|| संपदा वागळे

हातात पैसा खुळखुळत असेल तर घर सजवणं ही नवलाईची गोष्ट नाही. पण आमच्या पैशांनी घर सजवणं आणि ते अंगमेहनतीने वर्षांनुवर्ष तसंच टकाटक ठेवणं ही मात्र नक्कीच कौतुकाची बाब म्हणायला हवी. डोंबिवलीतील प्रसिद्ध फोटोग्राफर मनोज मेहता यांचं घर अशा सदाबहार प्रकारात मोडतं. २००१ साली म्हणजे १७ वर्षांपूर्वी नटवलेलं त्यांचं घर आजही बघता क्षणी प्रेमात पडावं असंच आहे.

स्टेशनपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर – हे या घराचं आणखी एक क्वालिफिकेशन. डोंबिवलीतील जवळजवळ सर्व कार्यक्रमात मनोज मेहता यांचं दर्शन होत असल्यामुळे  या जगन्मित्राचं घर शोधताना मला अजिबात अडचण आली नाही. खोजा मशिदीशेजारील नीलकंठ को. ऑ. सोसायटीत पहिल्या मजल्यावर मनोजभाईंचा १२५० स्के. फुटांचा (तीन बेड, हॉल किचन) प्रशस्त फ्लॅट आहे.

ही इमारत उभी राहाण्यापूर्वी याच जागी कैलासभाई मेहता यांचा (मनोजभाईंचे वडील) टुमदार बंगला होता. भोवताली आंबा, काजू, बदाम, नारळ.. अशी झाडं होती. घरात एकत्र कुटुंब पद्धती होती. परंतु मोठी वहिनी गेल्यावर १९८८ मध्ये बंगला बिल्डरला द्यायचं ठरलं.  त्यानंतर यथावकाश काम पूर्ण झाल्यावर २००१ मध्ये मनोजभाई यांचं चौकोनी कुटुंब आपल्या वाटय़ाच्या फ्लॅटमध्ये राहायला आलं. मूळ झाडांपैकी दोन नारळ, औदुंबर आणि वड आजही सोबत करत आहेत. तसंच जुनी विहीरही आपल्या जिवंत झऱ्यांनी अद्यापही सोसायटीतील सर्व बिऱ्हाडांना वापरासाठी पाणी पुरवत आहे.

घरात शिरले आणि सर्वप्रथम दर्शनी भिंतीवरील रोमन शपथविधीच्या चित्राने लक्ष वेधून घेतलं. चित्रातील रंग नुकतंच न्हाऊनमाखून बसलेल्या बाळा इतके टवटवीत! नजर वर जाताच घराला अ‍ॅन्टिक लुक देणारे पाच/सहा वासे दिसले. त्याबद्दल विचारणा केल्यावर मनोजभाईनी या प्रयोगापाठची कथा सांगितली; म्हणाले, ‘नव्या घराचं इंटिरियर करताना आमच्या सुताराने रेल्वे स्लिपर्सचा (रुळांच्या खालच्या पटऱ्या) वापर करण्याविषयी सुचवलं. सांताक्रूज-अंधेरी पट्टय़ात हे स्लिपर्स विकणारी खूप दुकानं आहेत म्हणाला. तिथे गेल्यावर अर्धवट जळक्या अवस्थेतील ते लाकडी ओंडके पाहून मी चरकलोच पण माझा सुतार निश्चिंत होता. म्हणाला, ‘चिंता मत करो, आपका घर हिरा हो जाएगा.. आणि तसंच झालं. ती लाकडं मापात कापून त्याने त्यांचा वापर बेडरुम्स हॉल, देवघर.. अशा ठिकठिकाणी केला आणि घराचा स्वर्ग बनवला..’

हे ऐकल्यावर मी घरभर फिरून त्या कारागिराची जादू बघितली आणि अवाक्  झाले. टेकायला पाठ असलेला हॉलमधील झोपाळा तर एवढा भक्कम की तो उचलायचा झाला तर १०/१५  माणसं सहज लागावीत. जडपणामुळे झोकाही मंदच येतो आणि डुलता डुलता वाचन समाधीही सहज लागते.

स्लिपर्समधून जन्माला आलेली एक सुरेख शिडी झोपाळ्यासमोरच्या भिंतीला चिकटून तिरपी लावलेली दिसली. तिच्या एका बाजूला पेन्सिलचा आकार दिलाय. या शिडीची गंमत मधुरा मेहता सांगू लागल्या.. ‘आम्ही जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा मुली लहान होत्या. त्यांच्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये बंग बेड बनवला आणि वर चढायलाही पेन्सिलची शिडी केली. कालांतराने बंग बेड निकालात निघाला तेव्हा मनोजनी ती शिडी हॉलमध्ये आणून पूर्व दिशेला वळलेल्या स्थितीत भिंतीवर स्थानापन्न केली. त्यामुळे हॉलची शोभा तर वाढलीच शिवाय त्यांच्या व्यावसायिक प्रगतीचा आलेखही वर वर चढत गेला..’

देवघराची मांडणी ईशान्य दिशेला स्वतंत्र जागेत केलीय. सर्वासमोर नतमस्तक व्हा असं. सांगणारा जैन धर्मातील नमोकार मंत्र देवघराच्या वर सुवाच्य अक्षरात कोरलेला दिसला. दाराच्या लाकडी डिझाइनमध्ये अनेक छोटय़ा घंटा बसवल्या आहेत. मेहता हे दिगंबरपंथीय जैन असल्यामुळे भगवान महावीर, सिद्ध, पाश्र्वनाथ या र्तीथकरांच्या पारंपरिक मूर्ती दवघरात विराजमान झाल्या आहेत. पाठीमागच्या बाजूला लावलेला पूर्णाकृती आरसा हे या देवघराचं वैशिष्टय़. या रचनेमुळे देवापुढे उभं राहून हात जोडले की आपण स्वत:लाच नमस्कार करतोय असं वाटतं. या पाठचा हेतू हा की आपल्या हृदयातही देव आहे याची जाणीव व्हावी आणि हातून चांगलं कर्म घडावं- इती मनोजभाई.

६५० स्के. फुटांचा ऐसपैस हॉल (एखादी कबड्डीची मॅच खेळता येईल असा) हे या घराचं प्रमुख सौंदर्यस्थळ. एका बाजूला सोफासेट आणि दुसऱ्या कोपऱ्यात बैठक (मधलं ब्रह्मांड खुलं) एवढं मोजकं फर्निचर जाणीवपूर्वक ठेवल्याने इथे अनेक मैफिली रंगल्या आहेत. कीर्तन – प्रवचनं तर किती झाली याची गणतीच नाही. राहायला आल्याच्या दुसऱ्याच वर्षीची गोष्ट. डोंबिवलीतील एका आध्यात्मिक मंडळाला रामनवमींच्या प्रवचनासाठी हॉल मिळत नव्हता. तेव्हा या घराने आपणहून मदतीचा हात पुढे केला आणि जवळजवळ दीडशे बायकांनी डॉ. श्रीकृष्ण देशमुखांचं (कोल्हापूरचे) दासबोधावरील रसाळ प्रवचन घरभर बसून मोठय़ा भक्तिभावाने ऐकलं. त्यानंतर या घराला ती सवयच लागून गेली.

भरपूर वारा आणि उजेड देणारी हॉलची लांबलचक (२५ फूट बाय ५ फूट) खिडकी हे घरातील माणसांचंच नव्हे तर आसपासच्या पक्ष्यांचंही आनंदाचं निधान. या खिडकीच्या आतील बाजूस असलेल्या ग्रॅनाइटच्या ओटय़ावर पक्ष्यांसाठी कायम काही ना काही खाऊ ठेवलेला असतो. चिमण्या, कबूतरच नव्हे तर बुलबुल, दयाळ, पोपट असे पक्षीही धीटपणे आत शिरून त्यावर ताव मारतात. खारूताईही झोपाळ्याच्या दांडय़ावरून  तुरुतुरु पळत असते. यापुढचा कहर म्हणजे एखाद दिवशी हॉलची खिडकी उघडायला उशीर झाला तर चिमण्या बेडरूमच्या खिडकीशी येऊन चोचीने टकटक करत घरच्या मंडळींना उठवतात म्हणे!

डायनिंग टेबलविना स्वयंपाकघर आणि टी.व्हीखेरीज हॉल हे या घराचं आणखी एक अप्रूप. खाली बसून जेवण्याची आपली संस्कृती जपणं आणि येणाऱ्या पाहुण्यांशी विनाव्यत्यय संवाद हे त्यापाठचं मर्म.

मनोजभाईंचे वडील कै. कैलासबाई मेहता हे एक यशस्वी वकील आणि तळमळीचे समाजकारणी होते. आईवडिलांच्या निधनानंतर मनोज भाईंनी त्यांच्या नावाने डोंबिवली परिसरातील गुणवंतांना पुरस्कर देऊन गौरवण्याची प्रथा सुरू केली. गेली २२ वर्ष अव्याहतपणे सुरू असलेल्या या उपक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे पाय या घराला लागले आहेत. वानगीदाखल ही काही नावं.. डॉ. स्नेहलता देशमुख, कुमार केतकर, ग. प्र. प्रधान, सुधीर गाडगीळ, प्रवीण दवणे, मृणाल गोरे.. असे अनेक. यावर्षी जब्बार पटेल यांचं नाव या यादीत  झळकणार आहे.

मेहता दाम्पत्याच्या दोन्ही मुलींची उत्तुंग करियर याच घरात घडली. आता मोठय़ा मुलीचं लग्न झालंय आणि धाकटी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेली असल्याने सध्या घरात सभासद संख्या फक्त दोन. पण मित्रपरिवार अफाट. त्यामुळे घरात माणसांचा सतत राबता. केवळ माणसांनाच नव्हे तर पशुपक्ष्यांनाही लळा लावणाऱ्या आपल्या घराबद्दल ती दोघं भरभरून बोलत असताना माझी नजर सहज प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीकडे गेली. डार्क मरून रंगाच्या त्या भिंतीवर पांढऱ्याशुभ्र अक्षरात सुलेखन पद्धतीने एक सुविचार लिहिलेला दिसला-

सुखालाही कधी वात बनवून

दिव्यात तेवत ठेवावं

मग ते आपोआपच घरभर पसरतं..

वाचता वाचता ते सुख माझ्याही तनामनात शिरलं आणि तृप्त मनाने मी त्या घराचा निरोप घेतला.

waglesampada@gmail.com