News Flash

गणपती सजावट सहा पिढय़ांची परंपरा

आजच्या मुंबईकरांना लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य हे नाव कदाचित अपरिचित असेल

या घरगुती गणपतीची सुरुवात आधुनिक मुंबईचे एक शिल्पकार आणि ‘भाऊचा धक्का’ बांधणारे लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य उर्फ भाऊ रसूल यांनी १८४५ साली केली. मी त्यांचा सहाव्या पिढीतील वंशज. भाऊच्या धक्क्याइतकीच ऐतिहासिक परंपरा आमच्या घरातील गणेशोत्सवाला आहे. या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे दीडशे- पावणेदोनशे वर्षांपूर्वी भाऊंनी गणेशोत्सवासाठी ज्या साहित्याने सजावट केली होती, त्याच वस्तूंनी आजही सजावट केली जाते.

विश्वास नारायण अजिंक्य

आमच्या घरी १८४५ सालापासून गणपती येतो. आमच्या अजिंक्य कुटुंबातील गणपतीचे यंदाचे १७४ वे वर्ष. माझ्या पणजोबांचा जन्म १८४५ मध्ये झाला. त्या वर्षी त्यांचे आजोबा लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य यांनी आपल्याला झालेल्या नातवाच्या आनंदाप्रीत्यर्थ घरी गणपती आणण्याची प्रथा सुरू केली. आजच्या मुंबईकरांना लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य हे नाव कदाचित अपरिचित असेल. अगदी या गृहस्थाचा मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असला तरी या नावाने त्यांची ओळख पटणं कठीणच. पण या शहरातील प्रत्येकाला ‘भाऊचा धक्का’ तर माहीत असेलच. याच लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य यांनी भाऊचा धक्का बांधला. देश-परदेशातून माल वाहतूक करणाऱ्या बोटी आणि कोकणातील प्रवाशांसाठी समुद्र हटवून बंदर बांधण्याची किमया लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य ऊर्फ ‘भाऊ रसूल’ यांनी केली. मी त्यांचा सहाव्या पिढीतील वंशज. भाऊच्या धक्क्य़ाइतकीच ऐतिहासिक परंपरा आमच्या घरच्या गणेशोत्सवालाही आहे. १८४५ ते १८९५ गिरगावात, १८९६ ते १९३५ परळला आणि १९३६ पासून आत्तापर्यंत प्रताप मॅन्शन, डॉ.आंबेडकर मार्ग, दादर टी.टी. येथील घरात सहा पिढय़ांनी गणपती आणण्याची परंपरा जपली आहे.

या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे दीडशे-पावणेदोनशे वर्षांपूर्वी भाऊंनी गणेशोत्सवाची ज्या साहित्याने सजावट केली होती, त्याच वस्तूंनी आजही सजावट केली जाते. जुन्या काळातील जाड घाटणीची तांब्या-पितळेची भांडी, शिसवी लाकडाचे, मिश्र धातूचे मोठमोठे चौरंग, पितळेच्या मोठय़ा समया, रिद्धी-सिद्धी, हरणाच्या आकाराची उदबत्तीची घरे, लामण दिवे, त्या काळात रॉकेलवर चालणारे दिवे.. सारे काही आजही पूर्वीचेचआहे. सर्व सामान वंशपरंपरागत चालत आलेले आहे; आणि आम्ही ते सांभाळून ठेवले आहे. गणपतीच्या पूजेतील पंचामृताची भांडी ही औरंगजेबाचे मुलगे आझम शहा व कामबक्ष यांच्या काळातील चलनी नाण्यांना चांदीचे जोडकाम देऊन बनवण्यात आली आहेत. गणपतीच्या मागचा आरसाही १५० वर्षांपूर्वीचा हातकारागिरीने बनविलेला आहे. पितळेच्या झांजादेखील पत्रा ठोकून बनविलेल्या आहेत. गणेश दर्शनाला येणाऱ्या लोकांना जुन्या काळातील आरास व  तांबा, पितळ, बीड, जर्मन सिल्व्हर, चिनी माती यांपासून बनविलेल्या वस्तू बघून वेगळे काहीतरी बघितल्याचा आनंद होतो.

गणेश चतुर्थीच्या १५-२० दिवस आधीच संपूर्ण अजिंक्य कुटुंब तन-मन-धनाने कामाला लागते. घराची साफसफाई, आवराआवरी, तसेच आरासीसाठी वापरत असलेले चौरंग, समया, पूजेची भांडी हे सर्व  घासूनपुसून चकचकीत करतो. आमचा गणपती गौरीबरोबर जातो. आमच्याकडे दरवर्षी एकाच प्रकारची मूर्ती आणली जाते.

आमच्या गणपतीच्या दर्शनाला अगदी लांबवरूनदेखील खूप लोक येतात. त्यामुळे हे ५-७ दिवस घर अगदी भरलेलं असतं. सारं घर गणपतीमय होऊन घराला एक उत्सवी रूप येतं. तेव्हाच्या प्रसन्न आणि आनंददायक वातावरणाचं वर्णन करणं अशक्यच आहे.

गिरगावात आणि परळला राहत असताना अथर्वशीर्ष, सहस्रवर्तन, इत्यादी धार्मिक विधी होत. गणेश यागदेखील होई. पुढे दादरला राहायला आल्यावर आमच्या इमारतीतील राहिवाशांच्या उत्साही सहभागामुळे दररोज साग्रसंगीत आरत्या होऊन गणेशोत्सव दणक्यात साजरा होऊ  लागला. गौरी विसर्जनाच्या दिवशी आमच्या घरातील गणपतीच्या विसर्जनाची तयारी सुरू होते. त्या दिवशी बत्ताशाचा प्रसाद असतो.

गणेशोत्सवानंतर पूजेची भांडी, समया, लामण दिवे, चौरंग या सर्व वस्तू व्यवस्थितपणे कापडात गुंडाळून मोठय़ा पेटाऱ्यात ठेवल्या जातात. आमच्याकडे तीन पिढय़ांपासून काम करणारा नोकरवर्गही या वस्तूंची योग्य ती देखभाल करतो. काळ बदलला किंवा वास्तव्याचे ठिकाण बदलले; तरीही गणेशोत्सव साजरा करण्याची आम्हा अजिंक्य कुटुंबाची रीत मात्र आजही एकोणिसाव्या शतकातीलच आहे व आजही गणेशोत्सव तेवढय़ाच जल्लोषात आणि पारंपरिक वातावरणात साजरा केला जातो. त्यामुळेच आमच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेताना भाविक कळत- नकळत जुन्याच काळात जातात. आम्ही वंशपरंपरागत चालत आलेल्या प्रथा-परंपरा स्वकारल्या आणि सांभाळल्याही. आमच्या अजिंक्य कुटुंबातील प्रथा कालांतराने पुढची पिढी चालवेल, त्यानुसार त्यात काही नवीन गोष्टींचा समावेश होत राहील. आज इतकी वर्षे गणराय आमच्या घरात येतात ह ेआमचे, आमच्या वास्तूचे भाग्यच आहे.

गणपतीच्या पूजेतील पंचामृताची भांडी ही औरंगजेबाचे मुलगे आझम शहा व कामबक्ष यांच्या काळातील चलनी नाण्यांना चांदीचे जोडकाम देऊन बनवण्यात आली आहेत. गणपतीच्या मागचा आरसाही १५० वर्षांपूर्वीचा हातकारागिरीने बनविलेला आहे. पितळेच्या झांजादेखील पत्रा ठोकून बनविलेल्या आहेत.

ajinkyavishwas9@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:18 am

Web Title: six generations tradition of ganpati decoration
Next Stories
1 वस्तू आणि वास्तू : टॉयलेट मॅनर्स
2 घर खरेदी रेरा-जीएसटीनंतरची!
3 साधेपणातील कलात्मक सजावट
Just Now!
X