News Flash

घरातली भातुकली

भातुकलीची आईबरोबर नाळ जुळलेली असते.

प्रत्येक लहान मुलीचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे भातुकली. आईच्या उबदार सहवासात आई ज्या काही पाककलेच्या किंवा घरातील कामांच्या क्रिया करते त्याचे हुबेहूब अनुकरण भातुकलीच्या खेळामध्ये मुली उतरवत असतात. भातुकलीची आईबरोबर नाळ जुळलेली असते.

माझी भातुकली आमच्या पडवीत किंवा ओटीवर मांडली जायची. त्यामुळे पडवीत खेळत असले तर तिथे असलेल्या दरवाजांना पडदे लाव, या खुंटीपासून त्या खुंटीपर्यंत घरातील चादरी आणून बांधून खोली बनवायची. मधेच एखादा लहान बाळाचा झोपाळा बांधायचा, खुच्र्या-टेबले एकत्र करून त्यावर चादरी टाकून तंबूसारखी रूम बनवायची असे नाना पसाऱ्यायाचे उद्योग चालू असायचे.

पूर्वी आमच्या उरणमध्ये खेळण्यांची दुकानं नव्हती. त्यामुळे सुरुवातीला माझ्याकडे भातुकलीची विकतची खेळणी नसायची. घरात नको असलेल्या डब्या, झाकणे, करवंटय़ा, शिंपल्या हीच माझी भातुकली असायची. तीन शिंपल्यांची किंवा छोटय़ा दगडांची चूल, त्यात छोटय़ा छोटय़ा काठय़ा टाकून केलेली चूल ही भातुकलीची महत्त्वाची भूमिका बजावत असे. मग तिला धरून तिच्या आसपास झाकणांच्या, सोडय़ाच्या बिल्लय़ांच्या बश्या, तवा, झाकणं, करवंटय़ांच्या टाक्या किंवा पाणी साठवण्याचे साधन, आइस्क्रीमच्या चपटय़ा काठय़ांचे चमचे, कालथे, काडय़ांच्या पळ्या असे काय काय तो कल्पनाशक्तीनुसार संसार मांडला जायचा. देवपूजेसाठी एखाद्या दगडाची स्थापना केली जायची. त्यावरही मनात असलेल्या श्रद्धेनेच फुले-पाने वाहिली जायची. जेवणाचे जिन्नसही मोकळ्या निसर्गातलेच असायचे. भाजीसाठी कुठलातरी पाला काढून आणायचा. दगडावर वाटण वाटायचं, बिल्लय़ाच्या साहाय्याने पाने गोल कापून त्या चपात्या किंवा भाकऱ्या म्हणून समजायच्या, चिंचेचा पाला जवळा समजायचा अशा नाना कल्पना त्या भातुकलीत खेळल्या जायच्या.

आमच्या उरणमध्ये डिसेंबरला दत्तजयंतीच्या दिवशी यात्रा असते. त्या यात्रेत खूप खेळणी विकायला येतात. त्यात स्टीलची, प्लास्टिकची भातुकलीची खेळणी असायची. अजूनही इतर खेळणी डोळ्यांसमोर येतात ती म्हणजे पाणी भरलेला हवेत आपटायचा फुगा. त्याची दोरीही ताणेल अशी रबरी असायची. ती फटाफट मारताना खूप मजा यायची. हा पाणीवाला बॉल मला वडील दर वर्षी आणायचेच. सोबत असायच्या पेपेऱ्या, फुंकर मारून पिपेरीतून बाहेर येणारे पोपट, साधे फुगे, वाऱ्यावर फिरणारी कागदी चक्रं यांचीही गंमत यायची. ते धरून धावत सुटलं की चक्र गरागरा फिरत असे. मेणबत्ती घालून चालणारी पत्र्याची बोट तर नेहमीच हिट. शिवाय पूर्वी शिंपल्यांपासून बनवलेल्या बाहुल्या यायच्या त्या मला खूप आवडायच्या. छोटे छोटे पाळणेही मन मोहून टाकायचे. छोटी कपाटे, फ्रिज, मिक्सर हे प्रकारही मोहात पाडायचे. या सर्वातलं दरवर्षी आलटून पालटून आई-वडील माझ्यासाठी घ्यायचेच. एक वर्ष उडणारं विमान आणलं होतं. पण ते लगेच खराब झाल्याने मी खट्टू झाली होते. एक वर्ष असाच आईने मला जत्रेतून भातुकलीचा स्टीलचा सेट आणला होता. त्यात चूल (त्या काळी भातुकलीतपण चूल असायची) पक्कड, गाळणी टोपे, ताटल्या, चिमटा, हंडा, कळशी, बालदी व इतर काही खेळणी होती. मी एक दिवस आमच्या ओटीवर खेळण्यांशी खेळत बसले होते आणि बराच वेळ खेळून झालं म्हणून खेळणी तशीच ठेवून झोपायला गेले. झोपेतून उठल्यावर थोडय़ा वेळाने येऊन पाहते तर माझी खेळणी गायब. खेळणी चोरीला गेलेली पाहून मला खूप रडायला आलं आणि वाईट वाटलं. नंतर मला वेड लागलं ते मातीची खेळणी बनवायचं. बांधावरची माती काढून तिची भांडी बनवून ती सुकवून खेळायला घ्यायचे. ही भांडी स्वत:च्या हाताने घडवलेली थेट मातीशी सलगी करून असल्याने त्या काळ्या कुळकुळीत भांडय़ांबद्दल विशेष कौतुक असायचं. घरातल्यांकडूनही या कलाकुसरीबद्दल शाबासकी मिळायची.

एकदा कोणीतरी लाकडाची खेळणी आणून दिली होती ते आठवतं. त्यात पिंप, उखळी मूस, जातं, चूल, बरण्या, पोळीपाट-लाटणं अशी खेळणी होती. ही खेळणी विशेष आकर्षक होती. त्यांचा स्पर्शही मुलायम वाटायचा.

थोडी मोठी झाल्यावर माझी भातुकली थेट खऱ्या चुलीवर आणि घरातल्या खऱ्या भांडय़ांबरोबर चालू झाली. यात आई घरातील पोहे, भिजवलेले कडधान्य, तांदूळ असा जिन्नस द्यायची आणि मी खरोखरीचं जेवण करायचे. ते जेवण पानचट असलं तरी स्वत: केलंय म्हणून मी आवडीने खायचे आणि घरातलेही थोडंसं खाऊन कौतुक करायचे.

आता मुलींसाठी भातुकली घेताना कुठली घ्यावी ही निवड करावी लागते इतके भातुकलीचे प्रकार आले आहेत मार्केटमध्ये. अजूनही आमची तशीच जत्रा असते आणि त्यात भरपूर खेळणी असतात त्यांतूनही दर वर्षी एखादा भातुकलीचा सेट मुलींसाठी येतोच. त्याचसोबत इतर खेळणीही येतात विकायला, शिवाय आजकाल घरबसल्या ऑनलाइनही मागवायची सोय झाली आहे. आधुनिक खेळण्यांत बार्बीची भातुकली, ओटय़ासकट किचनसेट, पूर्ण घर, त्यामध्ये रूम, असे खूप प्रकार येतात. या खेळण्यांतून आता चूल बाद झाली आहे आणि त्याची जागा गॅस, हॉब, कुकिंग रेंज आणि ओव्हन अशा आधुनिक साधनांनी घेतली आहे. खेळण्यांसोबत प्लास्टिकच्या भाज्या, चिकन, मासे अशा तयार पदार्थाचे नमुनेही मिळतात.

माझ्या सासूबाईंनी श्रावणीला म्हणजे माझ्या मोठय़ा मुलीला अष्टविनायक यात्रेवरून पितळ आणि तांब्याची भातुकलीतील खेळणी आणली होती. त्यात डबे, टोपे, ताटे, तवा, पोळीपाट- लाटणं अशी खेळणी होती. या धातूंच्या खेळण्याची श्रीमंती काही औरच. पाहताच प्रेमात पडावी अशी ही तांब्या पितळ्यांच्या खेळण्यांची घडण बनवलेली असतात. पुढे मी श्रावणी आणि छोटय़ा राधासाठीही पुण्यातील तुळशी बागेतून अशी तांब्या पितळेची खेळणी आणली. त्यात बंब, घंगाळं, टाक्या अशी नामशेष होत असणारी भांडीही आणली होती. ती पाहून मलाही गंमत वाटायची. दोघींनाही काका-काकी, मामा-मामीकडून आणि आत्यांकडून अनेक असे भातुकलीचे प्रकार येतात त्या नवीन खेळण्यात तितक्याच नवीन उत्साहाने भातुकलीच्या संसारात दंग होतात व जुनी खेळणी अडगळीत पडून त्यांचं कालांतराने दान केलं जातं.

मोठय़ा श्रावणीच्या हातात खरेखुरे पदार्थ करण्याइतपत बळ आलं आहे, त्यामुळे ती आता यू-टय़ूबवर पाहून अनेक वेगवेगळे प्रकार बनवत असते. मलाही जेव्हा गॅस पेटवायला येऊ  लागला तेव्हापासून मी पुस्तकाचं पानन् पान चाळून नवीन नवीन रेसिपी करायचे त्याची आठवण होते. माझं बालपण मी तिच्यात पाहते, तर छोटय़ा राधाच्या भातुकलीत वर्तमानातली आई दिसते. ती हुबेहुब भातुकलीत माझी नक्कल करत असते. सगळे डायलॉगही जसेच्या तसे असतात. या दोघींच्या भातुकलीत माझ्या बालपणातील व वर्तमानकाळातील प्रतिबिंब मी आनंदाने पाहात असते.

prajaktamhatre.77@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2017 12:31 am

Web Title: bhatukali children indoor games
Next Stories
1  गृहनिर्माण संस्था आणि थर्ड पार्टी विमा
2 रेरा आणि को-प्रमोटर
3 नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतरही बांधकाम उद्योग अडचणीतच!
Just Now!
X