१८ वर्षांवरील सात लाख ९९ हजार ५६१ जण लसीकरणासाठी पात्र

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत सव्वातीन लाख नागरिकांनी लसीकरण पूर्ण झाले आहे. या नागरिकांनी  लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेला लशींच्या प्राप्त मात्रांनुसार लसीकरणाचे सत्र आयोजित करून अधिकाधिक लाभार्थ्यांना लस देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना लशीचे दोन्ही मात्रा देण्याकडे वैद्यकीय विभागाकडून विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाने लसीकरणासाठी शहरातील १० लाख इतकी लोकसंख्या गृहीत धरली असून त्यापैकी १८ वर्षांवरील सात लाख ९९ हजार ५६१ लाभार्थ्यांना लसीकरणासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या सुमारे १० आरोग्य केंद्रांमधून ४२४ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.  लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याकरिता त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला जात आहे.

ज्यांच्या मनात अद्यापही लस घेण्याबाबत गैरसमज आहेत असा लाभार्थ्यांशी पथकातील कर्मचाऱ्यांकडून संवाद साधण्यात येत आहे. या मोहिमेतील पथकासोबत वैद्यकीय विभागाचे लसीकरण पथक नेमण्यात आले असून त्यांच्याद्वारे गृहसंकुले, औद्योगिक क्षेत्रांमध्ये लसीकरणापासून वंचित असलेल्या १८ वर्षांवरील लाभार्थ्यांना पहिली तसेच दुसरी मात्रा दिली जात आहे. यासह पालिकेच्या सर्व सहा प्रभाग समिती कार्यालयांमधून मोबाइल लसीकरण व्हॅनच्या पथकामार्फत दुकाने, हॉटेल्स, मॉल, कॉल सेंटर, बँक आदी आस्थापनांमधील लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा आढावा घेऊन लसीकरणापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांचे तात्काळ लसीकरण केले जात आहे. यानुसार आत्तापर्यंत पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या ६ लाख २ हजार ७०३ इतकी झाली असून पहिला व दुसरा असे दोन्ही मात्रा घेतलेल्यांची संख्या ३ लाख २७ हजार २०१ पर्यंत झाली आहे. तर लशीच्या एकूण ९ लाख २९ हजार ९०४ मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लसीकरण सत्राच्या आयोजनाची माहिती पालिकेकडून आदल्या दिवशी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात असून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी तात्काळ लस घेऊन शहराला कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून दूर ठेवावे, असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी वंचित लाभार्थीना केले आहे.

कठोर निर्बंध

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र न बाळगणाऱ्या नागरिकांना   मॉल, बाजार पेठ तसेच परिवहन बस सेवेत प्रवास करण्यास मनाई करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर शहरात  जागोजागी लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र तरी देखील अनेक नागरिक अदयापही लसीकरण करण्यास नकार देत असून सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरण झालेल्यांनी प्रमुख्याने सार्वजनिक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

लसीकरण न करणाऱ्या नागरिकांची वेळोवेळी करोना चाचणी करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी दिली. शहरात करोना नियमांचे उल्लंघन करत विनामास्क फिरणे, गर्दी करणे तसेच आस्थापाना अधिक काळ सुरु ठेवणाऱ्यावर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईनुसार आतापर्यंत पालिका प्रशासनाने ८६ लाख १६ हजार ९०२ रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली आहे.