उंबरठय़ाच्या बाहेर ठेवलेल्या काळ्या दगडावर बारीक रांगोळीने शिल्पा चित्र काढतात. रेष अगदी बारीक, एकसारखी असून ती सहज वळण घेत असते. सोन्याच्या दागिन्यांमध्ये जशी बारीक बारीक कलाकुसर असते तशी त्यांच्या रांगोळीत असते. सगळे आगार प्रमाणबद्ध व एकसारखे असतात. एक टापटीप त्याच्यात जाणवते.

झुंजुमुंजू झालं की उगवणारा प्रत्येक दिवस हा नवीन असतो. कधी पाण्याने गच्च भरलेल्या ढगांच्या गर्दीतून त्याला वाट शोधावी लागते, कधी काळ्याकुट्ट अंधाराचा पाय निघत नसतो. म्हणून त्याला थोडं मागे ढकलतच दिवसाला पुढे व्हावं लागतं. कधी ‘हेमंताचा ओढून शेला हळूच ओले अंग टिपावे’ अशी त्याची अवस्था होते, तर कधी रिमझिम पावसाची नादावलेली ओलसर सोबत असते. तर कधी निरभ्र आकाशात केशरी, लाल, पिवळ्या रंगांचा सडा टाकत तो उगवतो. रात्रीचा काळाकुट्ट पडदा अखेर दूर होतो आणि चैतन्याची सकाळ होते.

ravi rana bachchu kadu
“आम्ही तुमच्या खासगी गोष्टी बाहेर काढल्या तर…”, बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

ये अवखळ पोरी समान आज सकाळ

तोडीत गळ्यातील सोन्याची फुलमाळ

नादात वाजवीत रूमझूम अपुले चाळ

घरटय़ातून उडवी खगास ही खटय़ाळ  या पद्माताई गोळे यांच्या शब्दांनी ती नटते आणि दिवसाला सुरुवात होते.

भिंतीवरच्या दिनदर्शिकेनुसार मराठी महिना, पक्ष, तिथी, वार याचे अलंकार त्याला घातले जातात. तसेच इंग्रजी महिना आणि तारीख ही त्याला चिकटते. स्वत:ची ओळख मिळते आणि मग या ओळखीचे स्वागत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीप्रमाणं, रितीरिवाजाप्रमाणं करतात. म्हणजे चतुर्थी असली की एखादी व्यक्ती टिटवाळ्याला गणेश दर्शन घ्यायला जाते. एखादी फराळाच्या पदार्थावर ताव मारते. एखादी भक्तीभावाने सहस्रावर्तन करते तर एखादी उकडीच्या मोदकांचा बेत करते. या गोष्टींबरोबरच एखादी कलासक्त व्यक्ती आपल्या दारात गणपतीची रांगोळी काढते. त्या प्रसन्न दर्शनातून येणाऱ्या जाणाऱ्यांना ‘आज चतुर्थी’ आहे याची जाणीव करून देते. रांगोळीच्या माध्यमातून ‘दिनविशेष’ रेखाटणारी ही कलाकार आहे शिल्पा किरण घैसास.

या रांगोळ्यांविषयी बोलतं करायला जाताच आठवणींचे टिपके काढायलाच त्यांनी सुरुवात केली. केवळ काकामुळेच मला रांगोळी काढायला आवडायला लागलं. घरात ठिपक्यांच्या रांगोळीची पुस्तकं होतीच. मी साधारण पाच- सहा वर्षांची असेन, रांगोळीचे ठिपके कसे काढायचे? ठिपका बिंदूसारखा आला पाहिजे, स्वल्प विरामासारखा येता कामा नये. हे ठिपके एका सरळ रेषेत कसे काढायचे, दोन रेषांमधील अंतर सारखं कसं ठेवायचं, ठिपके जोडणारी रेष सरळ आली पाहिजे. बिचकत बिचकत रेष काढायची नाही, या सगळ्या गोष्टी काकाने मला अगदी हाताला धरून शिकवल्या. ठिपके ठिपके छान येईपर्यंत पुन्हा पुन्हा पुसून काढायचे, यात तो सतत माझ्याबरोबर असायचा. त्याला कधी कंटाळा यायचा नाही. तो झोपला असला तर मी त्याची डोळ्याची पापणी वर करून त्याला उठवायची, पण तो कधी रागवायचा नाही. बॉम्बे डाईंगमध्ये तो कामाला होता. कापडावर डिझाइन काढण्याचं काम तो घरी आणूनही करायचा. एका फुलात पाच रंग छटा असतील तर पाच वेगवेगळी चित्रे काढून मग ती एकावर एक ठेवून चित्र पूर्ण होत असे. त्यात एकाग्रता नेमकेपणा आणि अचूकपणा लागत असे. मला त्याला तसं काम करताना बघायला फार आवडायचं. मी लहानपणी बहुतेक शांत असेन, त्याच्या कामात त्रास देऊन व्यत्यय आणत नसेन, त्यामुळे त्याच्या बाजूला बसून ‘हे दे, ते दे’ अशी थोडीशी लुडबूड करत मी निरीक्षण करत असे. केवळ त्याच्या मुळेच संयमाबरोबरच रेषेतलं सौंदर्य, वळण जाणवत गेलं आणि हात तयार झाला. मला आठवतंय, मी दहा वर्षांची असेन दिवाळीला माझ्या मावशीकडे गेले होते. पंगत मांडली होती. मावशीने मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि प्रत्येक पानाभोवती महिरप काढण्याची हौस मी भागवून घेतली. सर्वाना रांगोळ्या अतिशय आवडल्या. माझ्या रांगोळ्यांचं झालेलं ते पहिले जाहीर कौतुक.

तसं आमच्याघरी सगळ्यांचंच ड्रॉइंग चांगलं आहे. बाबा कॉलेजमध्ये असताना होस्टेलमध्ये रांगोळ्या काढायचे. आईही रोज दारात रांगोळी काढतेच. मीही रोज रांगोळी काढते. पण एकदा लेकाला दसऱ्याला सरस्वती काढून देताना मनात विचार आला की दारातही अशीच सरस्वती आणि मोर काढला तर.. ही कल्पना लगेच कृतीत आणली. मला तर ती आवडलीच, पण इतरांनाही ती भावली. तेव्हापासून सणवारांच्या निमित्ताने तो दिवस प्रतिबिंबित होईल अशी रांगोळी मी काढू लागले. त्यासाठी मला घरातलं इंटिरिअर चालू असताना घराबाहेरच्या रांगोळीसाठी २ फूट x २ फूटचा काळा ग्रेनाइटचा तुकडा मी कापून घेतला आणि मग सकाळची मुलांची घाईगर्दी संपली की शांतपणे दिनविशेष जपत मी रांगोळी काढू लागले. शिल्पा यांनी रांगोळीची पाश्र्वभूमी रंगवली.

उंबरठय़ाच्या बाहेर ठेवलेल्या काळ्या दगडावर बारीक रांगोळीने त्या चित्र काढतात. रेष अगदी बारीक, एकसारखी असून ती सहज वळण घेत असते. सोन्याच्या दागिन्यांमध्ये जशी बारीक बारीक कलाकुसर असते तशी त्यांच्या रांगोळीत असते. सगळे आगार प्रमाणबद्ध व एकसारखे असतात. एक टापटीप त्याच्यात जाणवते. रंगीत चित्रपटांपेक्षा कृष्णधवल चित्रपट डोळ्यांना सुखावतात. शांत करतात. तसं रंग नसले तरी या रांगोळ्या बघताक्षणी ‘वा ऽऽ किती छान’ असं म्हटलं जातंच. फुलांचा सुवास दिसत नसला तरी असतो, तसंच पांढऱ्या रंगात सगळे रंग सामुहिकरित्या लपलेले असतातच. त्याचाच परिणाम असेल कदाचित, पण शिल्पा यांची रांगोळी बघताना डोळे कौतुकाने लकाकतातच. ‘बघत राहू दे तुझ्याकडे’ अशी बघणाऱ्यांची अवस्था होते.

या कोरीव कामातूनच नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या जातात. गुढीपाडव्याला गुढी  उभारली जाते. बैलपोळ्याला बैलाची पूजा होते. हरितालिकेचं व्रत साकारलं जातं. दीपपूजा होते. दसऱ्याला रावणवध होतो. खंडेनवमीला शस्त्रास्त्रांची पूजा होते. तुळशीचं लग्न होतं. नवरात्रीला गौर बसते. पुस्तकदिनाला पुस्तक उघडलं जातं. झेंडावंदन होतं. अशा चित्रमय भाषेतून भिंतीवरील दिनदर्शिका जणू घराच्या दर्शनी भागात स्थिरावते. हा दागिना घराची शोभा, सौंदर्य, रूप द्विगुणित करतो. घराच्या पायातले हे जणू पैंजणच. शिल्पा यांचा हा ‘हात’ गुण सतत वाढत राहो, हीच सदिच्छा.

सुचित्रा साठे suchitrasathe52@gmail.com