‘वास्तुरंग’(२० जुलै) मधील शरद भाटे यांचा ‘जुनी घरं, जुने शब्द’ हा लेख वाचला. लेख खूप आवडला. लेख वाचताना जुनं ते सोनं, याचीच जाणीव प्रकर्षांने होत होती. घराशी संबंधित वस्तूंचे जुने शब्द नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम लेखकाने केले आहे.
– माधुरी वर्तल

जुन्या स्मृतींना उजाळा
‘वास्तुरंग’मधील ‘जुनी घरे जुने शब्द’ हा लेख आवडला.
क्षण जगून झालेले,
जुन्या पानांत जपावे!
डोळ्यांतील पाण्यानेच,
नवे पान उलटावे!!
कवी सुधीर मोघे यांच्या या ओळी आठवल्या आणि मी पुन्हा एकदा-
त्या गावी त्या तिथवर,
चल झर झर मना पुन्हा
ती निरुंद पायवाट,
वळत वळत जाय आत
ते शिवार, ती विहीर,
पुढे एक लिंब जुना!!
अशा मनाच्या अवस्थेत मी गावी पोहोचलो आणि डोळ्यांसमोर आले-
ते माझे घर, ते माझे घर
जगावेगळे असेल सुंदर
हेच सुंदर घर वस्तूंसह माझ्याभोवती फेर धरून उभे राहिले.
प्रत्येक पिढी स्वत:चं भाग्य घेऊन जन्माला येते, पण स्वत:च्या जन्मापूर्वीच्या काही आनंदांना ती कायमची पारखी झालेली असते.
– सुरेंद्र दातार

कोकणच्या घराची सैर घडली
शरद भाटे यांचा ‘जुने घर जुने शब्द’ हा लेख आवडला. हा लेख मला एकदम कोकणात घेऊन गेला. सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अजूनही आमच्या कोकणातील घरात हे शब्द जसेच्या तसे वापरले जातात, त्यामुळे आम्हाला या शब्दांबद्दल अप्रूप आहे.
– प्रकाश बोंद्रे

आणखी काही शब्द..
शरद भाटे यांचा ‘जुने घर, जुने शब्द’ हा लेख फारच आवडला. विस्मरणात गेलेले बरेच शब्द आठवणींच्या विश्वात घेऊन गेले. पैकी काही शब्द असे-  विहिरीतील पाणी काढायची दोरी म्हणजे रज्जू. कंदील- लालटेन, घराची कौलं, खिडक्या तावदानं, विळी, कोयता, दगडी कुंपण- गडगा अशा अनेक शब्दांची उजळणी झाली.
– विजय गावकर

फण्यार पेटी..
‘वास्तुरंग’मधील ‘जुनी घरे जुने शब्द’ हा लेख आवडला. लेखकाने फक्त एक शब्द लिहिला नाही. बायका उघडझापीच्या कुंकवाच्या पेटीपुढे बसतात त्या पेटीला ‘फण्यार पेटी’ म्हणतात. वेणीफणी करण्याची पेटी. बेळगावला अशा पेटय़ा अजूनही मिळतात.
– माधवी बांदेकर