कामास सुरुवात झालीच नाही, जागेवर अतिक्रमणाचा धोका
वसई : मोठय़ा थाटात भूमिपूजन करण्यात आलेल्या पालिकेच्या मुख्यालयाचे कामाला तीन वर्ष उलटूनही काहीच सुरवात झाली नसल्याचे उघड झाले आहे. ही जागा आता ओसाड पडली असून त्यावर अतिक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे जुन्या मुख्यालयातील अपुऱ्या जागेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नियोजनच नव्हते, तर मग ३०० कोटींच्या मुख्यालयाचे भूमिपूजन कुठल्या आधारावर करण्यात आले असा सवाल करण्यात येत आहे.
वसई विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली. महापालिकेच्या स्थापनेला १२ वर्ष नुकतीच पूर्ण झाली आहेत. मात्र अद्याप महापालिकेला नवीन मुख्यालय मिळालेले नाही. जुन्या विरार नगरपरिषदेच्या इमारतीत दाटीवाटीने नवीन मुख्यालयाचे काम सुरू आहे. परंतु या इमारतीमध्ये जागेची कमतरता असल्याने छोटे छोटे भाग करून विभाग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेतील महत्वाची कागदपत्रे , दप्तर ठेवण्यापासून ते पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची यावेळी अडचण होत असते, तर काही वेळा नागरिकांना कामासाठी इकडून तिकडे फेऱ्या माराव्या लागत असतात.तर पावसाळ्यातसुद्धा छतावरून पाणी गळत असल्याने आणखीनच अडचणी वाढत असतात.
२०१७ मध्ये पालिकेने विरार पष्टिद्धr(१५५)मेच्या विरार नगर येथे दहा एकर प्रशस्त जागेत सहा लाख चौरस मीटर क्षेत्रफळात या इमारतीचे बांधकाम केले जाणार होते. नव्या मुख्यालयाच्या कामाचे २०१७ साली इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. ३०० कोटी रुपये खर्च करून त्यामध्ये नाटय़गृह आर्ट गॅलरी, वस्तू संग्रहालय, लग्नकार्यासाठी सभागृह, कॉन्फरन्स हॉल आदींचा समावेश होता. पंचतारांकित हॉटेल्स प्रमाणे त्याची रचना असून त्याचे काम तीन वर्षांत पूर्ण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र भूमिपूजन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली तरी हे काम पुर्ण झालेले नव्हते.
कामाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र निवडणुका आणि त्यामुळे लागलेली आचारसंहिता असे कारण देण्यात आली होती. नंतर करोनाचे कारण पुढे करण्यात आले. प्रत्यक्षात ३०० कोटी एवढा मोठा निधी पालिकेला मिळालेला नव्हता किंवा त्याची तरदूतच झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे महापालिकेच्या प्रस्तावित मुख्यालयाची जागा ओसाड पडली आहे. २६ नोव्हेबंर २०१७ रोजी या ठिकाणी थाटामाटात भूमीपूजन सोहळा पार पडला होता. आता या जागेवर जंगल उभे राहिले आहे. भूमिपूजनाच्या पाटीवरील अक्षरेदेखील उडाली आहेत. या जागेवर कसलेही कुंपण नसल्याने जागेवर अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
महापालिका मुख्यालयाचे काम कुठवर आले आहे त्याबाबत माहिती देण्यास महापालिका टाळाटाळ करत होती. स्थानिक रहिवाशी कमर बेग यांनी याबाबत माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवली असता, मुख्यालयाच्या कामाची कसलीच सुरवात झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मग महापालिकेने ३०० कोटींचा आराखडा कुठल्या आधारावर तयार केला असा सवाल बेग यांनी केला आहे.