25 March 2019

News Flash

आखीव-रेखीव : ४४० व्होल्ट्स आणि आपण..

सगळ्या इंटेरिअरची भिस्त ही मुळातच लाइटिंगवर असते तेव्हा ते फारच काळजीपूर्वक केले पाहिजे.

‘शॉवरमधून करंट लागून मुलाचा मृत्यू.’ अशी बातमी सकाळी सकाळी वाचायला लागणे हे खूपच वेदनादायी आहे आणि माझ्यासारख्या इंटिरियर डिझायनरला विचार करायला लावणारे. आजकाल आपण सतत कुठेतरी शॉर्ट सर्किटने होणाऱ्या जीवितहानीबद्दल वाचतोय. हे हॉटेल किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडतात तेव्हा दु:ख होतेच; पण ‘घरातल्या शॉवरमधून करंट.’ अशी  बातमी वाचली की आपण कुठेतरी आतून हादरून जातो. असे का होते? कारण हॉटेल, सार्वजनिक ठिकाणी नीट वायरिंग केली नसेल, मटेरियल योग्य नसेल किंवा अजून काही कारणे असतील, हे आपण गृहीत धरतो. पण जेव्हा घरात असे होते तेव्हा आपण काय म्हणणार? कोणाला दोष देणार?

आज आपण जाणून घेऊ  की आपले नेमके कुठे चुकते? आणि योग्य इलेक्ट्रिकल वायरिंग किंवा योग्य इलेक्ट्रिकल प्लॅनिंग कसे करायचे.

सगळ्यात प्रथम आपले घर नवीन आहे, आताच पझेशन मिळाले आहे तर मला इलेक्ट्रिकलचा खर्च कमी येईल असा एक विचार आपल्या मनात असतो, तो पूर्णपणे बाजूला ठेवावा. रिनोव्हेशन असो किंवा नवीन घरात होणारे काम इलेक्ट्रिकल प्लॅनिंग हे नव्यानेच होणार, असे आपल्याला ठरवायलाच लागते. बिल्डरने लावलेल्या नवीन घरातील टाइल्सही नीट फिनिशिंग नाही म्हणून बदलतो, तिथे आपण इलेक्ट्रिकलचे काम का चालवून घेतो? आपल्या सोयीनुसारच आणि उत्तम मटेरियल वापरूनच योग्य त्या प्लॅनिंगनुसारच हे काम करायचे आणि ते करताना फक्त बराच फोकस हा लाइट फिक्सचरवर नसून वायरिंग किंवा त्याचे प्लॅनिंग यावर असला पाहिजे. सगळ्या इंटेरिअरची भिस्त ही मुळातच लाइटिंगवर असते तेव्हा ते फारच काळजीपूर्वक केले पाहिजे.

जसे की, आपण नवीन घरात नवीन फर्निचरचा विचार करतो, तसेच नव्याने मी इलेक्ट्रिकल वायरिंगही करून घेईन आणि त्यासाठी मी उत्तम दर्जाचे मटेरियल वापरेन, कारण हा माझा आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे. इलेक्ट्रिकच्या खर्चाबाबत कोणतीही तडजोड करण्याचा विचारही मनात आणू नका.

आपण काय करायला हवे

 • सर्वप्रथम आपल्या फर्निचरच्या लेआऊटनुसार इलेक्ट्रिकल लेआऊट बनवणे.
 • किती लाइट हवे, कोणत्या प्रकारचे हवे, कुठे लाइटचे बटन असले पाहिजे, किती उंचीवर असले पाहिजे हे आधीच ठरवून घ्या.
 • इलेक्ट्रिकल काम करणारा कॉन्ट्रॅक्टरही सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यालाही सर्व बाबींची नीट माहिती असणे आवश्यक आहे. त्याची ‘चलता हैं ना साब’ अशी प्रवृत्ती नको. अशा कॉन्ट्रॅक्टरवर लगेच फुली मारा.
 • आपले काम आपल्याला तांत्रिकदृष्टय़ा उत्तम करायचे असेल तर सर्वप्रथम उत्तम दर्जाच्या वायर्स वापरणे आवश्यक आहे. त्या बरोबरच आपण सिंगल फेज, टू फेज का थ्री फ्रेज कनेक्शन याचा अभ्यास महत्त्वाचा असतो. सगळ्या इलेक्ट्रिकल उपकरणांचा वापर आणि त्यांना किती पॉवर सप्लाय लागणार हे ठरवणे थोडक्यात, लोड कॅल्क्युलेट करणे. अर्थिग नीट करून घेणे. सर्व इलेक्ट्रिक सप्लाय मेन्सपर्यंत अखंड नेणे. तसेच एसीसाठीची वायर वेगळी वापरली जाते म्हणजे काय तर १.५ टन एसीसाठी २.५ mm. वायर वापरणे. या पद्धतीने वायरिंगचा वापर करणे. तसेच इंटरनेटसाठी वेगळी
 • वायर वापरली जाते ती तर अखंडच असली पाहिजे नाहीतर त्या इंटरनेटचा काही उपयोग नाही. त्याच प्रकारे म्युझिक सिस्टिमच्याही वायरला जोड नको.
 • प्रत्येक रूमनुसार इलेक्ट्रिकल उपकरणांचा आढावा घेणे, लाइट पॉइंटस ठरवणे. किती v amph, rv amph चे किती सॉकेट लागणार हे आपण कोणते आणि किती गॅझेट वापरतो यानुसार ठरते. याचबरोबर त्यांच्या जागाही निश्चित झाल्या की वायरिंग करणे हे सोपे होते.
 • बाथरूममधील इलेक्ट्रिक लेआऊट फार महत्त्वाचा असतो कारण बाथरूम म्हणजे पाणी आलेच. इथे मात्र फार विचार करून स्विचबोर्डची उंची आणि जागा ठरवावी लागते. कारण आता आपण बाथरूममध्येही गॅझेट वापरतो तेव्हा सॉकेटही लागतात.
 • या सगळ्याबरोबरच स्विचेस कोणत्या कंपनीचे घेणार हेही महत्त्वाचे. आपल्या बजेटनुसार आपल्याला उत्तम कंपनीचे स्विच नक्की मिळतात. ब्रँडेड घेणे योग्य, कारण कधी जर का एखादा स्विच खराब झाला तर तो पटकन आपल्याला मिळाला पाहिजे.
 • वायरिंग करताना ते एका सरळ रांगेत आणि काटकोनातच झाले पाहिजे. तिरपे वायरिंग केल्यास पाइपमध्ये या पॉइंटवरून दुसरीकडे वेडेवाकडे फिरवलेले पाइप हे थोडा खर्च वाचवतेच, पण भविष्यात फार मोठे नुकसान करते. नुकसान करते म्हणजे नक्की काय तर सर्व भिंती फिनिश झाल्या की या कशाही फिरवलेल्या पाइपची जागा लक्षात राहणार आपणच पुढे-मागे भिंतीवर ड्रिल केले आणि तिथेच नेमके मागे हा पाइप असेल तर नक्की वायर कट होणार. पण हेच काम जर नीट असेल तर आपण निश्चिंत असू.
 • यामुळेच आम्ही कन्सिल्ड वायरिंगला विरोध करतो असाही एक मतप्रवाह आहे. पण असे काही नसते. कन्सिल्ड वायरिंगपण केसिंग केपिंग वायरिंगच्या पद्धती एवढेच योग्य असते.
 • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, काम संपल्यानंतर आपल्या तज्ज्ञांकडून वायरिंगचेही ड्रॉइंग घेणे. म्हणजे भविष्यात आपण जर का कुठे भिंतीवर ड्रिल करणार असू तर आपण त्या ड्रॉइंगवरच्या वायरिंगच्या पाइपचा अभ्यास करून ड्रिल मारू शकू. हे ड्रॉइंग्स आपल्या माहितीसाठी असणे आवश्यक आहे.
 • आजकाल ऑटोमेशननेही गोष्टी सोप्या झाल्या आहेत. एका मोबाइल अ‍ॅपद्वारे आपण कुठेही असलो तरी घरातील लाइट, एसी यांवर नियंत्रण ठेवू शकतो. ऑन-ऑफ करणे, शिवाय पडदे बंद करणे किंवा उघडणे हे फक्त एका जागी बसून एका बटनावर करता येते.

आजकालच्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे किचकट वाटणाऱ्या गोष्टीही सोप्या झाल्या आहेत. माझ्या या क्षेत्रातील इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मी नक्की सांगेन की, पहिल्याच बैठकीमध्ये- आपल्याला शॉर्टकट चालणार नाही, प्लॅनिंगनुसार काम करायचे आणि महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञांचे ऐकायचे या गोष्टींची पूर्ण कल्पना जशी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला लागते तशीच ती स्वत:च्या मनालाही द्यायची. आणि हीच सूचना पूर्ण काम होईपर्यंत आपल्या मनालाही सतत देत राहायची. कारण नंतर नंतर लोकांचा धीर सुटतो आणि मग आवरते घ्या, जाऊ दे ना अशी मन:स्थिती होते. आणि दर वेळेला काही कॉन्ट्रॅक्टरच्या काम लांबवण्याने उशीर होतो असे नाही. बऱ्याच गोष्टींवर ते अवलंबून असते. तेव्हा आपण जेव्हा घराचे काम काढतो ना तेव्हा फार पेशन्स ठेवावा लागतो, तो ठेवला की तुमच्या लक्षात येते की- सब्र का फल मिठा होता हैं।

(इंटिरियर डिझायनर)

kavitab6@gmail.com

First Published on February 17, 2018 12:17 am

Web Title: electric shock electric volts electrical planning