चुटकीसरशी भाज्या कापणाऱ्या यंत्रांच्या प्रेमात आपण एकदा तरी पडतोच. प्रेमात पडायला हरकत नसतेच. असतात काही गुणी यंत्रं, पण प्रेम निभावणं महाकठीण. नव्याचे नऊ  दिवसदेखील हे यंत्र वापरून होत नाही. काहीतरी तुटते, सरकते, खटकते आणि ते पडून राहते. काही यंत्रं भाज्या भले चुटकीसरशी कापतात, पण ते यंत्रच धुऊन ठेवायला भरपूर वेळ आणि बारीक कलाकारी करत बसावी लागते. एकूण एकच होते मग ते. विजेवर चालणारी, वीज न लागणारी, वेगवेगळ्या भाज्यांसाठी, फळांसाठी अशीही मॉडेल्स असतात. बऱ्याच मॉडेल्सचे प्लास्टिक पार्टस् फारसे भक्कम नसतात. अगदी प्रेमाने त्यांचे तंत्र शिकले तरी सराव होता होताच काही हरवते, तुटते. घरातल्या एकाच खटपटय़ा व्यक्तीकडे ते काम सोपवून इतर मंडळी अंग काढून घेतात. ‘ते बघ काय ते,’ म्हणत त्या यंत्राची मालकी, मेन्टेनन्स त्या व्यक्तीवर सोपवून दिला जातो. ‘एवढं आणून ठेवलं, पण साधं धड वापरता येत नाही’ ‘पैशाची किंमत नाही’, ‘तू आणलं, तू वापर, मी सांगितलं होतं घेऊ  नकोस’, ‘कशावर पैसे खर्च करावे अक्कल नाही. आपले पूर्वज काही वेडे नव्हते, हाताने अमुक काम करायला,’ असे घरोघरीचे हृद्य संवाद असतात.

व्हॅक्युम क्लीनर मोठे हौशीने घेतले जातात. त्यांचा वापर किती वेळा आणि कुठे कुठे होतो, अभ्यासाचा विषय असतो. अनेक ठिकाणी घरात जमा होणारी धूळ, कचरा व्हॅक्युम क्लिनरच्या आवाक्या बाहेरचा असतो. ते आयुध घेऊन फक्त खेळत बसावे लागते. त्यांचेही वेगवेगळे मॉडेल्स येतात. जाहिरातीत सगळे फटाफट स्वच्छ होते. मशीन हाताशी ठेवलेले असते. पिल्लूसा कचरासुद्धा निस्तरायला तयार होऊन बसलेला असतो. लोकांना मशीनशी खेळत बसायला वेळही असतो! घरात मात्र ते वर्कआऊट होत नाही. झाले तरी त्यात सातत्य राहत नाही. हँडी मॉडेल्स तर माळ्यावर पडलेली दिसतात. त्यांच्याच्याने काही साफ करायचे म्हणजे व्हॅक्युम क्लीनरच त्याचे खोके पुसण्यापासून साफ करत बसावे लागते. आधी तेच साफ करण्यात वेळ गेल्यावर त्या मशीनने आणखीन वेगळे काय साफ करणार? कुठे त्याचे तंत्र विसरून गेलेले असते. काही शिस्तप्रिय मंडळींच्या घरात नीट वापरले जात सुद्धा असेल ते. पण अनेक घरांमध्ये माळ्यावर या मशिन्स धूळखात पडून असतात. त्याचे मॅन्युअल कोणी वाचत नाही. डेमो बघतो, मशीन आणतो, ती एकच व्यक्ती त्याची पालनहार होऊन जाते. तिला वेळ, रस असेल तसे ते वापरले जाते. दहा सेटिंग आणि सोयी असतील, तर त्यातल्या चारसुद्धा धड माहीत करून घेतल्या जात नाहीत. वॉरंटी काय, कशी हे बघितले जात नाही. पडूनच वस्तू खराब होतात. कधी फॉल्टी पीस येतो, पण आपण गाफील असल्याने बरेच दिवस गेल्यावर जागे होतो. तोवर तारखा उलटून गेलेल्या असतात. नुकसान होते. नवी पण नवी नाही, सोय आहे पण सोय नाही, फेकवत पण नाही.. अशी वस्तू आपल्या घरात मुक्तीसाठी वाट बघत बसते, वर्षांनुवर्षे.

आपण प्रदर्शनात जातो, कोणाचे काही पाहतो. टीव्हीवर जाहिरातींचा मारा होतो. कधी ‘माझ्याकडे सुद्धा हे आहे बरे’, अशा तुलनेत फार विचार न करता वस्तू आणून ठेवतो. कधी कोणी गिफ्ट देते. कधी डिस्काऊंट मिळते म्हणून घेऊन टाकतो. मुद्दा डिस्काऊंटचा नसतोच. मुद्दा असतो, जी गोष्ट लागणारच नाहीये, फारशी वापरली जाणार नाहीये, त्यावर नव्वद टक्के डिस्काऊंट मिळाले तरी ती आणून का ठेवायची आहे, कुठे, कधी, कशी वापरणार आहोत, कोण वापरणार आहे, याचा विचार केला आहे का? समजा शंभर रुपयाची वस्तू आहे. अगदी दहाच रुपयांत मिळतेय. केवळ डिस्काऊंट मिळतेय, म्हणून गरजच नसलेल्या वस्तूसाठी दहा रुपये तरी का खर्च करा, हा अलार्म वेळीच वाजतो का डोक्यात? की ‘घेऊन ठेवू’, असेच कोणाला पास ऑन करू गिफ्टच्या नावाखाली म्हणून आपण ते घेतोय, हे स्वत:लाच विचारायचे.

टोस्टर, मिक्सरचे अनेक प्रकार, ट्रीमर, हेअर ड्रायर, वेगवेगळे रेझर्स, मसाजर्स, बेल्टस्, सोडा मेकर्स काय काय आपण घेऊन ठेवतो. घ्यावेही, पण त्या वस्तूचा पुरेपूर वापर होत नाही, ही घरोघरची रड असते. म्हणूनच खरेदीवरच ताबा हवा. आपण का घेतोय ही वस्तू, यावर विचार हवा.

अजून एक उदाहरण देते. लिंबाचा रस झटक्यात काढून देण्याचा दावा करणारे आणि दहा रुपये ते दोनशे रुपये या रेंजमधले अनेक छोटे यंत्रं कुठे कुठे मिळतात. प्लॅस्टिकचे, धातूचे. डेमो पाहून आपण अगदी लिंबाचे वर्षांचे सरबत करून ठेवायचा प्लॅन करतो. त्यात होऊन होऊन नुकसान दहा ते दोनशे रुपयांचे असते. वापरून बघू, म्हणून ती वस्तू घरात येऊन पडते. मग लक्षात येते, आपला जोर कमी पडतोय लिंबू पिळायला. कधी ते नीट वापरता येत नसते. कधी वरवर रस निघतो. आपण काही लिंबू सरबताची, सोडय़ाची गाडी लावलेली नसते आणि समोर भरपूर गिऱ्हाईक खोळंबलेले नसतात भराभर निघेल तेवढा रस काढून विकायला. मग आपले लक्ष त्या यंत्रात पिळलेल्या लिंबाकडे जाते. त्यातून पिळून निघाल्यावर देखील पुष्कळ रस काढता येणार असतो हाताने, ते कळते. मग नासाडी नको म्हणून आपण ते यंत्र ट्रॉलीत आत सरकवून देतो. ते तिथेच धूळखात मोक्ष मुक्तीचे गाणे गात राहते. ‘आमच्याकडेही आहे, पण काही उपयोग नाही’, अशा गोष्टींत अजून एक भर. ‘जाऊ  दे, पाच पन्नास रुपयांची गोष्ट’, ‘आपण ती विकणाऱ्या माणसाला रोजीरोटी तरी दिली’, हा वरून आव, पश्चातबुद्धी! ती वस्तू खराब नसते, त्यामुळे नवीच्या नवी फेकून कशी देणार, हा यक्ष प्रश्न पडतो. पाचपन्नास रुपयांची गोष्ट विकणार तरी कुठे? ती घेणार कोण? घराच्या कानाकोपऱ्यात अशा अनुभव सिद्ध गोष्टी कधीही सापडू शकतात. एकदा त्यांचे ऑडिट करूयात. आपली गरज आणि आपला वापर यांचे गणित सुटायची शक्यता तिथेच नांदत असते.

prachi333@hotmail.com