापणीसाठी केलेला खर्च ही वाया गेला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. आता ही भिजलेली  कणसे उचलून जे काय उत्पादन मिळेल त्यावरच आता अवलंबून आहोत. त्याचबरोबर इतर पिकांवरही याचा परिणाम झाला असल्याचे दिसत आहे.

रब्बीच्या हंगामात कमी पावसात घेतली जाणारी द्विदल पिकांचे सुद्धा मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे या पिकांना आवश्यक असलेला बहर येणार नसल्याने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचेसुद्धा नुकसान झाले आहे. शेतकरी अवकाळी पावसामुळे वारंवार संकटात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.