15 December 2017

News Flash

वॉटरप्रुफ्रिंग : सोलर पॅनल वरदान ठरणार की शाप!

आपल्या येथे टेरेस वॉटरप्रूफिंगसाठी सर्रास ‘ब्रिक ब्याट कोबा’ नावाची चुकीची पद्धत वापरली जाते.

शैलेश कुडतरकर | Updated: April 29, 2017 3:01 AM

हल्ली टेरेसवर बसवण्यासाठी सोलर पॅनल्सचा विचार होताना दिसतो आहे.

वॉटरप्रूफिंगमध्ये सर्वात उत्तम प्रकारचे वॉटरप्रूफिंग म्हणजे पाणी एका जागेवर थांबू न देणे. पाण्याचा लवकरात लवकर निचरा करून ते थेट ड्रेनेज व्यवस्थेत पोहचवणे. त्यासाठी पाण्याला वाहवून जाण्यासाठी कोठेही कुठच्याही प्रकारचे अडथळे असता कामा नयेत. हल्ली टेरेसवर बसवण्यासाठी सोलर पॅनल्सचा विचार होताना दिसतो आहे. नवीन गोष्टींचे स्वागत केले पाहिजे आणि ती जर सगळ्यांच्या भल्यासाठी असेल तर मग प्रश्नच नाही. कारण नवीन गोष्ट ही आपले प्रश्न सोडविण्यासाठीच आलेली असते. पण जर का ती पूर्ण विचार न करता उचललेली असेल तर तीच मोठय़ा काळासाठी डोकेदुखीही ठरू शकते.

सोलर पॅनेलची चर्चा ही मुख्यत: विजेची निर्मिती करून विजेच्या बिलात बचत करणे व जेथे शक्य असेल तेथे ती संबंधित संस्थांना विकून त्यातून काही अतिरिक्त कमाई करणे या अर्थकारणाभोवतीच फिरताना दिसते. त्यामुळे सोलर पॅनेल्स म्हणजे सगळा फायदाच फायदा आहे असे चित्र रंगवले जाते. हा झाला टेक्नॉलॉजीचा एक भाग. दुसऱ्या भागात ज्या इमारतीच्या छतावर ही यंत्रणा बसवायची असते त्याचे वॉटरप्रूफिंग व रखरखाव याबद्दल कोणी बोलताना दिसून येत नाही. सोलर यंत्रणा बसवण्यापूर्वी याचा विचार होणे आवश्यक आहे, अन्यथा कुठून ही यंत्रणा बसवली अशी पश्चात्तापाची वेळ येऊ  शकते. जेव्हा मोबाइल टॉवर्स प्रथम आले तेव्हा काहीशी अशीच परिस्थिती होती. पैशाचे आकर्षण होते व तेव्हाही काही ठिकाणी घाईघाईत निर्णय घेतले गेले. आज मोबाइल टॉवर्सना विरोध निव्वळ रेडिएशन अथवा उत्सर्जन या कारणासाठी होत नसून त्यापासून होणाऱ्या गळतीच्या त्रासामुळेही होत आहे. एकदा पीडित लोकांचे त्रास पाहून घेणे हेही हिताचे ठरू शकेल.

सोलर यंत्रणेमध्ये इमारतीच्या गच्चीवर ठरावीक अंतरावर काँक्रीटचे ठोकळे ठेवले जातात व त्यांच्यावर सोलर पॅनेल्सच्या चौकटी बसवल्या जातात. सोलर चौकटीत निर्माण झालेली वीज वायरमार्फत इन्व्हर्टरच्या माध्यमातून अस्तित्वात असलेल्या विजेच्या प्रणालीमधून प्रवाहित केली जाते. सोलरच्या चौकटी ज्या ठोकळ्यावर बसवल्या जातात ते वाहणाऱ्या पाण्याला अडथळे ठरतात व पाणी ताबडतोब वाहून न जाता काही काळ टेरेसच्या पृष्ठभागावर जमा होऊन राहते. हे पाणी कालांतराने वॉटरप्रूफिंगच्या समस्या निर्माण करू शकते. ठोकळे चहूबाजूने कायमस्वरूपी वॉटरप्रूफ करता येत नाहीत. ब्लॉक्सना पर्याय म्हणून सभोवतालीच्या प्यारापेट किंवा कठडय़ाचा आधार घेऊन अधांतरी चौकटी बसवण्याचा विचार काही जण मांडतात. पण त्यातसुद्धा मध्यंतरीच्या भागात अधूनमधून लोखंडी आधार उभे करणे आवश्यक ठरेल. शिवाय प्यारापेट व इतर भाग जिथे मोठय़ा प्रमाणावर खिळे मारले जातील तो भाग पंक्चर होऊन तिथून वॉटरप्रूफिंगच्या समस्या निर्माण होतील.

आपल्या येथे टेरेस वॉटरप्रूफिंगसाठी सर्रास ‘ब्रिक ब्याट कोबा’ नावाची चुकीची पद्धत वापरली जाते. या पद्धतीत साधारणपणे पाचव्या-सहाव्या वर्षांनंतर लिकेज दिसून येते. ती वेळीच दुरुस्त न केल्यास गंभीर समस्या उभी राहते. ठरावीक काळानंतर वॉटरप्रूफिंगचे मेंटेनन्स करणे आवश्यक ठरते. तेव्हा संपूर्ण टेरसचा पृष्ठभाग हा मोकळा असावा लागतो. अशा वेळेस संपूर्ण सोलर यंत्रणेचे काय करणार याचा विचार होणे आवश्यक आहे. काय ही यंत्रणा तात्पुरती काढून बाजूला ठेवणार का? तसे असल्यास तिचा काढायचा व परत बसवायचा खर्च किती आणि तो कोण करणार? आणि ठेवणार तर कुठे ठेवणार? खूप वेळा गच्चीची  स्लॅब ही छताची असल्यामुळे तिची जाडी कमी असते. तिच्यावर ‘ब्रिक ब्याट कोबा’चे वजन असते व त्यावर जर का ही यंत्रणा बसवायची असेल तर अतिरिक्त वजनाचाही विचार झाला पाहिजे. नाही तर काही काळानंतर रूफ स्लॅबला बाक येऊ  शकतो. सिमेंटचे ठोकळे ग्रीडचा विचार न करता सोयीप्रमाणे कुठेही ठेवले जातात. हे ठोकळे मोबाइल टॉवर यंत्रणेत वापरलेल्या ठोकळ्यांपेक्षा संख्येने किती तरी जास्त असतात.

हे जे काही मुद्दे मांडले आहेत ते मुख्यत: अस्तित्वात असलेल्या इमारतीवर जर ही यंत्रणा बसवायची असेल तर विचारात घेण्यासाठी आहेत. ज्या इमारती अजून बांधायच्या आहेत, त्यांच्यावर ही यंत्रणा बसवण्यासाठी आवश्यक ती फेररचना करून बसवणे शक्य आहे. विरोध हा सोलर यंत्रणेला नसून ती इमारतीच्या आराखडय़ात नसतानासुद्धा बसवण्याच्या अट्टहासासाठी व त्यातून पुढे होणाऱ्या त्रासाबद्दल आहे. प्रश्न सरळ सरळ पैशाशी असल्यामुळे ज्यांना यंत्रणेचा थेट त्रास नाही ते यंत्रणा बसविण्याबद्दल आग्रही असू शकतील. त्यांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की एकदा का गळती सुरू झाली की ती संपूर्ण इमारतीचा नाश करण्यास कारण ठरेल व त्यात त्यांचा मजलासुद्धा असेल. पण जे छताच्या खाली राहत असतील त्यांना त्याचा परिणाम जास्त भोगावा लागेल व म्हणून त्यांनी अशी काही योजना अमलात येण्यापूर्वी पुरेपूर विचार करून संमत्ती द्यावी, अन्यथा होणारे परिणाम गंभीर असू शकतील व त्यातून लवकर सुटका मिळणे संभव नाही. कारण ही यंत्रणा भरपूर महाग असते व ती सहजासहजी काढून टाकणे शक्य नसते. मोबाइल टॉवर कंपनीचा असतो, तो जरूर पडल्यास कंपनी घेऊन जाऊ  शकते. पण ही यंत्रणा रहिवाशांना आपल्या पैशांनी खरेदी करावी लागेल व त्यासाठी एखाद्या वेळेस कर्जही घ्यावे लागेल. बँकांनीसुद्धा या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. भविष्यात या विषयावर कोर्ट-कचेऱ्या होण्याची शक्यता आहे. इमारत एकदा का तोडफोडीला आली की ती कितीही प्रयत्न केले तरी पूर्वीसारखी होऊ  शकत नाही. गळती सुरू झाल्यावर तिने फक्त इमारतीचे नुकसान होणार नाही तर खालील फ्लॅटमध्ये इंटिरियर वगैरेसुद्धा नाश पावेल. म्हणून लिकेज होणार नाही अशी यंत्रणा बसवण्यापूर्वी संपूर्ण खबरदारी घ्यावी व तरीसुद्धा ती झाली तर त्याची जबाबदारी निश्चित करावी व त्या परिस्थितीत जो जबाबदार असेल तो मग ती यंत्रणा विकणारी कंपनी असेल, सोसायटीची कमिटी असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, त्याच्याकडून संपूर्ण नुकसानभरपाई करून घेण्याची सोय करारात असावी. असे प्रोजेक्ट्स अमलात आणणे हे काही गाजराची पुंगी वाजली तर वाजली एवढे सोपे नाही. असे काही नियोजन असेल तरच निर्णय घेणाऱ्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करतील व इमारतीच्या वॉटरप्रूफिंगचीही दखल घेतील.  सोलर यंत्रणा बसवणे हे तसे नवीनच आहे. जिथे अशा काही यंत्रणा बसवल्या गेल्या आहेत तेथील अनुभव अजून नजरेस यायचे आहेत. त्याला थोडा काळ जाईल पण त्यासाठी आपण गिनपिग व्हायचे का, हा प्रत्येकाचा स्वत:चा निर्णय आहे. इथे उपस्थित केलेले मुद्दे हे इतर यंत्रणा उभारलेल्या ठिकाणाच्या अनुभवांतून मांडले आहेत. हे अनुभव परिपूर्ण नाहीत. अजूनही कित्येक गोष्टी अशा असतील ज्यांचा विचार होणे जरुरीचे ठरेल. प्रश्न मोठय़ा पैशाच्या गुंतवणुकीचा आहे व म्हणूच खबरदारी या दृष्टिकोनातून हा प्रपंच.

शैलेश कुडतरकर shaileshkudtarkar81@gmail.com

First Published on April 29, 2017 3:01 am

Web Title: things to know before installing solar panels on building terrace