मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरात आजदेखील काही भाग हे केवळ रहिवास क्षेत्र म्हणून राखीव विकसित झालेले पाहायला मिळतात. परंतु रहिवाशांच्या नित्य गरजा भागविल्या जातील अशा लहान दुकानांची किंवा सेवा देणाऱ्या व्यवसायांची आवश्यकता रहिवास क्षेत्राला असते. उदा. किराणा भुसार, दुध डेअरी, सलून, दवाखाना, स्टेशनरी, केमिस्ट, इस्त्रीवाला, इ. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन काही रहिवासी इमारतींमध्ये अशा लहान दुकानांसाठी  गाळे तयार करून बिल्डरकडून विक्री केले जातात. यथावकाश अशा  इमारतीतील रहिवासी आपली सहकारी गृहसंस्था विधिवत स्थापन करून घेतात. अर्थात, इमारतीतील दुकान गाळेधारकदेखील कुटुंबवत्सल रहिवाशांबरोबर त्या सहकारी गृहसंस्थेचे कायदेशीर सभासद होतात. रहिवासी आणि दुकानदार यांच्यासाठी वेगवेगळे बायलॉज लागू होत नाहीत. कुटुंबवत्सल रहिवासी आणि दुकानदार यांच्याशी सोसायटीतर्फे एकाच बायलॉजच्या आधारे व्यवहार केला जातो. सहकारी गृहप्रकल्पासाठी लागू असणाऱ्या बायलॉजमध्ये ज्या वेळी भविष्यात काही सुधारणा केल्या जातील त्यावेळी या वास्तवाचा विचार व्हावा असे सुचवावेसे वाटते.

रहिवासी आणि दुकानदार यांचे तेथील वास्तव्य हे दोन अगदी भिन्न अशा हेतूने प्रस्थापित झालेले असते. त्यामुळे संबंधित सभासदांकडून त्याचा वापरदेखील ज्याच्या त्याच्या मूळ हेतूनुसार अगदी भिन्न प्रकारे आणि हेतूने केला जात असतो. सदनिकेमध्ये रहिवासी आपल्या कुटुंबांसह, दिवस-रात्र रहात असतो. तेथे त्याचा वास्तव्याचा हेतू केवळ कुटुंबासह  रहिवास इतकाच मर्यादित स्वरूपाचा असतो. कुटुंबवत्सल सभासद पाणी वापर, वीज वापर, सोसायटीतर्फे देण्यात येणाऱ्या इतर सुविधा उदा. लिफ्ट, सफाई कामगार, असल्यास बगीचा, इतर मनोरंजन साधने आणि पार्किंग याचा तो नित्यनेमाने कायद्याने उपभोग घेऊ शकतो. कुटुंबवत्सल सभासदाला सोसायटीतर्फे देऊ  केलेल्या सर्व सोयीसुविधा सहजगत्या गरजेनुसार वापरता येतात. दुकानाचे गाळे इमारतीच्या अगदी दर्शनी भागात असतात. त्यांना सोसायटीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या पाणी (तेसुद्धा कुटुंबवत्सल सभासदांपेक्षा अगदी कमी प्रमाणात लागते), स्वच्छतागृह या सुविधा सोडून अन्य कुठल्याही सोयीसुविधांचा उपयोग नसतो, दुकानदारासाठी त्या असून नसल्यासारख्याच असतात. त्या सभासदाला सोसायटीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा उपयोग नसतो आणि म्हणून उपभोगदेखील घेता येत नाही. असे असले तरी रहिवासी सभासदांप्रमाणे इमारतीचा देखभाल खर्च त्यात सोसायटीच्या अंतर्गत भागाची रोजची साफसफाई, दिवाबत्ती, बागेची निगराणी, लिफ्टची देखभाल असल्यास लिफ्टमनचा पगार, सुरक्षा यंत्रणा यासाठी लागणाऱ्या खर्चापोटी वसूल करण्यात येणारे शुल्क दुकानदार/व्यावसायिकांसाठीदेखील आकारले जाते आणि त्याला ते देणे बंधनकारकदेखील असते. सभासद दुकानदाराचे इमारतीतील वास्तव्य दिवसातील काही मर्यादित काळापुरतेच असते. सोसायटीतर्फे रोज करण्यात येणारी साफसफाई त्यांच्यासाठी असून नसल्यासारखीच असते. अशा वादविवादाच्या वेळी हमखास पहिल्या -दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी आणि लिफ्टचा वापर यांचे उदाहरण देण्यात येते, परंतु ते गैरलागू आहे. कारण अशा रहिवाशांनी ठरविल्यास किंवा त्याच्याकडे वास्तव्यासाठी असणाऱ्या वृद्ध व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती विनासायास रोज लिफ्टचा वापर करू शकतात. दुकानदाराला किंवा व्यावसायिकाला स्थानिक प्रशासनाकडून त्याचा  व्यवसाय चालविण्यासाठी खास परवाना घ्यावा लागतो. दुकानदार अधिकृत सभासद असल्यामुळे त्यांनादेखील इतर रहिवासी सभासदांबरोबरच पार्गची जागा मिळाली पाहिजे अशी बहुतेक सहकारी गृहसंकुलातून मागणी होऊ  लागली आहे. आधीच गृहसंकुलातून पार्गची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यात दुकानदारांकडून होणाऱ्या या मागणीची भर पडत आहे. वरील सर्व कारणांमुळे बऱ्याच सहकारी गृहप्रकल्पात रहिवासी आणि दुकानदार/ व्यावसायिक यांच्यात खटके उडत असतात. त्यांचे संबंध बिघडलेले असतात. कारण दोघांचे तेथील वास्तव्य पूर्णपणे भिन्न हेतूसाठी असते.

गृहसंकुलात होणाऱ्या कुठल्याही गैरप्रकारांना आणि बेकायदेशीर कृत्यासाठी संबंधित सहकारी गृहप्रकल्पाचे पदाधिकारी कायद्याने उत्तरदायी असतात. हा मुद्दा लक्षात घेतल्यास दुकान किंवा व्यवसायाच्या जागी होणारे सर्व प्रकारचे व्यवहार लक्षात घेतल्यास त्या व्यवहारावर नियंत्रण ठेवणे, गरज भासल्यास त्या व्यवहारावर कायदेशीर कारवाई करणे आणि ती प्रत्यक्षात आणणे या संबंधित सोसायटीच्या कार्यकारिणीला कितपत शक्य आहे? कार्यकारिणीचे सभासद हे कर्तव्य यशस्वीरीत्या पार पडू शकतील का? याचा विचार केला पाहिजे.

वास्तव लक्षात घेऊन दुकानदार/ व्यावसायिकांसाठी अन्यायकारक आणि कार्यकारिणीला कारवाई करण्यासाठी अडचणीची ठरणारी अशी रहिवासी आणि दुकानदार/ व्यावसायिक यांच्याकरता लागू होणारी एकच एक बायलॉज पद्धतीत सुधारणा करण्याचा विचार यापुढे ज्यावेळी सहकारी गृहप्रकल्पासाठीच्या मॉडेल बायलॉजमध्ये सुधारणा केल्या जातील, त्यावेळी अवश्य करण्यात यावा, अशी सूचना करावीशी वाटते.

gadrekaka@gmail.com