20 January 2019

News Flash

घर सजवताना : फर्निचर

खरं तर इंटिरियर डिझाइनर पार पाडत असलेल्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक आहे फर्निचर बनवणे.

बऱ्याच वेळा ओळखीत कोणाला मी इंटिरियर डिझाइनर असल्याचे कळले की लागलीच प्रश्न येतो, ‘‘म्हणजे तू फर्निचर बनवतेस का?’’ आधी मला फार हसू यायचे. इंटिरियर डिझाइनर आणि फर्निचर बनवणारा! किती गमतीशीर सांगड आहे ही. खरं तर इंटिरियर डिझाइनर पार पाडत असलेल्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक आहे फर्निचर बनवणे. पण एक गोष्ट मात्र नक्की कोणत्याही घराचे इंटिरियर करताना फर्निचरचा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा ठरतो. कसं आहे, घरात इतर कोणतेही बदल न करताही फक्त नवे फर्निचर बनवून किंवा काही वेळा तर फक्त फर्निचरच्या जागा बदलूनदेखील घराला नवेपणा सहज आणता येतो. म्हणूनच मला वाटतं फर्निचर हा इंटिरियर डिझाइनचा प्राण आहे.

घरात फर्निचरचे काम काढायचे म्हटले की आपल्यासमोर दोन पर्याय लागलीच येतात. एक तर बाजारात जाऊन झटपट तयार फर्निचर घेऊन यायचे, हे जागेवर लावले की झाले काम. किंवा दुसरा पर्याय म्हणजे घरी सुताराला बोलावून आपल्या गरजेप्रमाणे फर्निचर बनवून घेणे. नक्की कोणता पर्याय योग्य याबाबत बरेचदा आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. अर्थात दोन्ही पर्यायांना स्वत:चे असे फायदे तोटे आहेतच. तयार फर्निचरबाबत सांगायचे झाले तर तो एक संपूर्णपणे स्वतंत्र चर्चेचा विषय आहे आणि येत्या काही दिवसांत त्यावरही आपण सविस्तर बोलूच. तूर्तास घरी फर्निचर बनवून घ्यायचे झाल्यास जे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला माहीत असावेत त्यावर विचार करूयात.

फर्निचर म्हटले की आपल्या नजरेसमोर पटकन येतं ते घरातील लाकडी सामान. टेबल, खुच्र्या, कपाट असं बरंच काही. पूर्वी या वस्तू लाकडात बनत असत. परंतु गेल्या शतकात झालेल्या भरमसाठ वृक्षतोडीमुळे लाकडाचा तुटवडा झाला. मग फर्निचर बनविण्यासाठी इतर पर्यायांचा विचार होऊ  लागला. ज्यात सर्वप्रथम प्लायवूड व त्याचसोबत लोखंड, पोलाद, तसेच अगदी प्लास्टिकदेखील विचारात घेतले गेलेले आपल्याला सर्रास दिसून येते. त्यातही प्लायवूड हे तसे लाकडाला जवळचे. शिवाय स्वस्त, टिकाऊ  आणि मजबूत म्हणून त्याला अधिक पसंती दिली जाते.

प्लायवूडचा विचार करत असताना साहजिकच तुम्हाला प्रश्न पडू शकतो की किती जाडीचे प्लायवूड वापरल्यास फर्निचर दणकट होईल? तसेच फर्निचरसाठी कोणत्या प्रकारचे प्लायवुड वापरावे?

प्रश्न अगदीच रास्त आहे. प्लायवूड निरनिराळ्या जाडींमध्ये उपलब्ध असते. घरातील फर्निचर बनवताना १८ मी. मी., १२ मी. मी, ६ मी. मी. व ४ मी मी. अशा जाडीचे प्लायवूड वापरले जातात. वस्तू बनवताना सर्रास एकच जाडीचे प्लायवूड न वापरता जिथे जे आवश्यक आहे तिथे ते अशा प्रकारे वापरले जाते. उदा. एखादे कपाट तयार होत असताना त्याचा सांगाडा हा १८ मी. मी. जाडीत तर भिंतीला टेकणारी त्याची पाठ ६ मी. मी. व ड्रॉवर १२ मी. मी. जाडीच्या प्लायवूडमध्ये बनतात.

प्लायवूडमध्ये निरनिराळ्या जाडींप्रमाणेच निरनिराळ्या प्रतीही असतात. यात कमर्शिअल व वॉटर प्रूफ किंवा मरीन प्लायवूड या दोन महत्त्वाच्या प्रती. कमर्शिअल प्लायवूडलाच इंटिरियर ग्रेड प्लायवूड असेही म्हटले जाते. घरातील सर्वसाधारण फर्निचर बनविण्यासाठी याचाच वापर होतो. हे प्लायवूड एम. आर. ग्रेड म्हणजेच मॉइश्चर रेझिस्टंट प्रकारांत मोडतात. थोडक्यात, दमट हवामानात टिकाव धरू शकतील असे असतात. जिथे पाण्याचा थेट संबंध येत नाही अशा ठिकाणी याचा वापर बिनदिक्कत करावा. तर मरीन प्लायवूड हा दुसरा प्रकार खास समुद्रात चालणाऱ्या बोटींवर वापरासाठीच बनलेला आहे. घराच्या इंटिरियरमध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा थेट संबंध येण्याची शक्यता असते अशा ठिकाणीच याचा मर्यादित वापर आपण नक्की करू शकतो. याची किंमत देखील कमर्शिअल प्लायवूडच्या तुलनेत बरीच जास्त असते.

आता कोणता प्लायवूड घ्यायचा हे तर समजले पण त्यातही हलक्या ते उत्तम दर्जाची उतरंड आहेच. पण आपण निवडताना मात्र उत्तमच प्लायवूड निवडायचा, कारण त्यावरच आपल्या घरातील फर्निचरचे भवितव्य अवलंबून असते. चांगल्या दर्जाचा प्लायवूड कापला असता त्याचे पापुद्रे एकमेकांना घट्ट चिकटलेले आणि एकसंध दिसतात. याउलट हलक्या दर्जाचा प्लायवूडमधून कापला असता त्याच्या पापुद्य्रामध्ये असणाऱ्या पोकळ्या दिसून येतात.

प्लायवूडचाच आणखी एक भाऊबंद म्हणजे ब्लॉक बोर्ड. ज्याप्रमाणे फर्निचर बनवताना प्लायवूडचा वापर होतो त्याच प्रमाणे फ्लश दरवाजे बनविण्यासाठी ब्लॉक बोर्डची मदत घेतली जाते. पाइनच्या लाकडाच्या ब्लॉक बोर्डना आपल्याकडे जास्त मागणी आहे. याला कारण आहे पाइनच्या लाकडाचा टिकाऊ पण आणि वजनाने हलका हा गुणधर्म. ब्लॉक बोर्ड बनवताना त्यात वजनाने हलक्या असणाऱ्या लाकडाच्या पट्टय़ा दोन बाजूंनी साग किंवा तत्सम कठीण लाकडाच्या विनिअरमध्ये सॅन्डविच केल्या जातात. याचा मुख्य गुणधर्म म्हणजे ब्लॉक बोर्डला बाक येत नाही शिवाय हा दरवाजांना आवश्यक अशा जाडींमध्ये उपलब्ध होतो म्हणूनच दरवाजे बनवताना याचा उपयोग होतो. पुन्हा चांगल्या प्रतीचा ब्लॉक बोर्ड निवडायचा तर निकष एकच, मधून कापला असता आतील लाकडाच्या पट्टय़ांमध्ये पोकळी असता कामा नये.

मला खात्री आहे तुम्ही जर घराचे इंटिरियर डिझाइनचे काम काढले असेल तर तुम्हाला या माहितीचा नक्की उपयोग होईल. अर्थात प्लायवूडचे आणखीही काही भाऊबंद आहेत ज्यांची ओळख येणाऱ्या काळात आपल्याला होईलच. तोपर्यंत आज मात्र इथेच थांबू.

(इंटिरियर डिझायनर)

ginteriors01@gmail.com

First Published on December 23, 2017 12:33 am

Web Title: article on furniture interior designer