‘।। विश्वभरे बोलविले।।’ या वसंत नरहर फेणे लिखित कादंबरीतील विश्वंभर भटाच्या घराविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेशवेकालीन राधाकृष्ण मंदिर; त्याचं विशाल मैदानासारखं पसरलेलं प्राकार. गाभाऱ्यात राधाकृष्णाची मूर्ती. निर्माल्य वेळोवेळी काढून, ताज्या अन् टवटवीत फुलांनी सजवलेला स्वच्छ प्रसन्न गाभारा. तीर्थाची चकचकीत झारी, तबक, दोन बाजूला दोन उंच झळाळत्या समया, धूप-उदबत्त्यांनी वातावरण मंगल. गाभाऱ्याच्या दाराला पितळी गज. आरती झाल्यावर त्या दाराला जुनं-पुराणं, पण भक्कम कुलूप. पुढे एक दानपेटी. गाभाऱ्याभोवती तिन्ही बाजूंनी पूर्ण उंचीच्या भिंती! गाभाऱ्याची मागची भिंत आणि बाहेरची भिंत म्हणजे प्रदक्षिणेच्या मार्गात वरती एक पोटमाळा बांधलाय. आणि त्यात मंदिराचं कारणपरत्वे लागणारं सामान ठेवलं आहे. बाकीच्या प्रशस्त सभागृहाच्या भिंती अध्र्याच उंचीच्या, त्यामुळे अर्थातच प्रवेशद्वार नाही. त्या जागी दोन मोठे उंच गोल खांब. त्यांना एका कमानीनं जोडलं होतं आणि ‘श्री राधाकृष्ण मंदिर संस्थान, तोरणे, तालुका चांदवड, जि. नाशिक’ अशी सगळा ठाव-ठिकाणा देणारी लालचुटूक कोरीव अक्षरं कमानीवर रेखली होती. मंदिराच्या भिंतींना बाहेरच्या बाजूने कट्टा होता. दर्शन घेऊन झालं की भाविक थोडा वेळ तिथे टेकत. मंदिराच्या मागेच एक डोह होता. नंतर गायरान लागायचं. त्यानंतर माळ आणि मग गाव लागायचं. गावापासून दूर असलेल्या या मंदिराच्या एका बाजूला होतं विश्वंभर भटाचं टुमदार घर. वंशपरंपरागत पेशव्यांपासून चालत आलेली वृत्ती होती. आवारात आपल्या पानांचा पिसारा मोरासारखा झुलवणारे मोठमोठे वृक्ष होते. तर घराच्या अंगणात देवपूजेला पुरून उरतील अशी फुलझाडं. एका बाजूला मुद्दाम राखलेला दुर्वाचा हिरवागार तुकडा. आणि अशा पाश्र्वभूमीवर दाराच्या चौकटीत उभी राहिलेली देखणी अंबा-विश्वंभर भटजींची बायको. कोंदणातल्या हिऱ्यासारखी चमचमत होती. ते लांबवर गावात पूजेला जाणार त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तिने विश्वंभर भटाला भिजवलेला पंचाचा पिळा दिला. आणि या दृष्याकडे मंदिराच्या कट्टय़ावरून अनिमिष नेत्रांनी पाहात होता विष्णू- ज्याला गाव लफंग्या म्हणून ओळखत होतं. घराच्या दाराच्या चौकटीतून अंबूनेही विष्णूला पाहिले. अलीकडे हा सकाळ-संध्याकाळ आरतीला का येतोय? कसली अडचण असेल त्याला? आपण त्याला काही मदत करू शकतो का? त्याने पाणी मागितलं. तिने गूळपाणी दिलं. त्याची विचारपूस केली. त्याला दिलासा दिला. हळूहळू ओसरीची ही हद्द ओलांडली गेली आणि माजघरात पाऊल पडलं. आणि मग जे माजघर विश्वंभराचे प्रेमाचे बोल ऐकत होतं त्याच माजघराने विष्णू आणि अंबेचा उधाणलेला प्रणय पाहिला. रितीबाह्य़ परंपरेला सोडून. मात्र विष्णूच्या मनात उद्भवलेल्या या भावना प्रमाथी असल्या तरी खऱ्या होत्या.
एकदा अकस्मात आलेल्या विश्वंभराने परकोटावरून नजर टाकली तर माजघराच्या खिडकीने त्याला विष्णू दाखवला. बाहेरचे दार बंद! पण मागले दारही आतून बंद! मनात आलेल्या पापशंकेने विश्वंभर पेटून उठला आणि त्याने सर्वशक्तीनिशी दारावर लाथ मारली. माजघरातलं दृश्य त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. आपली शालीन पतिव्रता बायको विष्णूच्या मिठीत? माजघर हे त्यांचं विश्व होतं आणि आता तेच डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत होतं. त्या माजघराने मग विश्वंभराने दोघांना केलेली मारहाण पाहिली, ‘विष्णूबरोबरच चालती हो’ हा आदेश ऐकला आणि त्या गृहस्वामीनीचं उंबरठा ओलांडून जाणं, तिच्या लहानग्या सुरेशचं रडणंही पाहिलं. ही अशी मसालेदार बातमी कळल्यावर गावातल्या लोकांची हळहळ व्यक्त करत पण आपलं कुतूहल शमवून घेणारी गर्दीही ओसरीनं पाहिली.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divine temple
First published on: 30-05-2015 at 01:02 IST