परवा मैत्रिणीबरोबर तिला नुकताच पुनर्विकासांतर्गत नव्याने मिळालेला फ्लॅट बघायला गेले होते. मुंबईसारख्या शहरात अतिशय प्रशस्त असा टू बेड हॉल किचन आणि पुढे सुंदरशी बाल्कनीसुद्धा असलेल्या त्या फ्लॅटमधे राहायला जाण्यापूर्वी तिथे अंतर्गत सजावट चालू होती. सर्व खोल्या ऐसपैस असलेल्या त्या घराचे स्वयंपाकघर मात्र मला फारच लहान वाटले. तिला तसे म्हटल्यावर, ‘‘अगं स्वयपाक करायला अशी कितीशी जागा लागते? आणि आजकाल स्वयंपाकघरात आपण असतो कितीसा वेळ.. शिवाय इथे कुणाला पाट रांगोळ्या घालून जेवणाच्या पंगती बसवायच्यात या स्वयंपाकघरात?’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरी आल्यावर तिच्या पाटरांगोळीची पंगत शब्दावरच विचार करत बसले. नुकतीच कोकणातील आजोळच्या ऐसपैस घरात जाऊन आल्यामुळे वरचेवर त्याची शहरातल्या घरांबरोबर तुलना मनात चालूच होती त्यात आता पाटाचे निमित्त पुरले. एकेकाळी जेवण खाली पाटावर बसूनच जेवायचे हा रिवाज होता. पाट कमी पडले तर छोटय़ा चटया.. बसकर म्हणजेच अरुंद सतरंजी घेऊन बसायचे, पण शक्यतो जमिनीवर बसून जेवणे अमान्य होते. आजोळच्या लांबलचक स्वयंपाकघरात दारामागच्या कोनाडय़ात किमान १०-१२ तरी चांगले भरभक्कम असे लाकडी पाट ठेवलेले असत. त्यातील काही पाटांच्या चार कोपऱ्यावर खिळ्याने ठोकलेली पितळेची चपटी फुले होती. तेच पाट बसायला घ्यायची आम्हा मुलांमध्ये चढाओढ असायची. आता त्या आठवणीनेही हसू येते ‘‘चला, पाटपाणी घ्या..’’ अशी हाक घरातल्या मुलींना (फक्त मुलींनाच बर का, मुलांना नाही) ऐकू आली की जेवण तयार झाले समजावे. त्या लांबलचक स्वयंपाकघरात घरातली पुरुष माणसे आणि लहान मुला-मुलींची पंगत आधी व्हायची. आणि त्यांना अदबीने वाढायचे काम घरातील बायकांचे असे. त्यांच्यानंतर घरातल्या बायकांची अन्न पुढय़ात घेऊन अंगतपंगत होई. त्यांनी मात्र पाटावर बसले तरी शक्यतो मांडी घालून न बसण्याचा रिवाज होता. त्यामागील कारण मला तरी माहीत नाही. काही खास प्रसंगी त्या लांबलचक पंगतीत ताटाभोवती रांगोळीची महिरप किंवा किमान रांगोळीची चार बोटे तरी काढली जात आणि अशा वेळी उदबत्तीही आवर्जून लावली जाई. थोडक्यात, सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत उदरभरणाचे सर्व कार्यक्रम त्या ऐसपैस स्वयंपाकघरातच चालायचे. फक्त कुणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना चहा-फराळासारखा पाहुणचार मात्र स्वयंपाकघरात न होता बाहेरच्या ओटीवर होई. मात्र कुणी बाईमाणूस पाहुणी आली की तिच्यासाठी चहापाणी मात्र थेट स्वयंपाकघरात तिला पाटावर बसवून होई.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compact kitchen ideas
First published on: 24-02-2018 at 01:01 IST