07 April 2020

News Flash

एशियाटिक सोसायटी ज्ञान भांडाराचा समृध्द वारसा

आज या अलौकिक ज्ञानभांडारात सुमारे तीन लाखांची ग्रंथसंपदा आहे.

एशियाटिक सोसायटीचे जे कार्यक्रम होत असत ती जागा अंडाकृती होती. त्यात दरबार हॉलचाही समावेश होता.

आज या अलौकिक ज्ञानभांडारात सुमारे तीन लाखांची ग्रंथसंपदा आहे. भारतातील प्रादेशिक भाषांव्यतिरिक्त संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, इटालियन भाषांचा ग्रंथ खजिना आहे. त्या व्यतिरिक्त दुर्मीळ हस्तलिखिते, पोथ्या तसेच लंडन टाइम्स, इंद्रप्रकाश, बॉम्बे गॅझेट अशी जुनी वृत्तपत्रही पाहायला मिळतात. प्राचीन साहित्याशिवाय जुनी नाणी, सोने, तांबे, चांदीची भांडीही आहेत. तसेच जुने नकाशेही आहेत.
ऐतिहासिक वास्तू, स्तंभ, शिलालेख, नाणी, पुतळे हे त्या-त्या काळाच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या दर्शनांनी आपण नकळत भूतकाळात जातो. पण गत इतिहासाचे वैभव अधिक जाणून घेण्यासाठी प्राचीन लिखित साहित्य म्हणजे जिताजागता इतिहास संस्कृतीचा ठेवा आहे. हे लिखित साहित्य म्हणजे अबोलपणे गत इतिहास उलगडणारे मार्गदर्शकच! हा ठेवा काळजीपूर्वक जतन करणाऱ्या ज्या संस्था महाराष्ट्रात काम करताहेत त्यात पुण्याची भांडारकर प्राच्यविद्या संस्था, धुळ्याची राजवाडे इतिहास मंडळ, पुण्यातील राजा केळकर वस्तुसंग्रहालय, इतिहास संशोधन मंडळ यांच्या प्रमाणे मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे कामही स्पृहणीय आहे. ब्रिटिश काळात निर्माण झालेल्या या संस्थेद्वारे पौरात्य विषयाच्या अभ्यासाप्रमाणेच अनेक अन्य भाषांसहित वेगवेगळ्या शास्त्रांचा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी एशियाटिक सोसायटीचे ज्ञानभांडार निर्माण झाले. यावरून ब्रिटिश राज्यकर्त्यांची ज्ञानलालसा व ग्रंथरूपी पुरातन ज्ञानभांडार संवर्धनाची दृष्टीही जाणवते.

साम्राज्य विस्तार करताना प्राचीन साहित्य-संस्कृतीचे संवर्धन करण्याचा ध्यास इंग्रज प्रशासनाकडे होताच. या मूळ कल्पनेनुसार प्रथमत: एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कलकत्ता येथे झाली. त्याचाच एक भाग म्हणून लायब्ररी सोसायटी ऑफ बॉम्बे ही संस्था निर्माण झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, साहित्यप्रेमी जेम्स माँकिटॉश यांनी १८०४ मध्ये या संस्थेची स्थापना केली. त्यापूर्वी रॉयल एशियाटिक सोसायटी, लंडनमध्ये कार्यरत होती. ‘लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे’ ही त्याचीच एक शाखा म्हणून ओळखली जायला लागली. नंतर १८२९ पासून एशियाटिक सोसायटीची मुंबई शाखा म्हणून ओळखली जायला लागली.

पौरात्य विषयाच्या अभ्यासाला उत्तेजन देणे हा प्रमुख हेतू ही संस्था स्थापन करण्यामागे होता. अनेक भाषांप्रमाणेच वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी या संस्थेद्वारे सुविधाही उपलब्ध झाल्या. भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, उत्खननशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विषयांनुरूप संशोधनाला ही संस्था उपकारक ठरली. त्या बरोबरीनी पश्चिम भारतातील लोकजीवन व संस्कृती यासाठी संशोधन करून अभ्यास करण्यासाठी ही संस्था कार्यरत झाली. आज २०० वर्षांच्या या संस्थेकडे पुरातन हस्तलिखित, नाणी यांचा संग्रह आहे. डांटेच्या ‘डिव्हाइन कामेडी’ या ग्रंथाचे हस्तलिखितही या संस्थेनी जपून ठेवले आहे. तसेच डॉ. भाऊ दाजी लाड यांनी संशोधनात्मक जे लेखन केले हेसुद्धा एशियाटिक सोसायटीकडे उपलब्ध आहे.

विशेष म्हणजे त्या वेळच्या अनेक संस्था कालांतरांनी बंद झाल्या तरी एशियाटिक सोसायटी आपले अस्तित्व सांभाळून आहे. या संस्थेच्या प्रभावामुळे व कार्यपद्धतीमुळे जॉग्रिफकल सोसायटी, अँथ्रॉपॉलॉजिकल सोसायटी या संस्था एशियाटिक सोसायटीत विलीन झाल्याने एशियाटिक सोसायटीच्या दुर्मीळ संदर्भग्रंथात भर पडल्याने हे देशातील सुसज्ज ग्रंथालय म्हणून ओळखले जायला लागले. अनेक दुर्मीळ ग्रंथांप्रमाणे वेगवेगळ्या प्राचीन वस्तूंचे संग्रहालयदेखील या वास्तूमध्ये होते. मात्र हा प्राचीन ठेवा सुरक्षित राहण्यासाठी तो छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाकडे हस्तांतरित करण्यात आला.

एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची इमारत वारसा वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. ग्रीक आणि रोमन वास्तुशैलीचा प्रभाव या इमारतीवर आहेच. इमारतीत प्रवेश करण्यासाठी सुमारे तीस दगडी पायऱ्या चढून जावे लागते, नंतर संस्थेच्या इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी इमारतीच्या वैभवाला साजेसे आठ खांबांच्या कमानीतून आपण मार्गस्थ होतो. या प्रशस्त पायऱ्या आणि भलेमोठय़ा खांबावरून रोमन-ग्रीक वास्तुशैलीच्या बांधकामाची प्रथमदर्शनीच कल्पना येते. प्रत्यक्ष टाऊन हॉलमध्ये वावरताना हवा-प्रकाशाचा मेळ साधण्यासाठी दरवाजे आणि खिडक्यांची संख्याही भरपूर आहे. इ.स. १९०७ साली इमारतीच्या अंतर्गत सोयीसाठी विजेचे दिवे आणि पंखे बसविण्यात आले.

प्रारंभी इंग्रज अंमलदारांना सभासदत्व असलेल्या एशियाटिक सोसायटीला प्रेमचंद रायचन, जमशेटजीजीभॉय, नानाशंकर शेठ यांनीही देणग्या देऊन या संस्थेचा लौकिक वाढवला आहे. त्यांची आठवण म्हणून नानाशंकर शेठ यांचा पुतळा या संस्थेत उभारला गेला. आज अस्तित्वात असलेल्या टाऊन हॉलसह एशियाटिक सोसायटीच्या पूर्ततेसाठी स्थित्यंतरही घडली आहेत. मुळात शासकीय कार्यक्रमाकरता टाऊन हॉलची कल्पना ब्रिटिश प्रशासकांनी मांडली त्याची सुरुवात फोर्ट विभागातील न्यायालय भरणाऱ्या इमारतीत भाडय़ांनी टाऊन हॉलची स्थापना झाली. तर १७२० मध्ये रामा कामाठी यांच्या घरात टाऊन हॉल स्थलांतरित झाला. तर १७९३ साली हॉर्न बी हाऊसमध्ये जेथे रेकॉर्डरूम होते त्या जागेत टाऊन हॉलचे काम सुरू झाले. इ. स. १८११ साली रेकॉर्ड कोर्टाचे न्यायाधीश सर जेम्स माँकिटॉश यांनी टाऊन हॉलच्या स्वतंत्र वास्तूचा प्रस्ताव सरकारकडे मांडला त्याला मंजुरीही मिळाली.

टाऊन हॉलच्या नियोजित बांधकामासाठी निधी उभारण्याकरिता एकूण तीन वेळा लॉटरी काढण्यात आली. त्यातून पुरेसा निधी जमल्यावर हार्निमन सर्कल परिसरात बांधकामाला सुरुवात झाली. या इमारतीचा आराखडा कर्नल कॉपरनी तयार केल्यावर रुपये ६,५९,६६९ खर्च करून १८३३ मध्ये या इमारतीला मूर्त स्वरूप आले. तत्कालीन सरकारनेही या वास्तूचं महत्त्व जाणून रु. ४,८३,००० इतकी रक्कम दिली. टाऊन हॉलच्या दोन्ही बाजूकडील जागा रॉयल एशियाटिकच्या मुंबई शाखेसाठी उपलब्ध करून देण्यात आली.

एशियाटिक सोसायटीचे जे कार्यक्रम होत असत ती जागा अंडाकृती होती. त्यात दरबार हॉलचाही समावेश होता. कालांतरांने टाऊन हॉलची इमारत एशियाटिक सोसायटीची म्हणून ओळखली जायला लागली. १८०४ साली सर माँकिटॉश यांनी लायब्ररी सोसायटी म्हणून ही वास्तू नावारूपाला आणली, तर १८२९ मध्ये एशियाटिकचाच एक भाग म्हणून नावारूपाला आली. या संस्थेचे ग्रंथालय व वाचनकक्ष टाऊन हॉलचा एक भाग म्हणून ओळखला जायला लागला. अनेक मान्यवरांनी आपल्या संग्रहातील दुर्मीळ पुस्तके दान करून वाचनालयाची ग्रंथसंपदा वाढवली.

या प्रशस्त वास्तूत मान्यवरांचे पुतळे आहेत. एशियाटिकच्या दालनात सदस्यांना प्रवेश असला तरी टाऊन हॉल सर्वासाठी खुला आहे. राज्य शासनातर्फे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे कार्यक्रम या इमारतीत साजरे केले जातात. २०० वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार ठरलेली ही भव्य इमारत म्हणजे भारतीय विद्या, प्राच्यविद्या आणि इतिहासाची पाश्र्वभूमी असलेले ज्ञानभांडार आहे. हे भांडार म्हणजे असंख्य वाचक, संशोधक तथा अभ्यासकांना एक आधारवड आहे. आजचे मूर्त स्वरूप येण्यासाठी ही इमारत अनेक स्थित्यंतरातून गेली आहे.

जेम्स माँकिटॉश यांच्या सहभागाप्रमाणेच ही संस्था नावारूपाला आणण्यात डॉ. भाऊ दाजी लाड, रामकृष्ण भांडारकर, काशिनाथ तेलंग या भारतीय मान्यवरांनी काही काळ संस्थेची धुरा वाहिली आहे. पश्चिम भारतातील संशोधनात्मक काम करणारी ही पहिलीच संस्था आहे. महामहोपाध्ये पा. वा. काणे यांनी या संस्थेच्या संशोधन कक्षात हिस्टरी ऑफ धर्मशास्त्रचे खंड लिहिले. दुर्गाताई भागवत आणि एशियाटिक सोसायटीचे अतूट नातं होतं.

आज या अलौकिक ज्ञानभांडारात सुमारे ३ लाखांची ग्रंथसंपदा आहे. भारतातील प्रादेशिक भाषांव्यतिरिक्त संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, इटालियन भाषांचा ग्रंथ खजिना आहे. याव्यतिरिक्त दुर्मीळ हस्तलिखिते, पोथ्या, तसेच लंडन टाइम्स, इंदूप्रकाश, बॉम्बे गॅझेट अशी जुनी वृत्तपत्रही पाहायला मिळतात. प्राचीन साहित्याशिवाय जुनी नाणी, बौद्ध स्तुपांचे अवशेष, सोने, तांबे, चांदीची भांडीही आहेत. एशियाटिक संस्थेत वर्गवारीनुसार साहित्य जतन केले आहे, तसेच जुने नकाशेही आहेत.

आधुनिक ग्रंथसंवर्धन पद्धतीचा उपयोग करून हा अनमोल ग्रंथठेवा जतन केला जातोय. त्यासाठी टिकाऊ बाइंडिंग, मायक्रोफिल्मिंग डिजिटल पद्धतीद्वारे ही ग्रंथसंपदा संवर्धनाचे काम मोठय़ा निष्ठेने केले जातेय. विशेष म्हणजे कोणतेही पुस्तक संस्थेच्या जागेतच पाहता येते. बाहेर नेले जात नाही. पुस्तकांचे जतन करण्यासाठी ग्रंथ दत्तक योजनाही संस्थेद्वारे राबवली जाते. ग्रंथालय आणि संशोधनात्मक, साहित्य-सांस्कृतिक उपक्रमही आयोजित केले जातात. याव्यतिरिक्त संस्थेतर्फे वर्षभर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. संस्थेकडे असलेल्या दुर्मीळ वस्तूंची मालकी स्वत:कडेच ठेवून त्या वस्तू छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाकडे सुपूर्द केल्या आहेत. इ. स. १९९४ मध्ये एशियाटिक सोसायटी आणि मध्यवर्ती ग्रंथसंग्रहालयाचे विभाजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून या प्रख्यात संस्थेला वार्षिक अनुदान दिले जाते. सुमारे २०० वर्षांपूर्वी बांधलेली ही भव्य इमारत वारसा वास्तूसह ज्ञानभांडाराचा दुर्मीळ खजिना आहे.

– अरुण मळेकर
vasturang@expressindia.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2016 12:10 am

Web Title: rich heritage of knowledge treasures
Next Stories
1 डिम्ड कन्व्हेअन्सला उशीर का?
2 रंग वास्तूचे : देऊळ
3 कायद्याच्या चौकटीत : घर घेतले, पण ते माझे झाले का?
Just Now!
X