रसोई.. विविध रसांची निर्मिती करते, अनुभूती देते ती रसोई म्हणजेच घरातलं स्वयंपाकघर. किचन या शब्दाशी जास्त घसट असलेली, काळानुरूप आकुंचन पावलेली, घरातली छोटीशी महत्त्वाची आवश्यक जागा. गृहिणीच्या हातगुणाने रूप, रस, गंध, स्पर्शातील वैविध्य दाखवत चरणं आणि चारणं यात रमलेलं मोक्याचं ठिकाण. गणपतीच्या निमित्ताने मोदकांनी तिथे मिरवून घेतलं. पितृपंधरवडय़ात खास मेनूंनी पितरांना तृप्त केलं. नवरात्रात उपवासाने थोडा संयम ठेवला. दसऱ्याला श्रीखंडाशिवाय कोणाचं पान हललं नाही. आणि आता दिवाळीच्या स्वागतासाठी कामात गर्क झालंय.

खरं तर हे निसर्गाचंच व्यवस्थापन आहे. शरदऋतूच्या स्वागतासाठी आखलेली मोहीम. दिवाळीचे चार दिवस विविध पक्वानांच्या माध्यमातून रसगंधाची लूट करत जिभेचे चोचले पुरवले जातातच. त्याचबरोबर फराळाच्या पदार्थानी स्वयंपाकघर ‘रंगात’ येते. दिवाळीचे सेलिब्रेटीच की ते! खरं तर आजकाल कुठलाही पदार्थ, केव्हाही केला जातो, करता येतो, आणला जातो, खायला मिळतो. परंतु एकाचवेळी फराळाचे सगळे पारंपरिक पदार्थ म्हणजे एक वेगळीच मजा. त्यामुळे दिवाळीला स्वयंपाकघरात फराळाने भरलेले डबे नाहीत, असं होतच नाही. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत, ते सगळे पदार्थ किंवा त्यातले काही घरी केले जातात किंवा ऑर्डर देऊन आणले जातात. पण ते डब्यात उपस्थित असतात एवढं मात्र नक्की!

multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
System for one vote of disabled person in remote village
लोकशाहीची खरी ताकद! दिव्यांग व्यक्तीच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

‘काय मग लाडू कधी देणार?’ या प्रश्नाने लग्नाशी नातं जुळवलं असलं तरी दिवाळीत लाडवाचा मान पहिला. अगदी राखीव जागा. त्याचे प्रकारही खूप. पूर्वीच्या काळी खास आचारी बोलावून मोतीचूराचे लाडू घरात केले जात. बुंदी पाडण्याची पद्धतही किती आगळी. झारा आपटताना पिवळ्या बुंदीचा पाऊस गरम तेलात पडतो. पिवळ्या बुंदी उडय़ा मारतात. गुलाबी रंग चढलेली ती पिवळ्या मोत्याची रास डोळ्यांना चूर करून टाकते, म्हणून तो मोतीचूर. साखरेच्या पाकात केशर, वेलचीचा गंध मिसळतो. काजू, बदाम पोटात शिरतात. पाकात ‘साखरवलेला’ बुंदीचा राजेशाही लाडू तोंडात टाकता क्षणी विरघळतो. तसा हा परिस्थितीशी तग धरून राहणारा. पण आजकाल मात्र खोक्यातून घरी येतो. एवढा द्राविडी प्राणायाम चिमुकल्या घराला मानवत नाही. म्हणून स्वयंपाकघर बेसनाच्या लाडवाचा पर्याय शोधते. साजूक तुपात चण्याच्या डाळीचे किंचित जाडसर पीठ मंद गॅसवर ‘मस्टर कलर’ येईपर्यंत भाजायचं. गॅस बंद करून दुधाचा हबका मारायचा आणि चटक्यांचे तुषार हातावर झेलायचे. तुपकट कढईत थोडा बारीक रवा भाजून घातला तर चिकटपणाला तो पळवून लावेल. गार झाल्यावर त्यात मावेल एवढी पिठीसाखर घातली की लाडू तयार. तूप खाल्लं की रूप येतं हे तत्त्व नियमाने तो पाळतो. त्यामुळे लाडू तुंदीलतनु होण्याकडे कल. काजूची स्मायली, बेदाण्याची टिकली किंवा काळ्या मनुकाचं गालबोट लावलं की दृष्ट लागणार नाही. पाकाच्या परीक्षेतून हा सुटतो. त्यामुळे नवशिक्यांपासून सगळ्यांची याच्याशी गट्टी. असं असलं तरी सुगरणीची पदवी प्राप्त करून देतो तो रवाबेसनचा लाडू. हाताचा अंगठा आणि पहिलं बोट जोडून त्याची उघडमीट करत पाकाच्या थेंबाची एकतारी, दोनतारी अशी गुणवत्ता ठरवणे म्हणजे तारेवरची कसरत. तसंच साखर विरघळल्यावर उकळी आली की छोटय़ा ताटलीत एक थेंब टाकून बघायचा. आहे तसाच घोटीव राहिला, जराही पसरला नाही, सैलावला नाही की ‘पाक झाला’ असं समजायचं. त्याचा भगराही होता कामा नये आणि लाडू वळताच येत नाही असंही नको, असा सुवर्णमध्य साधणं, हे घरासाठी ‘प्रचीतीचे बोलणे.’ बाकी काजू, बेदाणे, वेलची, केशराची सजावट ही घराच्या आणि गृहिणीच्या हातात. असा हा गोल लाडू खायला सुटसुटीत सोपा. पोटभरीचा. त्याला कुठल्याही शेपटाची गरज नाही. फक्त रवा आणि ओला नारळ घातलेला लाडू एकदम ए वन गटातला, पण टिकण्याची शाश्वती नाही. मग फ्रीजमध्ये याचा मुक्काम. अचानक कोणी आलं तर हा ‘दगड’ हातावर ठेवावा लागतो. किंवा आधी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवला तर ‘पाणावलेला’ असतो. ही दोन्ही रूपं मनाला न भावणारी. म्हणून दिवाळीत हा थोडा बाजूला पडतो.

लाडवाच्या पाठोपाठ ‘घर’ चिवडा करायला लागतं. किंबहुना त्यांची जोडगोळी आहे. पोहे भाजण्याचं तंत्र जमलं की याची ‘कुरकुर’ सर्वाना हवीशी वाटणारी. कढीपत्त्याची तडतड, हिरव्या मिरचीचा थेडा ‘हिरवटपणा’, डाळ, दाणे, तीळ, खोबऱ्याचे काप, काजू यांचा आगळा गंध, मधूनच बेदाण्याची गोडी असा सुरेख संगम साधत चिवडा झटपट तयार होतो. आणि पुरवठय़ालाही येतो. रिकामे डबे भरत चालले की घराला आनंद होतो. तो गृहलक्ष्मीच्या चेहऱ्यावर दिसून येतो आणि ‘एक डबा काही रिकामा नाही’ अशा गोड कुरकुरीतून तो व्यक्त होतो.

मग थोडय़ा किचकट पदार्थाची तिथे वर्णी लागते. चकल्या करणं म्हणजे गृहिणीची परीक्षाच. धान्याचं, भाजण्याचं योग्य प्रमाण साधलं पाहिजे. गिरणीवाल्याने ती भाजणी चांगली दळली पाहिजे. तर चकल्या छान होतात. म्हणजे ‘का बिघडली’ याला बरीच कारणं असतात. अनुभव शिकवत जातो आणि छान खुसखुशीत, कुरकुरीत, आंत नळी पडलेली, मीठ-तिखटाची जाणीव करून देणारी चकली तयार होते. चकलीला कोणी नाही म्हणत नाही. लहान मुलांना तर लोणी, दही याच्याशिवायही सतत ती तोंडात टाकायला आवडते. मग सारासार विचार करून घराला एक डबा आपल्या ‘पोटात’ लपवून ठेवावा लागतो.

चकलीच्या पाठोपाठ शंकरपाळ्यांचा बेत ठरतो. सम प्रमाणात तूप, साखर, दूध किंवा पाणी एकत्र करून त्यात मावेल एवढा मैदा घातला की झालं. पोळी लाटायची आणि भूमिती आठवत समभूज चौकोन किंवा पतंग कातरण्याने कातरायचे. गंमत म्हणून नैवेद्याच्या वाटीने गोल गोल पाडण्याचा खेळही खेळता येतो. कडेचे विविध आकार मोडून टाकायचे म्हणजे एकसारखे शंकरपाळे तयार होतात. मंद गॅसवर गुलाबी रंग चढला की ‘रूपास भाळलो आम्ही’ अशी बघणाऱ्यांची अवस्था होते. आणखीन दोन हात लुडबूड करायला आले तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ते तत्क्षणी जाणवतं.

शेव मध्येच घुसते. कारण तिच्यासाठी खास काही तयारी करावी लागत नाही. डाळीच्या पिठात ठसठशीत मीठ, तिखट ओवा, मोहन घालून सैलसर पीठ भिजवायचं. शेवेची ताटली घालून सोऱ्यातून थेट तापलेल्या तेलात चवंगा घालायचा आणि हलक्या हाताने तळायचा. ही तळलेली चविष्ट मॅगीच. मोठय़ा तोंडाच्या डब्यात असे चवंगे अलगद ठेवायचे. असा आख्खा चवंगा खाणे हे आता स्वप्नातच अनुभवायला हवे. जागेचा प्रश्न म्हणून मोडतोड सहन करत, बिचारी अंग चोरून लहान डब्यात जाऊन बसते.

या टिकाऊ पदार्थानी स्वयंपाकघरात हजेरी लावली की मग करंज्यांकडे मोर्चा वळवला जातो. हिचा ‘खवट’ स्वभाव केव्हा उफाळून येईल याचा नेम नाही. म्हणून ‘वसुबारस’ हाच तिचा जन्मदिवस. भाजलेल्या खोबऱ्याच्या किसात भाजलेली कणीक, खसखस, वेलची, पिठीसाखर घातलेल्या सारणाने करंज्याची पोटं टुम्म फुगतात.

काळजीवाहू सरकार लागतं. नाहीतर करंजी ‘स्मायली’चा गुणधर्म तेलात टाकताक्षणी दाखवते. त्यामुळे सारणबाहेर येऊन सगळं तेल खराब होतं. गुळखुळेही चांगले वाटत नाहीत. कातरण्याच्या वळणाबरोबरच कधी ‘मुरड’ घालून घेत ही ‘शब्दार्थ’ही शिकवते. बारीक बारीक फोडांनी अंग भरलं की ही छान दिसते. अर्थात ‘फोड’ हा शब्द मनाला खटकतो. एरवी करू म्हटलं तरी तिचा नंबर लागत नाही म्हणून दिवाळीत कौतुक. गोमातेला प्रसन्न करून मगच ती इतरांच्या वाटेला येणार. करंज्यांचं बायप्रॉडक्ट म्हणजे चिरोटे. उरलसुरलं पीठ संपवणं हा उद्देश. दोन-तीन पोळ्यांना साटं चोपडून, एकावर एक ठेऊन गुंडाळी करायची आणि मग सुरीने छोटे छोटे तुकडे करून लाटायचे आणि तळायचे. पापुद्रे सुटून येतात आणि साखरेच्या चिमटीने गोडसर होतात. याचे शौकीन अगदी आतल्या गोटातले. तीन दिवस तांदूळ भिजत टाकून ते कुटून त्यात गूळ मिसळायचा की झालं अनरशाचं पीठ तयार. खसखशीवर नाजूक हाताने थापायचा आणि तळायचा. आंबूस वास कुठल्या कुठे पळून जातो. आणि जाळीदार कुरकुरीत अनारसे देखण्या रूपात तयार होतात. पण बिचारा चिरोटय़ांसारखाच खास खवैयांच्या मर्जीतला. स्वयंपाकघर मात्र त्याच्या कौतुकात काही उणे ठेवत नाही.

खरं तर दिवाळीसाठी ही भरल्या डब्यांची ‘सजावट’ करायला स्वयंपाकघराला फार आवडतं. जिन्नस तेच, कृती तीच पण चव मात्र प्रत्येक ‘घराची’ वेगळी, वैशिष्टय़पूर्ण. ब्रॅण्डेड नाही. त्यामुळे पदार्थ घरी केलाय म्हटलं की उत्सुकतेनं हात पुढे येतोच. दिवाळीच्या दिवसात कोणीही आलं की ‘फराळ’ पुढे केला जातो. कोणाच्याही घरी जाताना ‘नमुना’ नेला जातो. एखाद्या घरी दिवाळी नसेल तर आवर्जून फराळ पोहचवला जातो. कारण काहीही असू दे, घरात केलेले किंवा आणलेले फराळाचे पदार्थ असतातच. दिवाळी म्हटलं की दर्शनी सजावट आकाशकंदील, पणत्या असतातच. परंतु त्याचबरोबर ‘फराळा’ची अंतरंग सजावटही महत्त्वाची. कारण ती तर प्रेमाची वाट. मग लागू या तयारीला. निरनिराळ्या उद्योजकांनी चौफेर विचार करून गृहिणींना हातभार लावण्यासाठी केव्हाच तयारी सुरू केलीय. कदाचित घरात ‘फराळ’ तयार होत असतानाचे फोटो पाठवा, अशीही टूम निघेल. मग ‘चला दिवाळी आली, फराळ करण्याची वेळ झाली.’

– सुचित्रा साठे

suchitrasathe52@gmail.com