वसई : वसई विरार शहरात अनधिकृत इमारती तसेच धोकादायक स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असताना शहरात विविध ठिकाणी असणाऱ्या धोकादायक जाहिरात फलकांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे आता नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे धोकादायक जाहिरात फलक हटविण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वसई विरार शहरात रस्त्याच्या कडेला, स्कायवॉकवर, इमारतींवर तसेच खाजगी जागेत अशा विविध ठिकाणी जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. शहरात असे सातशे अधिकृत जाहिरात फलक लावलेले आहे. तसेच सणासुदीच्या दिवसात, निवडणूक काळात बेकायदेशीर पद्धतीने लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. असे फलक लावताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने या फलकांमुळे आता शहरात नारिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत पालिकेकडून करण्यात येणारी कारवाई अपुरी असून लेखापरीक्षणा अभावी यातले बरेचसे फलक गंजलेल्या स्थितीत आहेत. तर शहरातील रस्त्यांच्या कडेला, रेल्वे स्थानक, मंडई अशा वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आलेले फलक धोकायदायक ठरत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात असे धोकादायक फलक पडून मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पालिकेकडून अशा धोकादायक फलकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांवर वेळोवेळी कारवाई सुरू असते तसेच सणासुदीच्या काळात उभारण्यात येणाऱ्या कमानी यासह इतर जाहिरात फलक यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश संबंधित प्रभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे जाहिरात विभागाने सांगितले आहे.

धोकादायक फलकांमुळे वाहनचालक त्रस्त

शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या जाहिरात आणि शुभेच्छा फलकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. गणेशोत्सवासाठी शहरात लावण्यात आलेले जाहिरात फलक आणि कमानी अजूनही काढण्यात आलेले नाहीत यामुळे आता शहरातील फलकांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत .

लेखापरीक्षणाची मागणी

वसई विरार शहरात लावण्यात आलेले बहुतांश जाहिरात फलक जीर्ण झाले आहेत. त्यामुळे ते गंजलेल्या आणि तुटलेल्या स्तिथीत आहेत. हे धोकादायक फलक कोसळल्यास एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे अशा फलकांचे लेखापरीक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.