News Flash

साधेपणातील कलात्मक सजावट

मंडपाच्या चारही बाजूंना बीडस् अथवा मण्यांच्या साहाय्याने लटकन तयार करून लावू शकता.

सुचित्रा प्रभुणे

गणपतीचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. सार्वजनिक मंडळांप्रमाणे घरोघरीदेखील मखर सजावटीची कामे जोरात सुरू आहेत. त्यातच प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीमुळे मखर सजावटीसाठी नेमके कोणते पर्याय वापरावे, असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला असेल. परंतु साध्या-सोप्या गोष्टींचा वापर करूनही घरगुती गणपतीला आकर्षक सजावट करता येऊ शकते.

यंदा राज्य सरकारने प्लास्टिक व थर्माकोल बंदी जाहीर केल्यामुळे गणपतीसाठी मखर सजावट नेमकी कशी करावीत, असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे. त्यातच काहींना थर्माकोल वापरल्याशिवाय मखर सजावट पूर्ण झाली असे वाटतच नाही. शिवाय, अलीकडे घरगुती सजावटीलादेखील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच मूर्तीबरोबर त्यामागची सजावटदेखील तितकीच आकर्षक असावी, याकडे जास्त कल असतो.

परंतु थर्माकोल न वापरता देखील उत्तम आणि आकर्षक सजावट करता येऊ शकते. या संदर्भात हॉबी आयडियाज्च्या भावना मिश्रा यांनी अनेक चांगल्या संकल्पना मांडल्या आहेत आणि या सजावटीसाठी खूप काही महागडी साधनेदेखील लागत नाहीत. अगदी घरात येणारी वर्तमानपत्रे, डिझायनर कागद, फॅब्रिक रंग आणि विविध प्रकारच्या बीडस्च्या माध्यमातून ही सजावट सहजपणे करता येते. याव्यतिरिक्त पेपर क्वििलगच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची फुले, पाने, पंखे किंवा आसन वा इतरही अनेक गोष्टी तयार करून देखणी सजावट करता येते. थोडक्यात काय, तर थर्माकोल हेच एकमेव माध्यम मखर सजावटीसाठी आवश्यक नाही आहे. बदलत्या काळानुसार नवनवीन पर्याय निर्माण होतच आहेत. गरज आहे ती फक्त कलात्मक दृष्टीची.

वर्तमानपत्रे आणि मासिकांच्या पानांनी तयार केलेला मंडप

यासाठी वर्तमानपत्राचा कागद घेऊन त्याच्या एक इंच रुंदीच्या पट्टय़ा तयार कराव्यात. अशा सुमारे ११० तरी पट्टय़ा तयार कराव्यात. त्यांची दोन्ही बाजूंची टोके चिकटवून घ्यावीत. मग एकेक पट्टी एकाआड एक विणत त्यांची दहा बाय दहाची एक चटई तयार करून घ्यावी.

आता बाब्रेक्यू स्टिक अथवा तत्सम स्वरूपाच्या काठीच्या साहाय्याने मासिकांच्या पानांचा कागदी रोल तयार करून घ्यावा. असे सुमारे एकशे साठ रोल चिकटवून तयार ठेवा. हे तयार झालेले रोल अशा तऱ्हेने एकत्र करा की त्यामधून चार कागदी खांब तयार होतील. असे खांब जे आतून पोकळ असतील, पण उभारणीच्या दृष्टीने भक्कम असतील.

टिश्यू पेपर घेऊन पेपरकटरच्या साहाय्याने रोल अर्ध्यातून कापा. असे आठ रोल तयार करा. हे रोल वर-खाली ठेवून त्यात कागदी खांब अडकवा. मखरावर शिखर / गोपुरे ठेवण्यासाठी कागदाच्या मोठय़ा आकारापासून लहान आकारापर्यंतच्या रिंग्ज् तयार करून घ्या. अशा तऱ्हेने खाली चटई त्यावर चार खांब आणि वर शिखर /गोपुरे या प्रकारे जुळणी करून छान मंडप तयार होईल. जुळणी करण्यापूर्वी चटई, खांब आदी गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगात रंगवा अथवा डिझायनर पेपरदेखील त्यावर चिकटवून सुशोभित करू शकतात. मंडपाच्या चारही बाजूंना बीडस् अथवा मण्यांच्या साहाय्याने लटकन तयार करून लावू शकता. असा हा मंडप करायला देखील सोपा आहे आणि सजावट केल्यावर तो दिसतोही तितकाच आकर्षक.

चमचमत्या रंगातील पतंगाची सजावट

यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या ओएचपी शीटस्चा वापर करावा. या शीटस् चौकोनी आणि त्रिकोणी आकारात कापाव्यात. या पूर्ण त्रिकोणा /चौकोनात मावेल अशी तुमच्या आवडीची नक्षी प्रथम पेन्सिलने काढून घ्यावी. सोनेरी ग्लिटर आउटलायनरच्या मदतीने ही नक्षी ठळक करून घ्यावी. आवडीच्या ग्लिटर रंगांनी ही नक्षी रंगवावी. अशा रीतीने सर्व चौकोन-त्रिकोण रंगवून तयार ठेवावेत.

मग एक चौकोन घेऊन त्याखाली त्रिकोण चिकटवून त्याला पतंगासारखा आकार द्यावा. चौकोन- त्रिकोणाच्या दोन्ही बाजूला आवडीप्रमाणे लटकन लावा. अशा तऱ्हेने तयार झालेले हे पतंग दोराच्या साहाय्याने गणपतीच्या मागील बाजूच्या िभतीवर लटकावे अथवा मागे एखादी चादर किंवा पडदा घेऊन त्यावर हे पतंग चिकटवावे. या सजावटीचे खास वैशिष्टय़ म्हणजे, चमचमत्या रंगांचा वापर केल्यामुळे सजावट चटकन नजरेत भरते. शिवाय ही सजावट गणपतीपुरताच मर्यादित न राहता इतर सणावारी किंवा एरवी घरात वॉलपीस म्हणून देखील वापरू शकता.

ओरिगामी छत्री

तुमच्या मखराला अथवा मूर्तीला अनुरूप असा ए-३ आकाराचा जाड पेपर घ्यावा. त्यावर बारा इंच व्यासाचे वर्तुळ काढून ते कापून तयार ठेवावे. आता हे वर्तुळ अर्ध्यात चार वेळा दुमडावे. हे दुमडलेले वर्तुळ सावकाश उघडा. एक घडी सोडून त्यापुढची एक घडी अशा पद्धतीने सर्व घडय़ा एकत्र करा, म्हणजे पर्वतासारखा उंचवटा तयार होईल.

आता हे वर्तुळ परत एकदा पूर्ववत करून त्यावर तुमच्या आवडीचे नक्षीकाम करून सुशोभित करा. पुन्हा एकदा वरील पद्धतीने घडय़ा एकत्र करून उंचवटा तयार करून दोऱ्यामध्ये गुंफा. या दोऱ्यात आवडीप्रमाणे मणी, बीड्स ओवून सुशोभित करा. अशी ही सहज सोपी, परंतु आकर्षक अशी छत्री बाप्पाच्या डोक्यावर विराजमान होण्यास तयार आहे.

ओरिगामी हार

तुमच्या आवडत्या रंगाचा अथवा फिकट गुलाबी रंगाचा पूर्ण आकाराचा इम्पेरिअल कार्डपेपर घ्या. या कागदाचा साडेचार सेंमी. आकाराचा मोठा व साडेतीन सेंमी. आकाराचे तीन लहान चौकोन कापून घ्या.

कागद अर्ध्यातून घडी घालत दोन वेळा दुमडा. आता हा कागद उलगडा म्हणजे कागदाचे चार भाग तयार होतील. या कागदाची एका कोपऱ्यापासून विरुद्ध कोपऱ्यापर्यंत घडी घाला. हे कोपरे बोटांनी घट्ट दुमडून ठेवा म्हणजे त्रिकोणी आकार मिळेल. हा त्रिकोण उलगडा आणि विरुद्ध कोपऱ्यासाठी पुन्हा हीच कृती करा.

मग डाव्या कोपऱ्याचे टोक धरून त्रिकोणाच्या मध्यिबदूच्या टोकापर्यंत आणून घडी घाला. कोपऱ्याची टोके बोटांनी घट्ट दाबून दुमडा. उजव्या बाजूसाठी हीच कृती परत करा. आता शंकरपाळीसारखा आकार तयार होईल.

या आकाराच्या डाव्या कोपऱ्याचे टोक मध्यिबदूपर्यंत दुमडा. उजव्या कोपऱ्याबाबतही अशीच कृती करा. आता कागद उलटवा आणि पुन्हा आधीचीच कृती करा. मध्यिबदूच्या दोन्ही बाजूंना दुमडलेल्या घडय़ांच्या रेषा दिसतील. त्रिकोणी घडय़ा उलगडा आणि घडय़ांच्या रेषा आता कापून घ्या. शंकरपाळीचा आयताकृती आकार तयार होईल. तयार झालेल्या आकाराची एकेक पाकळी घ्या.

कागदाच्या वरच्या बाजूचा उचलल्यासारखा दिसणारा भाग उघडा. पाकळी खुली ठेवण्यासाठी हलकेच दाब द्या. अशा ३६ पाकळ्या बनवून एकापाठोपाठ एक चिकटवून तयार ठेवा. या पद्धतीने एक मोठे आणि चार लहान आकाराची ओरिगामी फुले तयार होतील. उचलल्यासारख्या दिसणाऱ्या पाकळ्यांवर गिल्टर रंगाने आउटलाइन काढा.

आता सोनेरी रंगाची रिबिन घेऊन मध्यभागी एक मोठे फूल आणि दोन्ही बाजूला दोन लहान फुले चिकटवा. दोन फुलांच्या मधल्या जागेत आवडीचे चमकदार खडे चिकटवून सुशोभित करा. अशा तऱ्हेने देखणा ओरिगामी हार तयार होईल.

suchup@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:02 am

Web Title: ganesh chaturthi decoration artistic decoration for ganpati festival
Next Stories
1 देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे
2 एकटय़ादुकटय़ा वृद्धांची सुरक्षा
3 दुर्गविधानम् : ..ते हे राज्य!
Just Now!
X