15 December 2017

News Flash

बनारसमधलं श्रावणामय घर!

पावसाळा सुरू झाला की लहानपणी अनुभवलेला बनारसचा श्रावण मनाला व्यापून टाकतो.

नंदिनी बसोले | Updated: August 5, 2017 1:05 AM

प्रातिनिधिक छायाचित्र

दिवसभर खपून सजावट करायची आणि सायंकाळी कॉलनीत घरोघरच्या झांक्या बघत हिंडायचं. आमचं एकमेव मराठी घर त्या कॉलनीत असल्यामुळे ठिपक्यांची रांगोळी बघायला गर्दी होई.

बनारसमध्ये श्रावण आपल्या पंधरा दिवस आधी सुरू होतो. पावसाळा सुरू झाला की लहानपणी अनुभवलेला बनारसचा श्रावण मनाला व्यापून टाकतो. विद्यापीठाच्या कॅम्पसमधली बैठी घरं, समोरच्या अंगणात बाग, मोठे वृक्ष वगैरे श्रावणात घरोघरी या झाडांवर झुले बांधले जात. झुला म्हणजे काय तर एक जाड दोरी. मग बसताना त्यावर पातळ उशी किंवा जाड चादर घातली जाई. फांदी पुरेशी मजबूत असेल तर समोरासमोर दोन दोऱ्या बांधत. दोघींनी समोरासमोर बसायचं आणि एकीनी दोन्ही पाय उचलून दुसरीच्या दोन्ही बाजूला ठेवायचे आणि दुसरीने उंच झोके घ्यायचे. हा प्रकार पुन्हा कधीच कुठे बघितला नाही. श्रावणातल्या सणांची मजा तर आणखी वेगळी.

रक्षाबंधनचं तिकडे खूप महात्म्य. सणाच्या कितीतरी आधी बाजार रंगीबेरंगी राख्यांनी फुलून जाई. बहीण-भावाच्या या सणाच्या दिवशी ब्राह्मणही दारोदारी येत आणि ‘येत बद्धो बली राजा..’ असा काहीसा श्लोक म्हणत घरातील पुरुषांच्या मनगटावर साध्या रंगीत दोऱ्याची राखी बांधत आणि दक्षिणा घेऊन जात. परगावातील चुलत-मावस भावांनाही पोस्टानी राखी पाठवायचा मोठा उद्योग असे. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर वसतिगृहात राहात असताना मुली रेशीम, टिकल्या वगैरे विकत आणून स्वत:च सुंदर राख्या तयार करीत. आणि सणानंतर २-३ दिवसांनी त्या साठच्या दशकात भावांकडून बहिणींसाठी ५-५ रु.च्या मनी ऑर्डरी यायला सुरुवात होई.

नागपंचमीला भल्या पहाटे आजूबाजूच्या खेडय़ांतून लहान मुले नाग छापलेला कागद घेऊन नाग लो भई नाग लो अशा आरोळ्या ठोकीत येत आणि पूजेसाठी घरोघरी हा कागद विकत घेतला जाई. दारात गारुडीही येत असे. त्याला पैसे, नागाला दूध, याशिवाय आमचे लहान झालेले कपडे त्याच्या मुलांसाठी आजी देत असत.

पंधरा ऑगस्ट हा रूढार्थाने सण नसला तरी आम्ही त्याची आतुरतेने वाट पहात असू. शाळेत झेंडा वंदनासाठी पी.टी.चा पांढरा ड्रेस घालून जावं लागे. राष्ट्रगीतानंतर गायलेल्या गाण्यातील ‘छत्तीस करोड जाँ वाले’ हे शब्द आठवले की ५०-६० वर्षांत लोकसंख्या किती फुगलीय हे लक्षात येतं. प्रमुख पाहुण्यांचं भाषण चुळबुळत ऐकून आम्ही मिठाईच्या रांगेसाठी धूम ठोकत असू. ही मिठाई म्हणजे वर्षांनुवर्ष तीच होती, द्रोणात तुपाने थबथबलेला शिरा.

सर्व सणांमध्ये उत्साहाचा सण म्हणजे जन्माष्टमी. घरोघरी आरास असे. त्याला झाँकी म्हणत. यासाठी फुलांची सजावट करायला आम्ही मैत्रिणी पहाटे उठून फुलं गोळा करत असू. आमच्या घरी ही आरास म्हणजे दोन पेटय़ांची उतरंड करून त्यावर ठेवणीतली चादर आणि वरच्या पेटीवर मधोमध छोटासा पाळणा आणि त्यात लंगडा बाळकृष्ण. पाळण्यांचे अनेक प्रकार बाजारात मिळत. या पाळण्याला छोटासा हार घालून भोवती फुलांची आरास. खालच्या पेटीवर विविध प्रकारची खेळणी, यात लहान-मोठय़ा बाहुल्या, प्राणी वगैरे असत. माझ्या खेळामध्ये कचकडय़ांचे रंगीबेरंगी मासे होते. पेटय़ांच्या बाजूला पाणी भरून एक पांढरं तसराळं ठेवून त्यात ते मासे सोडत असू. दिवसभर खपून ही सजावट करायची आणि सायंकाळी कॉलनीत घरोघरच्या झांक्या बघत हिंडायचं. आमचं एकमेव मराठी घर त्या कॉलनीत असल्यामुळे ठिपक्यांची रांगोळी बघायला गर्दी होई. ही कला तिकडे अवगत नव्हती.

श्रावणाच्या आठवणींची सांगता मेंदीशिवाय शक्यच नाही. घरोघरी मेंदीचं कुंपण असल्यामुळे भरपूर पानं गोळा होत. मग ती वाटायला कोणाच्या तरी घरच्या मोलकरणीला तयार करायचं. पुढच्या वेळी दुसरं कोणी वाटेल या अटीवर ती तयार होई, कारण वाटताना हात लाल होतात, मग डिझाइन कसं काढता येईल? मग ती जास्त रंगायला वाटताना त्यात काथ, लिंबू वगैरे घातलं जाई. आणि मग जेवणं झाल्यावर मेंदीचा वाडगा आणि खराटय़ाच्या काडय़ा घेऊन एकमेकींच्या हातावर डिझाइन काढायचा उद्योग चाले आणि संध्याकाळी कुणाची जास्त रंगली हे बघण्याची अहमहमिका या सगळ्या गमतींमध्ये श्रावण बघता बघता सरून जाई. राखीच्या दिवशी ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’ आणि पंधरा ऑगस्टला ‘ये देश है वीर जवानों का’ आम्ही रेडिओवर आवर्जून ऐकत असू.

श्रावण संपता संपता मला वेध लागे महाराष्ट्र मंडळातील गणपती उत्सवाचे आणि एव्हाना त्यातील कार्यक्रमांची तालीम सुरू झालेली असे आणि मी त्यात रंगून जाई.

नंदिनी बसोले

First Published on August 5, 2017 1:05 am

Web Title: marathi family home in banaras
टॅग Banaras