आम्ही मूळचे कोकणातले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावच्या पुनाळवाडीतील सावंत (पटेल). आमच्या आजोबांच्या पणजोबांनी- बाबू फट सावंत भिरवंडेकर यांनी इंग्रज राजवटीत काही विशेष कामगिरी केल्यामुळे तत्कालीन इंग्रज सर हेन्री बार्टल एडवर्ड, कमांडर यांच्याकडून व्हिक्टोरिया राणीच्या राजमुद्रा व शिक्का सहीने सन १८६४ला सनद देऊन, त्यांना याच जिल्ह्य़ातील मालवण तालुक्यात असलेल्या मसुरे गावात काही एकर जमीन इनाम म्हणून दिली होती. त्या वेळेपासून आमच्या घराण्याचे वास्तव्य मूळ भिरवंडे गावातून मसुरे या गावी हलविण्यात आले आणि आम्हाला‘भिरवंडेकर पटेल इनामदार’ अशी विशेष ओळख प्राप्त झाली. इंग्रजांनी दिलेली ती सनद आजही आमच्या दप्तरी उपलब्ध आहे. आज आमची दहावी पिढी या गावात गुण्यागोिवदाने नांदते आहे.
 ‘भिरवंडेकर सावंत पटेलांचा वाडा’ आमचे मोठे आजोबा महादेवराव नारायणराव सावंत भिरवंडेकर पटेल इनामदार यांनी १९११-१२ च्या दरम्यान बांधला. विशेष म्हणजे ६० फूट बाय ५० फूट जोत्याचे (प्लिंथचे) क्षेत्रफळ असलेला वाडा सर्व सामानाची पूर्वतयारी करून फक्त वीस दिवसांत बांधून पूर्ण केला, असे आमचे वडील सांगायचे.
आमचे आजोबा व त्यांचे दोन बंधू मिळून एकूण तीन बंधूंपकी मोठे महादेवराव (दादासाहेब) मधले गणपतराव (भाऊसाहेब) व धाकटे शंकरराव (बापूसाहेब) मोठे आजोबा मुंबई गोदीत शेड सुपरिंटेंडंट म्हणून कार्यरत होते. मधले पोस्टात तर धाकटे व्यवसायानिमित्त बाहेरगावी असायचे. आमचा वाडा बांधल्यानंतर आमच्या मधल्या आजोबांनी आपली पोस्ट खात्यातील नोकरी सोडून गावी वास्तव्यास आले.
आमचा वाडा म्हणजे तत्कालीन वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे.  गेल्या १०० वर्षांपासून तो दिमाखात उभा आहे. आमचे मोठे आजोबा महादेवराव (दादासाहेब) यांची आठवण म्हणून ‘महादेव निवास’ असे  त्याचे नामाधिकरण करण्यात आले. आमचा वाडा व उत्तरेकडील डोंगर याच्या दरम्यान ६० फूट लांब व २५ फूट रुंदीचे एक अंगण (नव्हे पटांगणच) आहे. अंगण हे डोंगराला लागून असल्यामुळे वाडय़ाच्या पुढील बाजूस डोंगर व त्यावरील गर्द झाडीने नटलेले जंगल म्हणजे निसर्गाच्या अप्रतिम ठेव्याचे नयनमनोहर दृश्य वाडय़ाच्या ओसरीवरून अनुभवताना डोळयांचे पारणे फिटते. वडील मंडळी सांगत असत की या समोरील जंगलातील श्वापदांच्या फिरण्याचा व त्यांच्या आवाजाचा अनुभव त्या काळात त्यांनी घेतला होता. आता जंगलतोड झाल्यामुळे जंगली श्वापदे दुर्मिळ झाली. तरी आम्ही अजूनही रात्रौ अतिसर्तक असतो. अंगणाच्या पूर्व दिशेस मोठे तुळशी वृंदावन आहे. वाडय़ाच्या पटांगणातून सरळ पायऱ्या चढून वाडय़ात प्रवेश करतो तो अगदी वाडय़ाच्या ओटय़ावरच. याच ओटय़ावर त्या काळात आणि आजही पुरुष मंडळींची बठकीची व्यवस्था आहे. ओटय़ावर आजोबांच्या काळातील एक जुने मोठे लाकडी बठकीचे बाकडे आहे. ओटय़ावरून मुख्य दरवाजातून वाडय़ातील माजघरात प्रवेश करता येतो. या मुख्य दरवाजाची चौकट जवळजवळ एक फूट रूंदीच्या शिसवी लाकडाची असून त्यावरील कोरलेली वेल व दोन सिंह म्हणजेच सुतारकामाचा एक प्रेक्षणीय नजर खिळवून ठेवणारा असा कलाकुसरीचा नमुना आहे. मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर आपण प्रशस्त अशा माजघरात येतो. त्यास आम्ही वळय असे संबोधितो. या वळईच्या उजव्या व डाव्या बाजूस दोन प्रशस्त शयनगृहे आहेत. उजव्या बाजूच्या शयनगृहास लागून देवीचा गाभारा आहे. आमची कुलदैवत भवानीमाता आहे. या गाभाऱ्यात  संगमरवरी पाषाणाची बठक आहे. आम्ही तिला देवीची गादी म्हणून संबोधितो या गादीवर २०० वर्षांपूर्वीच्या देवीच्या दोन सोन्याच्या पतवा (टाक) पूजेसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यासमोर पूर्वजांची तलवार तसेच वास्तूमध्ये केलेल्या होमाच्या पूजेचा असोली नारळ व चांदीचा वाघ व नाग यांच्या मूर्त्यां पूजेसाठी ठेवल्या आहेत. येथे दर दोन वर्षांतून एकदा चार दिवस धार्मिक कार्य व भवानीमातेचा गोंधळ घातला जातो. या उत्सवात ४०० ते ५०० भाविकांची उपस्थिती असते. याच वळईच्या पूर्व दिशेस एक लाकडी मोठे टेबल असून त्यावर भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीच्या उत्सवात श्रीगणेशाची मूर्ती बसविण्यात येते. या वळईच्या दक्षिणेच्या डाव्या बाजूस एक मोठे स्वयंपाकघर असून त्यात फक्त शाकाहारी जेवण शिजविले जातो. या स्वयंपाकघरास लागूनच एक धान्य व स्वयंपाकाचे भांडे ठेवण्यासाठी अगदी वेगळी कडीकुलपाची खोली आहे.  माजघरातून मागील दारी जाताना उजव्या बाजूस घराच्या जोत्याच्या म्हणजेच चौकाच्या बाहेर घरास लागूनच एक खोली आहे. ही खोली प्रामुख्याने बाळंतिणीसाठी व मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांच्या ऊठबठकीसाठी म्हणून बांधण्यात आली होती. या खोलीत वेगळी चूल असून त्या वेळी या स्त्रियांच्या आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी तिचा प्रामुख्याने उपयोग करण्यात येत असे. या खोलीच्याच पश्चिमेस घराच्या चौकाच्या एक पायरी खाली ३५ फूट बाय १० फूट आकाराची पडवी आहे. याच पडवीत दक्षिण दिशेस फक्त मांसाहार शिजवण्यासाठी एक चूल आहे. घरातील सर्व मांसाहारी जेवण आजही या पडवीतील चुलीवर शिवजले जाते.
घराच्या मागील दारी पायऱ्यांनी खाली उतरता येते. तिथेच आमची जुनी विहीर आहे. आमच्या घराचे मागील दार हे दक्षिणेस असलेल्या हमरस्त्याच्या दिशेस असल्यामुळे त्याला आम्ही अलीकडेच आकर्षक कठडा बांधून सुशोभित केले आहे. घराच्या माजघरातून माडीवर जाण्यासाठी एक प्रशस्त जिना आहे. जिना चढून माडीवर गेल्यावर तिथे दोन प्रशस्त हॉल आहेत. माजघरावरील हॉलमधून ओटय़ावरील हॉलमध्ये प्रवेश करता येतो. पूर्वी ओटय़ाच्या हॉलला लाकडी ग्रिल्स होत्या. अलीकडे आम्ही लोखंडी ग्रिल्स लावल्यामुळे घरासमोर असलेल्या डोंगरावरील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येतो. याच माडीवरील पुढील हॉलमध्ये आजोबांच्या वेळचा शिसवी लाकडाचा एक अतिसुंदर सुतारकामाचा नमुना असलेला प्रशस्त असा पलंग आहे, म्हणजे डबल बेडच म्हणाना. त्यावर विसावले असता आमच्या या वाडय़ाचा वास्तुपुरुषाने जणू आपल्या अंगावरून मायेचा हात फिरविल्याचा अनुभव होतो. त्याचमुळे आम्हा भावंडांना आज जरी आम्ही नोकरी-धंद्याच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी वर्षांतून काही दिवस येथे आल्याशिवाय मन:स्वास्थ्य मिळत नाही. माडीवरील आतील भागात आजोबांनी धान्य साठविण्यासाठी घेतलेली भली मोठी म्हणजेच साधारणत: दोन फूट व्यासाची, साडेचार फूट उंचीची तांब्याची िपपे असून त्याच्याच बाजूस आजोबांचे एक लाकडी फोल्डिंग टाइप लिहायचे बठे टेबल आहे.
कालमानानुसार आमचा हा वाडा जीर्ण होत होता, तसेच कालानुरूप त्यात काही आधुनिक सुविधा निर्माण करणे जरुरीचे वाटले म्हणून २००७ मध्ये आम्ही आमच्या या वडिलोपार्जति दिमाखदार वाडय़ाची मूळ रचना व ढाचा न बदलता दुरुस्तीचे सर्वात जिकिरीचे व गुंतागुंतीचे काम हाती घेतले. ते काम करण्यास ५ ते ६ महिन्यांचा अवधी लागला.
आमचे तीनही आजोबा हे फार भाविक व समाजसेवी वृत्तीचे होते. आमच्या या वाडय़ाचे बांधकाम झाल्यावर काही वर्षांत आमच्या मोठय़ा आजोबांना म्हणजे माहादेवराव आजोबांना मुंबईतील गोदीत श्रीपार्वतीमातेच्या मूर्तीचा लाभ झाला. वरिष्ठांच्या परवानगीने त्यांनी ती मूर्ती गावी आणली. गावी आणल्यावर गावातील जाणत्या व्यक्तींच्या सल्ल्याने स्वखर्चाने एक दिमाखदार मंदिर आमच्या या वाडय़ापासून हाकेच्या अंतरावर बांधून २६ फेब्रुवारी १९३४ रोजी श्रीपार्वतीमातेची त्या मंदिरात प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून आम्ही सातत्याने फाल्गुन शुद्ध द्वादशीस या मंदिरात देवीची शोडषोपचारे पूजाअर्चा करतो. आमचे मसुरे गाव व त्याच्या पंचक्रोशीत हे मंदिर प्रसिद्ध आहे. मसुऱ्यात जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत होईपर्यत ही शाळा याच मंदिराच्या सभामंडपात भरत होती. आणि त्यांच्या सामाजिक सेवेचे उदाहरण म्हणजे याच सुमारास आमचे मधले आजोबा गणपतराव (भाऊसाहेब) यांनी आमच्या वाडय़ाच्या मागील बाजूस म्हणजे दक्षिणेस रस्त्याच्या पलीकडे रस्त्यास लागूनच एक छोटेखानी एकमजली सुंदरसे घर १९३० मध्ये बांधले.  या घरासमोरच येणारे जाणारे वाटसरू, बलगाडीवान व बल यांना क्षणभर विश्रांती घेता यावी त्याचप्रमाणे शिदोरी खाल्ल्यावर त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून १९३१ साली एक पाणपोई शंकर बाबा सावंत यांच्या स्मरणार्थ बांधली. आणि त्या ठिकाणी सतत पाण्याची उपलब्धता राहावी म्हणून विहिरीवर रहाट बांधून पाइपाने पाणी पाणपोईत आणून तिथे बलांसाठी व नळाने वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची सोय केली.  
आमचे हे पाणपोईवरील टुमदार घर अजूनही रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याचे लक्ष निश्चितच वेधून घेते. या घराचे नामकरण आमच्या आजोबांच्या नावाने ‘गणपत निवास’ असे केले आहे.  
उदय  सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhirvandekar sawant patel inamdars wada
First published on: 29-06-2013 at 01:03 IST