प्राची पाठक

फ्रिजच्या वर, फ्रिजच्या आत, कपाटांच्या रिकामी कप्प्यांत, बॉक्स कॉटमध्ये, माळ्यावर, बाल्कन्यांच्या कोपऱ्यात, तुडुंब भरलेल्या ड्रॉवर्सच्या खाचाखोचांमध्ये पडीक औषधे, रिकाम्या-अर्धवट भरलेल्या- नकोशा झालेल्या बाटल्या, स्ट्रिप्स आणि आरोग्यविषयक यंत्रे-उपकरणे ठाण मांडून बसलेली असतात. फ्रिजच्या वर तर सगळ्या ‘पॅथीज’ एकमेकांशी केविलवाण्या होऊन बोलत असाव्यात. घरातल्या एकेका सदस्याला एकेक पॅथी एकेका व्याधीला किती तरी प्रकारचे उपचार करत बसलेली असते. उदाहरणार्थ, गुडघेदुखी! गुडघेदुखीला गुडघ्याला बटाटा बांधावा इथपासून ऐकीव आणि बदलत राहणाऱ्या तज्ज्ञांचे उपाय सुरू होतात. बटाटा बांधायचा तर फडके हवे. मग ते फडके योजले जाते. ते हाताशी राहावे म्हणून मोक्याची जागा शोधली जाते. ती अनेकदा फ्रिजवरची जागा असते. मग आपण आणखीन सोय बघायला जातो. असलेल्या कापडाला बंद शिवून घेतो, गरजेनुसार अगदी. काही दिवस स्वत:वरच खूश असतो. आता शेकायच्या पिशव्या वगरेदेखील या बंद असलेल्या कापडात गुंडाळून शरीरावर कुठेही बांधून घेता यायची सोय केली म्हणून सांगत असतो. थोडय़ाच दिवसांत कळते, असे बटाटे बांधून, शेकून काही होत नसते. नीटच उपचार घ्यावेत. मग ‘नीट उपचार’ या व्याख्येत जे बसते, त्या तज्ज्ञाला याकामी लावले जाते. ते रुळत नाही, तोवर कोणी तरी त्यांचाही वेगळाच अनुभव सांगते आणि आतापर्यंत केलेले उपचार कसे फिजूल होते, आपण अधिक नॅचरल व्हायची गरज आहे, असे स्वत:ला सांगत गुडघेदुखीसाठी आजवरची सगळी औषधे आणि उपाय फोल ठरवून नवीनच काही तरी केले जाते. या प्रत्येक टप्प्यावरची औषधे, गोळ्या, उपकरणे, सुविधा घरात साचत जातात. अनेकदा त्याच डॉक्टारांची उपचार पद्धती, औषधे बदलतात. आधीची औषधे अर्धवट फोडलेली असतात. ती वापरली जात नाहीत. सगळी पडून राहतात. आपण आधीच व्याधीग्रस्त असल्याने घरात आवरसावर करायला वेळ होतोच असे नाही. इतरांना असा उत्साह-विचार असतोच, असेही नाही. लागतील या गोष्टी, एक्स्पायरी उशिराची आहे, असू देऊ म्हणून ही सगळी औषधे घरात साचत राहतात.

अनेकदा हॉस्पिटलशी, दवाखान्याशी संलग्न दुकानांतूनच औषधे आणली जातात. त्यातील दोन-चार गोळ्या उरल्या आणि स्ट्रिप्स नीट असतील, बाटल्या फोडलेल्या नसतील, तर ते सामान रिप्लेस होते किंवा पसेदेखील परत मिळतात. कधी ही सुविधा केवळ त्या-त्या ठिकाणी अ‍ॅडमिट झालेल्या लोकांनाच मिळते. वरचेवर औषधे नेणाऱ्यांना, ओपीडीमध्ये आलेल्या लोकांना मिळत नाही. आपल्यालादेखील कुठे एक-दोन स्ट्रिप्स, दोन-चार गोळ्या परत करायला शब्द टाका? असे वाटत असते. परत करणे जिवावर येते, काही तरी फेव्हर दुसऱ्याकडून मागतोय, असे वाटते. परत करायची-पसे मागायची सवयच नसते, म्हणूनसुद्धा अशी औषधे घरातच पडून राहतात. काही गोळ्या दोन-चारच सांगितलेल्या असतात. पण दुकानदार म्हणतात, ‘आमच्याकडे हे कोणी घेत नाही. तुम्ही पूर्ण स्ट्रिपच घ्या.’ असे करत गरज नसताना पूर्ण स्ट्रिप घरात येते. कधी आपण आपले डोके चालवून काही औषधे जरा बरे वाटले की अर्धवट सोडून देतो. अनेक ड्रॉप्स, स्ट्रिप्स, सिरप अशा प्रकारे पडून राहतात. काही ड्रॉप्ससाठी उघडल्यानंतर अमुक दिवसांची मर्यादा असते. आपण तीदेखील पाळत नाही आणि फ्रिजमध्ये साठवून ठेवतो. त्यांची एक्सपायरी जास्त काळ असू शकते, पण फोडलेले ड्रॉप्स अमुक दिवसांत ते फोडल्यावर वापरावे, हे लक्षात आलेले नसते. लागतील कधी तरी परत, किती महागाची असतात औषधे म्हणून आपण ते सर्व जपून ठेवतो.

आपले घर आणि हॉस्पिटल/ दुकान हे लांब असले तरी रिप्लेस करायची/ रिफंड मिळायची सोय असून काही गोष्टी साचून राहतात.  डोक्यावरच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत आणि पायाला पडणाऱ्या भेगांपर्यंत अनेक प्रकारच्या उपचारांची सोय असते. केवढय़ा तरी क्रीम्स, लोशन्स, तेले ‘हेच बेस्ट’ आहेत म्हणून चटकन खरेदी होऊन घरात येतात. काही मसाजर्स, लाकडी यंत्रे, रोलर्सदेखील असेच आराम पडेल म्हणून आपण घेऊन ठेवतो. या सर्व गोष्टी पूर्णत्वाने आणि पुरेपूर पद्धतशीरपणे वापरण्यासाठी कमालीचे सातत्य हवे असते आणि ते मिळतेच असे नाही. म्हणूनच घरात साचत राहणाऱ्या औषधांचा वेळोवेळी विचार करून त्यांचा निपटारा करून टाकला पाहिजे. काही ठिकाणी एक्स्पायरी डेटमधील औषधे कुठे तशीच देऊन टाकायची सोय असते. ज्यांना परवडत नाही, त्यांना त्याने उपचार मिळू शकतात. खर्च वाचू शकतो. पण ही सोय सर्वत्रच असते, असे नाही. चांगल्या ठेवलेल्या, मुदतीच्या आतल्या औषधांचे, आरोग्यविषयक उपकरणांचे करावे काय, हा प्रश्न पडतो. काही मोबदला मिळून अथवा न मिळून किमान गरजूला ते वापरता यावे, अशी तरी भावना असतेच आपली. त्यासाठी आपल्या घरातल्या साचलेल्या औषधांवर नीट काम करावे लागेल. असेही एक छोटेखानी औषधांचे ऑडिट घरात करणे गरजेचे असते. त्यावर आणखीन माहिती करून घेऊ.

prachi333@hotmail.com