मी एक प्रौढ अविवाहिता आहे. वडिलांच्या मृत्युपश्चात त्यांच्या मालकीच्या गावठाण जागेत भावांनी बिल्डरकडून काही फ्लॅटच्या बदल्यात निवासी इमारत बांधून घेतली. आता ओसी मिळालेल्या त्या इमारतीला (वारसाहक्काचा) माझा फ्लॅट बिल्डरकडून ताब्यात घेताना मला काही व्यवहार करावा लागेल की केवळ हस्तांतरण होईल किंवा मी फ्लॅट परस्पर विकल्यास कोणता व्यवहार होईल, काही खर्च येईल का?                                   

ललिता भोईर

आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्या भावांनी बिल्डरबरोबर काही करार केला आहे का ते पाहावे लागेल. तसेच त्यातील अटी-शर्ती काय आहेत त्या पाहाव्या लागतील. त्यात तुम्हा सर्व भावंडांना दिलेल्या सदनिकेचा उल्लेख असेल आणि बिल्डरच्या सदनिकांचा उल्लेख असेल आणि सदर करारनामा आणि तत्सम कागदपत्र नोंदणीकृत असतील तर फक्त ताबापत्र घेऊन ठेवले तरी पुरेसे आहे. परंतु तसे काही नसल्यास आपण वारसाहक्काने त्या इमारतीच्या सहमालक होता. तेव्हा अन्य सहमालकांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन तुमची सदनिका विकता येईल. तरीसुद्धा आपण आपल्याकडील कागदपत्रे एका तज्ज्ञ व्यक्तीला दाखवून त्यांचा सल्ला घेणे इष्ट होईल.

आमच्या सोसायटीमधील काही सदस्य आपले फ्लॅट भाडय़ाने देतात. परंतु भाडे करारपत्र व्यवहार केला तरी प्रत सोसायटी कमिटीला देत नाहीत. तर काही सदस्य रजिस्ट्रेशन प्रत बनवून घेत नाही. त्याकरिता काही नियम आहेत का? त्यावरून कोणती कार्यवाही करू शकतो.   

– सुशील पवार

गृहनिर्माण संस्थेतील कोणताही सदस्य आपली सदनिका लीव्ह लायसन्स कराराने देऊ शकतो. मात्र त्यासाठी जो करारनामा करावा लागतो, तो नोंदणीकृत असणे कायद्याने बंधनकारक केले आहे. तसेच त्यासाठी गृहनिर्माण संस्थेला कळवणेदेखील आवश्यक आहे. या व्यवहाराच्या करारनाम्याची प्रत संबंधित पोलीस ठाण्यात देणेदेखील अनिवार्य आहे. आता आपल्या गृहनिर्माण संस्थेतील सदस्य आपणाला सदर करारनाम्याची प्रत देत नसतील तर त्यांना तशी नोटीस पाठवून त्यांच्याविरुद्ध उपविधीत नमूद केल्याप्रमाणे आपण दंडात्मक कारवाई करू शकता. अगदी शेवटचा उपाय म्हणून सदर सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाईदेखील संस्था करू शकते. मात्र अशी टोकाची कारवाई करण्यापूर्वी त्या सदस्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करून पाहणेच योग्य ठरेल.

ghaisas_asso@yahoo.com