मोहन गद्रे

पुनर्विकासातील, सदनिकाधारकांच्या दर्दभऱ्या कहाण्या कुठून कुठून कानावर येतच असतात… आणि असंख्य पाय असलेला पुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंट नावाचा भुंगा, म्हाताऱ्या सदनिकाधारकांच्या मागे लागतो.

पन्नास-साठ वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती आता जुन्या झाल्या आहेत. मध्यंतरी त्या इमारतीची दोन- चार वेळा दुरुस्ती होऊन गेलेली आहे. त्यावरसुद्धा सदनिकाधारकांचे काही लाख खर्च झालेले आहेतच. आता त्यांची पुनर्बांधणी करणे सर्वच दृष्टीने फायदेशीर ठरणार असल्याने, त्या बाबतीत सदनिकाधारकांमध्ये हालचाली सुरू होऊ लागतात. आजूबाजूला आधुनिक सोयीसुविधांची रेलचेल असलेली टॉवर संस्कृती जोमाने उभी राहू लागलेली असते. त्यांच्या समोर तीन-चार मजल्यांच्या- एकेकाळच्या आधुनिक म्हणवून घेणाऱ्या अशा इमारती आता अगदीच आऊट डेटेड वाटू लागल्या आहेत. या अशा जुन्या इमारतींमध्ये राहणारे, एकेकाळचे तरुण आणि आता आपली पंचाहत्तरी साजरी करून उतार वयातील शारीरिक, मानसिक आजार, त्यातून उद्भवलेली संभ्रमावस्था घेऊन, आपलं वार्धक्य, परमेश्वराने बहाल केलेला ‘बोनस’ मानून आला दिवस काढत आहेत. क्वचित कोणाच, गृहस्थाश्रमांत पदार्पण केलेली पुढच्या पिढीतील, त्यांच्या त्यांच्या कौटुंबिक समस्या घेऊन संसार करणारी मुले सोबत आहेत. कोणी सातासमुद्रापार असलेल्या मुलांचा अभिमान बाळगत एकाकी आयुष्य जगत आहेत. त्यांना मुलांनी, मुलींनी की- कोणत्याही कागदपत्रावर आम्हाला विचारल्याशिवाय सही करू नका आणि तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही येऊ शकू असे नाही.’ हा इशारा त्यांनी वेळीच देऊन ठेवलेला आहेच. पण आपल्याला मोठी जागा मिळणार आहे, ती कुठल्याही परिस्थितीत सोडायची नाही हे लक्षात ठेवा. मी सेक्रेटरींना सगळी प्रोसिडिंग्ज मला फॉरवर्ड करायला सांगितले आहे. तुम्ही काळजी घ्या. एकाकी वृद्धांच्या वेगळ्याच समस्या असतात.

‘एकवेळ जेवायचं ताट दिलं तरी चालेल, पण बसायचा पाट देऊ नये,’ हे वाक्य सर्वच ज्येष्ठांचे हल्ली तोंडपाठ झाले आहे, पण वाळवी लागलेल्या पाटावर बसून राहणार कसे? वाळवी लागलेल्या पाटावर अजून किती काळ ठाण मांडून बसून राहणार? याचे उत्तर त्यांना काही केल्या सापडत नाहीये.

रिडेव्हलपमेंट करायचं एकदाच ठरलं, मग पुढे वर्षभराच्या काळात, भांडण-तंट्याच्या प्रचंड कोलाहलात, तासन्तास चालणाऱ्या, शरीर आणि मन पार थकवून टाकणाऱ्या मीटिंगा, ना ना तऱ्हेच्या कागदपत्रांची पूर्तता करणे, असलेल्यांचा परत शोध घेणे, नसलेले परत तयार करून घेणे, हे मोठे खर्चीक आणि जिकिरीचे काम सुरू होते. मध्यंतरी सदनिकाधारकांमध्ये पडलेल्या गटा-तटांनी उभ्या केलेल्या असंख्य प्रश्नावल्या, त्यातून निर्माण होणारी संभ्रमावस्था, त्यामुळे मन:स्वास्थ्य बिघडवून घेणे. फसलेल्या पुनर्विकासातील सदनिकाधारकांच्या दर्दभऱ्या कहाण्या कुठून कुठून कानावर येतच असतात. आणि असंख्य पाय असलेला पुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंट नावाचा भुंगा, म्हाताऱ्या सदनिकाधारकांच्या मागे लागतो. हे सगळं मार्गी लागून, तयार होणाऱ्या स्वप्नवत घरात आपण परत जाऊ का? आणि समजा गेलोच तर ते स्वप्नवत घर आपल्याला सुखाची झोप नंतर घेऊ देईल का? तरुणपणी, सगळ्या हौसामौजा बाजूला ठेवून, पै पैची काटकसर करून, वीस एक वर्षं कर्जाचे हप्ते फेडून, आपल्या वाढत्या कुटुंबाची राहण्याच्या केलेल्या बेगमीत, आता वाढलेल्या कुटुंबानेच काढता पाय घेतला आहे, पण कायदेशीर हक्काचा त्याचा अदृश्य पाय मात्र चांगलाच येथे गुंतून पडला किंवा तो तसा राहील याची काळजी घेऊन गुंतवून ठेवला आहे. त्याच वेळी पैलतीर स्पष्टपणे समोर दिसू लागलेला असतो.

‘ज्येष्ठांची काळजी’ हा विषय यापुढे सरकारने करावयाच्या काळजीचा विषय ठरून गेल्यामुळे, सरकार यावर विचार करून काही तोडगा काढते का पाहू! म्हणून आला दिवस बोनस समजून राहणे ज्येष्ठांच्या हाती इतकेच उरते.

● gadrekaka@gmail.com