21 February 2019

News Flash

वस्तू आणि वास्तू : पेन्सिल सेल आणि  बॅटरीज

आपल्या गाडीला बॅटरी असते, कॉम्प्युटरच्या यूपीएससाठी बॅटरी लागते.

बॅटरीज

सेलचा ब्रँड ठरवताना नवीन सेल टाकल्यावर तिथेच एखाद्या स्टिकरवर तारीख लिहून ठेवली, तर तो एक सेल किती काळ टिकला, हे तपासता येते. रिचार्जेबल पेन्सिल सेल आणि त्याचा चार्जर आपल्या घरातल्या अनेक पेन्सिल सेलला वरचेवर कचऱ्यात फेकण्यापासून रोखू शकतो. सातत्याने नवीन सेल विकत आणण्यापेक्षा आहे तेच सेल चार्ज करून पुन्हा वापरता येतात.

गिफ्टमध्ये आलेली भिंतीवरची घडय़ाळे, गणेशमूर्ती आणि शोच्या वस्तू यावर घरोघरी जाऊन एक सर्वेक्षण करता येईल, इतक्या पडून असतात. घडय़ाळ वापरू तरी एकवेळ, पण बरेचसे शो पिसेस हलक्या दर्जाच्या प्लास्टिकचे आणि बटबटीत सजावट असलेले असतात. त्यांच्या जन्माचे तसे काहीही ठोस कर्तव्य नसते, कारण शोसाठी शो असतो! पण ते या घरून त्या घरी गिफ्ट म्हणून पुढे सरकत जाते. उगाच साचून राहणाऱ्या गिफ्ट्सपेक्षा वापरात येतील अशा गोष्टी गिफ्ट देणे केव्हाही चांगले असते.

या गिफ्ट्समधल्या अनेक गोष्टींना पेन्सिल सेल लागत असतात. कधी ते गिफ्टसोबत येतात, कधी वेगळे घ्यावे लागतात. त्या वस्तूंमध्ये सेल घालून काहीतरी लाइट्स सुरू होणे, काही देखावा असणे, एखादे मीटर सुरू होणे, अशी काही योजना असते. हे झाले गिफ्ट्सबद्दल. आपण घरात वापरत असलेल्या अनेक लहान-मोठय़ा यंत्रांना, इलेक्ट्रॉनिक वस्तूंना, खेळण्यांना सेल लागतात. टीव्हीचा रिमोट, वैद्यकीय किट्स असतील- ज्यातून बीपी मोजता येईल, त्यांना सेल लागतात. घडय़ाळं असतात, लहान मुलांची खेळणी असतात, वाद्यं, टॉर्च कॅमेरे, ट्रीमर, ड्रायर असतात ज्यांना पेन्सिल सेल लागतात. अशा किती ठिकाणी आपण साधे पेन्सिल सेल वापरणार असतो, ते एकदा शोधता येईल. प्रत्येक खोलीत एकेक घडय़ाळ गरजेचे आहे की एखाद्या मुख्य पॅसेजमध्ये एक, दोन मोठी घडय़ाळे असतील तर पुरेसे आहे, ते आपण ठरवू शकतो. आजकाल अनेक गॅजेट्समध्ये वेळ कळायची सोयही असतेच. जसे की आपला मोबाइल. जे पेन्सिल सेल आपण घरगुती वापरासाठी सातत्याने आणि जास्त संख्येने वापरतो, ते अअ या आकाराचे असतात. टीव्हीचे काही रिमोट त्याहून छोटय़ा म्हणजे अअअ आकाराचे असतात. या दोन्ही प्रकारच्या सेलसाठी एकदा वापरून टाकून द्यायचे आणि रिचार्जेबल असे दोन्ही प्रकारांतले सेल बाजारात मिळतात. रिचार्जेबल प्रकारातल्या अअ आणि अअअ सेलसाठी एकच चार्जर बाजारात मिळते. ते चांगल्या दर्जाचे घेतले की बराच काळ टिकते. दोन किंवा चार सेलचे रिचार्जेबल किट असेही ते बाजारात मिळतात. सेलचा चार्ज उतरला की परत परत चार्ज करून ते वापरता येतात. पेन्सिल सेलसारखी वस्तू चालली तर चालली, किती चालली, याचाही फारसा हिशेब नाही, ती वरचेवर वापरून फेकली जाते. चार्ज उतरला असे वाटले तरी नवीन सेल टाकले जातात. दहा-वीस रुपयांचीच तर गोष्ट आहे, त्यात काय मोठेसे? इतके सहज आपण ते आणतो आणि वापरून, अर्धवट उतरले तरी टाकून देतो. अनेकदा ‘लागेल कुठेतरी’ म्हणून सुद्धा आणून ठेवतो. ते घरात कुठेतरी पडून असतात. नवीन सेल आहे त्या पॅकिंगमध्ये ठेवले तर नीट राहतात. पण जास्तीचे झालेले सेल पॅकिंगमधून काढले असतील  तर ते उतरणार नाहीत, सुरक्षित राहतील असे ठेवणे आवश्यक असते. कधी कधी खूप काळ पडून असलेल्या सेलमधून एक चिकट द्रव बाहेर आलेला दिसतो. असे सेल घरात पडून असणे योग्य नाही. कितीतरी ड्रॉवर्समध्ये, कानाकोपऱ्यांत घरोघरी असे विविध आकारांचे बरेवाईट सेल निपचित पडून असतात. धूळ खात असतात. बंद, न वापरत्या उपकरणांमध्येसुद्धा सेल पडू देण्यापेक्षा ते काढून नीट ठेवावेत. धातूच्या वस्तूंजवळ ते जमा करून ठवू नयेत. एकमेकांना खेटूनसुद्धा ठेवू नयेत. मुख्य म्हणजे लागतील कुठेतरी म्हणून ते आणून ठेवण्यापेक्षा त्यावरची तारीख बघून जशी गरज असेल, तसे आणि तितकेच सेल नवीन आणावेत. म्हणजे ते साचून राहत नाहीत.

सेलचा ब्रँड ठरवताना नवीन सेल टाकल्यावर तिथेच एखाद्या स्टिकरवर तारीख लिहून ठेवली, तर तो एक सेल किती काळ टिकला, हे तपासता येते. रिचार्जेबल पेन्सिल सेल आणि त्याचा चार्जर आपल्या घरातल्या अनेक पेन्सिल सेलला वरचेवर कचऱ्यात फेकण्यापासून रोखू शकतो. सातत्याने नवीन सेल विकत आणण्यापेक्षा आहे तेच सेल चार्ज करून पुन्हा वापरता येतात.

काही उपकरणे बोली भाषेतल्या ‘चपटय़ा’ सेलवर चालतात. त्यावर काही एक कोड लिहिलेला असतो. जेव्हा हे सेल उतरतात, तेव्हा त्याच आकाराचा सेल आणून उपयोगाचे नाही. चालायला ते मशीन तशा सेलवर चालेलसुद्धा, पण जो तपशील त्यावर असतो, शक्यतो त्याच तपशीलाचा नवा सेल त्या त्या उपकरणासाठी वापरावा. रक्तातील साखर मोजायची जी किट्स असतात, त्यात असे सेल असतात. हाताच्या घडय़ाळात देखील असेच छोटे गोल सेल असतात. ते बदलल्यावर जुने सेल घरात साठवून ठेवू नयेत.

आपल्या गाडीला बॅटरी असते, कॉम्प्युटरच्या यूपीएससाठी बॅटरी लागते. या बॅटरीज नवीन आणायला जातो, तेव्हा ते जुन्या बॅटरीला काही एक किंमत देऊ  करतात. ती देऊन नवीन बॅटरी घेणे सगळ्यांत उत्तम असते. या बॅटरीज कुठे ठेवाव्यात किंवा कशा टाकून द्याव्यात, हा प्रश्न ते सोडवतात. त्या तशाच कचऱ्यात टाकणे धोक्याचे असते.

मोबाईलचे इतके मॉडेल्स आणि चार्जर्स घरोघरी असतात की त्यांचेही काय काय साचत जाते. जुन्या, नव्या मोबाइलच्या मॉडेल्सच्या खराब झालेल्या बॅटरीज घरात कधीही पडू देऊ  नयेत. लागतील, लागतील म्हणून त्यातल्यात्यात चांगल्या बॅटरीज साठवायच्या असतील, तर त्या पिना, टाचण्या यांच्यासोबत ठेवू नये. कोरडय़ा आणि थंड जागी त्या ठेवाव्यात. फुगलेल्या बॅटरीज, ज्या कोणत्याही सपाट पृष्ठभागावर ठेवल्या आणि गोल फिरवल्या तर भवऱ्यासारख्या फिरतील अशा बॅटरीज सव्‍‌र्हिस सेंटरला देऊन याव्यात. काही मॉडेल्सवर मोबाइलची देखील जुनी बॅटरी देऊन काही सूट मिळून नवीन मोबाईल बॅटरी मिळते. ती सोय वापरावी.

घरात असलेल्या टॉर्च आपण कितीदा वापरतो, तोही एक अभ्यासाचा विषय आहे. निसर्गभ्रमंती करताना, प्रवासात लागतील म्हणून, लाइट गेल्यावर म्हणून आपण त्या आणून ठेवतो. त्यात विविध आकाराचे, प्रकारचे सेल असतात. काही टॉर्च सोलर पॉवरवर देखील चालतात. जेव्हा त्या वापरात नसतात, तेव्हा सेल काढून ठेवल्यास सेल जास्त टिकतात.

काही कॅमेऱ्यांना देखील पेन्सिल सेल चालतात. तिथेही रिचार्जेबल सेल वापरता येतील. अनेक कॅमेऱ्याच्या ठरावीक अशा बॅटरीज असतात. कॅमेरा रोज वापरणार नसाल तर ती बॅटरी काढून ठेवताना निदान ४०-५० टक्के चार्ज करून ठेवावी. पूर्ण डिस्चार्ज झालेली बॅटरी नुसतीच पडून राहिली तर लवकर खराब होते. म्हणून थोडी चार्ज करून ती बाजूला काढून ठेवावी.

अशाच छोटय़ा छोटय़ा कृतींतून चांगल्या वस्तूंचे आयुष्य वाढते. त्यांचा पुनर्वापर करायचा पर्याय शोधता येतो आणि घरातला अनावश्यक कचरा देखील काढून टाकता येतो.

प्राची पाठक  prachi333@hotmail.com

First Published on January 26, 2018 1:22 am

Web Title: pencil cell and batteries