डॉ. मनोज अणावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या महिला या त्यांच्या करिअरबद्दल अधिक सजग झाल्या आहेत. घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. पूर्वी महिलांचा दिवसाचा बराचसा काळ स्वयंपाकघरातच जायचा. लोणची, मसाले, पापड अशा अनेक जिनसा निगुतीनं घरच्या घरीच करून त्या बरण्यांमध्ये भरून त्यावर कापडी आवरणं गच्च झाकून फडताळांमध्ये त्या वपर्यंत रचून ठेवायच्या. मग गरज लागेल तेव्हा घरातल्या कोणा पुरुषाला किंवा मुलांना हाक मारून उंच स्टुलावर चढून बरण्या काढून घ्यायच्या. त्या काळी या पद्धतीने काम करणं शक्य होतं. पण आता सकाळच्या दीडदोन तासांमध्ये जेवणाचा सगळा व्याप उरकून घराबाहेर पडायचं असतं. मदतीसाठी कोणाला हाका मारायला वेळही नसतो आणि बऱ्याचदा घरातली इतर माणसंही या वेळी घाईतच असतात. अगदी मुलंसुद्धा शाळा-कॉलेजला नाहीतर क्लासला गेलेली असतात. तेव्हा घाईच्या वेळेत सगळं हाताशी पटकन सापडणं गरजेचं असतं. तसंच सध्या शहरांमध्ये एकमेकांना खेटून इमारती उभ्या असतात. काही ठिकाणी स्वयंपाकघराच्या खिडकीलगतच रस्त्यावर महापालिकेनं लावलेल्या झाडांमधून किंवा गृहनिर्माण संकुलांमध्ये बिल्डरांनी लावलेल्या झाडांच्या माध्यमातून शक्य तितका निसर्ग निर्माण करायचा जो प्रयत्न केलेला असतो, त्यामुळे स्वयंपाकघरात दिवसासुद्धा काळोख जाणवतो. अशा काळोखी खोल्यांमध्ये काम करताना वस्तू आणि जिनसा शोधणं जिकिरीचं होतं. जरी या गोष्टींच्या जागा ठरलेल्या असल्यामुळे सरावानं त्या ठिकाणी हात जात असला, तरी मीठ, मसाले, आणि इतर जिनसा योग्य प्रमाणात जेवणात पडण्यासाठी त्या काढून घेत असताना, भाज्या निवडून त्या चिरताना तिथे पुरेसा प्रकाश असायला हवा. खोलीत प्रकाश योग्य प्रमाणात येत असला, तरी कपाटांची आणि त्यांच्या दरवाजांची दिशा ही जर प्रकाशाला सामोरी जाणारी नसेल, तर कित्येकदा खोलीत प्रकाश चांगला असूनही किचन कॅबिनेट्समध्ये मात्र काळोख असतो. तसंच स्वयंपाकघरात एकूणच दिवसा काय किंवा रात्री काय पुरेसा प्रकाश असेल, तरच स्वयंपाक करताना प्रसन्न वाटेल. तसंच स्वयंपाकघरात जे फर्निचर आहे, त्याचं सौंदर्यही उठून दिसलं पाहिजे. त्यामुळे स्वयंपाकघरातल्या प्रकाशाचं व्यवस्थित नियोजन करणं आवश्यक आहे.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on kitchen lighting abn
First published on: 06-03-2021 at 00:30 IST