News Flash

आधुनिक बाग

इनडोअर बागकामात ताजी फुलं तसेच अन्य वनस्पतींची होत असलेली वाढ घरात एक सुगंध निर्माण करते. घ

टिकाऊपणा ही काळाची गरज आहे. लँडस्केपच्या टिकाऊपणाबद्दल बोलायचे झाले तर आजच्या काळात याकडे अधिक लोकांचा कल दिसून येतो. सुंदर हिरवीगार पालवी फुटलेली बाग ही मनाला वेगळाच आनंद देते. घर, कार्यालय किंवा रेस्टॉरन्ट असो..  बाग त्या-त्या वास्तूचे स्वभाववैशिष्टय़ प्रतिबिंबित करत असते. समकालीन जीवनशैलीत घरात आणि घराबाहेरील वातावरणाला अनुकूल व सुसंगत अशी बाग असायला हवी. ही संकल्पना सध्याच्या काळात अधिकच वेग घेत असून, त्या अनुषंगाने बदल घडत आहेत. सुरुवातीच्या काळात बाग मोकळ्या मैदानावरील जागा होती. आताच्या काळात इनडोअर गार्डन  अर्थात घरातील बाग ही संकल्पना अधिक झपाटय़ाने लोकप्रिय होत आहे. घराच्या सजावटीतील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ज्यावेळी घराचे इंटेरियर केले जाते, त्यावेळी काहीतरी कमी आहे ही भावना आपल्या मनात येते, त्यावेळी निश्चितपणे घरात छोटीशी बाग केल्यानंतर त्याला परिपूर्णता आल्याचे जाणवते. टवटवीत झाडे व फुले वातावरणात एक सकारात्मकता निर्माण करतात. त्यामुळे आपले मन व स्वास्थ्य प्रसन्न वाटते.

इनडोअर बागकामात ताजी फुलं तसेच अन्य वनस्पतींची होत असलेली वाढ घरात एक सुगंध निर्माण करते. घराची रचना आधुनिक असेल आणि हे बागकाम पारंपरिक पद्धतीचे असेल तर निश्चितपणे ते जुनाट वाटेल. त्यामुळे इनडोअर बागकामात समकालीन संस्कृतीशी अनुरूप अशी रचना ठेवण्याकडे लोकांचा कल झपाटय़ाने वाढू लागला आहे. आता अशा बागकामांच्या बाबतीत प्रश्न निर्माण होऊ  शकतो, की जर घराला बाल्कनी नसेल किंवा बाहेर कुठेही झाडे लावण्यास जागा  नसेल तर बागकाम करण्याचा प्रश्न निर्माण होऊ  शकतो. अशावेळी आपण आपल्या घरात इनडोअर प्लान्ट आपल्या आवडीनुसार  करून घेऊ शकतो. त्यामुळे आतील भाग शोभिवंत  दिसतो. लिव्हिंग रूम, बेडरूम तसेच किचनमध्येसुद्धा उपलब्ध जागेत उत्तमरीत्या शोभेची झाडे लावता येऊ  शकतात.

या झाडांमुळठे हिरव्यागार वातावरणाची भुरळ आपल्याकडे येणाऱ्यांना निश्चितपणे पडू शकते. हिरवागार असा पट्टा आपल्या लिव्हिंग रूम तसेच भिंतींवरील वातावरणात दिसून येण्यामुळे एक वेगळाच फरक पडू शकतो. आपल्या जागेला नैसर्गिक वातावरणाची अनुभूती येते. बाथरूमच्या भिंतींवरदेखील हा प्रकार एक वेगळाच अनुभव देतो. आपल्याला हवा तसा लुक या हिरव्यागार वातावरणाला देता येतो. त्यामुळे एक मोकळेपणादेखील त्यातून जाणवतो.

अत्यंत कल्पक, कमी खर्चात, सूक्ष्म अवलोकन करून इनडोअर बागकाम करता येते. काही स्वयंपाकघराचा लुक हा अत्यंत जुनाट पद्धतीचा जाणवतो. त्या ठिकाणी अशा प्रकारे अंतर्गत लागवड केली तर निश्चितपणे त्यात वेगळेपण जाणवेल. हिरवळीने नटलेला तो भाग मनाला खूप आनंद देतो. आपल्या रोजच्या जेवणात उपयोगी पडेल, अशा प्रकारच्या रोपटय़ांसाठीदेखील बागकाम उपयोगी पडणारे आहे. खिडक्यांच्या आसपास किंवा भोवतालीदेखील अशी बाग करता येणे शक्य आहे. स्वयंपाकघरात उपयोगी पडेल अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या बागेत उगवाव्यात. इनडोअर गार्डनमध्ये रोपं ही वरच्या दिशेने वाढत जाणारी असावीत, जेणेकरून अधिकाधिक भाग हा हिरव्यागार वनराईने नटलेला दिसून येईल. त्याचबरोबर ही रोपं आपल्या दैनंदिन वापरात अत्यंत उपयुक्त ठरतील, अशा पद्धतीचीच असावीत. या रोपांना किंवा झाडांना पुरेसा सूर्यप्रकाशदेखील मिळायला हवा. अशा प्रकारे त्यांची रचना असावी. जर तुमचे घर लहान असेल तर छोटी छोटी झाडंदेखील लावून त्याची भव्यता आपल्याला दाखवता येऊ  शकते.

पारंपरिक बागकाम

आपल्या घरासाठी आपण आपल्या आयुष्यातील बराचसा काळ, पैसे घालवीत असतो. त्यामुळे घराची अंतर्गत रचना ही अत्यंत महत्त्वाची असून त्याच्यावर अधिक वेळ देणेदेखील तितकेच आवश्यक आहे. घराच्या बाहेरची आणि आतली बाजू तितकीच महत्त्वाची असून, त्यानुसार आपण ध्यान दिले पाहिजे. बागकाम हे प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीचे असले तर तेसुद्धा आकर्षक दिसते. फुलझाडं, शोभेची झाडं यांमुळे कमी जागेत चांगल्या प्रकारे घर सजविता येते.

आधुनिक शैलीचे बागकाम

आधुनिक बागकामामध्ये जुन्या व नव्या पद्धतींचा अनोखा मिलाफ करून बाग तयार करता येते. लतामंडप हा पूर्वी लाकडांवर बांधला जात आहे. आता तो स्टीलच्या वस्तूंवरदेखील तयार करता येतो. त्यामुळे सूर्यप्रकाशाला अडथळा येत नाही तसेच हवादेखील स्वच्छ राहते. पाण्याचा अपव्यय होत नाही. त्याचबरोबर तो भागदेखील शोभिवंत दिसतो. दगडांच्या भिंतींवर वेगवेगळ्या प्रकारची झाडं तसेच बसण्याच्या ठिकाणीदेखील चांगले बागकाम ही त्या परिसराची शोभा वाढवते. आपली जागा अधिक उठावदार दिसावी, तसेच त्या ठिकाणी शांत वाटावे  यासाठी बुद्धाची मूर्ती ठेवावी. पूल एरियाच्या ठिकाणी केलेले बागकाम हे मनाला अधिक आनंद देते. खासगी जागेत काचेच्या आतील बाजूस केलेले बागकाम अधिक आकर्षक वाटते. लतामंडपाच्या माध्यमातून केलेली रचना, सागवानी लाकडाच्या साहाय्याने भौमितिक आकारात बनवलेले बागकाम अधिक आकर्षक असते. कमीत कमी जागेत ते व्यापले जाऊन त्यामुळे जागेची बचत होते व आकर्षकपणादेखील वाढतो. लँडस्केपच्या आधुनिक पद्धतीत अशा प्रकारची रचना करण्यावर अधिक भर दिला गेला आहे. त्यामुळे कमीत कमी देखभाल व अधिक प्रभावी परिणाम दिसून येतो. आधुनिक पद्धतीनुसार केलेल्या रचनांमुळे वातावरणात बदल तर होतोच, पण त्याशिवाय आपल्या दैनंदिन कामकाजावर तसेच व्यवहारांवरदेखील सकारात्मक परिणाम दिसून येतात.

अंगण

आपल्या घरातील अंगण बागकामाने सजवणे हे बा सौंदर्य वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. आपण मोकळ्या अंगणात बसून आनंद घेऊ  शकतो. सूर्यप्रकाशात बसून पेपर वाचत चहा किंवा कॉफीचा आनंद घेऊ  शकतो. अंगणातील बागकाम व त्याचा आवाका हा निश्चितपणे त्यानुसार आपली सुंदर जीवनशैली घडवीत असतो. बागकामासाठी अनेक पर्याय उपलब्ध असून, आपण आपल्या आवडीनुसार ते स्वीकारू शकतो. केवळ विशिष्ट जातींच्या वनस्पतींसाठी नव्हे तर आपल्याला हवा असलेला रंग किंवा मटेरियल यानुसारदेखील त्यांची निवड करता येणे शक्य आहे. ओक, ऊस, वाळुंज अशी काही उदाहरणं आहेत. त्यामुळे आपल्या बागेचे सौंदर्य बहरते. अलीकडे सागाच्या वनस्पतींना वाढविण्याचाही कल वाढताना दिसून येतो. त्यांच्या टिकाऊपणामुळे त्यांना अधिक पसंती देत असल्याचे दिसून येते. त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी छत्र्या किंवा अन्य बाबींचा कल्पक वापर केला जात असल्याचेही दिसून येते.

प्रकाश व्यवस्था

बाग आणि प्रकाशयोजना या एकमेकांना पूरक असतात. त्यामुळे योग्य प्रकाशयोजनेशिवाय बाग ही कल्पना आपण करू शकत नाही. हे ध्यानात घेतले पाहिजे की, प्रकाशयोजना ही दिवसा व रात्रीनुसार वेगवेगळी असायला हवी. दिवसा बाग ही सूर्याच्या नैसर्गिक प्रकाशात योग्य रीतीने वाढीस लागते. सायंकाळी तिला पुरेसा प्रकाश मिळेल अशी रचना करावी. सध्याच्या परिस्थितीत एलईडी लाईटचा प्रकाश घरातील झाडांना देण्याचा प्रकार वाढू लागला आहे. सायंकाळच्या वेळेत हा प्रकाश झाडांना दिला तर नक्कीच त्यांची वाढ झपाटय़ाने होऊ  शकेल. रंग बदलणारे दिवे लावूनदेखील आपण त्यांचा झाडांवर होणारा बदल पाहू शकतो. प्रकाश मग तो नैसर्गिक असो किंवा कृत्रिम, त्याच्यामुळे झाडांची वाढ होत असल्याचे आपल्याला निश्चितपणे आढळून येईल. प्रकाशाचा वापर हा झाडांच्या मार्गावरदेखील योग्यरीत्या करण्यात यावा. भोवतालच्या जागेतदेखील प्रकाशाचा योग्य वापर करण्यात यावा.

आधुनिक बागांचे प्रकार

उभ्या रचनेतील बाग

आजच्या काळात बागेच्या सौंदर्याचे वेगवेगळे प्रकार दिसू लागले आहे. यात इनडोअर गार्डन, उभ्या रचनेचे गार्डन, स्पेशालिटी गार्डन, वुडलँड गार्डन, वॉटर गार्डन अशी काही उदाहरणे आहेत. मात्र उभ्या रेषेत वाढलेले गार्डन हे शाश्वत व हरित संरचनेचे एक उत्तम उदाहरण असून ते बहुतांश प्रमाणात घरात, कामाच्या व अन्य ठिकाणी अधिक लोकप्रिय झाल्याचे आपल्याला आढळून येते. उभ्या रचनेचे गार्डन म्हणजे भिंतींवर वाढवलेली रोपं. त्यामुळे तो भाग हिरव्यागार वनस्पतींनी व्यापलेला दिसतो. हे नव्या पद्धतीची नावीन्यपूर्ण अशी बाग आहे. त्यासाठी फक्त मोकळी भिंत असायला हवी. झाडांची उभ्या दिशेने वाढ होऊ  द्या. मग त्याचे रूप तुम्हालाच दिसून येईल. उभ्या रचनेच्या बागेत झाडे वरच्या दिशेने वाढत असल्यामुळे खाली जागा मोकळी राहते व ती आपल्याला वापरायला मिळते. आपल्याला फक्त अशा पद्धतीने झाडं वाढतील, अशी भिंत निवडावी लागेल. त्यानंतर त्या भिंतीवर प्लॅस्टिक शीट टाकून त्याच्यावर झाडं वाढवावीत. या बागेला नियमितपणे पाणी द्यावे. अनेक ठिकाणी इन बिल्ट इरिगेशन सिस्टमनुसार पाण्याची व्यवस्था केलेली असते. त्यांना या भिंतीमध्ये बसविण्याचीही सोय करता येऊ  शकते.

इनडोअर गार्डन

घराच्या आत गार्डन तयार करण्याकडे अनेकांचा कल वाढू लागलेला आहे. या बागेत विविधता आणता येऊ  शकते. या ठिकाणी झोका, कारंजे, झगमगत्या लाईट्स, कृत्रिम गवत, रोपं, गारगोटय़ांचे फ्लोरिंग, आकाशाचा मोकळा उजेड अशा अनेक वैविध्यपूर्ण पद्धतीतून हे गार्डन सजविता येते.

वॉटर गार्डन

पाण्याचा आवाज हा प्रत्येक बागेला तिचा जिवंतपणा राखण्यासाठी उपयोगी पडतो. वॉटर गार्डनसाठी जागा जास्त व्यापली जाते. त्यामुळे आऊटडोअरसाठी अशा प्रकारचे गार्डन तयार करणे उपयोगी आहे. या ठिकाणी कारंजे, धबधबे, झरे तसेच छोटी तळी तयार करता येतात.

रूफटॉफ गार्डन

शहरी भागात गच्चीवरील रूफटॉफ गार्डन हा प्रकार अधिक लोकप्रिय असल्याचे दिसून येते. हा प्रकार स्वीकारताना हवामानाची स्थिती विचारात घ्यावी लागते. त्यानुसारच हे गार्डन तयार करण्यात यावे.

कंटेनर गार्डनिंग

आजच्या काळात कंटेनरचादेखील बागकामासाठी वापर होत असल्याचे दिसून येते. ज्यांना आपली बाल्कनी किंवा व्हरांडा गार्डन करण्यासाठी वापरायचा आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

फॉर्मल गार्डन

आधुनिक व औपचारिक पद्धतीचे बागकाम ही संकल्पनादेखील वेगळी आहे. आपल्याला हवे ते भौमितीय आकार जसे- चौकोन व त्रिकोण यांच्यानुसार त्यांची रचना केली जाते तसेच बहुतांशी रोपं व फुले या ठिकाण उगवता येतात.

मेडिटेरियन गार्डन्स

आपल्या अंगणाची शोभा अधिक वाढविण्यासाठी या गार्डनचा उपयोग होतो. टेरा कोटा तसेच डीआयवाय अशा पद्धतीच्या अनुषंगाने या गार्डनची निर्मिती करता येते. बागेची आवड असलेल्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

बागेसाठी खूप मोठी जागाच असावी, असे काही नाही. योग्य प्रकारे रचना केल्यास छोटय़ा जागेत उत्तम प्रकारे त्यांची उभारणी करता येते. आधुनिकतेचा स्पर्श करत त्यांना सजवता येते. त्यामुळे आपले घर हे भव्य व सुंदर असल्याची जाणवी होते.

– हरजित बब्बर

(लेखक सीसीआय प्रोजेक्टचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 1:02 am

Web Title: modern garden
Next Stories
1 स्थावर मालमत्तेची हस्तांतरण प्रक्रिया
2 घर स्वच्छ ठेवण्यासाठी..
3 सोसायटी व्यवस्थापन : अपार्टमेंट संघ व पुनर्विकासाचे नियम
Just Now!
X