मला कामानिमित्त बऱ्याच वेळा दिल्लीला जावे लागते. बहुतेक वेळा माझी धावती भेट असते. काम आटोपले की लगेच निघायचे अशा स्वरूपाची. पण कधीकधी उलटेही होते. वेळ कुठे काढायचा, असाही प्रश्न पडतो, असा प्रसंग दोनदा माझ्यावर आला.
एकदा श्री गंगानगरला जाणे झाले होते. तेथून रात्रीची गाडी पकडली आणि सकाळी सात-सातेसातच्या सुमारास नवी दिल्ली स्टेशनवर पोचलो. माझे विमान दुपारचे होते. एवढा वेळ कुठे काढायचा हा प्रश्न होता. मी रमतगमत जनपथ रस्त्यावरील ‘सरवण’ हॉटेलमध्ये पोचलो. सावकाश मस्त नाश्ता केला. सरवणा म्हणजे दिल्लीचे वैशाली. त्यामुळे उत्तमत्तेची खात्री! म्हणूनच बाहेर पडताना मन तृप्त होते. पुन्हा रमतगमत जनपथावरून पार्लमेंट स्ट्रीटवर आलो आणि ‘जंतरमंतर’मध्ये घुसलो. सकाळची साडेदहाची वेळ असावी. जनपथवरची दुकानेही नुकतीच उघडायला सुरुवात झाली होती. जंतरमंतरही नुकतेच उघडले असावे. ‘उशिरा उजाडणे’ हा दिल्लीचा नेहमीचाच खाक्या आहे. त्यात नवीन काही नाही.
छायाचित्रकारांना आकृष्ट करणारे जानेवारीतले दिवस. दिल्लीतही चावरी थंडी, पण सकाळचे कोवळे ऊन पडलेले. त्यामुळे उबदारपणा आणि प्रसन्नपणा आसमंतात पसरलेला. म्हणजे चित्तवृत्ती अगोदरच फुललेली. अशा बहारदार वातावरणात मी जंतरमंतरमध्ये प्रवेश केला. तो समोर आली मोठाली शिल्पे. लाल रंगाची आणि अनोख्या आकारांची. तीसद्धा हिरव्यागार हिरवळीवरती डौलाने उभी असलेली. या दृश्याने मी हरखून गेलो. माझ्यासाठी ती फोटोग्राफिक मेजवानीच होती. तिचा मी मनसोक्त आनंद घेतला. पुढचे दोन तास कसे गेले ते माझे मलाही कळले नाही. सगळे फोटो झकास आले. हा शेवटी मांडणीचा खेळ असतो. कॅमेऱ्याच्या चौकटीत कुठला भाग बसवायचा आणि कसा बसवायचा, एवढाच खेळ फोटोग्राफीत आपण नेहमी करत असतो. इथे मला एकाच दृश्याकडे अनेक कोनांतून बघता येत होते. चांगला कोन हुडकायचा आणि क्लिक करायचे. एवढेच माझे काम होते. हे सर्व ‘कॅलिडोस्कोप’सारखे होते. थोडा बदल केला की मांडणी बदले आणि नवी मांडणी पहिल्यापेक्षा चांगली वाटे. एकाच वस्तूत इतके कोन क्वचितच पाहायला मिळतात. फक्त पाहणारा डोळा थोडा चौकस पाहिजे. त्यामुळेच बहुधा जगातल्या सर्व छायाचित्रकारांना ‘जंतरमंतर’ हे ठिकाण नेहमीच आकृष्ट करत आलेले आहे आणि पुढेही करत राहील. माझी आत्यंतिक आवड म्हणूनच मी फोटोग्राफी करत आलो आहे. पण हे जरी ‘स्वांतसुखाय’ असले तरी यामागे आणखीनही एक भावना होती. ती म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे, मित्रमंडळींचे प्रबोधन व्हावे ही इच्छा नेहमीच असे आणि माझ्या लिखाणाला पूरक हे फोटो व्हावेत, अशीही एक इच्छा होतीच. ज्यामुळे माझे लिखाण झटकन वेधत होते आणि त्यामुळे वाचले जाण्याची शक्यता निर्माण होते. अर्थात, हे जाता जाता मिळणारे फायदे आहेत. मुख्य गोष्ट फोटोग्राफी मला मनापासून आवडते आणि त्यातून मला आनंदही मिळतो.
सवाई जयसिंग यांची वेधशाळा
जंतरमंतर हे नावाप्रमाणे यंत्र आणि मंत्र यांचे अपभ्रंश रूप आहे. ही राजा सवाई जयसिंगाची वेधशाळा. मुघल बादशाहच्या सांगण्यावरून त्याने ती बांधून घेतली. बहुतांश यंत्रे ही छायाप्रकाशाच्या दिवसांतल्या खेळावर बेतलेली आहेत. मला त्या वेळच्या तज्ज्ञांचे अतिशय कौतुक वाटते. कारण त्यांना त्या काळातसुद्धा ही यंत्रे कशी बांधायची याचे पूर्ण ज्ञान होते. त्याची अचूकता आजही वादातीत आहे. हीच सर्वात आश्चर्यजनक गोष्ट वाटते. अशाप्रकारची वेधशाळा ही जगामध्ये एकमेव असावी. दिल्लीची ही वेधशाळा १७२४ साली बांधली गेली. जयपूरची १७३४ साली. तिसरी वेधशाळा छोटेखानी आहे आणि ती बनारसला आहे. गंगाकाठच्या राजाच्या राजवाडय़ाच्या छतावरती आहे. यातल्य पहिल्या दोन वेधशाळा सवाई जयसिंगने बांधल्या. तिन्ही आजही चांगल्या स्थितीत आहेत. त्याने मथुरा आणि उज्जन येथे अजूनही दोन वेधशाळा बांधल्या होत्या. पण आता त्याचा मागमूसही शिल्लक नाही. बनारसची वेधशाळा मात्र राजा मानसिंगाने १५९० साली बांधली, असा इतिहास सांगतो.
राजा जयसिंगाने दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक म्हणजे जंतरमंतरसारख्या वेधशाळा बांधल्या आणि दुसरी त्याहून मोठी गोष्ट म्हणजे जयपूर शहराचे प्लॅनिंग केले. तेही नवग्रहांवर आधारितच केले. या प्रकारच्या प्लॅनिंगला ‘ग्रिड आयर्न पॅटर्न प्लॅनिंग’ म्हणतात. या धर्तीचे प्लॅनिंग चंदिगडच्या वेळी झाले. जे मुळात मॅथ्यू नोहिकी आणि अल्बर्ट मेयर या दोघांनी मिळून केले होते. असेच प्लॅनिंग किमान सव्वादोनशे वर्षे आधी जयपूरला झाले होते. ही मला स्वत:ला खूप अभिमानाची गोष्ट वाटते. म्हणून महाराजा जयसिंग याचे योगदान फार महत्त्वाचे मानले जाते. विशेषत: जयपूर प्लॅनिंगबाबत आणि त्याने उभ्या केलेल्या वेधशाळांबाबत ‘वास्तुविद्या’ आणि ‘ज्योतिष विद्या’ या दोन्ही विद्यांना समृद्ध करण्याचा यामागे उद्देश होता. कारण दोघांचाही पाया एकच होता. या दोन्ही विद्यांवर आपल्याकडे भरपूर अभ्यास झालेला आहे. मात्र तरी समाजाचा आज त्यावर फारसा विश्वास नाही. हीसुद्धा एक वस्तुस्थिती आहे.
पण एकेकाळी राजा जयसिंगाचा त्यावर पूर्ण विश्वास होता आणि म्हणून त्याने आपले सर्व आयुष्य वेधशाळा आणि नवीन शहर निर्मितीत घालवले. याकामी त्याचा खजिनाही रिता झाला असेलच. पण इथे माझा मुद्दा वेगळाच आहे. सर्वोच्च आसनावर विराजमान होणाऱ्या राजाकडे त्या वेळी दूरदृष्टी होती. (व्हिजन) आणि म्हणून चिरस्थायी आणि चांगल्या गोष्टी घडल्या. अशीच गोष्ट नेहरूंच्या काळात चंदिगड निर्मितीने झाली. म्हणून जयपूर आणि चंदिगडची निर्मिती यांना भारतीय इतिहासात ‘मैलाचा दगड’ (माईल स्टोन) मानले गेले आहे. विशेषत: नगररचनेच्या क्षेत्रात. पण अशी दृष्टी नसेल तर ‘मुलाखतीत कसा घाम फुटतो’ हेही देशाने परवाच पाहिले आहे.
‘वेळ कसा घालवायचा’ असा प्रसंग पुन्हा एकदा माझ्यावर आला. सुदैवाने मी जवळच होतो. त्यामुळे पुन्हा एकदा माझे पाय आपोआपच जंतरमंतरकडे वळले. या वेळी या सर्व यंत्रांची माहिती करून घ्यावी असे मनात होते.
त्याप्रमाणे परिसराच्या मध्यभागी असलेल्या यंत्राकडे पोचलो. याचा आकार काटकोन त्रिकोणासारखा आहे, याला खडा जिना आहे. (म्हणजे कुठेही लँडिंग नाही.) शिवाय हे सर्वात उंच यंत्र आहे आणि म्हणून लक्षवेधक देखील. याच्या दोन्ही बाजूला दोन जिने आहेत. मधून अचानक वळणारे. ते का वळले, याचे कारण कळत नाही. तरी एक शिल्प म्हणूनसुद्धा हे दोन्ही प्रकार पाहायला छानच वाटतात. जयपूरमधल्या याच यंत्राला दोन्ही बाजूला अर्धवर्तुळाकार पंख आहेत. त्यामुळे पाहताना ते अजूनच मजेशीर दिसते. पुण्यातल्या ‘आयुका’मध्येही या यंत्राची एक प्रतिकृती आहे. केवळ जुन्या वेधशाळेच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. याचे नाव आहे ‘सम्राट यंत्र’! याचे मुख्य काम वेळ मोजणे! आणि याचे तोंड उत्तरेकडे आहे.
याच्या बरोबर मागे जे यंत्र आहे, त्याचे नाव जयप्रकाश यंत्र. हे यंत्र अर्धे जमिनीवर आहे आणि अर्धे जमिनीखाली आणि याच्या दोन सारख्या प्रतिकृती आहेत शेजारी शेजारी. हे यंत्र अतिशय गुंतागुंतीचे आहे. पाहताना तर थक्कच व्हायला होते. याची रचना कशी केली असेल ते रचनाकारच जाणोत. ‘उपयुक्ततेनुसार आकार’ (फॉर्म फॉलोज फंक्शन) ही वास्तुकलेतली जुनी उक्ती आहे. इथे ब्रह्मांडाचा वेध घेणे हेच मुळी उद्दिष्ट होते. त्यामुळे असे अगम्य, पण चकित करणारे आकार येणारच. मी सर्वात जास्त वेळ इथे घालवला. माझ्या फोटोग्राफीसाठी. मला अर्थातच भरपूर फोटो मिळाले.
तिसऱ्या गोलाकार यंत्राचे नाव आहे ‘राम यंत्र’. याच्याही दोन सारख्या प्रतिकृती शेजारी शेजारी आहेत. हे यंत्र म्हणजे वर्तुळाच्या परिघावर भिंत आहे आणि केंद्रस्थानी एक खांब आहे आणि त्याला केंद्राकडून परिघाकडे जाणाऱ्या आऱ्या आहेत. जयप्रकाश आणि राम यंत्र ही दोन्ही आकाशातल्या ग्रहताऱ्यांच्या जागा पाहण्यासाठी, शोधण्यासाठी निर्माण केली गेली.
आज या सर्व यंत्रांचा उपयोग शून्य आहे. वस्तूची उपयुक्तता संपली की त्याचा ‘शो पीस’ होतो. म्हणूनच शंभर वर्षांपूर्वीचे, रोजच्या वापरातले घंघाळे उपयोग संपल्यावर दिवाणखान्यात शो पीस म्हणून ठेवले जाते. आजचे जंतरमंतर हे दिल्लीच्या दिवाणखान्यातले एक शो पीसच आहे.
हल्ली जगभर शहरांचे सौंदर्य वाढवण्यासाठी जागोजागी शिल्पकृती ठेवल्या जातात. त्याला ‘आर्ट इन्स्टॉलेशन्स’ म्हणतात. दिल्लीला आयतीच अशी अजब शिल्पे वारसाहक्काने लाभलेली आहेत. तुम्ही वेधशाळेतील यंत्रे म्हणून त्याच्याकडे पहा किंवा शहर सौंदर्य वाढवणारी शिल्पे म्हणून. कसेही पाहिलेत तरी ती तुम्हाला अचंबित करतात. धक्का देतात. पण त्याहून महत्त्वाचे अमूर्तातल्या सौंदर्याची जाणीव करून देतात.
म्हणून जंतरमंतरला मी ग्रेट म्हणतो.