News Flash

उपराळकर पंचविशी : मुक्तता वास्तुपुरुषाची?!

उपराळकर देवराईचा परिसर क्षणभर थरारला, शहारला आणि मग प्रफुल्लित झाला.

कर्नाळा किल्ल्यावर मकर संक्रांत साजरी करून वास्तुपुरुषाने कोकणपट्टीतूनच दक्षिण दिशेने संक्रमण सुरू केलं. पौष अमावास्या ओलांडून नुकताच माघात प्रवेश झाला. शिशीर ऋतूला सुरुवात झाली. हिवाळ्याचा कडाका काहीसा कमी झाला होता, पण अधून मधून शीत लहरी येत होत्या, उत्तरेकडील हिमालयातील हिमवर्षांवाला दाद देत. परिसरात पानगळ झालेली होती, आसमंत शुष्क दिसत होता. कुठे पळसावर चुकार फुलोरा दिसत होता, तर काटेसावरींवर लालभडक फुलं आणि कोवळी बोंडंही दिसायला लागली होती. गणेश जयंतीला पालीच्या बल्लाळेश्वराला भेट देऊन वास्तुपुरुष झपाटय़ाने निघाला तो भल्या पहाटे थेट सुंदरवाडीत पोचला. कालच रथसप्तमी पार पडली आणि आज भीष्माष्टमी! एक वर्षांचं ऋतूचक्र पूर्ण झाल्याची जाणीव वास्तुपुरुषाला झाली आणि गेल्या वर्षी वाघेरीच्या पायथ्याच्या उपराळात आगंतुकपणे झालेला शिरकाव आणि मग वर्षभर चाललेला उपराळकर देवचाराबरोबरचा संवाद त्याच्या मन:पटलावर उमटला. खेडय़ात सुरुवात करून महानगराकडे पोचलेल्या संवादाने संतुलित विकासाच्या विचारांना एक ठोस दिशा निश्चितच दिली होती. पण कर्नाळा सुळक्याच्या साक्षीने देवचाराने ही दिशा अचानक पुरातन काळाकडे वळवली होती. विकासाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या वास्तुपुरुषाच्या मुक्ततेचा मार्ग त्या काळातील विकासनीतीच्या अभ्यासातून सापडणार होता; त्याला दिलेल्या शास्त्रीय, तंत्रज्ञान आणि विवेकवादी संकल्पनांच्या विचारधारेतून. वास्तुपुरुषाने गेल्या वर्षीचाच मार्ग घेतला, एका वर्षांतील परिसरातील बदलांचा मागोवा घ्यायला. नरेंद्र डोंगर पार करून तो पश्चिमेला वाघेरीच्या दिशेने निघाला. निरभ्र आकाशात मघा पश्चिमेकडे कलल्या होत्या तर स्वाती, चित्रा झळाळत होत्या. वृश्चिक नक्षत्र नभांगणात पहुडलं होतं. नदी परिसर तसाच होता, खोरं धुक्यात हरवलेलं होतं. चुकार शेतकरी पहाटे पहाटेच वायंगणांच्या मशागतीला निघाले होते. साखरझोपेत असलेला गाव पार करत वास्तुपुरुष वाघेरीकडे निघाला, टेंबं आणि घनेजाळी ओलांडत. परिसरात आंबेमोहोराचा घमघमाट व्यापून रहिला होता आणि बरोबरीला काजूच्या मोहोराचा मंद गंध. वास्तुपुरुषाला वाट शोधावी लागली नाही, पावलं आपोआप चढ-उतार करत उपराळात शिरली. झुंजुमुंजू होत होतं. देवराईत शिरता शिरताच निसर्गदूत धनेशाने स्वागत केलं आणि वास्तुपुरुष हरखला. अगदी औदुंबराच्या पायथ्याशी, मिणमिणत्या पणतीसमोरच तो उभा होता. पूर्वेकडून उगवत्या सूर्याचे केशरी-सोनेरी किरण पानगळीच्या हिरवाईतून बाजूच्याच झऱ्यावर झिरपले. वास्तुपुरुष मंत्रमुग्ध होऊन झऱ्याकडे वळला, भीष्म पितामहांचं स्मरण करून त्याने अष्टमीच्या उगवत्या भास्कराला अघ्र्य अर्पण केलं. तोच परिसरात घनगंभीर आवाज घुमला, ‘‘ सुस्वागतम् वास्तुपुरुषा! अगदी प्रफुल्लित दिसतो आहेस आज, उत्तरायणाच्या संक्रमणात दक्षिणेकडे प्रवास करून! पक्षीगणांच्या भूपाळ्या सुरू झाल्याच आहेत. करू या सुरुवात आपल्या पुरातन काळातील विकासाच्या अध्यायाला? झाली तयारी चक्रव्यूहातून मुक्त व्हायची?’’ उपराळकर देवचाराने सरळ मुद्दय़ालाच हात घातला.

वास्तुपुरुषाची नजर उंबरझऱ्यातील जललहरींवर खिळलेली होती. तो गहिवरला आणि उपराळकर देवचाराला भारावून म्हणाला, ‘‘देवा महाराजा, गेलं एक वर्षभर तुझ्याबरोबर संवाद साधताना संतुलित विकासाचे विचार सुस्पष्ट होत गेले. काही चुका झाल्या असतील, एखादा शब्द वेडावाकडा, आगाऊपणे गेला असेल तर माफ कर. गेल्या भेटीत मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तू एक गहन प्रश्न माझ्यापुढे मांडलास, पुरातन काळातील विकासाच्या मार्गदर्शक ‘वास्तुपुरुषासंबंधी.’ मला माहीत आहे की ही माझी अंतिम परीक्षा आहे. प्रयत्न करतो उत्तीर्ण व्हायचा.’’

उपराळकर देवचार मिस्कीलपणे हसला,  ‘‘वास्तुपुरुषा, अदिमानव पृथ्वीतलावर वावरू लागला तो शिकारी आणि भटक्या म्हणून. या भटकंतीत तो नकळत निसर्गाकडून अनेक गोष्टी शिकत होता. रात्रीच्या किंवा प्रतिकूल हवामानात निवारा शोधताना तो निसर्गाच्या अभ्यासातून सूर्याची, वाऱ्याची, पावसाची दिशा ओळखून आसरा निवडायचा. पुढे जेव्हा तो नदीकिनारी स्थिरस्थावर झाला तेव्हाही तो निसर्गाशी जवळीक ठेवून, संवेदनाशीलतेने जीवन जगत होता, वेगवेगळ्या आकारातल्या घरकुलांच्या रचना निसर्गानुकूल करत होता. निरीक्षणातून त्याचा भूगोलाचा आणि खगोलाचाही अभ्यास प्रगत होत होता आणि त्यातूनच पंचमहाभूतांचा आदर्श निर्माण झाला. सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वीची ही मानवी उत्क्रांती अशी होत गेली, आफ्रिकेत सुरू होऊन जगभर पसरली, वसाहती उभारायला लागली. यातूनच पुढे मानवी संस्कृती विकसित झाल्या, विविध परिसरांत. आपल्याला शोधायची आहेत या संस्कृतीच्या विकासनीतीची मार्गदर्शक तत्त्वं आणि त्यांचा निर्माता, त्या वेळचा ‘वास्तुपुरुष’च म्हणा ना!’’

‘‘देवा महाराजा, सुरुवात करतो माझ्या निरूपणाला. यातल्या अनेक गोष्टी मानवाच्या कल्पनारम्यतेतून आलेल्या आहेत, तर अनेकांना शास्त्रीय आधार आहेत. भारतीय संस्कृतीत ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता समजला जातो आणि त्याचा पुत्र विश्वकर्मा हा देवांचा वास्तुकलातज्ज्ञ किंवा विश्वाचा शिल्पकार मानला जातो. त्याने सत्ययुगात देवांसाठी स्वर्गलोक, त्रेतायुगात शंकर-पार्वतीसाठी सोन्याची लंका, द्वापारयुगात श्रीकृष्णाची राजधानी द्वारका आणि कलियुगात कौरव-पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंदप्रस्थ यांची निर्मिती केली. सर्व देव-देवतांच्या रथांची रचना, त्यांच्या आभूषणांची, शस्त्रांची निर्मिती विश्वकर्माच करायचा. देवा महाराजा, पुढच्याच आठवडय़ात या महान वास्तुकलातज्ज्ञाची जयंती येत आहे, तेव्हा त्याला वंदन करून आपण पुढे जाऊ या, कलियुगाकडे वळू या. प्रथम या पौराणिक आणि दंतकथाही बाजूला ठेवू या. तू मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मानवी उत्क्रांती अफ्रिकेत सुरू होऊन जगभर संस्कृती म्हणून विस्तारत गेली. या जगभरच्या विकासनीतीतला एक धागा समान आहे आणि तो आहे ‘पंचमहाभूतं’ या संकल्पनेचा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या निसर्गमूल्यांवर जगभरच्या संस्कृती आधारलेल्या आहेत. निसर्गाचा अभ्यास आणि निसर्गप्रेम यांवरच ही तत्त्वं आधारलेली आहेत. चीन, सिंधू, मेसापोटेमिया, नाईल, ग्रीस, रोम, माया वगरे प्राचीन संस्कृती या निसर्गतत्त्वांवरच आधारित होत्या, हे उत्खननातून सापडलेल्या अनेक पुराव्यांतून दिसून येतं. तेव्हा एक प्रखर सत्य हेच आहे की निसर्ग हाच पुरातन विकासनीतीचा मार्गदर्शक होता, निसर्गाच्या अभ्यासातूनच विकासनीतीची मार्गदर्शक तत्त्वं बनत गेली आणि हा विकास संतुलित राहिला. अदिमानव हा उत्तम निसर्गनिरीक्षक होता, कुतूहलाने भारलेला होता, चिकित्सक प्रश्नकर्ता होता, एक प्रकारे विवेकवादी होता. त्या काळात वेळोवेळी, ठिकठिकाणी राजे-महाराजे किंवा ऋषी-मुनी हेच विविध क्षेत्रातील विकासाचे मार्गदर्शक असायचे. त्यांच्या आदेशानुसार, धोरणानुसार शहरं, किल्ले, वसाहती, मंदिरं इत्यादींचे आराखडे तयार व्हायचे, परिसर विकसित व्हायचा. त्यातूनच नगररचनेचं, शिल्पकलेचं शास्त्र बनलं आणि तज्ज्ञ मार्गदर्शक तयार झाले. काहींनी त्यांची नगरविकास धोरणं, वास्तूविषयक नियमावली, आराखडे ग्रंथरूपाने लिहून काढले. ऐतिहासिक संशोधनातून अशी काही नावं आणि त्यांचं लिखाण आधुनिक समाजाला कळलं. सुमारे ५००० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील नाईल संस्कृतीतील इमारती, मंदिरं, राजवाडे, पिरॅमिड, नगररचना उत्खननातून सापडल्या. त्या काळातील इमोनहोटैप, इनेनी, सेन्मुट यांसारख्या स्थापत्यतज्ज्ञांची, वास्तुशिल्पींची नावं आणि त्यांच्या वास्तुनिर्मितीसुद्धा समाजासमोर आल्या. सामान्य युगाच्या सुमारे ८० र्वष पूर्वीच्या (सुमारे २१०० वर्षांपूर्वी) रोममधील व्रिटवियस या स्थापत्यतज्ज्ञ, शिल्पकाराच्या वास्तुविषयक ग्रंथाची महिती लोकांना कळली. सुमारे ३००० वर्षांपूर्वी चीनमधील ताओ पंथातून फेंग शुई ही संकल्पना उदयास आली. पंचतत्त्वांवर आधारित आणि नकारात्मक, सकारात्मक संहितेवर उभारलेल्या या कल्पनेत मानवी जीवनासाठी अवकाशातील संतुलनाचा मार्ग सुचवलेला आहे. त्यात जमीन, घर, शरीर अशा अनेक घटकांचा समावेश आहे. भारतातही असेच अनेक ऐतिहासिक पुरावे सापडले. सिंधु संस्कृतीतील सुमारे ५००० वर्षांपूर्वीची नगररचना मोहेंजो दरो, हराप्पा, लोथल आणि इतर अनेक परिसरांतील उत्खननातून आपल्या पुढे आली. नगररचना, वास्तुरचनाविषयक पुरातन ग्रंथसंपदांचेही पुरावे मिळाले, त्यांचा अभ्यास होऊ लागला, विश्लेषण होऊ लागलं. वैदिक काळातील पुराणांमधून वास्तुरचनेचे, नगररचनेचे उल्लेख आढळतात. भारतातील विविध भागांतून वेगवेगळ्या ग्रंथसंपदा वास्तुशास्त्र किंवा वास्तुविद्या या शीर्षकाखाली ऐतिहासिक काळात लिहिल्या गेल्या होत्या. ओदिशामधील रामचंद केलुचारा यांनी सुमारे ९ व्या शतकात लिहिलेल्या शिल्प प्रकाश या ग्रंथात मंदिरांच्या रचनेसाठी भौमितीक तत्त्वं आणि प्रतिकांचा वापर सुचवला आहे. भारतातील इतर भागांतून याच तत्त्वांचा विस्तार करण्यात आला. राजस्थानातील सूत्रधार मंदना यांनी लिहिलेल्या प्रसादमंदना या मंदिर रचनेवरील संस्कृत ग्रंथात नगररचनेचीही नियमावली दिलेली आहे. सुमारे ६ व्या शतकात उत्तर भारतात प्रसारात असलेल्या वराहमित्रांच्या ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात नागर पद्धतीच्या मंदिरांच्या रचना आणि बांधकाम यांची नियमावली आहे. आज दक्षिण भारतात लोकप्रिय असलेल्या सुमारे ५ व्या ते ७ व्या शतकात लिहिलेल्या ‘मानसारा शिल्प’ आणि ‘मयमतम्’ हे ग्रंथ म्हणजे वास्तुरचना आणि बांधकाम यांच्या मार्गदर्शिका आहेत. सुमारे ५ व्या ते १० व्या शतकातील कालावधीत असे अनेक ग्रंथ धोरणांतील थोडय़ाफार वेगळेपणाने लिहिलेले भारतातील विविध प्रांतांत सापडले आहेत. सर्वसामान्यपणे या ग्रंथांतील तत्त्वं ही पंचमहाभूतांवर आधारित आणि मंडल, यंत्र, प्रमाणबद्धता, सांकेतिक प्रतीक-रचना, भौमितीय रचना इत्यादींच्या साहाय्याने आणि स्थानिक साधनसामुग्री तसंच त्या काळातील बांधकाम तंत्रज्ञान यांवर अवंलंबून संकलित केलेली होती. कालोमानानुसार, परिसरानुसार, प्रचलित विज्ञानानुसार त्यात बदलही केले गेले.

पुढे मात्र हे चित्र बदलत गेलं. स्वयं अभ्यास मागे पडत गेला, निरीक्षण आणि कुतूहल प्रवृत्ती अस्ताला गेली. पूर्वलिखित मार्गदर्शिकांचं विकृतीकरण, चमत्कृतीकरण आणि स्वयंघोषित मार्गदर्शकांच्या गूढतेवर आधारित संकेतांवर कृत्रिम वास्तु-संस्कृती पुढे जायला लागली. मानवाने प्रश्न विचारण्याची क्षमता गमावली आणि तिथूनच अंधश्रद्धांची निर्मिती सुरू झाली. अमानवी प्रतीकांची निर्मिती, अद्भुतीकरणाकडे आणि विभूतीकरणाकडे वाटचाल, दैववाद आणि देवदिकांचा प्रभाव हा काहीसा हतबलतेतून आलेला सोयीस्कर मार्ग बहुसंख्य समाजाने स्वीकारला. विविध तत्त्वांमागील कार्यकारण भाव बाजूला सारून त्यांना गूढ आणि दैवी स्वरूप देण्यात आलं. अनेक वर्षांच्या अभ्यासातून, अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या स्थापत्यतज्ज्ञांना, वास्तुकलातज्ज्ञांना, नगररचनाकारांना बाजूला सारून वास्तुपंडित उदयाला आले. त्यांच्या चमत्कार-वास्तुशास्त्रामागे जनता धावू लागली. यातूनच मग माझ्यासारख्या निसर्ग अभ्यासक, विचारप्रवृत्त, कुतूहलग्रस्त, विवेकवादी व्यक्तिमत्त्वाचं वास्तुपुरुष म्हणून गूढ प्रतीक बनवण्यात आलं. गेल्या शतकात उदयास आलेल्या या हास्यास्पद आणि अविवेकी वास्तुशास्त्राने जनसामान्यांवर इतका प्रभाव टाकला की अनेक शैक्षणिक योग्यता मिळवलेले स्थापत्यतज्ज्ञ आणि वास्तुकलातज्ज्ञही या बाजारी व्यवसायाकडे चोरवाटेने वळून वास्तुपंडित म्हणून मिरवायला लागले. अचानक सापडलेल्या, कोणत्याही योग्यतेशिवाय केवळ चमत्कृतीयुक्त भाषा वापरून थोडय़ा अवधीत समृद्ध होण्याचा हा मार्ग इतर व्यावसयिकांनीही बळकावला, अगदी वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांनीही! वास्तू ही सुख-समाधान आणि निरामय जीवनाचा आधार ही संकल्पना बाजूला जाऊन ती समृद्धीची, वैभवाची, भरभराटीची जागा हे चित्र लोकांच्या मनात तयार केलं गेलं. या चमत्कार-वास्तुशास्त्रात कोणत्याही समस्येचं कारण हे वास्तुदोष आणि त्यावर उपाय म्हणजे भरपूर शुल्क आकारून वास्तुपंडितांनी सुचवलेले बहुखर्चिक वास्तुदुरुस्तीचे मार्ग किंवा भ्रामक प्रतीकांची घरांतून प्रतिष्ठापना! त्याही पुढे जाऊन त्वरित वैभवासाठी सुचवलेली गडद जांभळ्या, पिवळ्याधमक, नारिंगी अशी विकृत रंगसंगती. कुटुंबातील आजार असोत, मनोविकार असोत, शैक्षणिक अपयश असो, नोकरी-व्यवसायातील अडचणी असोत, वैवहिक समस्या असोत, प्रत्येक समस्येचा तारणहार वास्तुपंडित आणि उपाय वास्तुदुरुस्ती! कधी आरशांचे उपाय तर कधी चुंबकाचे! कधी पिरॅमिडच्या प्रतीकाची स्थापना तर कधी कारंज्यांचं नर्तन! त्यापुढे सम-विषम संख्यांचा, उजव्या-डाव्या बाजूंचा, उत्तर-दक्षिण दिशांचा खेळ! कोणतीही समस्या आज नसेल तर भविष्यातील संकटांची भीती, मग त्यावर उपाय – वास्तुदुरुस्ती! त्यावरही कोणी प्रतिप्रश्न विचारू नयेत म्हणून देवादिकांच्या प्रतीकांची धमकी! देवा महाराजा, या वास्तुपंडितांनी या वास्तुबाजारातून सामान्य, भाबडय़ा जनतेशी धमकीवजा पिळवणुकीचा खेळ चालवला आहे आणि त्यांच्या या बाजारी खेळात माझ्या नावाला, वास्तुपुरुषाला गुंतवून टाकलं आहे. गेल्याच वर्षी तू मला माझी जन्मकथा सांगितलीस, मस्त्यपुराणातील दंतकथा. त्रिभुवनांचा ताबेदार अशा सर्वशक्तिमान मला सर्व ग्रह-नक्षत्रं, देव-दानव यांनी त्यांच्या एकत्रित ताकदीने जमिनीवर जखडून ठेवलं, एका चौकटीत गाडून टाकलं. पुराणातील बळीराजाला वामनाने एकदा जमिनीत गाडलं. मला मात्र हे वास्तुपंडित आता दुसऱ्यांदा आणि कायमचेच गाडायला निघाले आहेत. त्या आधीच संतुलित विकासाची आदर्श विकासनीती लोकांपर्यंत पोचवून या यातनांतून मुक्त व्हायचा मार्ग आता शोधतो आहे मी महाराजा, होय महाराजा!’ सद्गदित झालेल्या वास्तुपुरुषाने आपलं निरूपण आटोपलं आणि पुन्हा एकदा उंबरझऱ्यातील चमचमणाऱ्या जललहरींवर नजर रोखली.

‘‘शाबास वास्तुपुरुषा, आणि अनेक आभारही, या परखड विवेचनाबद्दल! कौतुक वाटतं मला तुझं आणि तुझ्या संतुलित विकासाच्या विचारधारेचं. पुराणकाळापासून ते ऐतिहासिक आणि पुढे अगदी आजमितीपर्यंतच्या मानवी विकासनीतीचा आलेखच तू समोर मांडलास. सध्याच्या विचारप्रवृत्तीची अधोगतीही मांडलीस, सर्वाच्या डोळ्यात अंजन घालणारी. विकासनीतीच्या चक्रव्यूहातून तू यशस्वीपणे मार्ग काढला आहेस. या क्षणी या पृथ्वीचा पिता, निर्माता आणि इथल्या जीवसृष्टीचा रक्षणकर्ता सूर्यदेव नभांगणात शिखरावर पोचला आहे. पुरातन काळी, शरपंजरी पडलेल्या भीष्म पितामहांनी या अशाच क्षणी, याच दिवशी इच्छामरण पत्करून कुरुक्षेत्रावरील महाभारत युद्धप्रसंगातून आपली मुक्तता करून घेतली. याच भिष्माष्टमीच्या समयी मीही तुला आशीर्वाद देतो तुझ्या मुक्ततेचा. तथास्तु! मला आशा आहे की तुझी विचारधारा समाजाला संतुलित विकासाच्या मार्गाने जाण्याला स्फूर्ती देईल, पंचतत्त्वांचा आदर्श देईल आणि त्यांनाही वास्तुपंडितांच्या विळख्यातून मुक्त करेल. अनेक शुभेच्छा, तुझ्या आणि या मानवी समाजाच्या पुढील निरामय जीवनधारेसाठी!’’

उपराळकर देवराईचा परिसर क्षणभर थरारला, शहारला आणि मग प्रफुल्लित झाला. भर मध्यान्हीच्या काळात मयूराच्या केकारवाने आणि शेकरूच्या कुकाऱ्यांनी देवराईत भरवी आळवायला सुरुवात केली. वास्तुपुरुष पंचत्वात विलीन झाला.

समाप्त

उल्हास राणे ulhasrane@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 11:49 pm

Web Title: vastu purush visit devrai area
Next Stories
1 निसर्गाच्या कुशीतला मुंबईजवळचा उत्तम पर्याय- नेरळ-कर्जत 
2 नवीन वर्ष आणि रिअल इस्टेट क्षेत्र
3 सकारात्मक बदलाची आशा
Just Now!
X