12 December 2018

News Flash

दुर्गविधानम् : दुर्गाची दुनिया..

इतिहासाच्या प्रात:काळीसुद्धा दुर्गबांधणीचे शास्त्र अतिशय प्रगतावस्थेत होते.

एक गोष्ट निर्विवाद की, दुर्ग ही संकल्पना अतिप्राचीन आहे. ती जागतिकही आहे. जगभरातील आधुनिक पुरातत्त्वसंशोधकसुद्धा मान्य करतात की, इतिहासाच्या प्रात:काळीसुद्धा दुर्गबांधणीचे शास्त्र अतिशय प्रगतावस्थेत होते. अतिशय मजबूत, अनेक शतके टिकणारी अन् तत्कालीन युद्धशास्त्राच्या दृष्टीने अतिशय प्रभावी ठरणारी ही युद्धोपयोगी बांधकामे अतिप्राचीन काळापासून आशियामायनर, ग्रीस, टायग्रीस, युफ्राटिस व नाईल नद्यांची खोरी, तसेच सिंधू, सरस्वती या नद्यांच्या खोऱ्यांत सापडली आहेत; अन् हे सारेच अवशेष दुसऱ्या नागर संस्कृतीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, यांच्यामध्ये कमालीची समानता आहे.

एक गोष्ट स्पष्ट आहे की, जगातल्या साऱ्याच संस्कृती एकमेकांकडून काही ना काही घेऊन वा एकमेकांना काही ना काही देऊन वाढत असतात. प्रारंभिक कालखंडाचा विचार केला तर भाषा, कला आणि अर्थ हे कुण्याही संस्कृतीचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत हे जाणवते. कालांतराने त्यात वंश, व्यापार, धर्म, राजनीती, युद्धशास्त्र व शस्त्रे, समाज, साहित्य असे अनेकानेक बरेवाईट प्रवाह येऊन मिसळत गेले. अवघ्या जगाच्या संस्कृतीचे वाहते पात्र यामुळे अधिकाधिक विस्तारत गेले, संपन्न होत राहिले. इतिहासाच्या निरनिराळ्या कालखंडांत निरनिराळ्या कलांचा, विचारांचा अन् संस्कृतींचा जो प्रसार झाला त्यातून हे अगदी प्रखरपणे जाणवते की, या साऱ्याच संस्कृतींनी एकमेकांशी युद्धे लढण्याच्या नादात वा मैत्रीच्या संबंधांचा उपयोग करून घेऊन त्यांनी आपापल्या शत्रूंच्या आक्रमणांच्या अन् संरक्षणाच्याही शैली ओळखल्या, त्यांतील चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. याच कारणांमुळे या साऱ्यांच्याच लष्करी बांधकामांमध्ये अनेकानेक बाबतीत अधिकाधिक साम्य आढळते. दुर्ग वास्तुशास्त्राच्या या प्रगतीच्या प्रक्रियेमध्ये काही मूलभूत असे फरकही होते. वेगवेगळ्या देशांमधील वेगवेगळे हवामान, नैसर्गिक साधनसंपत्तीची विविधता व उपलब्धता, त्या त्या राष्ट्राचा भूगोल व त्यावर अवलंबून असणारे त्या त्या राष्ट्राचे व पर्यायाने तिथल्या समाजाचे चारित्र्य.. या बात: भिन्न दिसणाऱ्या घटकांचा एकत्रित परिणाम दिसून येत होता. मात्र हे असं असलं तरीही, दुर्गस्थापत्याची प्रगती हे साऱ्यांचेच समान सूत्र होते.

आजही उभे असलेले अथवा पुरातत्त्ववेत्त्यांनी उत्खननित केलेले तटबंदींचे अवशेष पाहिले, तर ते अतिशय प्राचीन असूनही शास्त्रीयदृष्टय़ा एवढे अचूक आहेत की, या शास्त्राची मर्यादा कुठवर मागे न्यावी याविषयी मनात शंका उभी राहते. पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते, पॅलेस्टाइनजवळील जेरिको सिटी या ठिकाणी उत्खननित झालेले तटबंदीचे अवशेष हे ख्रिस्तपूर्व ९००० म्हणजे साधारणपणे अकरा हजार वर्षे इतके जुने आहेत. जागतिक पातळीवर विचार केला तर बॅबिलोनची अतिप्राचीन तटबंदी, ऊर व ट्रॉय शहरांची तटबंदी ख्रिस्तपूर्व तिसऱ्या सहस्रकात जाते. अ‍ॅण्टिओकजवळील अ‍ॅट्चना- ख्रिस्तपूर्व १९००, प्राचीन असीरियाची राजधानी आशूर- ख्रिस्तपूर्व १६०० या शहरांच्या तटबंदी अतिप्राचीन आहेत. ग्रीसमधील मायसिनी व तिर्यिन अन् ट्रॉयचे सहावे शहर ही सारी शहरे मायसिनिअन् काळातली म्हणजे साधारणपणे ख्रिस्तपूर्व १५०० ते शिख्रस्तपूर्व १२०० या काळातील आहेत.

देश-विदेशांतील दुर्गाच्या रचनेचा विचार केला तर रोमन साम्राज्याच्या कालखंडात या शास्त्राच्या प्रगतीने वेगवेगळे टप्पे सहजच पार केले. आज दृश्यमान होत असलेल्या दुर्गरचना त्यांच्या संशोधनात्मक प्रगल्भतेची व तंत्रकुशलतेची साक्ष देतात. रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर हे सारे काहीसे रुंधल्यासारखे झाले होते. मात्र अकराव्या शतकापासून हा गाडा पुन्हा सुरू झाला. यामागची कारणेही वेगवेगळी होती. अस्तित्वाच्या लढाईत नाना उपाय पडताळून पाहणे निरतिशय गरजेचे होते. मध्ययुगात संरक्षणाच्या व आक्रमणाच्या नवनव्या योजना शोधून काढणे, हे त्या काळातील राज्यकर्त्यांचे प्राथमिक कर्तव्य ठरले होते, त्यातून मध्ययुगात, प्रवासाची आवड असणाऱ्यांना प्रवास घडावा अशा कारणांची अगदी रेलचेल होती : जेरुसलेमची यात्रा, धर्मयुद्धे, रोमची यात्रा अशा नाना स्थळांच्या दर्शनामुळे चौकस यात्रेकरूंच्या, प्रवाशांच्या दृष्टिकोनात व ज्ञानातही भर पडत होती. त्या नव्या कोऱ्या अशा निरीक्षणांचा उपयोग त्यांना व त्यांच्या देशातील राज्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या देशात होत होता. ज्ञान वाहते राहत होते!

दुर्गशास्त्राच्या या प्रगतीच्या प्रक्रियेमध्ये काही मूलभूत असे फरकही होते. वेगवेगळ्या देशांमधील वेगवेगळे हवामान, नैसर्गिक साधनसंपत्तीची विविधता व उपलब्धता, त्या त्या राष्ट्राचा भूगोल व त्यावर अवलंबून असणारे त्या त्या राष्ट्राचे व पर्यायाने तिथल्या समाजाचे चारित्र्य, या बात: भिन्न दिसणाऱ्या घटकांचा एकत्रित परिणाम दिसून येत होता. इजिप्त, इराक, असिरिया, आशिया-मायनरमध्ये पसरलेले हिटाइट दुर्ग, सिंजेर्ली, हमाथ, कार्केमिश, अथेन्स, ऱ्होडस् स्पेनमधील टॅरागोना, इटलीमधील अओस्ता, इंग्लंडमधील प्रसिद्ध अशी हॅड्रिअनची भिंत, प्रशियातील कॉन्स्टँटिनोपल व बॅबिलोन हे विख्यात बायझन्टाइन दुर्ग, चीनची विश्वविख्यात भिंत, दक्षिण आफ्रिकेतील झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, माशोतालॅण्ड या भागांत विखुरलेले दुर्गाचे अतिप्राचीन अवशेष, मध्य व दक्षिण अमेरिकेतील माचू-पिचू, अ‍ॅलन्टेलॅम्बो, सॅक्सहुआमन, कुझ्को, युकॅटन, पॅलांक येथील विविध दुर्ग वरील विधानाची सत्यता पटवून देतात. हे सारेच दुर्ग त्या त्या काळातील लष्करी स्थापत्याचा व लष्करी संसाधनांचा विचार करता अजोड असेच होते.

ग्रीस व रोम येथील तटबंदींच्या बांधकामाविषयी ग्रीक इतिहासकार पॉलिबिअस म्हणतो, ‘केवळ एका माणसाच्या देवदुर्लभ अशा गुणवत्तेचा योग्य तसा उपयोग करून घेतला गेला अन् त्यामुळे अद्भुत गोष्टी घडल्या. सिराक्युसमधल्या त्या म्हाताऱ्याचा- आर्किमिडीजचा- अपवाद वगळला, तर ते शहर काबीज करणं रोमन लोकांसाठी अतिशय सोपं होतं. ख्रिस्तपूर्व २८७ मध्ये जन्मलेल्या विख्यात शास्त्रज्ञ आर्किमिडीजने ग्रीकसम्राट दुसरा हिएरो याच्यासाठी युद्धशास्त्रामध्ये व दुर्गाच्या बांधकामांमध्ये अनेक शास्त्रोक्त बदल सुचवले व ते अमलातही आणले आणि रोमन सैन्याशी होणाऱ्या युद्धात ग्रीकांची नेहमीच सरशी होईल याची खातरजमा केली.

फिलो ऑफ बायझॅन्टिअम या ग्रीक स्थपतीने ख्रि्रस्तपूर्व २५० च्या सुमारास लष्करी स्थापत्यशास्त्रावर अतिशय तर्कशुद्ध व सुसंबद्ध असं लिखाण केले. त्याचे जे काही भाग आज आपल्या संदर्भासाठी म्हणून उपलब्ध आहेत, त्यांवरून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते की, पूर्णावस्थेत असताना हे लिखाण खरोखरीच परिपूर्ण असायला हवे. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात युरोपातील दुर्गशास्त्र किती प्रगत व परिपूर्ण होतं, याचे हे उत्तम उदाहरण आहे. साधारण याच काळात हिंदुस्थानात कौटिल्याचे अर्थशास्त्रही लिहिले जात होतं व दुर्ग या विषयाचा परिपूर्ण असा ऊहापोह त्यानेही केलेला होता. एखाद्या समस्येचे वा कल्पनेचे स्वतंत्रपणे, पण सारखेच निराकरण वेगवेगळ्या भूभागांवर नांदणारी दोन समकालीन माणसे सारख्याच पद्धतीने करू शकतात. अगदी तेच दोन विभिन्न संस्कृतींबाबतही म्हणता येते. नागरीकरणाची प्रक्रिया हे याचे अजून एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

युरोपातील अनेक प्राचीन शहरे दुर्गाच्या सावलीत वसली व वाढली. एथेन्स, मायसिने, थेस्सालोनिका, ही ग्रीसमधली शहरे, टर्कीमधलं प्रिएन ही या प्रकारच्या असंख्य उदाहरणांपैकी काही सांगता येतात. भारतात तर अशा प्रकारे वसलेली शहरे अक्षरश: असंख्य आहे. इसवी सनाच्या पंधराव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला म्हणजे इ.स. १४०५ साली बर्विकच्या लढाईत इंग्रजांनी ‘आग ओकणाऱ्या’ शस्त्रांचा फार मोठय़ा प्रमाणात वापर केला. नेपोलियनच्या विजयी मोहिमांमध्ये या शस्त्राचा फार मोठय़ा प्रमाणात सहभाग होता. नंतरच्या काळात या शस्त्राचे सामथ्र्य वाढले. त्याची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली. त्याचीच परिणती लष्करी स्थापत्यशास्त्रात सुधारणा होण्यात झाली. या शस्त्राचा वापर करता येईल किंवा या प्रकारच्या शस्त्रांना तोंड देता येईल असे बदल लष्करी स्थापत्यशास्त्राने स्वीकारले अन् अमलातही आणले.

हे सारं येथे मांडण्याचा उद्देश एकच की, जेव्हा स्वसंरक्षणाच्या उद्देशाने दुर्गाच्या संकल्पना जगभर विकसित होत होत्या तेव्हा त्या एकाच उद्देशाने, एकाच पातळीवर विकसित होत होत्या. एरवी थांग न लागणारं मानवी मन जणू एकाच पातळीवर येऊन काम करीत होतं. या विषयाचा अभ्यास करताना एक गोष्ट ध्यानी घ्यायलाच हवी की, दुर्ग हा विषय स्थानिक नसून जागतिक आहे. कसे आणि कुठे बी पडले कुणास ठाऊक; मात्र अनादी काळापासून सुरू झालेल्या या जागतिक परंपरेचे एक बीज आपल्या या खंडप्राय देशातही कधी कुण्या काळी अलगद रुजले. आज पाहू गेले तर या सूक्ष्म अशा बीजाचा भला थोरला वटवृक्ष झालेला आपल्या ध्यानी येतो. या विशाल वटवृक्षाच्या सावलीतच भारतीय संस्कृती लहानपण झटकून थोरली झाली, वेदांचा अन् सिंधुसंस्कृतीचा वारसा उशा-पायथ्याला घेऊन मोठी झाली. जगाचे डोळे दिपून जातील असा इतिहास भारतीय दुर्गशास्त्राने अन् भारतीय दुर्गानी रचला. यास साक्ष आहेत कुलपर्वत सह्यद्रीच्या अंगाखांद्यावर पसरलेले दुर्गराज शिवछत्रपतींचे धक्कधिंग दुर्ग.!

आपल्या भारताचा विचार करायचा झाला तर सिंधू संस्कृतीतील अथवा हडप्पा संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या बाणावली, लोथल, बेट द्वारका, कालिबंगन, धोलाविरा, राखीगढी यांसारख्या अनेक शहरांची तटबंदी ख्रिस्तपूर्व ३५०० ते ख्रिस्तपूर्व १८०० इतकी प्राचीन आहे. गुजरातमधील लोथल येथील गलबतांचे तळ दुरुस्त करायची विटांनी बांधलेली कोरडी गोदी- ड्राय डॉक- ही आजही कार्यरत करण्याएवढय़ा सुस्थितीत आहे. दिल्लीच्या पश्चिमेकडील हरयाणा या राज्यातील राखीगढम हे स्थळ मोहेंजोदारो, हडप्पा यांच्याएवढेच प्राचीन मात्र आकारमानाने त्याहून किती तरी मोठे आहे. या साऱ्याच स्थळी तटबंदींचे अवशेष जागोजागी झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये सापडले आहेत.

नंतरच्या कालखंडातील भारतीयांच्या पिढय़ांनी हाच कित्ता पुढे गिरवत, त्यास स्वत:च्या बुद्धिमत्तेची व स्थापत्यकौशल्याची जोड देत अनेक दुर्ग निर्माण केले. या साऱ्या दुर्गाची मूळ संकल्पना तशीच होती, मात्र स्थानिक व क्षेत्रीय वैशिष्टय़ांचा विचार करून त्यात फेरबदल केले गेले. आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये यासंबंधीची अवतरणे जागोजागी सापडतात. शिल्पे, चित्रकला, वास्तुशास्त्र, नाणी, शिलालेख

अशा नाना ऐतिहासिक साधनांमधून दुर्गाचा हा इतिहास आपल्याला उलगडता येतो. युद्ध हा तर रामायण व महाभारतासारख्या पुराणांचा मुख्य विषय आहे. याच कारणांमुळे लष्करी बांधकामे, त्यामागच्या रूढ कल्पना, त्याबद्दलची त्या काळातील समज व उपयोग यांचा मागोवाही अतिशय सहजपणे घेता येतो. याशिवाय स्थानिकांच्या व आर्याच्या तत्कालीन दुर्गविषयक कल्पनांची व समजुतींची ओळखही आपल्याला इथे करून घेता येते. याखेरीज इतर पुराणे, काव्ये, नाटके यांमधूनही लष्करी बांधकामांचे आणि राजकीय नीतितत्त्वे यांचे उल्लेख आपल्याला ठायी ठायी आढळतात.

बुद्धकाळ हा ऐतिहासिकदृष्टय़ा काहीसा राजकीय अस्थिरतेचा काळ मानला जातो. त्या कालखंडात गांधारापासून ते मगधापर्यंत पसरलेल्या आणि सिंधूच्या खोऱ्यापासून ते गंगेच्या मुखापर्यंत असलेल्या सुपीक प्रदेशात नांदणाऱ्या सोळा महाजनपदांमध्ये राजकीय कुरबुरी सतत सुरू होत्या. त्यामुळे राजकीय व सामाजिक असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. या अस्थिरतेचे पर्यवसान संरक्षण व आक्रमणांच्या नवनवीन कल्पनांचा उगम व उत्क्रांती होण्यात झाले. पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये या साऱ्याच महाजनपदांच्या राजधान्या दुर्गरूप होत्या हे स्पष्ट झाले आहे. काशी महाजनपदाची बनारस, कोसलाची श्रावस्ती, अंगदेशाची चंपानगर, मगधाची गिरिव्रज, वज्जींची वैशाली, मल्लांची कुशीनगर, चेदिंची शुक्तिमती, वत्सांची कौसांबी, कुरूंची हस्तिनापुर आणि इंद्रप्रस्थ, पांचालांची काम्पिल्यनगरी, मत्स्यांची विराटनगर, शूरसेनांची मथुरा, अस्सकांची पोदण, अवंतीची उज्जैन व माहिष्मती, गांधारांची तक्षिला आणि काम्बोजांची राजपूर या साऱ्याच राजधान्या दुर्गरूप आहेत. याच कालखंडात भारतातील राज्यकर्त्यांचे विदेशी संस्कृतींशी व्यापारी संबंधही सुरू होते. या व्यापाराच्या मिसे धनाच्या थैल्यांसोबत सांस्कृतिक, राजकीय व लष्करी कल्पनांचे अन् तत्त्वांचे पेटारेही या भूमीत पावते झाले आणि याचा परिणाम येथील दुर्गस्थापत्यावरही निश्चितच झाला.

मौर्य साम्राज्याच्या कालखंडात दुर्गशास्त्रात अतिशय मोठय़ा प्रमाणावर उलथापालथ झाली. मनू, बृहस्पती, नारद, विशालाक्ष, उद्धव, इंद्र, कौणपदंत, द्रोण, आंभिय यांच्यासारख्या पूर्वसूरींनी व आचार्यानी दुर्गशास्त्राची जी तत्त्वे व मूलकल्पना आपापल्या ग्रंथांमधून मांडल्या होत्या, त्या साऱ्यांच्या साऱ्या अभ्यासयुक्त मतमतांतरांचा परामर्श घेत व त्यांवर स्वत:चे नेमके अचूक मत मांडत मौर्याच्या राजगुरू कौटिल्याने आपला अर्थशास्त्रावरील ग्रंथ – ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ – सिद्ध केला. राज्यशास्त्राशी निगडीत असलेल्या या केवळ अपूर्व अशा ग्रंथातील पंधरापैकी दोन प्रकरणे केवळ दुर्गशास्त्र या विषयाला वाहिलेली आहेत.

या सगळ्या साहित्याचा संबंध पाश्चिमात्य देशांतील ‘फिलो ऑफ बायझँन्टीअम’, व्हिट्रव्हिअस, प्रॉकोपिअस, यांच्यासारख्या ऋषितुल्यांनी लिहिलेल्या दुर्गशास्त्राशी संबंधित साहित्याशी जोडता येतो अन् मूलभूत कल्पना, प्रगती, साम्ये व फरक आदींच्या मापपट्टय़ा लावून ताडूनही पाहता येतो. परिणामी दोन विलग भूभागांवर नांदणाऱ्या समकालीन संस्कृतींच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या विभागातील आणिक एक मंत्रमुग्ध करणारे दालन या निमित्ताने आपल्याला उघडतासुद्धा येते!

discover.horizon@gmail.com

First Published on February 17, 2018 12:25 am

Web Title: article on fort fort formation fort security