कालिदास हा महान कवी होता हे आम्हाला मान्य आहे, पण म्हणून तो काही वास्तुशास्त्रज्ञ नव्हता, असा विचार या लेखाचे शीर्षक वाचल्यावर कोणाच्याही मनात येईल आणि ते अगदी योग्य आहे. पण माणसाबरोबरच वास्तुशास्त्रालाही सुरुवात झाली. अतिप्राचीन अशा अश्मयुगात दगडाच्या आश्रयाने या शास्त्राला सुरुवात होऊन गुहा, आश्रम, प्रासाद असा प्रवास करत आजच्या आधुनिक इमारतींपर्यंत हे शास्त्र येऊन पोचले. याचाच अर्थ अगदी प्राचीन काळातदेखील दगडांचा का असेना, पण आडोसा, आसरा मानवाला हवासा वाटला. मग माणसाच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी ही वास्तू संस्कृत काव्यात अस्पर्श कशी राहिल? कालिदासाच्या वास्तू कधी वास्तुशास्त्राशी संबंध ठेवतात, तर कधी वास्तूशी संबंधित गोष्टी कविकल्पनेतून आकाराला येतात.
कालिदासाच्या ‘कुमारसंभव’ या महाकाव्यातील सारे नाटय़ घडते तेच मुळी ओषधीप्रस्थ या हिमालयाच्या नगरीत. या नगरीचा राजा आहे हिमालय.
कालिदासाच्या साहित्यातील इंटिरियर
दारांवरील पडदे : ओषधीप्रस्थ ही नगरी असली तरी आजूबाजूच्या दऱ्या-कंदरांतून अनेक वनवासी, आदिवासी निवास करत आहेत. चढत्या रात्रीबरोबर या लोकांच्या शृंगाराला बहर आला आहे. या दरीगृहांना ना दारं आहेत ना पडदे! स्वाभाविकच या अर्धवस्त्र स्त्रियांची स्थिती फार बिकट झाली आहे. त्या लाजेने चूर झाल्या आहेत. कालिदासाच्या व्याख्येप्रमाणे ‘प्रकृतीरञ्नात् राजा’ प्रजेच्या अडीअडचणीत जो उभा असतो तो राजा. हिमालय या व्याख्येला अपवाद कसा असेल? तोही प्रजेच्या प्रत्येक अडचणीत त्यांचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावतो. आपल्या राज्यातील वनवासी स्त्रियांची अडचण त्याच्या लक्षात येते आणि तो पाण्यानी ओथंबून गेलेले मेघ हळूच या लंबवर्तुळाकृती गुहांच्या दारांवर ओढून टाकतो. अशा या ओथंबून खाली आलेल्या मेघरूपी पडद्यांमुळे या स्त्रियांची अडचण दूर होते.
शृंगाराला अधिक रसिला करतो तो बेडरूममधला नाइटलँप. संस्कृतमध्ये या दिव्याला अतिशय समर्पक शब्द आहे- सुरतप्रदीप. सुरत म्हणजे शृंगार. शृंगारासाठी असलेला दीप तो सुरतप्रदीप. पण घनदाट जंगलांनी युक्त अशा हिमालयात कुठला आला नाइटलँप, असा विचार आपल्या मनात येतो. पण तेथे त्याचीही सोय आहे. शृंगाररसाचा आस्वाद घ्यायला मंदसा प्रकाश हवा. हा प्रकाश पुरवला आहे तो हिमालयातील रात्रीच्या वेळी तेजाळणाऱ्या वनस्पतींनी. संजीवनीसारख्या रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या वनस्पती सुरतप्रदीप बनतात.
‘कुमारसंभवा’त सुरतप्रदीपाचे कार्य वनस्पती करतात तर मेघदूतात तेजस्वीरत्न सुरतप्रदीप झाली आहेत. अलकानगरीतील विवस्त्रावस्थेतील स्त्रिया आपल्या प्रियकरांनी आपल्याला या अवस्थेत पाहू नये म्हणून हे प्रदीप विझवण्यासाठी सुगंधी पावडर त्यांच्यावर टाकतात. पण ते कुठले विझायला, त्यामुळे या स्त्रियांची कुचंबणा होते आणि त्यांच्या प्रियकरांचे मात्र फावते. बरे या दोन्ही दिव्यांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांना तेल नको की वात नको, रात्रभर ते तेजाळत राहातात.
वेगवेगळ्या वेळांचे प्रासाद वर्णन : कालिदासाच्या काव्य आणि नाटकांतून वेगवेगळ्या वेळांचे वर्णन करण्याच्या निमित्ताने घरांच्या बांधणीची कल्पना येते. ‘विक्रमोर्वशीयम’ नाटकात पुरुरव्याच्या प्रासादाचे सायंकालीन वर्णन आहे. प्रासादात पक्ष्यांना बसायला टांगलेल्या दांडय़ावर कंटाळलेले मोर चित्रात चितारल्याप्रमाणे निश्चल झाले आहेत. जाळीदार खिडक्यांतून बाहेर पडणारा धुपाचा धूर प्रासादाच्या वळचणीला बसलेल्या कबुतरांना झाकून टाकत आहे. वृद्ध परिचर संध्यासमय झाल्याने जागोजागचे दीप उजळत आहेत.
तर मालविकाअग्निमित्रम् या नाटकात माध्यान्ह म्हणजे टळटळीत दुपारीचे वर्णन आहे. दुपारचा उष्मा असह्य़ झाल्यामुळे राजप्रासादातील तळ्यात असणाऱ्या कमळाच्या पानांच्या सावलीत हंसपक्षी अर्धवट डोळे मिटून प्रासादाच्या उतरत्या छपरांचा स्पर्श होणार नाही अशा प्रकारे बसले आहेत.
नाटकात मालविकेच्या प्रेमात राजा पडला आहे असे पाहून राजाची राणी धारिणी संतापते आणि तिला सारभांडभूमिगृहात बंदी करते. हे सारभांडभूमिगृहात म्हणजे आजच्या काळातील बँकेच्या लॉकरसारखी व्यवस्था होती. सारभांड याचा अर्थ अत्यंत मौल्यवान दागिने. हे खाशा लोकांचे दागिने असू शकतील आणि भूमिगृह हे जमिनीखालील एखादी खोली, अर्थात तळघरासारखी, पण अत्यंत सुरक्षित, सर्वाना सहज प्रवेश नसणारी अशी खोली असावी. म्हणूनच सहज प्रवेश दुर्लभ अशा या सारभांडभूमिगृहात ठेवले आहे.
यंत्र : आजच्या काळातील यंत्रांप्रमाणे अत्याधुनिक नसली तरी काही यंत्रांचा वापर प्राचीन काळापासून होत होता. वरील मालविकाग्निमित्र नाटकातील उन्हाळ्याचे वर्णन करताना धारायंत्र म्हणजे कारंज्यातून उडणारे जलिबदू पिण्यासाठी मयूर धडपड करत असल्याचा उल्लेख आहे. प्राचीन काळी घराघरांवर ध्वज-पताका उभारण्याची पद्धत होती. ओषधीप्रस्थही त्याला अपवाद नाही. या नगरीतील उन्नत प्रासादांवर यंत्रपताका लावल्या आहेत. ध्वजारोहण किंवा ध्वजावतरणासाठी ज्या प्रकारे यंत्राने ध्वज वर-खाली घेतला जातो, तशीच काहीशी ही यंत्रे असावीत असे वाटते. कारण असे उल्लेख अनेक ठिकाणी सापडतात.
अलकानगरी : ‘मेघदूत’ या खंडकाव्यात मेघाला आकाशातून दिसणाऱ्या अलकानगरीचे वर्णन आहे. यात नगररचनेच्या दृष्टीने सुरक्षेसाठी खोदलेले खंदक, उंच तोफा व भाल्यांनी संरक्षित तटबंदी या कशाचीही आठवण यक्षाला होत नाही. विरहवेदनेने व्याकुळ झालेल्या यक्षाला अलका ही आपल्या प्रियकराच्या मांडीवर पहुडलेली प्रेयसी भासते. त्या अलकेतून वाहणारी गंगा म्हणजे प्रियकराच्या मांडीवर नििश्चतपणे पहुडल्यामुळे प्रेयसीच्या अंगावरील अस्ताव्यस्त झालेले उस्कटलेले रेशमी वस्त्र आहे, अशी कल्पना कालिदासाने केली आहे. आकाशाला स्पर्श करणाऱ्या या अलकानगरीतील प्रासादांच्या गच्च्यांची फरसबंदी स्फटिकमण्यांची आहे. त्यात पडलेल्या आकाशातील ताऱ्यांच्या प्रतििबबांमुळे जणूकाही फुलांची नक्षी चितारल्याचा भास होतो.
यक्षगृहाच्या भोवतालचा परिसर अर्थात लँडस्केप : आपल्या घरी कुणाला आपण बोलावलं तर सर्वप्रथम आपला पत्ता देतो. घराजवळच्या खाणाखुणा सांगतो. जेणेकरून कुणालाही येणं सोपं जातं. मेघदूताचे प्रयोजनच मुळी रामगिरीवर राहाणारा यक्ष मेघाला आपला संदेश दूर अलकेत विरहात असलेल्या आपल्या पत्नीला मेघाद्वारे संदेश पाठवणं हा आहे. रामगिरी ते अलका एवढा मोठा प्रवास आणि मेघ तर पहिल्यांदाच निघालेला. त्याला मार्गातल्या साऱ्या खाणाखुणा नीटपणे सांगायलाच हव्यात. रामगिरीवरून निघाल्यापासून अलकेपर्यंतचा सारा मार्ग मेघाला सांगून झाल्यावर आता यक्षाच्या घराचा पत्ता.
यक्षाचे घर अलकेचा अधिपती असलेल्या कुबेराच्या घराच्या उत्तरेला आहे. त्या घराबाहेर असलेल्या सप्तरंगी कमानीवरून ते मेघाला सहजपणे ओळखता येईल. घराच्या जवळच यक्षपत्नीने पुत्रवत वाढवलेला मंदारवृक्ष आहे. यक्षाच्या घराभोवती एक छोटेसे सुंदर तळे आहे. त्यात उतरण्यासाठी असलेला सोपान किंवा जिना नीलमण्यांनी सजवलेला आहे. या तळ्यातील पाणी इतके स्वच्छ आहे की त्याचा मोह पडून मानससरोवर जवळ असतानासुद्धा हंस तिकडे न जाता या तळ्यातच रमतात. तळ्याच्या काठी एक क्रीडाशैल आहे. हाही नीलमण्यांनी जडवलेला असून त्याच्याभोवती कर्दळीवन आहे.
घराजवळच्या बागेत मधुमालतीचा मंडप असून तो कुरबकाच्या झुडपांनी वेढलेला आहे. त्याच्याजवळच रक्ताशोक आणि केसरवृक्ष आहेत. या दोन वृक्षांच्या मधोमध एक स्फटिकांनी जडवलेला सुवर्णस्तंभ आहे. त्यावर असणाऱ्या स्फटिकाच्या पत्र्यावर मोर नाचत असतो. हे सारं सौंदर्य बघून मेघ पुढे जाईल तेव्हा त्याला घराच्या दोन्ही बाजूला शंख, कमळ अशी शुभचिन्ह चित्रांकित केलेली दिसतील.
जिथे हे सारं दिसेल ते माझं घर समज आणि माझ्या पत्नीला माझा निरोप दे. अशा प्रकारे अलका, यक्षाच्या घराभोवतीचं लँडस्केप या साऱ्यांचे सुंदर काव्यात्म वर्णन आपल्याला मेघदूत या यक्षाच्या घरचा पत्ता सांगण्याच्या निमित्ताने रचलेल्या काव्यात सापडते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onघरHouse
मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalidas architecture concept
First published on: 20-07-2013 at 01:04 IST