मित्रांनो, मागील लेखात आपण विद्युत सुरक्षेमध्ये विविध खात्यांचा सहभाग किती मोलाचा आहे याचा आढावा घेतला. आता वीजग्राहक यामध्ये केंद्रस्थानी कसा आहे याचे विश्लेषण पुढील चर्चेत करणार आहोत.
‘ग्राहक हिताय, ग्राहक सुखाय’ अशा प्रकारच्या म्हणी आपण बऱ्याच दुकानात, कंपनीत व संघटनांमध्ये पाहिल्या असतील. मी स्वत: काही दुकानांमध्ये ‘ग्राहकांचे हित हाच आमचा संतोष’ हे ब्रीदवाक्य पाहिले होते व नेमकी त्याच्या उलट वागणूक त्या दुकानदाराकडून अनुभवली आहे. अशा वेळी ग्राहक म्हणून आपले कर्तव्य आणि अधिकार काय आहेत, त्यांचा वापर कसा व केव्हा करावा या बाबी माहीत होणे आवश्यक आहे. ग्राहक म्हणजे काय? याला इंग्रजीमध्ये समानार्थी शब्द आहे Consumer (कन्झुमर) अर्थात जी व्यक्ती काही पदार्थ किंवा सेवा वापरते त्यास कन्झुमर किंवा ग्राहक म्हणतात. दुकानांतून आपण कापड, मिठाई, शोभेच्या वस्तू, किराणा माल, भाज्या इत्यादी अनेक पदार्थ खरेदी करतो आणि वापरतो, म्हणजेच आपण त्या वस्तूंचे ग्राहक बनतो. सेवा पुरवण्यामध्ये वीज कंपन्या, गॅस कंपन्या, वैद्यकीय सेवा करणाऱ्या कंपन्या इत्यादी आघाडीवर आहेत. आपल्या घरापर्यंत वीज पोहोचवणाऱ्या कंपन्या जसे टाटा पॉवर, बेस्ट, रिलायन्स, महावितरण इ. कंपनीचे विद्युत ग्राहक हा आपला प्रमुख फोकस आहे.
जे घरी, कार्यालयात, कारखान्यात इ. ठिकाणी वीज वापरतात ते सर्व विद्युत ग्राहक असतात. घरगुती उपयोगासाठी आपण जी वीज वापरतो ती सामान्यपणे सिंगल फेज २३० व्होल्टस किंवा तीन फेज ४४० व्होल्टस् या लेवलची असते. वीज ग्राहक म्हणून आपल्याला प्रथम हे माहीत असणे जरुरी आहे की, आपण कोणत्या वीज कंपनीचे ग्राहक आहोत. वीज ही कमॉडिटी नसून एक सेवा आहे, जी खालील कंपनीतर्फे संपूर्ण राज्यात दिली जाते त्या त्या विशिष्ट एरियात.
वीज कंपनी वीजपुरवठाचा एरिया
टाटा पॉवर कंपनी संपूर्ण मुंबई, ठाणे
बी. ई. एस. टी. (बेस्ट) मुंबई शहर क्षेत्र
रिलायन्स एनर्जी मुंबई उपनगर क्षेत्र +
काशीमिरा-भाईंदर,
महावितरण नवी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र
अशा प्रकारे प्रत्येक वीज कंपनीला शासनाने क्षेत्र विभागून दिले आहे. त्या एरियात वीजपुरवठा करणे, त्या सेवेचे योग्य मूल्यमापन करून विजेच्या वापरावर बिल आकारणी करणे व वीज नियमांचे अनुपालन करून विद्युत सुरक्षा प्रस्थापित करणे ही जबाबदारी वीज कंपनीची आहे. समजा एखाद्या ग्राहकास त्या क्षेत्राच्या वीज कंपनीव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या वीज कंपनीचा पुरवठा पाहिजे असल्यास ती सोय विद्युत कायदा २००३ अन्वये करण्यात आली आहे. यातील ओपन अॅक्सेस अंतर्गत अशा ग्राहकाने नॉर्मल चार्जेसव्यतिरिक्त व्हिलिंग चार्जेस भरल्यानंतर त्याला त्या कंपनीचा वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जातो.
मंडळी, विद्युत कायदा २००३ मधील या तरतुदीमुळे मुंबईमधील हजारो ग्राहक रिलायन्स एनर्जी या कंपनीकडून टाटा पॉवरकडे गेल्या काही वर्षांत गेल्याचे कळते. याला मुख्यत्वे दोन कारणे सांगितली जातात. पहिले- अयोग्य देखभाल, ज्यामुळे ग्राहकास होणारा खंडित वीजपुरवठा आणि दुसरे म्हणजे वीज दर. वरील दोन कंपन्यांच्या वीज दरात व एकूणच गुणवत्तेत फरक जाणवल्यानेच वीज कंपनी बदलण्याचा हा सिलसिला अजूनही चालू आहे. यावरून हे स्पष्ट होते की, वीज कंपनी निवडीबाबत ग्राहक हा बऱ्याच अंशी सजग झाला आहे. हीच सजगता ((Awareness) त्याने सुरक्षेसंदर्भात आचरणात आणली तर बरेचसे अपघात, शॉर्ट सर्किट इ. घटनांना आळा बसेल हे नि:संशय. त्या दृष्टीने ग्राहकाने आपल्या घरातील वायरिंगही चांगल्या दर्जाची ठेवणे आवश्यक ठरते. त्याकरिता योग्य व कार्यक्षम अर्थिग असणे जरुरी आहे. वायरचे इन्सुलेशन जर खराब झाले तर घरातील फिटिंग व उपकरणे केव्हाही धोकादायक ठरू शकतात व त्यामुळे अपघात होऊ शकतो किंवा आग पण लागू शकते. मात्र योग्य व कार्यक्षम अर्थिग असेल तर या गोष्टी टाळता येतील; परंतु वीज ग्राहक व ठेकेदार नेमके या बाबींच्या खर्चाकडे काटकसर होण्याच्या दृष्टीने दुर्लक्ष करतात आणि तिथेच विद्युत सुरक्षेचा पाया हादरायला सुरुवात होते. त्यानुसार वीज ग्राहकाने विद्युत सुरक्षा प्राप्त करण्यासाठी खालील टिप्स अमलात आणाव्यात.
अर्थिग : आपल्या घरामध्ये जर अर्थिग इंडियन स्टॅण्डर्डप्रमाणे नसेल तर रिटर्न करंट परत अर्थ फॉल्ट लूप रेजिस्टन्समध्ये येण्याची शक्यता असते. त्यासाठी त्या लूपची रोधकता ४ ओहम्पेक्षा जास्त असू नये. जर ती जास्त असेल तर फ्युज जाणार नाही व त्यामुळे केव्हाही अपघात होण्याची किंवा आग लागण्याची शक्यता असते. म्हणूनच धातूचा बल्ब होल्डर, फॅन, कुलर, मिक्सर, फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव इ. उपकरणांना अर्थिग करणे जरुरी आहे.
दूरदर्शन संच (टीव्ही सेट) : आपण घरी टी. व्ही. पाहात असताना काही वेळेस चित्र अस्थिर होते. आवाज स्पष्ट नसतो किंवा चित्र अंधुक दिसते. हे सर्व परिणाम अर्थिग बरोबर नसल्याने होतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रोज रात्री टी. व्ही. बंद करताना फक्त रिमोटने न करता त्यानंतर त्याचा सप्लाय पॉइंटचा स्वीच बंद करणे आवश्यक आहे. अन्यथा रात्रभर विद्युत प्रवाह टी. व्ही.मध्ये राहून शॉर्ट सर्किटची शक्यता असते. त्याचबरोबर आपल्या लाइट बिलात वीस टक्क्य़ांची बचत होते.
वातानुकूल यंत्र (एसी) : आजकाल घरोघरी एसी बसविलेले आढळतात, त्याचे नियमितपणे सव्र्हिसिंग, गॅस चार्जिग इ. करून घेणे आवश्यक आहे, अन्यथा शॉर्ट सर्किट होऊन कॉम्प्रेसरमुळे आग लागल्याचे बरेचदा वाचायला मिळते. अर्थिगही पूर्ण सक्षम असावी.
संगणक : जर संगणकाचे अर्थिग चांगले नसेल व कुठेही लूज कॉँटॅक्ट्स असतील तर त्यातील डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किट निकामी होईल आणि त्यात साठविलेली माहिती निघून जाईल, तसेच विजेचा शॉकसुद्धा बसू शकतो.
पाण्याचा गिझर : गिझरचे लोड हे साधारणपणे २ ते ५ किलोव्ॉट असल्यामुळे आणि करंटचा सतत पाण्याशी संबंध येत असल्यामुळे इथे जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. पावर प्लगचे फेज, न्यूट्रल व अर्थचे तिन्ही टर्मिनल बरोबर जोडणे, अर्थिग सक्षम ठेवून लूज कॉन्टॅक्ट्स टाळणे या गोष्टी व्यवस्थित असतील तरच गिझरचा वापर करावा, तसेच अंघोळ करताना अथवा नंतर ओल्या हाताने स्विच, ऑन-ऑफ करू नये, ते प्राणघातक ठरू शकते.
इलेक्ट्रिक आयर्न : अर्थात कपडय़ांना इस्त्री करणारे यंत्र, इस्त्री सुरू करण्यापूर्वी त्याच्या वायरची आपण थोडी तपासणी करावी. कुठे इन्सुलेशन निघाले आहे का, वायरला जोड दिला असल्यास टेपिंग केले आहे का वगैरे बाबी ग्राहकाने पाहणे अत्यंत आवश्यक आहे. इस्त्री करतानाचे अनेक अपघात हे ग्राहकांच्या निष्काळजीपणा व फाजील आत्मविश्वासाने होतात.
ई. एल. सी. बी. : प्रत्येक विद्युत ग्राहकाने आपले मेन स्विच (एम. सी. बी.) जवळ योग्य क्षमतेचे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर लावणे आवश्यक आहे. ज्यामुळे विद्युत उपकरणांवर, काही दोष निर्माण झाल्यास ई. एल. सी. बी.मुळे सर्किट ट्रिप होऊन ग्राहकास संरक्षण मिळते.
ग्राहकाला विजेचे काहीही काम आपल्या इमारतीत करायचे असल्यास ते नियम क्र. ४५ प्रमाणे लायसन्स इलेक्ट्रिकल कॉँट्रॅक्टरकडूनच घ्यावे व त्यानंतर त्याच्याकडून टेस्ट रिपोर्ट घेतल्यानंतरच पेमेंट करावे.
अशा प्रकारे आपल्या घरात व इमारतीत योग्य ती दक्षता विद्युत ग्राहकाने घेतल्यास शॉर्ट सर्किट व आगीमुळे होणारे धोके टाळता येतात. ग्राहकांचे विद्युत नियमाप्रमाणे अधिकार खालीलप्रमाणे.
० जर एखाद्या ग्राहकास मीटरच्या बाबतीत किंवा बिलिंग इ. बाबतीत काही तक्रारी असल्यास त्या त्या वीज कंपनीमध्ये असलेल्या ‘सी. जी. आर. एफ.’ अर्थात ग्राहक मंचाकडे योग्य ते फॉर्मस् भरून अर्ज केल्यावर हिअरिंग (सुनावणी) नंतर त्यास न्याय मिळतो.
० ग्राहकास या मंचाचा निर्णय मान्य नसेल तर ग्राहक हा त्यावरील अपीलीय अधिकारी ‘ओम्बडसमन’ यांच्याकडे विद्युत कायदा २००३ च्या कलम ४२ (६) प्रमाणे जाऊ शकतो.
० ग्राहकास नावात बदल करून पाहिजे असल्यास त्याने संबंधित दस्तावेजासोबत वीज कंपनीला अर्ज केल्यावर कलम क्र. ५० प्रमाणे एक महिन्यात बदल होणे बंधनकारक आहे.
० समजा एखाद्या वीज ग्राहकास ठरावीक मुदतीत लाइट बिल भरणे शक्य झाले नाही तर वीज कायदा २००३ च्या कलम क्र. ५६ प्रमाणे वीज कंपनीने १५ दिवसांची नोटीस दिल्यानंतरच वीजपुरवठा खंडित करता येतो. नोटीस दिल्याशिवाय वीजपुरवठा खंडित करणे हे पूर्णत: बेकायदेशीर आहे. काही वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध निसर्ग कवी ना. धों. महानोर यांच्याबाबत अशीच केस गाजली होती. ज्यात वीज कंपनीच्या अभियंत्यावर कारवाई करण्यात आली.
० जर एखाद्या घरगुती ग्राहकास वीज कंपनीतर्फे अचानक कमर्शिअल अथवा औद्योगिक दराने बिल आकारले तर वीज कायदा २००३ च्या कलम क्र. १२७ प्रमाणे संबंधित विद्युत निरीक्षकांकडे सुनावणी होऊन ग्राहकास न्याय मिळू शकतो.
० एखाद्या ग्राहकाच्या संच मांडणीवर (घरगुती, व्यावसायिक वा औद्योगिक) व्होल्टेजच्या चढ-उतारामुळे काही नुकसान झाल्यास भारतीय विद्युत नियम ५४ प्रमाणे वीज कंपनीस ते नुकसान भरून देणे बंधनकारक आहे.
० एखाद्या ग्राहकास त्याची विद्युत संचमांडणी दोषपूर्ण असल्याचे दाखवत जर वीज कंपनी सप्लाय देत नसेल तर नियम क्र. ५२ प्रमाणे ग्राहकाने विद्युत निरीक्षकाकडे जावे. संबंधित विद्युत निरीक्षकांनी संचमांडणीची पाहणी केल्यावर योग्य आढळल्यास ते वीज कंपनीस आदेश देतात. सदर आदेशानंतर वीज कंपनीने २४ तासांच्या आत वीजपुरवठा करणे बंधनकारक आहे.
नुकतेच केंद्रीय विद्युत प्राधिकरणातर्फे (CEA) विद्युत कायदा २०१० मध्ये सुधारणा करून २०१५ सुधारित नियमानुसार, विद्युत ग्राहकास सेल्फ सर्टिफिकेशनचे अधिकार देण्याचे चालू आहे. चार्टर्ड इलेक्ट्रिकल सेफ्टी इंजिनीअरच्या मदतीने हे करणे घाटत आहे; परंतु त्याबद्दल नंतर कधी तरी.
विद्युत ग्राहकाचे सुरक्षेमध्ये किती महत्त्व आहे हे वरील विवेचनावरून लक्षात येईलच. सतत सजग राहून जागरूकतेने वरील नियमांचे अनुपालन केल्यास विद्युत सुरक्षा दूर नाही!
विद्युत सल्लागार आणि सदस्य,
राष्ट्रीय सुरक्षा परिषद,
प्रकाश कुलकर्णी- plkul@rediffmail.com
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2015 रोजी प्रकाशित
विद्युतसुरक्षा : विद्युत ग्राहकांची कर्तव्ये आणि अधिकार
जे घरी, कार्यालयात, कारखान्यात इ. ठिकाणी वीज वापरतात ते सर्व विद्युत ग्राहक असतात.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 26-09-2015 at 01:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power and duties of electric customers