फुलपाखरे ही सर्वानाच आवडतात. आपण लावलेल्या झाडावर जर एखादे फुलपाखरू येऊन भिरभिरले तर आपल्याला केवढा आनंद होतो! काही अशी झाडे आहेत की, जी आपण कुंडीत लावू शकतो आणि फुलपाखरांना त्यांचा उपयोग होऊ  शकतो. आजच्या लेखातून आपण फुलपाखरांना उपयोगी पडणाऱ्या काही झाडांविषयी जाणून घेणार आहोत. पण त्याआधी फुलपाखरांच्या वनस्पतींच्या गरजांविषयी थोडे सांगते म्हणजे हा विषय समजणे सोपे जाईल.

फुलपाखरांना दोन प्रकारच्या वनस्पतींची आवश्यकता असते. एक म्हणजे अंडी घालण्यासाठीची वनस्पती आणि दुसरी म्हणजे मधासाठीची वनस्पती. यापैकी जो पहिला प्रकार आहे- तो प्रत्येक प्रजातीच्या फुलपाखराचा वेगवेगळा असतो. प्रत्येक फुलपाखरू हे ठरावीक प्रजातीच्या वनस्पतीवरच अंडी घालते. या वनस्पतीची पाने खाऊन त्याच्या अळ्या वाढतात. दुसऱ्या प्रकारच्या वनस्पतींची सगळ्या फुलपाखरांना गरज असते. कोशातून बाहेर आलेली फुलपाखरे फुलांतील मध खाऊन जगतात. त्यामुळे त्यांना मध मिळू शकतील अशा फुलांची झाडे जर लावली तर त्यावर विविध प्रजातींची फुलपाखरे भिरभिरताना बघायला मिळतात.

Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

१. सदाफुली (Periwinkle) : सर्वानाच माहीत असलेले हे झुडूप. त्याच्या नावाप्रमाणे वर्षभर फुलत असते. कडक सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी हे झुडूप ठेवावे. याच्या फुलांवर काही प्रमाणात फुलपाखरे बघायला मिळू शकतात.

२. घाणेरी (Lantana) : याच्या पानांना उग्र वास असतो म्हणून बहुधा हे नाव पडले असावे. यात पांढरी, जांभळी, पिवळी, केशरी, गुलाबी अशा अनेक रंगछटा असलेली फुले बघायला मिळतात. काही प्रकार पसरून वाढणारे असतात तर काही झुडूप प्रकारातील आहेत. पण घरातील जागेचा विचार करता पसरणारी घाणेरी लावणे योग्य. वाढीचे निरीक्षण करून छाटणी करावी. यातील बरेचसे प्रकार जवळजवळ वर्षभर फुलतात. याच्या फुलांवर फुलपाखरे येतात. या झाडांना दिवसाचे किमान ४ ते ५ तास कडक सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवावे.

३. समई (क्लेरोडेंड्रम) :  हे मध्यम आकाराचे झुडूप असून कडक सूर्यप्रकाशात तसेच थोडय़ा कमी सूर्यप्रकाशातपण वाढू शकते. याच्या फुलांच्या तुऱ्यांच्या आकारामुळे याला समई नाव पडले असावे. याच्या लाल फुलांचे तुरे बरेच दिवस झाडावर चांगले राहतात. याच्या फुलात फुलपाखरांबरोबरच सनबर्डसारखे पक्षीपण बघायला मिळू शकतात. याची लागवड मोठय़ा कुंडीत करावी. याच्या मुळांमधून नवीन झाडे येतात.

फुलपाखरांना उपयोगी झाडे लावताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, आपण झाड लावले म्हणजे फुलपाखरे येतीलच असे ठामपणे सांगता येत नाही. कारण त्यांना ते झाड कळेपर्यंतपण काही कालावधी जावा लागतो. त्याचबरोबर शहरातील वातावरणाचाही परिणाम लक्षात घ्यायला हवा. जर आपल्या घरात पाळीव प्राणी असतील तर यातील झाडे लावण्याआधी या पाळीव प्राण्यांना ती चालतील की नाही याविषयी प्राणीतज्ज्ञांना विचारून घ्यावे.

फुलपाखरांना उपयोगी अशा अजून काही प्रकारांची माहिती पुढील लेखातून घेऊ या.

पूर्वार्ध

जिल्पा निजसुरे jilpa@krishivarada.in