मी लग्न झाल्यावर कल्याणला तीन खोल्यांच्या ब्लॉकमध्ये दीड वर्षे लीव्ह अ‍ॅण्ड लायसन्सवर राहात होते. त्यानंतर डोंबिवलीला स्टेशनपासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या भाडय़ाच्या चार खोल्यांच्या मोठय़ा आणि स्वतंत्र व हवेशीर घरात राहात आहे. घर भाडय़ाचे असल्यामुळे कुठेतरी स्वत:च्या मालकीचे घर असावे अशी इच्छा होती, पण भाडय़ाच्या घरासारखे घर सापडलेच नाही.
एके दिवशी माझ्या पतीने मामाच्या घरासाठी नेरळला जागा बघायला गेल्याचे सांगितले आणि तेथे आपल्या घरासाठी जागा घ्यायची का, असे विचारले. माझ्या दृष्टीने हा प्रश्न गहन होता. नेरळसारख्या ठिकाणी स्वतंत्र बंगला की शहरात ओनरशिपचा ब्लॉक या विचारात पडले. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक होत असल्याचे ऐकिवात होते. तसेच बालपणापासून डोंबिवलीत राहिल्यामुळे नेरळसारख्या दूरवरच्या अनोळखी ठिकाणी जायला मन कच खात होते, पण स्वतंत्र बंगल्याचीदेखील हौस होतीच. त्यामुळे जूनमध्ये भर पावसात जागा बघण्यासाठी मुलगी आणि पतीसमवेत नेरळला गेले. त्या वेळी तेथे राहणाऱ्या एका मैत्रिणीबरोबरच्या माथेरानच्या ट्रीपच्या आठवणी जाग्या झाल्या. समोर एक हिरवागार उघडा माळ. तेथे गवतामध्ये न दिसणाऱ्या रेघा आणि खाणाखुणा दाखवून, १२ प्लॉटपैकी एक प्लॉट असलेली ही जागा आपण घ्यायची का, असे विचारताच जागेच्या व्यवहारात होणाऱ्या फसवणुकीच्या कथा पुन्हा आठवल्या. आपल्या बाबतीत असे काही झाले तर काय, असे विचारल्यावर कागदपत्रांबाबत खात्री करून व्यवहार करायचा आणि प्रत्यक्षात जागा मिळाल्याशिवाय पैशाचा व्यवहार करावयाचा नाही असे ठरले. पण टोकन म्हणून २५ हजार रोख द्यावेच लागले. तेव्हा एक कच्ची रिसिट घेतली. पण जागा नावावर होण्यासाठी नोंदणी करायला जाण्यापूर्वी निम्मी रक्कम रोख द्यावयाची होती. त्याची पावती मिळणार नव्हती. त्यामुळे मनात शंकेची पाल चुकचुकलीच. मग हिशेब सुरू झाला. जागा केवढय़ात पडेल, रक्कम कशी उभी करायची, घर बांधायला किती खर्च येईल; परंतु जागा घ्यायची मनाने घेतले होते. त्यामुळे ईश्वरेच्छा बलियसी म्हणून पुन्हा मागे वळायचे नाही असे ठरले. जुन्या जागेचे काही पैसे आलेले होते, त्यात भविष्य निर्वाह निधीमधून भर घालून एकदाचा जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला. काही दिवसांनी ७/१२ ही नावावर झाला आणि ब्लॉक की बंगला याचा फैसला झाला.
या जागेवर अतिक्रमण तर होणार नाही ना या भीतीने साधारणपणे दर महिन्याला फेरी मारायला लागायची. दिवाळीच्या सुमारास एक मेंढय़ांचा कळप माळावर बसलेला दिसला, पण ते दरवर्षी येतात व काही दिवसांनी पुढे मार्गक्रमण करतात असे कळले.
अखेर पाणी आल्यानंतर घर बांधण्यासाठी बिल्डरची चाचपणी सुरू झाली. त्या भागातील बांधकामाचे दर शहरातील दरापेक्षा जास्ती असल्याचे लक्षात आले. डोंबिवलीतील बिल्डरदेखील जागा पाहून गेला. नंतर लक्षात आले की, स्थानिक बिल्डरकडून बांधकाम करण्यास सर्व दृष्टीने परवडण्यासारखे आहे. मग दरावरून घासाघीस सुरू झाली. अखेर एका स्थानिक बिल्डरला बंगल्याचे काम दिले. जोत्याचे बांधकाम झाल्यावर पाहायला गेले तेव्हा, एवढय़ाशा चौथऱ्यावर बंगला कसा होणार असा विचार मनात आला, पण विटांचे बांधकाम झाल्यावर घर मोठे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर सिलेक्शन सुरू झाले. लाद्या बघण्यासाठी नेतिवली येथील होलसेलच्या दुकानात गेल्यावर लाद्यांचे निरनिराळे प्रकार बघून स्तिमित झाले. त्या वेळी घरातील प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगाची आणि नक्षीची लादी निवडताना खूपच मजा आली. ओटय़ासाठी काळ्या दगडाऐवजी चकचकीत ग्रॅनाइट निवडला. ओटय़ावरच्या टाइल्स लाद्यांना मॅचिंग होणाऱ्या निवडल्या. त्यात कपबशा व फळांचे डिझाइन असल्यामुळे पाहुण्यांना चहा पिताना त्यातील संगती लक्षात येते.
घराच्या सुरुवातीसच ओटीवर लाकडी झोपाळा बघितल्यावर सगळ्यांची जुन्या घरांची आठवण जागी होते. हॉलमध्ये प्रवेश करतानाच सर्वप्रथम लक्ष जाते ते हॉलमध्ये असलेल्या दोन मोठय़ा खिडक्यांमध्ये असलेल्या खांबावर. त्यावर फुलदाणीतील वेलीवर फुले असलेल्या लाद्यांचे डिझाइन कल्पकतेने लावले आहे.  हॉलमध्ये प्रवेश केल्यावर समोर येतो तो नक्षीदार लाकडी जिना. तो बघताना शूटिंगसाठी सेटवर आल्याचा भास होतो. पाहुणे घरात बसल्यानंतर त्यांचे लक्ष वेधून घेतो तो श्री स्वामी समर्थाचा फोटो आणि येणारी प्रत्येक व्यक्ती त्यासमोर आपोआपच नतमस्तक होते. घराच्या खिडक्या मोठय़ा ठेवल्या आहेत. तसेच प्रत्येक खोलीसाठी लाद्यांना मॅचिंग होणाऱ्या रंगांच्या शेड निवडण्यात आल्या आहेत. हॉलमधील लाद्यांचे डिझाइन बघितल्यानंतर गालीचा घातल्याचा भास होतो. घर बघितल्यानंतर प्रत्येक पाहुण्याकडून, तुमच्या घरात प्रवेश केल्यावर फारच प्रसन्न वाटत असल्याचे उद्गार बाहेर पडतात. अशा प्रकारे कंपाऊंडसह बंगला सजून तयार झाला आहे.
प्लॉट घेण्याच्या आधीपासून लावलेले सुरूचे उंच व मोठे झाड बंगल्यासमोर स्वागतासाठी हजर असते. त्याला बघितल्यानंतर ख्रिसमस ट्रीची आठवण येते. त्या झाडावर सध्या तोंडल्याच्या वेलाच्या कमानीला लागलेली तोंडली तोरणासारखी शोभून दिसतात. बाजूच्या मोकळ्या जागेत सुरुवातीसच लावलेल्या दुर्वाची हिरवळ नेहमीच गारवा देते. कपाऊंडच्या बाजूने उरलेल्या जागेत लावण्यासाठी निवडक झाडे आणायला कल्याणच्या पाठारे नर्सरीत गेलो. नर्सरीत गेल्यावर तेथील विविध रंगांची आणि जातींची झाडे पाहिल्यावर त्यातील कोणती झाडे घेऊ आणि कोणती नको असे झाले. मग दोन हापूसची, दोन नारळाची आणि प्रत्येकी एक पेरू, चिकू आणि जांभळाचे झाड घेतले. प्रत्येक वेळी नेरळला जाताना मध्येच कल्याणला उतरून नर्सरीतून वेगवेगळ्या रंगांची आणि वासाची गुलाबाची आणि जाई, जुई, चमेली, चाफा, मदनबाण, मोगरा, शेवंती, अबोली अशी इतर सुवासिक व सुंदर दिसणारी निवडक फुलझाडेही आणली आहेत.
आता त्यापैकी दारातच लावलेले हापूसचे झाड डौलाने वाढत आहे. स्वयंपाकघराच्या खिडकीतून रायआवळा डोकावतो. पहिला आवळा पिकायच्या आधीच खाल्ल्यामुळे तोंड आंबट झाले. आमटी करता-करताच खिडकीतून कढीपत्ता घेता येतो. घरामागे पारिजातकाचा सडा पडतो. सकाळी झोपेतून जागे झाल्यावर सर्वप्रथम त्याचा सुगंध बेडरूमच्या खिडकीतून आत येतो व मन प्रसन्न होते. पारिजातकाच्या बाजूला पपईचे झाड फळांनी कायमचे लगडलेले असते. चिकूच्या झाडाला बारीकबारीक चिकू लागायला सुरुवात झाली आहे. जांभळे येण्याची वाट पाहते आहे, पण पेरू हाताने तोडून खाताना पाहुण्यांना एक वेगळीच मजा येते. चहा पिताना पातीचा चहा वास आल्यावर पाहुण्यांकडून त्याची लगेच चौकशी होते आणि जाताना कढीपत्ता व पातीचहा, तसेच दारची फुले आणि पपई भेट म्हणून देता येतात. दरवेळी पावसाच्या सुरुवातीला भेंडी, चवळी, माठ, पालक, मिरच्या असा वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लावून दारच्या कोणत्या ना कोणत्या भाजीची चव घ्यायला मिळते.
सकाळी जाग येते ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने; पावसाळ्यात चहा प्यायला गच्चीवर गेलो की, वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे पक्षी दर्शन देतात. मध्येच एखादा भारद्वाज दिसतो, तेव्हा लहानपणी ऐकलेल्या लाभ होण्याच्या गोष्टीची आठवण येते. तसेच निरनिराळ्या रंगांची छोटी छोटी फुलपाखरे बागडताना व मधमाशा वेगवेगळ्या फुलांवर रुंजी घालताना दिसतात. पूर्वेला ढगांआडून उगवत्या सूर्याचे दर्शन होते, तर पश्चिमेला माथेरानचा डोंगर ढगाने आच्छादलेला दिसतो. मधूनच डोंगरातून वाहणारे धबधबे आणि हिरवीगार झाडी दिसते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या स्टेशनमध्ये शिरणारी लोकल दृष्टीस पडते. हिवाळ्यात माथेरानचा डोंगर धुक्याची दुलई पांघरूण बसल्यासारखा वाटतो. रात्रीच्या वेळी माथेरानच्या डोंगराकडे बघितल्यावर जाणाऱ्या-येणाऱ्या गाडय़ांचे दिवे काजव्यांसारखे लुकलुकताना दिसतात. गच्चीवर शेड घातल्यामुळे उन्हाळ्यात किंवा भर पावसातदेखील गच्चीवर जाता येते आणि सर्वदूर पडणाऱ्या रिमझिम पावसाची मजा अनुभवता येते. एकद्या सायंकाळी गच्चीवर उभी असताना पश्चिमेकडे सूर्याचा लाल गोळा मावळताना दिसला आणि मागे लक्ष गेले तर गोलाकार पूर्ण चंद्राचे दर्शन असे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. निसर्गाचा असा चमत्कार मनाला काही वेगळाच आनंद देऊन जातो.
अशा प्रकारे आमच्या कुटुंबाची स्वप्नपूर्ती झाल्यामुळे बंगल्याचे नाव सर्वानुमते ‘स्वप्नपूतीर्’ ठेवले आहे. बाहेर पडताना घराच्या नावाकडे पुन्हा लक्ष गेल्यावर खरोखरची स्वप्नपूर्ती झाल्याची सर्वाचीच खात्री पटते.