26 September 2020

News Flash

रंग वास्तूचे हॉस्टेल

आज सुट्टीचा दिवस असूनही यत्नेश सकाळी लवकरच उठला. चित्रांगलाही त्याने हाक मारून उठवलं

आज सुट्टीचा दिवस असूनही यत्नेश सकाळी लवकरच उठला. चित्रांगलाही त्याने हाक मारून उठवलं आणि तो आवरायला निघून गेला. चित्रांगने डोळे न उघडताच करवदायला सुरुवात केली. ‘‘काय रे बाबा, आज रविवार तर आहे. झोपू दे ना मला आणि आता तर माझी बारावीची आणि सीईटीची परीक्षाही संपली आहे. थोडेच दिवस राहिले आता सुट्टीचे मग झालं. परत इंजिनीअिरगचं कॉलेज सुरू..’’ तेवढय़ात खोलीत ऋचिता आली आणि पांघरूणं आणि चादरीच्या घडय़ा घालता घालता तिनेही चित्रांगला सांगितलं, ‘‘चित्रांग ब्रेकफास्ट तयार आहे. लवकर उठ आणि आवरून घे. तुला बाबाबरोबर जायचंय.’’ हे ऐकल्यावर चित्रांग वैतागलाच. ‘‘आई बस्स हा आता.. नो मोअर क्लासेस नाऊ. मी आता उरलेल्या सुट्टीत कुठल्याही क्लासला जाणार नाहीये.’’

‘‘अरे, यत्नेश तुला कोणत्याही क्लासला नेत नाहीये. त्याचा कॉलेजमधला मित्र, धीरज आलाय अमेरिकेहून. ते दोघं भेटणार आहेत, त्यांच्या कॉलेजच्या हॉस्टेलवर.. तिथे तुला तो नेतोय. ’’

‘‘आता माझं काय काम तिथे? आणि त्या दोघांच्या जुन्या बोअर गोष्टींचा मला कंटाळा येणार. मी नाही जाणार. आणि बाबा एवढा हॉस्टेलवर जायला एक्साईटेड का आहे?’’

‘‘ अरे धीरज अंकलला तुला पाहायचंय,’’ ऋचिताने सांगितलं.

‘‘आई, मी काय पेशवे पार्कातल्या झू मधला प्राणी आहे? मला काय पाहायचंय?’’

‘‘अरे, तू प्राणिसंग्रहालयातला प्राणी नाहीस, म्हणून तर तुला भेटून त्याला तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. चल आवर लवकर आणि ये ब्रेकफास्ट करायला.’’ एवढं सांगून ऋचिता निघून गेली. एव्हाना चित्रांगला कळून चुकलं होतं की, आई आणि बाबा यांनी मिळून आखलेला हा प्लॅन आहे. तेव्हा आता काही आपली यातून सुटका नाही. जावंच लागणार. आळोखेपोळोखे देऊन तो उठला आणि मुकाटय़ाने आवरायला घेतलं. तसा चित्रांग शहाणा मुलगा होता. आई-बाबाचं ऐकणारा, मेहनत करणारा आणि त्यांचे निर्णय मानणारा. पण स्वत:ला एखादा निर्णय घ्यायची वेळ आली की कच खाणारा. साधं, वर्गातली मुलं पिकनिकला जाणार असली तरी ‘आई सांग ना मी काय करू, जाऊ की नको जाऊ,’ म्हणून विचारणार. चित्रांग झाला तेव्हा ऋचिताने नोकरी सोडली. यत्नेशचं आणि तिचं स्पष्ट मत होतं की, मुलाला पाळणाघरात ठेवायचं नाही. काही अपवाद वगळलेत तर मुलांना हातात खाऊची पाकिटं देऊन कार्टून लावून देऊन टीव्हीसमोर बसवायचं. ते बघता बघता यांत्रिकपणे हात पाकिटात आणि पाकिटातून तोंडात जात असतो. त्यात खाता खाता पाकिटातला खाऊ कधी संपला हेसुद्धा मुलांना कळत नाही. त्यामुळे हाताचा आणि मेंदूचा संपर्कच नसतो. कार्टूनमधल्या लुटुपुटुच्या लढाया याच खऱ्या वाटायला लागतात. त्याचा एकदा नाद लागला की, घरी आल्यावरही हे व्यसन सुटत नाही. ही कार्टून बघण्यात ती इतकी दंग होतात की, आजूबाजूला पालक त्यांच्याशी बोलत असले, तरी त्यांना त्याचं भान नसतं. थोडं मोठं झाल्यावर मग या कार्टूनची जागा हातातल्या मोबाइलवरचं व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुक घेतात. त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये गेल्यावर या अशा आत्ममग्न मुलांशी संवाद साधणं हे पालकांना खूप कठीण जातं. एक गोष्ट तीन-चार वेळा आणि तीही ओरडून चढय़ा आवाजात सांगितल्याशिवाय त्यांना कळतच नाही. मग वर्गात लक्षच देत नसल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून येतात. हे सगळं चक्र टाळण्यासाठी आणि चांगले संस्कार व्हावेत म्हणून यत्नेश आणि ऋचिताने निर्णय घेतला होता की, यत्नेशची बारावी होईपर्यंत ऋचिता घरीच राहील. पण घरी राहण्याचेही काही तोटे असतात. मुलं परावलंबी होतात. आई ही आपली दासीच आहे असा समज आणि आपल्या हातात तिने सगळं दिलं पाहिजे, हा त्यांचा हक्कच होतो. त्याही पलीकडे एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घ्यायची वेळ आली की, एरव्ही पालकांवर करवदणारी आणि त्यांना शहाणपणा शिकवणारी हीच मुलं निर्णयासाठी मात्र धावत पालकांकडे येतात आणि त्यांच्यावर अवलंबून राहतात. हेच यत्नेश आणि ऋचिताला मोडून काढायचं होतं. त्यासाठी त्यांना चित्रांगला बारावीनंतर शिकायला बाहेर पाठवून हॉस्टेलमध्ये ठेवायचं असा त्यांचा बेत होता. पण इतकी र्वष संरक्षित वातावरणात वाढलेल्या चित्रांगला असं एकदम जगाच्या उघडय़ा समुद्रात फेकून देणं बरोबर नव्हतं म्हणूनच त्याची मानसिक तयारी करण्यासाठी त्याची धीरजशी गाठ घालून द्यायची होती. कारण यत्नेश जरी कॉलेजात गेल्यावर हॉस्टेलमध्येच शिकून मोठा झाला असला, तरी घरच्या वैद्यापेक्षा बाहेरचा डॉक्टरच काही वेळा बरा असतो. म्हणूनच यत्नेश आज चित्रांगची धीरजशी गाठ घालून देणार होता. ब्रेकफास्ट करून यत्नेश आणि चित्रांग दोघंही, पुण्यातल्या ज्या हॉस्टेलवर यत्नेश रहात होता, तिथे जायला निघाले. हॉस्टेलच्या दरवाजावर धीरज त्या दोघांची वाट बघत थांबलाच होता. यत्नेशने चित्रांगशी त्याची ओळख करून दिली. ‘‘हाय धीरज, हा चित्रांग, माझा मुलगा आणि चित्रांग, हा धीरज देशमुख माझा कॉलेजमधला मित्र आम्ही याच हॉस्टेलमध्ये एकाच खोलीत राहायचो.’’

‘‘पण बाबा, तू पुण्यात राहात असून हॉस्टेलवर का राहात होतास?’’

‘‘अरे, तेव्हा आपलं पुण्यात घर नव्हतं. आपल्या गावी अहमदनगरला आमचं घर होतं. तिथून मी पुण्याला शिकायला इंजिनीअिरग करायला आलो होतो, म्हणून तर मी या हॉस्टेलमध्ये राहायचो. पुण्यात मी नोकरीला लागल्यावर घर घेतलं. त्यामुळे आमच्या या हॉस्टेलच्या आठवणी आहेत. त्यामुळेच आज इतक्या वर्षांनी हा धीरज मला अमेरिकेहून भेटायला येणार तर जुन्या ठिकाणी भेटूया म्हणून आम्ही आधी इथे भेटायचं असं ठरवलं आणि मग आपल्या घरी धीरज अंकलला घेऊन जायचंय. चल आता आत जाऊन आधी नामदेवमामाला भेटूया आणि बघूया कोण भेटतंय का जुनं आणि बघायला मिळाली तर आपली खोलीही बघून घेऊ. बघूया तिथे आता कोण राहातंय ते. ’’आत जातानाच त्यांना केअरटेकर असलेला नामदेवमामा भेटला. आता बराच वयस्कर दिसत होता तो. यत्नेश आणि धीरजला पाहून त्याला खूप आनंद झाला. दोघांनी त्याची विचारपूस केली. खबरबात झाली. मग धीरजने त्याला विचारलं, ‘‘नामदेवमामा, हॉस्टेलचे रेक्टर महाजनसर रिटायर्ड झाले असतील ना?’’

‘‘ हो, ना. तुम्ही गेलात त्यानंतर दोनच वर्षांत ते रिटायर्ड झाले. सर आता जळगावला त्यांच्या गावी गेलेत राहायला. तिथे त्यांनी घर बांधलंय ना..’’ इतक्यात कॉलेजचे सध्याचे रेक्टर असलेले देवरे सर आले. नामदेवने त्यांची आणि यत्नेश-धीरजची ओळख करून दिली. धीरज अमेरिकेहून आला आहे आणि मुद्दाम हॉस्टेलच्या खोलीला भेट देण्यासाठी आज इथे आलाय म्हणून त्याने देवरे सरांना सांगितलं. यत्नेशने त्यांना विचारलं, ‘‘सर तुमची हरकत नसेल, तर आम्ही एकदा आमची खोली बघून येऊ का? माझ्या मुलालाही ती खोली दाखवायची होती. जुन्या आठवणींना तेवढाच उजाळा.’’

देवरे सरांनी विचारलं, ‘‘किती नंबरची खोली होती तुमची?’’

‘‘सर पहिल्या मजल्यावरची १०५ नंबरची खोली. आता कोण राहातं तिथे?’’

‘‘सध्या कोणी नाही. गेल्याच आठवडय़ात मुलांच्या परीक्षा झाल्यात आणि ती मुलं खोली रिकामी करून गेलीत.’’

‘‘मग आम्ही पंधरा-वीस मिनिटं बसू शकतो का तिथे?’’ यत्नेशने विचारलं. देवरे सरांनी होकार दिला आणि नामदेवला खोली उघडून द्यायला सांगितलं. यत्नेश-धीरजने मग त्यांचे आभार मानले आणि सगळे मग वर खोलीत गेले. खोली उघडून देऊन नामदेवमामा म्हणाला, ‘‘तुम्ही बसा गप्पा मारत, मी चहा घेऊन येतो.’’

खोलीत शिरताच यत्नेश आणि धीरजच्या आठवणी जाग्या झाल्या. धीरज सांगायला लागला, ‘‘बरं का चित्रांग, ही बघ डाव्या बाजूच्या िभतीकडे दिसतेय ना, ती माझी बेड आणि या उजवीकडची बेड तुझ्या बाबाची,’’ असं म्हणत धीरज सरळ समोर चालत गेला आणि समोरच असलेला पिवळसर पांढऱ्या रंगाचा पातळ पडदा दूर सारत त्यामागे असलेला दरवाजा उघडायला सुरुवात केली. या खोलीच्या रुंदीइतकी लांबी असलेल्या आणि संपूर्ण िभत व्यापून टाकणाऱ्या या फोिल्डग दरवाजाचा खालचा अर्धा भाग लाकडी आणि वरचा भाग काचेचा. या दरवाजातून बाहेर गेलं की, मागच्या बाजूला कॉमन गॅलरी.. दरवाजा उघडल्यावर खोलीत लख्ख उजेड आला.

चित्रांगने विचारलं, ‘‘पुढल्या बाजूलाही कॉमन पॅसेज आहे. मग मागच्या बाजूला ही गॅलरी कशासाठी?’’

यत्नेशने सांगितलं, ‘‘अरे, मागच्या बाजूच्या गॅलरीखाली खेळाचं मदान आहे. महाजनसरांची शिस्त कडक होती. रात्री कधीही मध्येच येऊन ते या मदानातून फेरी मारायचे आणि रात्री अकराच्या पुढे सगळ्या खोल्यांमधले दिवे गेले आहेत की, नाही ते पाहायचे. या मागच्या बाजूच्या काचेच्या दरवाजातून अगदी पडदे सारलेले असले, तरी महाजन सरांच्या नजरेला आतले दिवे बरोबर दिसायचे. एखाद्या खोलीत दिवे दिसलेत, तर मग त्या मुलांचं काही खरं नाही. त्यांना ओरडा मिळायचा आणि त्यावर जर एखाद्या विद्यार्थ्यांने हुज्जत घालायचा प्रयत्न केला तर मारही मिळायचा.’’

‘‘हॉस्टेल म्हटलं की, रॅिगगची भीती वाटते,’’ चित्रांग म्हणाला.

यत्नेशने हॉस्टेलबद्दलची चित्रांगची भीती कमी करण्यासाठी त्याला सांगितलं, ‘‘अरे आता तर अँटीरॅिगगचे कायदे आणि नियम झाल्यापासून रॅिगग जवळजवळ बंदच झालंय. आमच्या हॉस्टेलमध्येही कधी जीवघेणं रॅिगग झालं नाही. कारण महाजन सरांचा धाकच तसा होता. पण तरी नवीन आलेल्या मुलांना सीनिअर्स सतवायचेच, हा धीरज माझ्या वर्गातच होता. पण सीनिअर नसूनही मला त्याने सतावलं होतं.’’ हे ऐकून चित्रांगला खरं तर हसू येत होतं. पण धीरज अंकल रागावतील, म्हणून त्याने ते तोंडातच दाबलं आणि मिश्किलपणे धीरजकडे बघितलं.

‘‘चित्रांग, हा गमतीचा भाग नाहीये. आता कळतंय की तेव्हा माझं चुकत होतं. मी तेव्हा एकदम मस्तीखोर टग्या होतो. टग्या म्हणजे काय, बडे बाप का बिगडा हुआ बेटा. मी नाशिकहून इथे शिकायला आलो होतो. माझे बाबा इंडस्ट्रिअलिस्ट होते आणि आई डॉक्टर. ते दोघंही नेहमी बिझी असायचे. त्यांना माझ्याबरोबर बाहेर कुठे यायला तर वेळ नव्हताच, पण माझ्याशी बोलायला, गप्पा मारायलाही वेळ नसायचा. मी दुपारी शाळेतून आलो की, मला सांभाळायला ठेवलेली आया, तिला मी मावशी म्हणायचो, तीच मला जेवायला वाढायची. माझा अभ्यास घेण्यासाठी प्रायव्हेट टय़ुटर घरी यायचे. बंगल्याच्या आवारात मी एकटाच खेळायचो. कारण शेजारच्या बििल्डगमध्ये जाऊन मी त्या सोसायटीतल्या मुलांशी खेळलेलं माझ्या आई-बाबांना आवडायचं नाही. त्यांच्या स्टेट्समध्ये ते बसायचं नाही. आपल्यापेक्षा आíथक दर्जा कमी असलेल्या मुलांमध्ये मी खेळलो तर माझ्यावर वाईट संस्कार होतील असं ते मला सांगायचेत. त्यामुळे मग माझी खेळणी घेऊन मी एकटाच एकलकोंडेपणाने बंगल्यात खेळत राहायचो. मग मला या सगळ्याचा राग आला की, मला सांभाळणाऱ्या मावशीवर, नाहीतर माझ्या खेळण्यांवर मी राग काढायचो. खेळण्यांची आणि घरातल्या वस्तूंची मोडतोड केली की, माझ्या आई-वडिलांना धडा शिकवल्याचं समाधान मला मिळायचं. जुनिअर कॉलेजला गेल्यावर तिथे वाईट संगतीत सिगरेटचं व्यसन लागलं. मी बाहेर जाऊन िड्रक्स घेऊ नये म्हणून ऑफिशियली मला बाबा त्यांच्या बरोबरच प्यायला बसवायचे. कधी कधी या सगळ्याचं खूप फ्रस्ट्रेशन यायचं. माझा आडदांडपणा यातूनच वाढत गेला. खरं तर मला नाशिकमध्येच शिकवून नंतर त्यांच्या बिझनेसमध्ये घ्यायचं असा बाबांचा विचार होता. पण मला इंजिनीअिरगचं निमित्त साधून घरातून बाहेर पडायचं होतं. मला मुंबईला जायचं होतं. पण बारावीला माझ्या या आडदांड आणि बेफिकीर वृत्तीमुळे हुशार असूनही मार्क्‍स कमी पडले आणि मला पुण्याच्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली. अशा तऱ्हेने मी इथे या हॉस्टेलमध्ये आलो. माझ्याबरोबर रूम पार्टनर म्हणून  तुझा बाबा आला.’’

मग पुढची गोष्ट यत्नेशने सांगायला सुरुवात केली. ‘‘माझी आई म्हणजे, तुझी आजी हाऊसवाईफ होती आणि  तुझे आजोबा खाजगी कंपनीत क्लार्क म्हणून नोकरीला होते. आम्ही मध्यमवर्गीयच होतो. पण खाऊनपिऊन सुखी होतो. मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो. पण मला आवडेल ते शिकायला त्यांनी परवानगी दिली होती. एकदा माझ्या मित्राच्या घरी गेलो असताना, त्याच्याकडे सुट्टीसाठी आलेल्या आणि इंजिनीअिरगला शिकणाऱ्या त्याच्या आतेमामे भावांनी अंघोळीचं पाणी तापवायला असलेल्या बंबापासून घरातल्या घरात वॉटरहिटर तयार केला. ते बघितलं, तेव्हाच मी ठरवून टाकलं की, आपणही इंजिनीअर व्हायचं. बारावीला खूप अभ्यास करून अहमदनगरहून पुण्यासारख्या शहरात जाऊन मला इंजिनीअिरग करायचं होतं. इथे आलो आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं होतं. मेकॅनिकल इंजिनीअिरगला अ‍ॅडमिशन मिळाली आणि या हॉस्टेलमध्ये राहायला आलो. चित्रांग, तुझा बाबा त्यावेळी एकदम लाजाळू आणि कमी बोलणारा होता. मी त्याची गंमत करायचं ठरवलं. पहिल्या दिवशी रात्री जेवणं आटोपल्यावर आम्ही झोपायला खोलीत आलो. मी या खोलीच्या मागच्या दरवाजाची कडी आधीच काढून ठेवली होती. यत्नेशचा डोळा लागल्यावर माझ्या बेडवरची पांढरी चादर मी डोक्यावरून घेतली आणि हळूच दरवाजाबाहेर गेलो आणि दरवाजा बाहेरून लावला. मग हळूच दारावर टकटक केलं. यत्नेश त्या आवाजाने जागा झाल्यावर मग डोक्यावर चादर घेऊन त्याला भूत बनून घाबरवायला सुरुवात केली. तो उठून पोटाकडे पाय घेऊन डोळे गच्च बंद करून बेडमागच्या िभतीला टेकून थरथरत बसला होता. शेवटी मला त्याची दया आली. मग मी आत येऊन डोक्यावरची चादर काढून  त्याला हलवून सांगितलं की, भूतबीत काही नाही तो मीच होतो. दोन दिवस तो माझ्यावर खूप रागावला होता. माझ्याशी बोलत नव्हता. पण हळूहळू त्याचा राग ओसरला आणि माझी त्याच्याशी गट्टी जमली. हॉस्टेलच्या खोलीत सिगरेट ओढायला मुलांना मनाई होती. एकदा यत्नेशच्या बेडवर बसून तो आणि मी अभ्यास करत होतो. त्यावेळी मी सिगरेट ओढत होतो. दरवाजा बंद होता. पण कोणीतरी शेजारच्या खोलीतल्या मुलाने महाजन सरांना चुगली केली की, आमच्या खोलीतून सिगरेटचा धूर आणि वास येतोय म्हणून. ते रागारागाने आले आणि जोरजोराने कडी वाजवायला लागले. वाजणाऱ्या कडीवरून मला लक्षात आलं की, हे महाजन सरच आहेत. मी घाईघाईत हातातली सिगरेट मागच्या दरवाजातून बाहेर फेकली. पण सिगरेटचं पाकीट यत्नेशच्या बेडवर तसंच राहिलं. सरांना वाटलं की, यत्नेशच सिगरेट ओढत होता. त्यांनी यत्नेशला अक्षरश: फरफटत खाली हॉलमध्ये नेलं. खरं तर माझ्या आग्रहाला कधी बळी न पडता त्याने एकदाही सिगरेट ओढली नव्हती. तो मलाही ओढू नको म्हणून सांगायचा. पण मला सारखी सिगरेटची सवयच लागली होती. त्याशिवाय चनच पडायचं नाही. हा सगळा प्रकार बघितल्यावर मीही काही क्षण सुन्न होऊन बसलो. मग मीही खाली धावत गेलो. पण तोपर्यंत इतर मुलांनाही जरब बसावी म्हणून सरांनी यत्नेशला खूप बदडलं होतं. तोही काही बोलला नाही. गुपचूप मार खाल्ला. ते बघून मला कधी नव्हे ते खूप रडायला आलं. मी सरांची माफी मागितली आणि सगळा प्रकार त्यांना सांगितला. तो ऐकल्यावर त्यांनाही यत्नेशला मारल्याचं खूप वाईट वाटलं. ते जितके कडक होते तितकेच ते आतून हळवेही होतेत. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मग यत्नेशला मलम लावलं. मला सरांनी सांगितलं की, तू माझी माफी मागू नकोस. तू यत्नेशची माफी माग आणि तुला जर खरोखरच पश्चाताप झाला असेल आणि तुझी यत्नेशबरोबरची मत्री खरी असेल, तर तुझ्यासाठी हीच शिक्षा आहे की, तू यापुढे यत्नेशला झालेल्या त्रासाबद्दल कायमची सिगरेट सोडशील. मी लगेच ‘हो’ म्हटलं आणि त्या दिवसापासून आजतागायत सिगरेट ओढलेली नाही.’’

चित्रांगने म्हटलं, ‘‘व्हॉट अ फ्रेंडशीप बाबा!’’

‘‘चित्रांग तू चुकतो आहेस, यत्नेशने चित्रांगला सावध केलं. केवळ फ्रेंडशीप होती म्हणून मी धीरजचं नाव न सांगता मार खाल्ला, हा चुकीचा निष्कर्ष तू काढतो आहेस. धीरज मस्तीखोर असला, तरी स्वभावाने माणूस म्हणून तो खूप चांगला होता आणि रस्ता चुकलेल्या अशा एखाद्याला शिक्षा करून तो सुधारत नाही, तर केवळ पश्चातापानेच सुधारू शकेल याचा मला विश्वास होता, म्हणून मी त्याच्या वाटय़ाचा मार मुकाटय़ाने खाल्ला.’’

‘‘हो, यत्नेश बरोबरच सांगतोय,’’ धीरज म्हणाला.

‘‘त्याच्यामुळेच माझ्या स्वभावात खूप बदल झालेत. आम्हाला आमच्या बेडच्या मागे हे तू पाहतोयस ना तो एकेक वॉर्डरोब आणि अभ्यास करायला टेबल दिलं होतं. ते नीट टापटीप आणि स्वच्छ ठेवायला, आपले कपडे आपण धुवायला आणि खोलीतही कचरा काढून ती स्वच्छ ठेवायला मी यत्नेशकडूनच शिकलो. मला अमेरिकेला शिकायला गेल्यावर त्याचा खूप उपयोग झाला. मलाही धीरजने मदत केली म्हणूनच मी माझं इंजिनीअिरग वेळेत पूर्ण करू शकलो,’’ यत्नेश म्हणाला.

‘‘मी शेवटच्या वर्षांला असताना बाबांची कंपनी बंद पडली. आई पुरणपोळ्या आणि फराळाचं वगरे करायची. बाबा बाहेर जाऊन ते विकायची, आई शिवण कामही करायची आणि अशा तऱ्हेने घर चालायचं. माझी शेवटच्या वर्षांची फी तेव्हा खरं तर पंधरा हजार रुपयेच होती. पण ती फी भरणं शक्य नव्हतं. धीरजने तेव्हा त्याच्या बाबांना सांगून माझी फी भरली म्हणून मी इंजिनीअिरगचं शिक्षण पूर्ण करू शकलो. नंतर आमचा कोर्स पूर्ण झाल्यावर मी कॅम्पस इंटरव्ह्य़ूमधून मोठय़ा कंपनीत सिलेक्ट  झालो. प्रामाणिकपणे मेहनत करत गेलो. हळूहळू प्रमोशन मिळून आज प्रॉडक्शन मॅनेजर झालोय. धीरजला त्याच्या वडलांनी बी.ई. झाल्यावर एमबीए करायला अमेरिकेत पाठवलं. पुढे त्याने तिथे जॉब घेतला. नंतर त्याने तिथेच राहायचं ठरवलं. आता एका अमेरिकन माणसाबरोबर पार्टनरशीपमध्ये त्याने तिथे स्वत:चा बिझनेस सुरू केलाय. पण माझा लाजाळूपणा धीरजमुळे गेला. मी विश्वासाने आलेल्या परिस्थितीशी सामना करायला धीरजकडून शिकलो, ते याच हॉस्टेलच्या खोलीत.’’

‘‘आणि मीही यत्नेशमुळे नीटनेटका आणि शिस्तशीर झालो, ते याच हॉस्टेलच्या खोलीत, धीरज म्हणाला. त्यामुळे आम्हा दोघांचं आयुष्य घडवणाऱ्या या हॉस्टेलच्या खोलीबद्दल आम्हाला खूप अ‍ॅटॅचमेंट आहे.’’ धीरजने सांगितलं.

यत्नेशने चित्रांगला विचारलं, ‘‘आता तुला कळलं की, मी इथे यायला एवढा का एक्साईटेड का होतो ते?’’

‘‘हो बाबा.’’ चित्रांग म्हणाला.

‘‘आणि मीही असंच एखाद्या हॉस्टेलवर राहून इंजिनीअिरग करायचं ठरवलं आहे. कारण हॉस्टेल लाइफ खूप काही शिकवून जातं, हे मला आता कळलंय.’’

एवढय़ात नामदेवमामा चहा घेऊन आला. चहा घेऊन निघताना कृतज्ञतेची भेट म्हणून नामदेवमामाला थोडी आíथक मदत आणि हॉस्टेलला डोनेशन म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन डोळ्यात दाटलेल्या हॉस्टेलच्या खोलीच्या आठवणी आणि आनंदाश्रू घेऊन धीरजबरोबर यत्नेश आणि चित्रांग घरी जायला निघाले..

मागच्या बाजूच्या गॅलरीखाली खेळाचं मदान आहे. महाजनसरांची शिस्त कडक होती. रात्री कधीही मध्येच येऊन ते या मदानातून फेरी मारायचे आणि रात्री अकराच्या पुढे सगळ्या खोल्यांमधले दिवे गेले आहेत की, नाही ते पाहायचे. या मागच्या बाजूच्या काचेच्या दरवाजातून अगदी पडदे सारलेले असले, तरी महाजन सरांच्या नजरेला आतले दिवे बरोबर दिसायचे. एखाद्या खोलीत दिवे दिसलेत, तर मग त्या मुलांचं काही खरं नाही. त्यांना ओरडा मिळायचा आणि त्यावर जर एखाद्या विद्यार्थ्यांने हुज्जत घालायचा प्रयत्न केला तर मारही मिळायचा.

 

मनोज अणावकर
anaokarm@yahoo.co.in

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 6:23 am

Web Title: lead story in loksatta vasturang
Next Stories
1 नंदनवन
2 घोषणापत्र : महाराष्ट्र अपार्टमेंट कायदा १९७०
3 पाचूपक्षी
Just Now!
X