वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गावर सापडलेल्या एका अनोळखी तरूणाच्या हत्येची उकल करण्यात पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. या मयताच्या खिशात सापडलेल्या एका चिठ्ठीवरून पोलिसांनी गुगलच्या मदतीन शोध घेत आरोपीचा माग काढला

शुक्रवार १० मे रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सोपारा फाट्यावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता त्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती. पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पोलिसांना मयत तरुणाच्या खिशात पोलिसांना एका चिठ्ठी सापडली. त्यावर ‘एस्सेल’ असे नाव होते. तेवढ्या एका दुव्यावरून पोलिसांना मयताची ओळख पटवून हत्येचा तपास करायचा होता.

हेही वाचा…पत्नीची छेड काढत असल्याने मित्राची हत्या, विरार पोलिसांनी केली आरोपीला अटक

..अशी पटली ओळख

‘एस्सेल’ नावावरून काहीच बोध होत नव्हता. मग पेल्हार पोलिसांनी त्या चिठ्ठीवरील ‘एस्सेल’ नावाचा गुगलवरून शोध घेतला. तेव्हा विविध संकेतस्थळांची नावे समोर आली. त्यात एक नाव मानखुर्द येथील एका स्टुडियोचे होते. या स्टुडियोतून सिनेमासाठी ज्युनिअर आर्टीस्ट पुरवले जात होते. पोलिसांनी त्या स्टुडियोला भेट दिली. तेथे येणार्‍या सुमारे दिडशे लोकांना चिठ्ठी दाखवून चौकशी केली. तेव्हा एका तरुणीने चिठ्ठीचे हस्ताक्षर ओळखले. ते हस्ताक्षर संतोषकुमार यादव या तरुणाचे होते. ७ मे पासून त्याचा फोन बंद येत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. ७ मे रोजी संतोषकुमारने तिला व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी त्याच्यासोबत सनी सिंग आणि राहुल पाल अशी दोन तरुण होते. मयताची ओळख पटल्याने पोलिसांचे पुढील काम सोपे झाले.

हेही वाचा…वसई : प्रियकराचा बदला घेण्यासाठी लावला ‘हनी ट्रॅप’, अपहरण करून मागितली १ लाखांची खंडणी

काम न मिळाल्याने केली हत्या

याबाबत माहिती देताना पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले की, मयत संतोषकुमार यादव हा सिनेसृष्टीत मॉडेल पुरविण्याचे काम करत होता. त्याला या कामाचे एक मोठे कंत्राट मिळाले होते. त्यामुळे त्याचे प्रतिस्पर्धी असलेल्या सनी सिंग आणि राहुल पाल यांनी संतापून त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. ७ मे रोजी दोघांनी संतोषकुमारला या कामाची पार्टी देण्यासाठी बोलावले. त्याला भरपूर मद्य पाजल्यानंतर डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह महामार्गालगत सोपारा फाट्याजवळ टाकून दिला. पोलिसांनी सनी सिंग याला अटक केली. राहुल पालचा शोध सुरू आहे. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील,पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, अशोक परजने आदींच्या पथकाने या क्लिष्ट गुन्ह्याची उकल करून आरोपीला बेड्या ठोकल्या.