पूर्वी स्टोव्ह छत्री रिपेऽऽऽर, बालदी..  रिपेऽऽऽर, गादी उशी भर.. नार अशा आरोळ्या देत काही कारागीर किंवा त्यांना वस्तूशल्यविशारद म्हणू या, दारोदार  फिरत असत.

जुने जाऊ  द्या मरणा लागुनी, जाळून किंवा गाडून टाका, म्हणता म्हणता मी बऱ्याच वस्तू भविष्यात कधीतरी लागतील म्हणून माळ्यावर वर्षांनुवर्षे टाकून ठेवल्या होत्या. इतरांना त्या भंगार वाटत असल्या तरी माझ्यासाठी मात्र त्या  जपून ठेवलेल्या वस्तू होत्या. आज मात्र मनाचा हिय्या करून नको असलेल्या वस्तू भंगारवाल्याला देण्याचा निर्णय पक्का केला आणि माळ्यावर वर्षांनुवर्षे पडून असलेल्या सर्व वस्तू खाली काढल्या. त्यात एक पाणी भरण्याची पत्र्याची जुनी  बादलीदेखील  होती. तिचा तळ पार कामातून गेला होता. बाकी बादली चांगली दिसत्ये, तिचा तळ तेव्हा बदलून घेतला तर.. असा  विचार मनात आला. मात्र मला फार  पूर्वी आमच्या चाळीत येणाऱ्या बादली रिपेऽऽऽर करणाऱ्या त्या कारागिराची, बादलीशल्यविशारदाची आठवण झाली.

पूर्वी स्टोव्ह छत्री रिपेऽऽऽर, बादली..  रिपेऽऽऽर, गादी उशी भर.. नार अशा आरोळ्या देत काही कारागीर किंवा त्यांना वस्तू-शल्यविशारद म्हणू या, दारोदार  फिरत असत. प्रत्येक वस्तूचा पुरेपूर उपयोग करून घेऊन अखेर ती वस्तू वापरण्याच्या पलीकडे गेली की ती टाकाऊ वस्तू भंगारवाल्याला विकून दोन-चार पैसे पदरात पडल्याशिवाय कुठलीही वस्तू कायमची घराबाहेर पडत नव्हती. वस्तू परत परत वापरण्याजोगी होण्यासाठी वस्तीत येणाऱ्या अशा वस्तू शल्यविशारदांची मध्यमवर्गीय कुटुंबांना फार मदत व्हायची.

पूर्वी सार्वजनिक नळावरून पाणी भारावे लागत असे.  इमारतीतील सर्व बिऱ्हाडकरूंमध्ये पाणी काटेकोरपणे मोजून मापून घ्यावे लागत होते. पाणी वाटपाची समन्यायी पद्धत नसल्यामुळे, राज्या राज्यात आणि तालुक्या तालुक्यात धुमश्चक्री होताना आपण अनुभवतो आहोत. सार्वजनिक नळातून मिळणाऱ्या पाणी वाटपाची समन्यायी पद्धत अंगीकारून देखील सार्वजनिक नळावर त्या काळात भाडेकरूंमध्ये तुंबळ हाणामाऱ्या होत असत. त्या भांडणात एकमेकांच्या बादल्यांची आदळ आपट तर अगदी ठरलेली. रोज होणाऱ्या अत्याचारांमुळे बादल्या कितीही दणकट बांधणीच्या असल्या तरी त्या जायबंदी होत असत. (सार्वजनिक नळावरची भांडणे हा एक वेगळ्या लेखाचा विषय होऊ  शकतो.)  पाण्याशी कायम संपर्क आणि भांडणात होणारे अत्याचार ह्यमुळे बादल्यांच्या खालची रुंद उभी पट्टी पोचे येऊन खराब होणे, बादल्यांच्या कडय़ा तुटणे असे प्रकार होत असत. तळाला भोके पडलेली, कडय़ा तुटलेली किंवा खालची रुंद पट्टी निखळल्यामुळे डगमगत राहाणारी  बादली  दुरुस्त करून परत वापरण्याजोगी करून देण्याची किमया वस्तीत येणारा बादली रेपेअर कारागीर करून देत असे. पुढचे निदान सहा महिने तरी नवीन बादली घेण्याचा खर्च वाचे.

ह्य कारागीरांमध्ये घाटावरून आलेल्यांची संख्या अधिक. उन्हात फिरून रापलेला रंग, मजबूत देहयष्टी, हाप पॅण्ट बहुतेक वेळा खाकी, वर खमीस आणि त्यावर ज्याकीट डोक्यावर मूळचा रंग कोणता असेल हे न कळू देणारी घट्ट गांधी टोपी, त्यावर कापडाची लहान चुंबळ. वेगवेगळ्या आकाराचे मुडपून घडय़ा घातलेले जुने पत्र्याचे तुकडे, त्यावर एक जाडजूड आकाराचे दोन-चार इंच उंचीचे पोलादीकडे, त्यात अजून एक जाडजूड  लोखंडी आयताकृती ठोकळा, अशा सर्व वस्तू एका तारेत बांधून त्याची मोट बांधून डोक्यावर घेतलेली, एका खांद्यावर कारागिरीसाठी लागणाऱ्या सर्व हत्यारांची पत्र्याची पेटी आणि एका काखेत एका जाडजूड धातूच्या तारेत ओवलेले वेगवेगळ्या आकाराचे गोल, चौकोनी, आयताकृती जुनेच, पण ठोकून सपाट केलेल्या पत्र्यांची चळत आणि पायात जाडजूड सणसणीत वहाणा. असा बादली रेपेर कारागीर दारावर आला की ज्यांना आपल्या घरातील बादल्या दुरुस्त करून घ्यायच्या असत ते त्याच्याकडे जुनी मोडकी बादली सोपवून काय पडेल? म्हणजे पैसे किती घेशील ह्यची विचारपूस करून आणि खूप घासाघीस करूनअखेर सौदा जमला तर त्याच्याकडे बादली सोपवत. बादलीला फार काही झालेच नाहीये तसे म्हणाल तर फार  काम नाहीच आहे त्या मानाने हा पैसे बरेच सांगतो ही तक्रार मात्र नेहमीची!

प्रत्येक चाळीमध्ये एखादा चौक किंवा जिन्यासमोर मोकळी अशी जागा असायचीच, तेथे हा कारागीर आपले तात्पुरती बादली दुरुस्तीचे दुकान थाटून बसायचा. त्याच्या हत्यारांच्या पेटीमधून त्याचे एक-एक हत्यार बाहेर पडू लागायचे.. पत्रा कापायची मोठी कात्री, दोन-तीन लहान-मोठय़ा छीन्या, दोन-चार प्रकारच्या होतोडय़ा, दोन-तीन प्रकारच्या कानशी, लोखंडी करकटक, काटकोना आणि एक मोठी लोखंडी वाराची म्हणजे तीन फूट लांब अशी पट्टी, भूमितीच्या अभ्यासाला लागणाऱ्या अशा दोन-चार वस्तू आणि अन्य बारीकसारीक उदा. दोन-तीन प्रकारचे पोलिश पेपर, तारेचा ब्रश वगैरे देखील त्या पेटीतून बाहेर येत. दुरुस्तीनंतर जोडकाम पक्के सांधून घेण्यासाठी जोडामध्ये लांबी भरली की अगदी बारीकसारीक भेगादेखील बुजून जातात. त्या लांबीचा गोल आकाराचा डबा. त्याचबरोबर एका चौकोनी डबीत लहान-मोठे आकाराचे रिव्हेटस्. असा सगळा दुरुस्तीकरता लागणारा हत्यारांचा आणि इतर गोष्टींचा  सरंजाम बाजूला मांडून तो दुरुस्तीचे काम सुरू करत असे.

बहुतेक बादल्यांचे तळ गंजून भोक पडलेले असत किंवा खालची रिंग पट्टी मुडपून किंवा गंजून खराब झालेली असे. बादली दुरुस्तीच्या वेळी तळाचा पत्रा आणि खालची उभी पट्टी दोन्ही बदलणे भाग पडत असे. कायम पाण्याशी संपर्क आणि आदळ आपट झाल्याने तळाचा पत्रा आणि उभी पट्टी  एकाच वेळी दुरुस्तीलायक झालेले असण्याची शक्यता अधिक. दुरुस्तीची  सुरुवात तळाखालची उभी पट्टी बादलीपासून वेगळी करून करणे भाग असे, त्याप्रमाणे ती पट्टी वेगळी झाली की बादलीच्या तळाच्या भागाची काय अवस्था झाली आहे ती बालदीच्या मालकाला आधी दाखवावी लागत असे. त्यावर मालकाचा बहुतेक वेळा ठरलेला डायलॉग असायचा, बादली आणताना चांगली टिकाऊ हवी म्हणून किमतीकडे पाहायचे नाही. पण चांगली वस्तू वापरायचीसुद्धा अक्कल लागते. अर्थात हा डायलॉग स्वयंपाकघराच्या दिशेने फेकलेला असायचा. दुरुस्तीसाठी कसला पत्रा वापरणार आहे आणि त्यामुळे आता परत बादली वाटेल तशी वापरली तर कमीत कमी वर्ष दोन वर्षे तरी सहज जातील असे तोंडभरून आश्वासनही द्यायला कारागीर विसरायचा नाही. बादलीचा मालक पत्रा कापण्यापूर्वी मला दाखव म्हणून तंबी द्यायला विसरायचा नाही. दुरुस्तीसाठी  वापरला जाणारा पत्रा वरून खराब दिसत असला तरी खरा गेल्वेन (ग्याल्वनायीज) चा आहे म्हणून छातीठोकपणे पत्र्याच्या उत्तम क्वालिटीची खात्री देऊन कारागीर मोकळा व्हायचा. मालकही आपल्याला पत्र्यातलं पण बरं-वाईट काय ते बरंच काही कळतं हे दाखविण्यासाठी पत्रा मुडपून वाजवून बिजवून पाहायचा. आणि पत्रा निश्चित झाला की बादली  दुरुस्तीला सुरुवात व्हायची. जुना काढलेला बादलीच्या तळाचा पत्रा शेगडीला विस्तव, राख भरायला आणि संध्याकाळचा धूप घालायला लागणार आहे तेव्हा तो घेऊन जाऊ नकोस हे बजावायलादेखील बादलीचा मालक विसरायचा नाही.

बादलीचा तळ बादलीपासून वेगळा काढणे तसे सोपे, कारण एक-दोन ठोके दिले की बादलीचा तळ बादलीपासून वेगळा होई आणि तळ नसलेली बादली अगदी भोंगाळी दिसू लागे. चौकोनी लोखंडी ठोकल्यावर बाल्डीची खालची कडा धरून छोटय़ा हातोडय़ानी किनार एकसारखी करून घेतली की जाडजूड पोलादी कडय़ा वरती धरून कानशिने घासून त्यावरचा गंज काढून टाकला की बाल्दीचा तळापासून उभा भाग कितीसा कापून काढावा लागेल ह्यचा अंदाज येई आणि तेवढा भाग लोखंडाची मोठी कात्री घेऊन कापून टाकायचा, कडय़ात अडकवलेल्या जुन्या पत्र्याच्या चळतीतून जो पत्रा बादली मालकांनी पास केलेला असेल, तो ठोकून ठोकून अगदी सारखा करून घ्यायचा आणि तो देखील तारेच्या ब्रशने आणि कानस वापरून पूर्ण साफ करून घ्यायचा. तो खाली पसरून त्यावर लोखंडी करकटक घेऊन बादलीच्या तळाच्या अकरापेक्षा जरा थोडय़ा मोठय़ा आकाराचे वर्तुळ आखून घ्यायचे आणि लोखंडी कात्रीने पत्र्याचा वर्तुळाकार तुकडा काढायचा, तो बादलीच्या तळावर  बसवून सभोवती अधिकचा पत्रा वरच्या बाजूने दुमडून बादलीच्या उभ्या पत्र्याबरोबर लहान हातोडीच्या साहाय्यांनी ठोकून घट्ट बसेल असे बघायचे. म्हणजे बादलीला नवीन तळ बसविण्याचे मुख्य काम पुरे होई, मग सोबत आणलेल्या जुन्या जाड पत्र्यातून एक-दोन-तीन इंच रुंदीची पट्टी कापून त्यातून बादलीच्या खालचे उभ्या पट्टीचे कडे बनवायचे. ते कडे बनविताना बादलीच्या तळाभोवती अगदी घट्ट बसेल इतका पट्टीचा तुकडा कापून त्याची दोन्ही टोके रीव्हेटस् ठोकून कडे पूर्ण करायचे आणि बादलीच्या तळाशी बसवून वरून लहान हातोडीने ठोकून ठोकून ते पक्के घट्ट बसले आहे ह्यची खात्री करून घ्यायची. अशी नव्याने तळ बसवलेली बादली तळाची बाजू उजेडाकडे ठेवून आणि  तोंड बादलीत घालून कुठे बारीकसारीक भोक किंवा चीर तर नाही ना, ह्यची खात्री करून घ्यायची. अशी खात्री पटली की बोटांवर लांबीचा छोटी गोळी घेऊन ती पूर्ण जोर लावून बादलीचा तळ आणि बाजूची पट्टी ह्यच्या सांध्यात गच्चपणे भरली जायची. शिवाय बादलीच्या पत्र्याला जेथे उभा जोड दिलेला असेल तेथे देखील लांबीचे बोट आतून, बाहेरून ओढले जायचे. अशी दुरुस्ती केलेली बादली आणि बादलीचा काढलेला जुन्या तळाचा पत्र्याचा गोल तुकडा, बादलीच्या मालकाला सुपूर्द करायची. मालक स्वत: एकदा बालदीत तोंड खुपसून उजेडाकडे पाहून बादलीला कुठे बारीकसारीक भोक नाही ह्यची खात्री करून आणि जुना पत्रा ताब्यात घेऊन व्यवहार पुरा करून टाकायचा. पुढे दोन-तीन दिवस लांबी पूर्ण सुकवण्यात जायचे आणि नंतर ही दुरुस्त केलेली बादली पुढे वर्ष-दोन वर्षे त्या घरात रोज नळावरून पाणी भरत राहायची, नळावरच्या भांडणात रोज होणारे अत्याचार सहन करत राहायची.

हाच बादली रिपेर करणारा, पत्र्याच्या ट्रंका दुरुस्त करून देई, डालडा तुपाच्या रिकाम्या गोल डब्याला, तेलाच्या, बिस्किटांच्या सहा पायलीच्या डब्याला बिजागर आणि कडी- कोयंडा असलेले पत्र्याचे झाकण बसवून द्यायचा. असे डबे धान्य साठवायला उपयोगी व्हायचे. पाणी भरायचे पिंप गंजलेले, भोके पडलेले असेल तर पत्र्याचा गंजलेला भाग कापून काढून, उरलेल्या चांगल्या धड पत्र्यापासून परत पाणी भरण्यासाठी वापरता येऊ  शकेल असे पिंप बनवून द्यायचा. थोडक्यात, पत्र्याच्या जुन्या नादुरुस्त वस्तू घेऊन त्या परत वापरता येऊ   शकतील अशा करून देण्यात त्याचा हातखंडा असे. आता तसे कोणी कारागीर दारावर येणे शक्य नव्हते आणि समजा आलेच असते तरी ही पत्र्याची जुनी बादली दुरुस्त करून परत वापरात आणणे शक्यच नव्हते. कारण आमच्या आधुनिक घरातील आधुनिक न्हाणीघरात हे असले बादलीचे राकट रूप इतर रंगीबेरंगी प्लॅस्टिकच्या शोभिवंत बादल्यांबरोबर राहाणे शक्य नव्हते, शिवाय न्हाणीघराच्या गुळगुळीत आणि चकाकणाऱ्या फरश्यांशी होणारा तिचा प्रत्येक संवाद अगदी कर्कश होत राहिला असता. ह्य सगळ्याचा विचार करून, मन घट्ट करून भंगारवाल्याला देण्याच्या वस्तूमध्ये पत्र्याच्या त्या जुन्या बादलीलाही मी अलगद ठेवून दिले. ती जमिनीवर ठेवताच एक ओळखीचा पण आता कर्कश वाटणारा आवाज मला ऐकू आला.

gadrekaka@gmail.com