मोनूच्या आवडीनिवडीही खास आहेत. स्वच्छ ताजा मासा- तोही व्यवस्थित साफ करून बारीक तुकडे केलेला, मलईदार कोमट दूध, स्ट्रॉबेरी किंवा मँगो आइस्क्रीम आणि तंदुरी चिकन हे तिचे आवडते पदार्थ. ठरावीक कंपनीचंच कॅट फूड लागतं तिला, तेही जेवल्यानंतर मुखशुद्धी करता. ते खाल्ल्यावरच स्वारी झोपायला जाणार. तिला उग्र वास अजिबात आवडत नाहीत. मुळा किंवा कांदा चिरला की आरडाओरडा करते. झोपताना टेडी जवळ हवा असतो. नरम उशी आणि बेडशिवाय स्वारी झोपणार नाही.

आमच्या घरात आम्हा चौघांनाही मांजराची खूप आवड आहे.  ही आवड फक्त गावी गेल्यावर मनसोक्त पूर्ण व्हायची. बाहेर पडल्यावर कुठेही रस्त्यावर मांजर दिसलं तरी त्याला हात लावण्याचा मोह टाळता यायचा नाही. मी सहा वर्षांची असेन, आमच्या सोसायटीत एका अडगळीच्या ठिकाणी रस्त्यावरच्या भटक्या मांजरीने चार पिल्लांना जन्म दिला. मग त्या मांजरीला व तिच्या पिल्लांना वेळेवर खायला देणं सुरू झालं.

एके दिवशी एकच पिल्लू जागेवर दिसलं. पहिल्यांदा वाटलं की मांजर तिच्या पिल्लांना कुठेतरी नेऊन ठेवते आहे. मी थोडय़ा वेळाने पुन्हा तिथे जाऊन पाहिलं तर ते पिल्लू एकटंच ओरडत होतं. माझा धीर सुटू लागला. पांढरा शुभ्र रंग आणि काळंकुट्ट नाक असलेल्या त्या पिल्लाला मी उचलून घेतलं. ते पिल्लूही मला लगेचच बिलगलं. जणू त्याला खूप मोठा आधार मिळाला होता. त्याच्या अंगावरून अलगद हात फिरवता फिरवता त्याला घरी आणून त्याचं बारसंही केलं. आम्ही त्या पिल्लाचं नाव ‘मोनू’ असं ठेवलं. आज या गोष्टीला बारा वर्ष झाली आणि मोनू घरचा पाचवा सदस्य बनलीय.

सोसायटीच्या बाहेर ट्रकचं पार्किंग व्हायचं. एक दिवस मोनूला एका ट्रकमध्ये चढताना आमच्या वॉचमनने पाहिलं. तेव्हा मोनू दीड वर्षांची होती. मोनू घरी आली नाही म्हणून आम्ही सगळे काळजीत होतो. एरवी ती संपूर्ण सोसायटी फिरून येऊन पुन्हा तिसऱ्या मजल्यावर घरी येत असे. आम्ही तिला खूप शोधलं. आईने तर आजूबाजूच्या सोसायटींत, चाळींमध्ये मोनूचा फोटो दाखवत लोकांकडे विचारणा केली. सकाळी येणाऱ्या सफाई कामगारांनासुद्धा विचारलं, पण मोनूचा काही पत्ता लागेना. १५ दिवस झाले. मोनू परत येण्याची आम्ही आशा सोडली आणि अचानक पहाटे दाराबाहेर मोनूचा आवाज आला. माझी ताई अभ्यास करण्यासाठी पहाटे उठायची. मोनूचा आवाज ऐकताच तिने आईला उठवलं. आईने दार उघडलं तर काय, मोनू दाराबाहेर भेदरलेल्या अवस्थेत दिसली. तिचा आवाज क्षीण झाला होता. ती धुळीने माखली होती. ती आमचं अंग चाटून मी तुमची मोनू अशी ओळख पटवून देत होती. पण तिच्या नाकावरच्या काळ्या डागामुळे आम्ही तिला ओळखलं. तिच्या अवस्थेवरूनच आमच्या लक्षात आलं की, १५ दिवसांत तिचे खाण्याचे खूप हाल झाले असावेत. तिला पाणी प्यायला दिलं. खाऊ घातलं.

मोनू खूप हुशार आणि चौकस व खटय़ाळही आहे. तिच्याकडे बघून मोठय़ानं हसलं की तिला भारी राग येतो. मग ती टीपॉयवरील पेपर टराटरा फाडते, नाहीतर सोफ्याचं कव्हर नखांनी खरडवून आपला राग व्यक्त करते. माणसासारखीच प्राण्यांची स्वभाववैशिष्टय़ं असतात, फक्त त्यांच्या मूकभावना समजून घेता यायला हव्यात.

मोनूच्या आवडीनिवडीही खास आहेत. स्वच्छ ताजा मासा- तोही व्यवस्थित साफ करून बारीक तुकडे केलेला, मलईदार कोमट दूध, स्ट्रॉबेरी किंवा मँगो आइस्क्रीम आणि तंदुरी चिकन हे तिचे आवडते पदार्थ. ठरावीक कंपनीचंच कॅट फूड लागतं तिला, तेही जेवल्यानंतर मुखशुद्धी करता. ते खाल्ल्यावरच स्वारी झोपायला जाणार. तिला उग्र वास अजिबात आवडत नाहीत. मुळा किंवा कांदा चिरला की आरडाओरडा करते. झोपताना टेडी जवळ हवा असतो. नरम उशी आणि बेडशिवाय स्वारी झोपणार नाही. मोनूने कधीच घरात घाण केली नाही. ती दार उघडायला सांगणार आणि खाली जाऊन १०-१५ मिनिटांत घरी परतणार. बाल्कनीत आम्ही तिच्यासाठी कॅट लिटर (मिट्टी) आणून ठेवली आहे, पण तरीही ती खालीच फेरी मारून येणार.

गेली बारा वर्ष आम्ही घर बंद करून कुठेही बाहेर गेलो नाही. कुणाला तरी घरी राहावंच लागतं. आम्ही दरवर्षी मोनूचा वाढदिवस साजरा करतो.

आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी आपण बरंच काही करतो, पण प्राणी आपल्याला खरोखरीच खूप आनंद देतात. त्यांना समजू शकलो तर त्यांच्याशी आपली मैत्री चटकन होते. आमच्याकडे येणारा प्रत्येक जण मोनूचा हेवा करतात. मलाही कधी कधी तिचा हेवा वाटतो. भरपूर झोपायचं, आराम करायचा आणि कशाचीही चिंता, काळजी करायची नाही. आमच्या मोनूंचं आयुष्य किती आहे माहीत नाही, पण तिला जवळ घेऊन आम्ही नेहमी म्हणतो- तू आमच्या सोबत नेहमी राहा!

सलोनी पंडित vd.akshata_pandit@yahoo.com