scorecardresearch

इच्छापत्र बनवणे ही काळाची गरज!

आपल्या वारसांनादेखील आपल्या पश्चात होणारा त्रास आपण टाळू शकतो ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. 

benefits of having last will

श्रीनिवास घैसास

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला व त्या व्यक्तीने काही इच्छापत्र अथवा मृत्युपत्रसदृश काही कागदपत्रे तयार केलेली नसतील, तर त्याला प्रचलित कायदे लागू होतात आणि त्या कायद्यानुसार त्याच्या संपत्तीचे वाटप केले जाते. हे सर्व टाळण्यासाठी आपण प्रत्येकाने इच्छापत्र बनवणे ही एक काळाची गरज बनून राहिली आहे. अशा प्रकारे इच्छापत्र बनवल्याने आपण आपल्या संपत्तीचे वाटप आपल्या मर्जीप्रमाणे तर लावू शकतोच, परंतु आपल्या वारसांनादेखील आपल्या पश्चात होणारा त्रास आपण टाळू शकतो ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. 

आजच्या या धकाधकीच्या जीवनाचा मानवी आयुष्यावर कळत नकळत खूप मोठा परिणाम होत आहे. दैनंदिन जीवनात स्पर्धा अधिकाधिक तीव्र होत जात आहे, यामुळेच त्याचा कळत नकळत परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावरदेखील होत आहे, म्हणूनच आपण आपल्या श्रमाने, कर्तृत्वाने एखादी मालमत्ता निर्माण केली तर आपल्या पश्चात तिचे वाटप कसे करावे याचा अधिकारदेखील त्या मालमत्ता निर्माण करणाऱ्या माणसालाच असतो. हा अधिकार योग्य तऱ्हेने वापरण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या वयाची चाळिशी झाल्यावर इच्छापत्र बनवणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी मी मुद्दामून इच्छापत्र हा शब्द वापरला आहे कारण मृत्युपत्र हा शब्द वापरला तर मृत्यू आपल्या दारात येऊन उभा ठाकला आहे अशा तऱ्हेचे वातावरण तयार होऊन संबंधित व्यक्ती आधीच आपला आत्मविश्वास गमावून बसते; आणि हे टाळण्यासाठीच त्याच अर्थाचा इच्छापत्र हा शब्द मी या ठिकाणी वापरला आहे. प्रत्येक माणूस इच्छापत्र करण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. मला काय धाड भरली आहे? इतक्यात इच्छापत्र करायला मी काय म्हातारा झालो आहे का? अशा प्रकारची सर्वसाधारण वृत्ती समाजामध्ये दिसून येते; परंतु वर वर्णन केलेल्या धकाधकीची परिस्थिती लक्षात घेता कुणाला कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही; आणि जर असं काही घडलं तर त्यांनी कमावलेल्या संपत्तीचे वाटप त्यांच्या मर्जीप्रमाणे लागेलच याची खात्री देता येत नाही. कारण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला व त्या व्यक्तीने काही इच्छापत्र अथवा मृत्युपत्रसदृश काही कागदपत्रे तयार केलेली नसतील, तर त्याला प्रचलित कायदे लागू होतात आणि त्या कायद्यानुसार त्याच्या संपत्तीचे वाटप केले जाते. हे सर्व टाळण्यासाठी आपण प्रत्येकाने इच्छापत्र बनवणे ही एक काळाची गरज बनून राहिली आहे. अशा प्रकारे इच्छापत्र बनवल्याने आपण आपल्या संपत्तीचे वाटप आपल्या मर्जीप्रमाणे तर लावू शकतोच, परंतु आपल्या वारसांनादेखील आपल्या पश्चात होणारा त्रास आपण टाळू शकतो ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे.

याबाबतीत एक घडलेले उदाहरण मी मुद्दाम वाचकांच्या माहितीसाठी देत आहे. एका गरीब व्यक्तीने मोठय़ा कष्टाने काम करून  मोठी हिंमत बाळगून एका छोटय़ा शहरवजा गावात एक मंगल कार्यालय स्वकष्टाने उभे केले. त्यासाठी त्यांनी खूप मेहनतदेखील घेतली. त्यामुळे ते मंगल कार्यालय खूप छानपैकी चालू लागले. त्या व्यक्तीला चार मुले होती. मुले खूप हुशार होती; परंतु त्यांचे विचार वेगवेगळे होते. हे त्या गृहस्थांना जाणवू लागले, म्हणून त्यांनी वेळीच सावध होऊन आपले स्वत:चे इच्छापत्र बनवले. या इच्छापत्रात त्यांनी त्यांच्या पश्चात त्यांच्या  संपत्तीची खासगी विश्वस्त संस्था बनवण्याची तरतूद केली व त्या संस्थेमार्फतच आपल्या संपत्तीचा कसा विनियोग करावा हे ठरवले. त्यांची इच्छा या तरतुदींमुळे साकार झाली. या तरतुदींप्रमाणे त्यांनी इच्छापत्र बनवून घेतले. संबंधितांना इच्छापत्र सही करण्यासाठी घरी घेऊन गेले आणि आज सही करू, उद्या सही करू, असे करताना सही न करताच दोन-चार दिवस गेले. त्यानंतर त्यांना अर्धागवायूचा झटका आला आणि त्यामुळे त्यांना सही करता येईना, तरीसुद्धा संबंधित इच्छापत्र जरा बरे वाटल्यावर लगेच सही करण्याचे त्यांनी ठरवले; परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांनी सही न केल्यामुळे त्यांनी बनवलेले इच्छापत्र अमलात आले नाही. याचा असा परिणाम झाला की, त्यांची स्वत: कष्टाने उभी केलेली सर्व मालमत्ता ही वडिलोपार्जित झाली आणि त्या मालमत्तेला हिंदू वारसा हक्क लागू झाला. त्यामुळे त्यांची पत्नी व त्यांची चार मुले ही सर्व जण मालमत्तेचे सहमालक झाले. त्याचा परिणाम असा आला की, प्रत्येकाला त्या मालमत्तेमध्ये समान मालकी हक्क मिळाला व सर्व मुलांनी मंगल कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आईचा त्याला विरोध होता; परंतु त्यात आईचे काही चालले नाही. मुले पैसे घेऊन आपापल्या संसारात रमली. शेवटी त्यांच्या पत्नीकडील पैसे संपले व उत्पन्नाचा काही मार्ग नसल्याने आणि मुले विचारत नसल्याने त्यांच्या पत्नीची दयनीय अवस्था झाली. मुलांच्या हातातले खेळणे बनल्याशिवाय त्यांना गत्यंतरच राहिले नाही. आपले वडील विनामृत्युपत्र न करता वारले म्हणून त्या मुलांनी घरी दिवाळी साजरी केली. ही सत्य घटना मुद्दाम नमूद करण्याचे कारण म्हणजे, इच्छापत्राचे आपल्या जीवनात काय स्थान आहे ते कुठपर्यंत खोलपर्यंत परिणाम करू शकते व एखाद्या वारसाची किंवा आपल्या लाडक्या माणसाची काय हालत होते त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. समजा, त्या ठिकाणी जर त्या व्यक्तीने मृत्युपत्रावर स्वाक्षरी केली असती तरीसुद्धा बुडत्याला काडीचा आधार तरी मिळाला असता व त्यावर काही तरी कायदेशीर कारवाई करता आली असती. यावरून वाचकहो, आपणाला विनंती आहे की, आपण आपले इच्छापत्र बनवले नसल्यास आजच बनवावा. त्याचे काय फायदे होतात ते आपण पाहू या.  या साऱ्यावरून आपल्या असे लक्षात येईल की, इच्छापत्र करणे ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. आता इच्छापत्र कसे बनवावे याबाबतची माहिती आपण अन्य लेखातून घेऊ या, जेणेकरून इच्छापत्र बनवताना कोणती काळजी घ्यावी लागेल हे आपल्या लक्षात येईल आणि आपले इच्छापत्र हे  कसे वैध ठरेल याची काळजी आपण घेऊ शकू.

इच्छापत्र बनवण्याचे फायदे

* इच्छापत्र बनवले असल्यामुळे स्वकष्टार्जित  मालमत्तेवर वारसांना वारसा हक्क सांगता येत नाही.

* इच्छापत्र बनवले असल्यास स्वकष्टार्जित मालमत्तेला कोणताही वारसा हक्क कायदा लागू होत नाही.

* इच्छापत्र करणारी व्यक्ती आपल्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे वाटप आपल्या मर्जीप्रमाणे लावू शकते व ती कशी लावावी हेदेखील ती इच्छापत्रात नमूद करून ठेवू शकते. सदर व्यक्तीने आपल्या मालमत्तेचे वाटप अशा तऱ्हेने का करावे? यासाठी त्याने असे का केले म्हणून त्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही.

* इच्छापत्र हाती लिहिलेले असले तरी चालते. कोणत्या तरी निश्चित नमुन्यात ते असायलाच पाहिजे असे कोणते बंधन नसते.

* इच्छापत्र नोंदलेले असले तरी चालते अथवा नोंदलेले नसले तरी चालते.

* कायद्याप्रमाणे विशिष्ट सेवेतील लोकांना उदाहरणार्थ सैन्यदलात काम करणाऱ्या व्यक्ती इत्यादी यांना तोंडी इच्छापत्र करण्याचीदेखील मुभा आहे. इतर सर्व गोष्टींची पूर्तता होत असेल तर असे तोंडी केलेले  इच्छापत्रदेखील ग्रा धरले जाते.

* इच्छापत्र कधीही रद्द करता येते.

* इच्छापत्रात नमूद केलेल्या मालमत्तेचा विनियोग इच्छापत्र करणारी व्यक्ती आपल्या हयातीतदेखील करू शकते. इच्छापत्रात  दर्शवलेल्या आपल्या संपत्तीचा विनियोग त्याला आपल्या हयातीत करायचा असल्यास तो तसा करता येतो. यावर काही बंधन येत नाही.

* इच्छापत्रातील एखादा मजकूर बेकायदेशीर ठरला तर तेवढा मजकूर अथवा तो मजकूर असणारे एखादे कलमच बेकायदेशीर ठरते. संपूर्ण इच्छापत्र त्यामुळे बेकायदेशीर ठरत नाही.

* इच्छापत्राच्या बाबतीत गुप्तता पाळली जात असल्याने भविष्यातील वाटणीवरून लाभार्थीमध्ये लगेच वादावादीला तोंड फुटत नाही. ghaisas2009@gmail.com

मराठीतील सर्व वास्तुरंग ( Vasturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 13:46 IST