जमिनीची मर्यादा आणि बांधकामाच्या जागेची मागणी या व्यस्त प्रमाणामुळे इमारती उंच होऊ लागल्या, सभोवतालच्या मोकळ्या जागा आकुंचायला लागल्या. नवीन इमारतींच्या निर्मितीवर योग्य नियंत्रण नसल्याने शहरं बेढब व्हायला लागली. ही अस्ताव्यस्त वाढ परिसराचा विचार न करता झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा, सांडपाण्याचं व्यवस्थापन, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन हे सर्व विस्कळीत होऊन शहरातील अनेक भागांचा उकिरडा झाला.

गुढीपाडव्याला झालेल्या वसंतागमनामुळे निसर्ग रंगमय, सुगंधमय, आनंदमय आणि प्रणयमय झालेला आहे. सद्या रात्रभर चित्रा नक्षत्राने नभांगणात थाट मांडलेला आहे, तर त्याच्या जोडीला उत्तरेला सप्तर्षी आणि दक्षिणेला स्वाती पहाटेपर्यंत मिरवत आहेत. वास्तुपुरुष गेला पंधरवडाभर वेंगुर्ला, सुंदरवाडी, कुडाळ, कणकवली, मालवण या शहरीकरणाकडे वळलेल्या परिसरातील भटकंतीत गुंग होता. हा ‘विकसनशील’ परिसर हळूहळू निसर्गाशी व पर्यावरणाशी घेत असलेली फारकत त्याला अस्वस्थ करत होती. ही वाटचाल अशीच चालू राहिली तर हा परिसर बघता बघता सध्या जगभर चाललेल्या  असंवेदनशील ‘महानगरी’ करणाच्या विषारी विळख्यात सापडून ‘मृत्यूनगरी’कडे वळेल, हे चित्र त्याला अगदी स्पष्ट दिसत होतं. उपराळकराने सुचवलेल्या स्वत:च्या मुक्ततेच्या मार्गाचा विचार करताना तो आता अधिकच जागृततेने या ‘शहरीकरणा’ला संतुलित विकासाच्या दिशेने वळवण्याचे सुलभ पर्याय मनात रेखाटायला लागला होता. सध्याच्या चांदण्यारात्री त्याच्या या वैचारिक मैफिली प्रसन्नतेने रंगवत होत्या. या नगरांतील जुन्या- नव्या इमारतींच्या घोळक्यातून वळणाऱ्या अरुंद रस्त्यांवरून रात्री वाटचाल करताना थोडय़ाफार उरलेल्या झाडोऱ्यातून जमिनीवर झिरपणारे लोभस चंद्रकवडसे मनाला उभारी देत होते. मधूनच येणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकांवर मान डोलावणाऱ्या आणि सळसळणाऱ्या चैत्रपालवीबरोबर हेलकावे घेणारे ते जमिनीवरील कवडसे वैचारिक आंदोलनाच्या आरोह- अवरोहांना सावधतेने समेवर पोचवत होते.

चैत्रपौर्णिमेच्या पहाटेला वास्तुपुरुष रमला होता ‘रांगणा’ किल्ल्यावर, सह्यद्री पर्वतरांगेतील मानवनिर्मित सुरक्षा कवचावर, पुरातन सांस्कृतिक वारशाच्या आठवणींत, दुर्लक्षित भग्नावशेषांच्या हुंदक्यांचं सांत्वन करत, सभोवतालच्या अथांग वनसंपदेच्या सोबतीत. दूरवर पश्चिम क्षितिजावर पूर्णचंद्राने मीलनोत्सुक उफाळणाऱ्या लाटांच्या सागरात स्वत:ला झोकून दिलं आणि थोडय़ाच वेळात पूर्व क्षितिजावर अंजनीपुत्राला आकर्षित करणारं लालभडक सूर्यबिंब उमलायला लागलं, द्विजगणांच्या भूपाळ्या सुरू झाल्या. वास्तुपुरुष मंत्रमुग्ध होऊन हा निसर्गसोहळा अनुभवत होता. बघता बघता सूर्य वर चढला आणि त्याने तळकोकण उजळलं. किल्ल्याच्या कोकण दरवाजाजवळील भग्न बुरुजावरून वास्तुपुरुषाला सह्यद्रीच्या कुशीत उभारणारी तीन शहरं सूर्यप्रकाशात उजळताना दिसत होती- पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्ह्यची नवीन राजधानी ओरस आणि औद्योगिक शहर कुडाळ तर खाली दक्षिणेला सुंदरवाडी- ऐतिहासिक संस्थानिक शहर.

गेल्या पंधरवडय़ातील या शहरांमधील वाटचालीतून मनात निराशाच दाटून आली होती. काही गावांची नगरं होणं, काही नगरांची शहरं व काही शहरांची महानगरं होणं ही प्रक्रिया सतत चालू असते. या प्रक्रियेचं मुख्य कारण असतं त्या त्या ठिकाणी निर्माण होणारं उद्योग, व्यापार, पर्यटन, आर्थिक व्यवहार इत्यादींना पोषक वातावरण आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार. क्वचित काही राजकीय कारणाने नव्या शहरांचीही उभारणी होते. एकंदरीतच शहरीकरणाची ही प्रक्रिया आर्थिक विकासाला केंद्रिभूत करून होत असल्याने अनेक महत्त्वाचे घटक ‘अडथळे’ म्हणून वगळले जातात, जाणूनबुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा ‘पुढे बघूया’ या वृत्तीने बाजूला सारले जातात. अशा एकांगी शहरीकरणाच्या धारेणाचा पहिला आघात होतो समाज व्यवस्थेवर आणि तोच पुढे अधिक तीव्र होत वळतो निसर्ग-पर्यावरण विध्वंसाकडे. या आघातांची, विध्वंसाची आच बसायला लागली की मग विचार सुरू होतो पर्याय शोधण्याचा. या उरफाटय़ा प्रक्रियेला सहज, सुलभ, सरळ मार्गावर आणण्यासाठी संतुलित विकासाच्या मार्गक्रमणाचे विचार वास्तुपुरुषाच्या मनात घोंघावत होते. आजुबाजूला पसरलेले किल्ल्याचे भग्न अवशेष या एकांगी शहरीकरणाचं विदारक स्वरूप डोळ्यासमोर आणत होते. वास्तुपुरुषाला आता वर चढलेल्या सूर्याची झळही तापवायला लागली. किल्ल्यावरच्या एकुलत्या सदाहरित अंजन वृक्षाकडे त्याचे पाय वळले. त्या शीतल छायेत मन:शांतीही पटकन आली. अंजनाचे निळे-जांभळे तुरळक फुलोरे गर्द हिरवाईत विखुरले होते, तर बहुतेक फांद्या बारीक फळांच्या घोसांनी लगडल्या होत्या. फुलांवर मधमाश्या भिरभिरत होत्या तर फळांच्या घोसांतून मुंग्या वाटचाल करत होत्या. वास्तुपुरुषाचं मन प्रसन्न झालं आणि त्यांचं लक्ष बाजूच्याच ‘डोंगरच्या काळ्या मैनां’नी लगडलेल्या करवंदाच्या जाळीकडे गेलं. आंबटगोड करवंदांच्या न्याहारीत रंगलेल्या वास्तुपुरुषाचं चित्त बाजूच्या उतारावरून संथपणे ओघवणाऱ्या छायेने विचलित केलं. त्याने वर आभाळात नजर फेकली आणि उष्ण हवेच्या प्रवाहावर तरंगत घिरटय़ा घालणाऱ्या कृष्णगरुडाने त्याला मान वळवून खुणावलं. वास्तुपुरुष आनंदाने हसला. उपराळकराचा निसर्गदूत आला होता ‘वादविवादा’चं आमंत्रण घेऊन. कृष्णगरुडाचा मागोवा घेत वास्तुपुरुष रांगणा किल्ल्याच्या पश्चिम उतारावरून झपाटय़ाने मार्गस्थ झाला.

वास्तुपुरुष कृष्णगरुडासह वाघेरीच्या डोंगर उतारावर पोचता पोचता तिन्हीसांज झालीच. कृष्णगरुड आता तरुशिखरांवरून झोके घेत होता, वास्तुपुरुषाला उपराळकर देवराईकडे नेत होता. परिसर ओळखीचा वाटायला लागला. कृष्णगरुड वटवृक्षावर विसावला आणि वास्तुरुपुरुषाचं लक्ष धनेशाच्या ढोलीकडे गेलं. एक नवनिर्माण होऊन ढोल रिकामी झालेली दिसत होती. बहुधा पिल्लांचं संगोपन संपून आता वन्यपरिसरातील शिकवणी सुरू झाली असणार, नवीन फळ-फळावळीची, इतर आहाराची ओळख आणि शत्रू- मित्रांची पारख यांची धडपड चालली असणार. वास्तुपुरुष उंबर- निर्झराजवळ विसावला आणि पाण्यात तरंग उमटले, ‘‘ये वास्तुपरु षा, चैत्रपौर्णिमेचं स्वागत! उगवत्या पूर्णचंद्राच्या सोबतीने कसं देवराईत चांदणं फुलवलं आहेस. पण मी पहात होतो गेला पंधरवडाभर त्या शहरांतून भटकताना तुझा चेहरा कसा निराशेने काळवंडला होता, रात्री चांदण्या असूनही, आता मात्र अगदी प्रफुल्लित दिसतो आहेस. शहरीकरणाचं कोडं सुटलेलं दिसतंय.’’

देवचाराचा घनगंभीर आवाज वास्तुपुरुषाला आनंदित करून गेला, ‘‘नमस्कार देवा महाराजा! तुझ्या कृपेने आणि सह्यद्रीच्या निसर्गवैभवाच्या साथीने मन कसं बहरून गेलं आहे. शिवाय रांगणा किल्ल्याच्या भग्नावशेषांनी सांगितलेल्या इतिहासाच्या साक्षीही सोबतीला आहेतच. सांगतो तुला माझे शहरीकरणासंबंधीचे विचार.’’

उपराळकर देवचाराने वास्तुपुरुषाला रोखलं, ‘‘हे बघ बाळा, इथल्या काही गावांचं शहरात होणारं रूपांतर मी श्वास रोखून पाहतो आहे. इथल्या नवीन राजधानीच्या शहराच्या उभारणीचाही मी साक्षीदार आहे. हा कसला विकास? ही तर अधोगतीकडे चाललेली वाटचाल आहे. काय बदल होणार आहे तुझ्या विचारांनी?’’

वास्तुपुरुष एक उसासा सोडून उत्तरला, ‘‘ माफ कर देवा महाराजा! या प्रश्नांनी मलाही गेले कित्येक दिवस सतावलं आहे, निराशेने मन झाकोळून टाकलेलं आहे. पण मी औदासीन्याला माझ्यावर मात करायला देत नाही. मी संतुलित विकासाचा मार्ग आणि पर्याय यांच्या शोधात आहे. मला खात्री आहे की सर्व समावेशक नियोजनाच्या दृष्टिकोनातून पर्यायी, निसर्गस्नेही शहरं उभी रहातील, आताची शहरही आपली ‘विकासा’ची वाटचाल योग्य दिशेने बदलतील.’’

वास्तुपुरुषाच्या अंगात आता उत्साह संचारला, ‘‘देवचारा, माझा प्रथम भर आहे ‘विकासा’च्या व्याख्येचा. हा वैचारिक संभ्रम जगभरातलाच आहे आणि निसर्ग, पर्यावरण, उत्क्रांती यांच्या विचारांपासून फारकत घेतलेल्या व केवळ आर्थिक ‘विकास’ आणि त्यासाठी चंगळवाद असा सिद्धांत मांडणाऱ्या अर्थतज्ज्ञांनी हा निर्माण केला आहे. सर्वागीण व संतुलित विकास हा उत्क्रांती सिद्धांतानुसार निसर्गाचा सन्मान करणारा असतो. असा विकास परिसराची धारण क्षमता व नैसर्गिक संसाधनांची यथार्थ उपज यांचा सारासार विचार करून होत असतो. हा विकास सर्वसमावेशक असतो. काही मोजक्या व्यक्तींच्या ऐश्वर्यापेक्षा सर्वसाधारण समाजाच्या स्वास्थ्यावर, आनंदमय जीवनावर तो भर देतो. असा विकास झगमगणारा, मोहमयी नसतो, तर शांतीमय असतो. हा विकास नैसर्गिक पंचतत्त्वांच्या भक्कम पायावर, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने उभारला जाणारा आहे. माझे संतुलित शहरीकरणाचे पर्याय हे या व्याख्येवर आधािरत आहे.’’

उपराळकर काहीसा कातावून म्हणाला, ‘‘हे व्याख्या वगैरे प्रकरण ठीक आहे, पटतंय मला सर्व. पण या विचारांची अंमलबजावणी कशी होणार, कोण करणार, आकर्षक झगमगाटाने दिपलेल्या जनतेला हे स्वीकारार्ह कसं होणार?’’

वास्तुपुरुषाने उपराळकर देवचाराला शांत करण्याचा प्रयत्न सुरू  केला, ‘‘देवा महाराजा, मी तुला प्रथम इथल्या शहरीकरणाच्या व्यथा सांगतो. खरं म्हणजे इथली शहरं तशी छोटीच आहेत, पण तिथल्या अडचणी मोठय़ा शहरांसारख्याच आहेत आणि त्या आताच निस्तरल्या नाहीत तर अधिक गंभीर होणार आहेत. जुन्या गावांच्या सभोवती विस्तारित जाणाऱ्या या शहरांना भेडसावणारा मुख्य प्रश्न आहे सार्वजनिक जागेचा, रस्त्यांसाठी व नागरी सुविधांसाठी. लोकसंख्या वाढली, व्यापार- उदिम वाढला, रहदारी वाढली पण रस्त्यांची रुंदी तशीच राहिली. रहिवासी जागांच्या जोडीला व्यापारी जाग अस्ताव्यस्तपणे इभ्या राहिल्या. त्यांना सामान पुरवणारी अवजड वाहनं या छोटय़ा रस्त्यांवरच जागा अडवायला लागली. पादचाऱ्यांना चालायला जागा राहिली नाही, जीव मुठीत धरूनच मुलं, महिला व ज्येष्ठ नागरिक आपापली कामं करतात. जमिनीची मर्यादा आणि बांधकामाच्या जागेची मागणी या व्यस्त प्रमाणामुळे इमारती उंच होऊ लागल्या, सभोवतालच्या मोकळ्या जागा आकुंचायला लागल्या. नवीन इमारतींच्या निर्मितीवर योग्य नियंत्रण नसल्याने शहरं बेढब व्हायला लागली. ही अस्ताव्यस्त वाढ परिसराचा विचार न करता झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा, सांडपाण्याचं व्यवस्थापन, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन हे सर्व विस्कळीत होऊन शहरातील अनेक भागांचा उकिरडा झाला. आर्थिक व्यवस्थेला महत्त्व आल्याने जाहिराती सर्वत्र पसरल्या. वीज पुरवठा, दूरचित्रवाणी, संगणक यांच्यासाठी यथार्थ योजना न केल्याने शहरभर, झाडाझाडांमधून, इमारतींवरून तारांची बेंगरूळ जाळी तयार झाली. आर्थिक विषमतेमुळे सामाजिक विषमतेतही भर पडली. पैसे असतील तर सुविधा, नसतील तर गैरसोयी असा कारभार वाढायला लागला. महानगरातील भपक्याच्या प्रभावाने इथेही तशीच नक्कल सुरू झाली. परिसरस्नेही घरं जाऊन मायावी इमारती उभ्या राहू लागल्या. सांस्कृतिक वारसा हरवला गेला. विविध प्रकाराच्या प्रदूषणाने भीषण रूप घेतलं. पाणवठे दूषित झाले, हवा विषारी झाली, धुळीने साम्राज्य पसरलं, डास-उंदीर-भटके कुत्रे, कबुतरं यांनी रोगराईला आमंत्रण दिलं. निसर्ग दुर्मीळ झाला, वृक्षतोडीने परिसर उजाड झाले, पक्षीगान अस्तंगत झालं, रानफुलांची रंगावली आणि सुगंधाची पखरन हरवली. या सर्व अव्यवस्थेचं मुख्य कारण म्हणजे डोळस आणि सयुक्तिक नियोजनाचा अभाव. गावांची शहरं होत असतानाच विचारपूर्वक, भविष्यातील वाढीचा विचार व्हायला हवा, त्यासाठी सुविधांचं नियोजन आधी व्हायला हवं. हे नियोजन लोकसहभागातून व्हायला हवं आणि ते सर्वसमावेशक असायला हवं. पुढील दर दहा वर्षांनी या नियोजनाचा पुनर्विचार व्हायला हवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नियोजन निसर्ग, पर्यावरण आणि परिसंस्था यांवर आधारित असायला हवं. निसर्गसुंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यला हे अत्यावश्यक आहे कारण निसर्ग हाच या परिसराचा प्राण आहे.’’

उपराळकराने वास्तुपुरुषाच्या ओघवत्या विचारधारेला थांबवलं, ‘‘वास्तुपुरुषा, तुझे विचार पटतात. तू सर्व अडचणी सारासार विचार करून मांडल्यास. आता या अडचणींवर मात कशी करायची ते दाखव. आणि नुसतं मार्गदर्शन नको, ते लोकांना स्वीकारार्ह कसं होईल तेही सांग. तुझे विचार योग्य मार्गावर आहेत असं मला वाटतं. ये नीट विचार करून पुढच्या अमावस्येला. मला तर आदर्श शहरं डोळ्यांसमोर दिसायला लागली आहेत. शुभेच्छा!’’

विचारचक्रात गुंगलेल्या वास्तुपुरुषाला अचानक मोठय़ा जबाबदारीची, आव्हानाची जाणीव झाली, ‘‘आभारी आहे देवा महाराजा! नक्कीच मांडणी करतो आदर्श शहराची. हा जिल्हाच नव्हे तर सर्व शहरं पर्यावरणस्नेही, निसर्गसमृद्ध आणि विज्ञान-तंत्रज्ञाभिमुख करूया, महाराजा!’’

रात्र केव्हा सरली कळलंही नाही. संधीप्रकाशाने देवराई परिसर उजळत होता. अचानक भेकराच्या इशाऱ्याने वास्तुपुरुष भानावर आला, निसर्गदूताच्या पावलांचा मागोवा घेत उपराळातून बाहेर पडला. भेरली माडाचा फुलोरा त्याला उल्हसित करत होता.

‘‘देवचारा, माझा प्रथम भर आहे ‘विकासा’च्या व्याख्येचा. हा वैचारिक संभ्रम जगभरातलाच आहे आणि निसर्ग, पर्यावरण, उत्क्रांती यांच्या विचारांपासून फारकत घेतलेल्या व केवळ आर्थिक ‘विकास’ आणि त्यासाठी चंगळवाद असा सिद्धांत मांडणाऱ्या अर्थतज्ज्ञांनी हा निर्माण केला आहे. सर्वागीण व संतुलित विकास हा उत्क्रांती सिद्धांतानुसार निसर्गाचा सन्मान करणारा असतो. असा विकास परिसराची धारण क्षमता व नैसर्गिक संसाधनांची यथार्थ उपज यांचा सारासार विचार करून होत असतो. हा विकास सर्वसमावेशक असतो. काही मोजक्या व्यक्तींच्या ऐश्वर्यापेक्षा सर्वसाधारण समाजाच्या स्वास्थ्यावर, आनंदमय जीवनावर तो भर देतो. असा विकास झगमगणारा, मोहमयी नसतो, तर शांतीमय असतो. हा विकास नैसर्गिक पंचतत्त्वांच्या भक्कम पायावर, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने उभारला जाणारा आहे. माझे संतुलित शहरीकरणाचे पर्याय हे या व्याख्येवर आधािरत आहे.’’

ulhasrane@gmil.com